प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ९ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.
क्विंगमॅंग फेस्टिवल चीनमधे पूर्वजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी साजरा होतो. आजही त्या दिवशी शिजियाझुयांग शहरात द्वारकानाथ कोटणीस यांच्या समाधीवर फुलांची गर्दी होते. चीन जपानच्या युद्धात गावोगाव जाऊन चिनी सैनिकांची सेवा करण्यात त्यांनी जिवाची पर्वा केली. त्यांचं हौतात्म्य आज पंच्याहत्तर वर्षं पूर्ण होऊनही चीन विसरलेला नाही. मूळ वेंगुर्ल्याचे असणाऱ्या डॉ. कोटणीस यांचे वडील सोलापूरचे झाले होते. मुंबईत डॉक्टरकीचं पोस्ट ग्रॅज्युएशन करत असताना ते वयाच्या अवघ्या अठ्ठाविसाव्या वर्षी काँग्रेसने पाठवलेल्या पाच डॉक्टरांच्या टीमचे सदस्य म्हणून चीनला गेले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी जखमी चिनी सैनिकांवर सलग सर्जरी केल्या. अतिश्रमामुळे त्यांनाही ९ डिसेंबर १९४२ला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे ते भारत आणि चीनमधील मैत्रीचं प्रतीक बनले. वी. शांतारामांच्या सिनेमाने त्यांना अजरामर केलं.
गेल्याच वर्षी होमाई व्यारावाला यांच्या जन्मदिनानिमित्त गुगलने त्यांचं डूडल तयार केलं होतं. त्या देशातल्या पहिल्या फोटोजर्नालिस्ट होत्या. जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधे शिकत असताना त्यांना फोटोग्राफीने आपल्याकडे ओढलं. त्या काळात एका बाईने फोटोग्राफीमधे करियर करणं अशक्यप्राय होतं. तरीही ते त्यांनी प्रत्यक्षात आणून दाखवलं. भारतीय स्वातंत्र्ययुद्ध आणि दुसऱ्या महायुद्धातले अनेक ऐतिहासिक प्रसंग त्यांनी कॅमेरात पकडले. त्यांना २०१०मधे पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. नवऱ्याच्या मृत्यूनंतर दीर्घकाळ निवृत्त आयुष्य जगूनही त्या भारतीय महिलांसाठी आदर्श बनून राहिल्या. १५ जानेवारी २०१२ला ९९व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी के. शिवराम कारंथ यांना आधुनिक रवींद्रनाथ टागोर म्हटलंय. १९०२ साली उडुपी येथे जन्म झालेले कारंथ फक्त कन्नडच नाही तर एकूणच भारतीय साहित्यातला मानदंड बनले. महात्मा गांधींच्या प्रभावामुळे ते स्वातंत्र्यासाठी लढले. तो आदर्शवाद त्यांनी आपल्या ९५ वर्षांच्या दीर्घ आयुष्यात मनापासून जपला आणि आपल्या कलेतून मांडला. त्यांनी ४७ कादंबऱ्या, ३१ नाटकं, चार कथासंग्रह, सहा सचित्र निबंधसंग्रह, कलेवरची १३ पुस्तकं, कवितांचे दोन खंड, नऊ विश्वकोश खंड आणि हजारांहून अधिक लेख इतकं विपुल लेखन त्यांनी केलं. त्यांचं शेवटचं पुस्तक त्यांनी वयाच्या ९०व्या वर्षी लिहिलं. यक्षगान या कलेचं पुनरुज्जीवन करण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. त्यांना साहित्यातला सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार मिळालाच. शिवाय पद्मभूषणनेही त्यांना गोरवण्यात आलं. आणीबाणीचा निषेध म्हणून त्यांना हा पुरस्कार सरकारला परत केला होता. त्या कृतीने त्यांना रवींद्रनाथ टागोरांच्या पंक्तीत नेऊन बसवलं.
पाटण्याचा बिहारी बाबू असणाऱ्या शत्रुघ्न सिन्हांसाठी सिनेमांमधला प्रवास सोपा नव्हताच. एफटीआयआयमधून शिकून आणि प्रभावी पर्सनॅलिटी असूनही त्यांना हिरोच्या भूमिका मिळत नव्हत्याच. त्यासाठी सात वर्षं सतत मेहनत करावी लागली. कधी विलनच्या, कधी साईट हिरोच्या भूमिका करून त्यांनी आपली छाप पाडली. जगावेगळी स्टाईल, वजनदार आवाज, कमावलेली डायलॉग डिलिवरी याच्या जोरावर त्यांनी हिरो म्हणून रोल मिळवले. सुरवात झाली सुभाष घईंच्या कालिचरणपासून. मग त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही. राजकारणात केंद्रीय मंत्रिपदापर्यंत झेप घेतल्यानंतरही ते छोट्या मोठ्या सिनेमांमधे अभिनय करतच राहिले. आज ते भाजपमधे राहून नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे गाजत आहेत. एनिथिंग बट खामोश हे त्यांचं आत्मचरित्र आहे.
आरएचटीडीएम म्हणजे रहना हैं तेरे दिल में हा तिचा पहिला सिनेमा. आर. माधवन त्यात हिरो होता आणि दिया हिरोईन. पण त्या आधीच ती आरस्पानी सौंदर्यामुळे लाखों दिलों की धडकन बनली होती. २००० ची फेमिना मिस इंडिया स्पर्धा खासच होती. लारा दत्ता, प्रियांका चोप्रा आणि दिया मिर्झा त्यात पहिल्या तिघी आल्या होत्या. तिघींनीही अनुक्रमे मिस युनिवर्स, मिस वर्ल्ड आणि मिस एशिया पॅसिफिक या इंटरनॅशनल स्पर्धा जिंकल्या. तिघीही बॉलीवूडमधे आल्या. दियाने सुरवात तर जबरदस्त केली. पण त्यानंतर तिच्या वाट्याला मेन रोल कमीच आले. पण तिने छोट्या छोट्या भूमिकांनाही न्याय दिला. तिची ताज्या संजूमधली मान्यता दत्तही लक्षात राहील अशीच होती. शिवाय प्रत्यक्षातही ती नर्मदा आंदोलनापासून स्वच्छ भारत मोहिमेपर्यंत सामाजिक भूमिका मांडत राहिलीय.