९ नोव्हेंबरः आजचा इतिहास

१० नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ५ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ९ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

बर्लिनची भिंत तुटली, जग एकवटलं (सुरवात १९८९)

अमेरिका आणि सोवियत रशिया या दोन महासत्तांच्या भांडणात जग विभागलं गेल्याचं प्रतीक होती ती बर्लिनची भिंत. आजच्याच दिवशी १९८९ साली करार होऊन ही भिंत तोडायला सुरवात झाली. त्यामुळे या घटनेने शीतयुद्ध थांबल्याचं आणि जग एकत्र येत असल्याचा संदेश दिला. कारण वीस वर्षांपूर्वी हे घडू शकेल, असं कुणी सांगितलं असतं तर बर्लिनकरांना ते खरं वाटलं नसतं. दुसऱ्या महायुद्धानंतर नाझी जर्मनीच्या ताब्यातलं बर्लिन शहर अमेरिका, रशिया, ब्रिटन आणि फ्रान्स यांनी वाटून घेतलं. स्टॅलिनच्या ताब्यातल्या पूर्व जर्मनीच्या भागातून इतर भागात हजारोंच्या संख्येने स्थलांतरित होत होते. ते रोखण्यासाठी आधी तारेचं कुंपण आणि नंतर १३ ऑगस्ट १९६३ला पूर्व जर्मनीने काँक्रीटची भिंत बांधायला सुरवात केली. त्यामुळे अनेक कुटुंबांची ताटातूट झाली. पण त्यामुळेच एक युद्ध टळलं, हेही लक्षात घ्यायला हवं.

 

नोबेल विजेते हरगोविंद खुराणा (निधन २०११)

ब्रेन ड्रेनची चर्चा घडवणारे भारतीय जैव-रसायनशास्त्रज्ञ यांचा ९ जानेवारी १९२२ ला जन्म झाला. जनुकीय रचना आणि प्रथिनांच्या रचनेमधील महत्वाचा संबंध शोधण्याच्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी त्यांना रॉबर्ट डब्ल्यू. हॉली आणि मार्शल वॉरेन निरेनबर्ग यांच्यासोबत १९६८ मधे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आलं. मूळ पंजाबी असणाऱ्या खुराणांना तेव्हा भारतीयांना आनंद झाला. पण त्यांनी तो आनंद उपभोगू दिला नाही. इंग्लंड अमेरिकेत शिकून आपण भारतात परतलो तेव्हा आपल्याला योग्य ते काम मिळालं नाही. आपण आज आहोत ते अमेरिकेमुळेच. असं त्यांनी सांगितल्यावर ब्रेन ड्रेनवर भारतात मोठी चर्चा घडली. त्यातून देशात वैज्ञानिक संशोधनाच्या क्षेत्रात काही सुधारणा घडल्या. अनेक भारतीय शास्त्रज्ञांना त्यांनी प्रेरणाही दिली. ८९ वर्षांचं दीर्घ आयुष्य जगलेल्या खुराणा यांचं आजच्या दिवशीच २०११ मधे निधन झालं.

 

कवी सौमित्र किशोर कदम (जन्म १९६७)

आपल्या कवितांमधून रसिकांच्या मनात 'गारवा' करणारे कवी सौमित्र उर्फ किशोर कदम यांचा आज बड्डे. संवेदनशील कलावंत म्हणूनही महाराष्ट्र त्यांना ओळखतो. 'गारवा' अल्बमसाठी त्यांनी लिहिलेली गाणी अजूनही रसिकांच्या काळजात घर करून आहेत. या अल्बममधली 'बघ माझी आठवण येते का?', 'उन्ह थोडं जास्त आहे' ही गाणी गाजली. घरात सलूनचं दुकान असलेल्या सौमित्र यांच्या हातात वडिलांनी कधी कंगवा, कात्री येऊ दिली नाही. सत्यदेव दुबे यांच्याकडे अभिनयाचे धडे गिरवले. रंगभूमी गाजवल्यावर त्यांनी हिंदीत श्याम बेनेगलांच्या अंतर्नाद, मम्मो या सिनेमात सुरवात केली. समर, दिल पे मत ले यार, ब्लॅक फ्रायडे, इस रात की सुबह नहीं, स्पेशल २६ अशा हिंदी सिनेमात काम करत राहिले. पण मराठी सिनेमात त्यांनी घट्ट ठसा उमटवला. बनगरवाडी, जोगवा, देऊळ, नटरंग, बालक पालक, फँड्री अशा त्यांच्या भूमिका गाजल्या. यात सर्वात खास होती, कुटंब नियोजनाचं काळाचं पुढचं काम करणारे प्रा. र. धों. कर्वे यांची ध्यासपर्वमधली मुख्य भूमिका.

 

बायोपिकवाले सुबोध भावे (जन्म १९७५)

एकीकडे अमिताभ बच्चन आणि अमीर खानचा ठग्ज ऑफ हिंदुस्थान रिलीज झालेला असताना आणि काशिनाथ घाणेकर हा मराठी सिनेमा काल रिलीज झाला तेव्हा मराठी सिनेमा नेहमीप्रमाणे दुर्लक्षित होणार, असं वाटत होतं. पण तसं झालं नाही. सुबोध भावेंचा काशिनाथ घाणेकर मराठी रसिकांना आवडतोय. ते त्यांच्यासाठी बर्थडे गिफ्ट ठरलंय. ‘अवंतिका’, ‘वादळवाट’ ते सध्या सुरू असलेली ‘का रे दुरावा’ या टीवी सीरियलने सुबोधना खरी ओळख मिळवून दिली. मराठी रसिकांचा बायोपिकवाला हिरो सुबोध भावेचा आज वाढदिवस. मालिका, नाटक आणि सिनेमांमधून त्याने भूमिका साकारल्या. सनई चौघडे, एक डाव धोबीपछाड, बालक पालक, भारतीय, हापूस, हिंदी अय्या या सिनेमात त्यांनी लक्ष वेधून घेतलं. पण बालगंधर्वच्या बायोपिकने त्यांना स्वतःची ओळख सापडली. खरं तर त्यांनी महात्मा बसवेश्वरमधे या सिनेमात पहिल्यांदा बायोपिक केला होता. पण तो कुणाला माहीत नाही. त्यानंतर लोकमान्य एक युगपुरुष आणि आता काशिनाथ घाणेकरने त्यांना बायोपिकवाले अशी ओळख करून दिलीय. त्यांनी कट्यार काळजात घुसलीचं दिग्दर्शनही केलंय. तेही सुपरहिट ठऱलं.

 

लव ८६ नीलम (जन्म १९६८)

इल्जाम नावाच्या सिनेमात गोविंदा नावाचा एक हिरो मोठ्या पडद्यावर आला. १९८६ सालचा तो सिनेमा पडला. पण त्या हिरोने इतिहास घडवला. त्या सिनेमात त्याची हिरोईन होती नीलम. तिचाही तो दुसराच सिनेमा होता. पहिला जवानी दणकू आपटला होता. पण ती लक्षात राहिली होती. तिला आणि गोविंदालाही ओळख दिली त्याच वर्षीच्या लव८६ या सिनेमाने. त्यानंतर या जोडीने मागे वळून वगैरे पाहिलंच नाही. या जोडीचे एकामागून एक १४ सिनेमे आले. त्यात खुदगर्ज, हत्या, ताकतवर असे हिट सिनेमे होते. गोविंदाचा जोडीदार चंकी पांडेबरोबरही तिची जोडी जमली. त्या दोघांनीही आग ही आग, पाप की दुनिया, खतरों के खिलाडी, घर का चिराग सारखे हिट सिनेमे दिले. ती अमिताभच्या अग्निपथमधेही होती. पण लक्षात राहावी अशी कोणती भूमिका तिला मिळाली नाही. तिनेही कोणती भूमिका अविस्मरणीय वगैरे बनवली नाही. पण हाँगकाँगमधे जन्मलेली नीलम अपघातानेच सिनेमात आली होती. तशीच ती चूपचाप सिनेमातून गुल झाली. हम साथ साथ है, हा तिचा शेवटचा दखलपात्र सिनेमा. अभिनेता समीर सोनीबरोबर लग्न झाल्यावर ती तिच्या ज्वेलरीच्या कौटुंबिक उद्योगात रमलीय.