देशप्रेमाने काठोकाठ भरलेला ‘83’

११ जानेवारी २०२२

वाचन वेळ : ४ मिनिटं


ढीगभर जातीधर्मांमधे विभागून वाद घालत बसणाऱ्या भारताला एकत्र आणणारी गोष्ट म्हणजे क्रिकेट. गोऱ्या सायबाने सुरु केलेल्या या खेळाला भारतात जवळपास धर्माचाच दर्जा दिला जातो. भारतीय क्रिकेटचा इतिहास हा जर एक धर्मग्रंथ असेल तर १९८३ची वर्ल्डकप स्पर्धा हा त्यातला सोनेरी अध्याय आहे. ‘83’च्या निमित्ताने हाच अध्याय आता रुपेरी पडद्यावर साकार होतोय.

भारतीयांना सगळ्यात जास्त अभिमान कशाचा असेल तर तो त्यांच्या जातीय, धार्मिक, भाषिक आणि प्रांतीय अस्मितेचा. सतत आपली अस्मिता कुरवाळत बसणाऱ्या भारतीयांना वाद घालण्यासाठी क्षुल्लक कारणही पुरेसं असतं. पण त्यामुळे देशात कधी जीवघेण्या दंगली पेटल्या तरी क्रिकेट मॅच बघण्यासाठी सगळे एकत्र येतात, ही अतिशयोक्ती वाटत नाही. शेंबड्या पोरापासून ते जुन्याजाणत्या खोडांपर्यंत सगळेच भारतीय क्रिकेटचे चाहते आहेत.

गोऱ्या सायबाने ज्या चांगल्या-वाईट गोष्टी भारतावर लादल्या, त्यातली एक म्हणजे हा क्रिकेटचा खेळ. आज क्रिकेट खेळणाऱ्या बलाढ्य देशांमधे भारताचं नाव आदराने घेतलं जातं. १९व्या शतकात सुरु झालेल्या भारतीय क्रिकेटचा आजवरचा प्रवास कधीच सोपा नव्हता. दुबळ्या टीमपैकी एक असणाऱ्या भारताचं नशीब पालटलं ते १९८३च्या वर्ल्डकप स्पर्धेनं. कपिल देवच्या नेतृत्वाखाली कमजोर वाटणाऱ्या भारताने त्यावर्षी वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावत सगळ्यांनाच धक्का दिला.

‘83’ स्पोर्ट्स ड्रामा नाही

कबीर खान दिग्दर्शित ‘83’ हा शेवटाला फक्त एक स्पोर्ट्स ड्रामा म्हणून न उरता खूप काही सांगून जातो. सिनेमाच्या सुरवातीला आपल्याला दिसतं ते भारतीय क्रिकेट बोर्डाचं ऑफिस. दोन अधिकारी जेवत असताना शिपाई एक लिफाफा घेऊन येतो. त्यात भारताला वर्ल्डकप खेळण्यासाठी पाठवलेलं निमंत्रण बघून ते दोन्ही अधिकारी वैतागल्याचा भाव चेहऱ्यावर आणतात. यावरूनच प्रेक्षकांना भारतीय क्रिकेट टीमची त्यावेळची कामगिरी कळून येते.

तेव्हाच्या वर्ल्डकपमधे भारताची टीम फक्त भारतीयांच्याच नाही तर इतरांच्याही चेष्टेचा विषय बनला होता. त्यात अनुभवी सुनील गावसकरला वगळून अवघ्या ५ वर्षांपूर्वी टीममधे आलेल्या कपिल देवच्या खांद्यावर कॅप्टनपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पूर्व आफ्रिकेचा अपवाद वगळता भारताने इतर कुठल्याही टीमला वर्ल्डकप स्पर्धेत हरवलं नव्हतं. त्यात यावेळी पहिल्याच मॅचमधे त्यांच्यासमोर दोन वेळच्या विश्वविजेत्या वेस्ट इंडीजचं आव्हान होतं.

एकापेक्षा एक महान खेळाडूंचा भरणा असलेल्या वेस्ट इंडीजसमोर भारत अगदीच दुबळा होता. पण कपिल देवने दिलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर भारताने पहिल्याच मॅचमधे वेस्ट इंडीजला आस्मान दाखवलं. त्यानंतर झिम्बाब्वेलाही अगदी सहज हरवलं. हे अनपेक्षित यश भारताला जड गेलं. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीजबरोबर झालेल्या पुढच्या दोन मॅचमधे भारताला अपयश आलं. अश्या कामगिरीमुळे भारतापुढे ‘करा किंवा मरा’ परिस्थिती निर्माण झाली होती.

त्यानंतर मात्र भारताने उचल खाऊन झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. सेमी फायनलमधे इंग्लंडला धूळ चारत भारत फायनलमधे दाखल झाला. यावेळी पुन्हा एकदा त्यांची वेस्ट इंडीजशी गाठ पडली. अगदी तुटपुंज्या धावसंख्येवर भारताचा डाव आटोपला, तेव्हाच वेस्ट इंडीज पुन्हा जिंकणार हे पक्कं झालं. पण प्रत्यक्षात झालं उलटंच! भारताने वेस्ट इंडिजची फलंदाजी झटपट गुंडाळली आणि विश्वविजेतेपदाला गवसणी घातली.

हेही वाचा: देशाने लढाई करावी पासून विश्वचषक जिंकावा हा उन्मादच

खेळाडूंची भूमिका साकारणारे कलाकार

वर्ल्डकप स्पर्धेचा हा थरार पडद्यावर मांडताना दिग्दर्शक कबीर खानचा कस लागलाय. सत्य घटनेवर आधारित असलेले सिनेमे बनवताना प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवता येईल, अशी कथावस्तू गरजेची असते. वसन बाला आणि संजय पुरन सिंग चौहान यांनी लिहलेली पटकथा स्कोरबोर्डइतकीच मनोरंजक आहे. खुमासदार संवादांसोबतच विनोदी आणि भावनिक प्रसंगांची अधूनमधून केलेली पेरणी प्रेक्षकांना कथेच्या गाभ्याशी जोडून ठेवते.

असीम मिश्रा यांची सिनेमेटोग्राफी आणि नितीन बैद यांचं संकलन स्पर्धेतल्या सामन्यांची रंजकता अधिकच वाढवत नेतं. ही निर्मिती साकारण्यासाठी पडद्यामागे राबणाऱ्या तंत्रज्ञांचं विशेष कौतुक करावं लागेल. खेळाडूंच्या चेहरेपट्टीपासून ते ड्रेसिंग रूम, मैदानांच्या तपशीलवार चित्रणातून तो काळ हुबेहूब उभा करण्याचा प्रयत्न या सर्वांनी जमवून आणलाय.

पात्र निवडीसाठी माजी खेळाडूंच्या चेहऱ्याशी मिळतेजुळते चेहरे शोधण्याचं शिवधनुष्य मुकेश छाब्रा यांनी लीलया पेललंय. या खेळाडूंची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी फक्त त्यांच्यासारखं दिसण्याचा आणि वागण्याचाच नव्हे तर खेळण्याचाही प्रामाणिक प्रयत्न केलाय. प्रत्येक कलाकाराने त्या त्या खेळाडूची खेळण्याची शैली अचूकपणे आत्मसात केलीय. टीम मॅनेजर मान सिंगच्या भूमिकेत पंकज त्रिपाठीनेही कमाल केलीय.

क्रिकेटविश्वाला ध्रुवतारा मिळाला

कपिल देवच्या भूमिकेत असलेल्या रणवीर सिंगचा अभिनय निव्वळ अफलातून आहे. कपिलचा धीरगंभीर आवाज, नेहमीचं स्मितहास्य, इंग्रजीत बोलताना एकेक शब्द हळूहळू उच्चारण्याची लकब खरोखरच कौतुकास्पद आहे. पडद्यावर सराव सत्रात सगळ्यांशी जुळवून घेणारा, चिडलेल्या खेळाडूंना शांत करणारा कपिल देव पाहिला की प्रत्यक्षात मिडियासमोर उथळपणे वागणारा रणवीर सिंग हाच का असा प्रश्न पडतो.

रोमी भाटीया-देवच्या भूमिकेत दिपीका पादुकोण आहे. तिने तिच्या वाट्याला आलेली भूमिका चांगली निभावलीय. पण तिच्याऐवजी इतर कोणतीही अभिनेत्री असती तरी फारसा काही फरक पडला नसता. संगीतकार प्रितम आणि दिग्दर्शक कबीर खान हे एक यशस्वी समीकरण असल्याचं ‘83’च्या गाण्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय. अरिजित सिंगच्या आवाजातलं ‘लेहरा दो’ ऐकताना भरून आलेलं मन त्यानेच गायलेलं ‘जितेगा जितेगा’ ऐकताना आनंदी होऊन जातं.

भारतासाठी ही वर्ल्डकप स्पर्धा अतिशय महत्त्वाची ठरली. परतीच्या तिकिटाचे पैसेही कसेबसे जमवणारा तेव्हाची दुबळी भारतीय क्रिकेट टीम आजच्या घडीला सर्वात बलाढ्य आणि श्रीमंत टीमपैकी एक आहे. १९८३च्या या जेतेपदामुळेच भारत आज क्रिकेटविश्वातला ध्रुवतारा बनू शकलाय. या जेतेपदाने भारतीय क्रिकेटचा आर्थिक दुष्काळ संपवला, असंही म्हणता येईल. आता यावर आधरित सिनेमा थिएटरमधला प्रेक्षकांचा दुष्काळ संपवणार, हे नक्की!

हेही वाचा: 

२०२१ : कल, आज और कल

महेंद्र सिंग धोनी: वनडेतला ‘ग्रेट फिनिशर’

ख्रिश्चनांच्या पंढरीत अवतरलीय धर्मगुरूंची क्रिकेट टीम

उगवत्या वर्षात नुसतं न्यू नॉर्मल नको, ‘न्यू निर्भय’ही हवं!

फूटबॉलपटूच्या किकने बदलला मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टिकोन