८ डिसेंबरः आजचा इतिहास

०८ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ८ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

नृत्याला आकार देणारे उदय शंकर (जन्म १९००) 

लंडनमधे स्थायिक झालेल्या बंगाली वकील बापाचा मुलगा रॉयल कॉलेज ऑफ आर्टसमधे चित्रकला शिकत होता. वडिलांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्याने एक डान्स सादर केला. ते अॅना पावलोवा या जगप्रसिद्ध रशियन बॅले डान्सरने पाहिलं. तिने त्याला तिच्या बॅले ट्रूपमधे येण्याचं निमंत्रण दिलं. त्यांनी हिंदू मॅरेज आणि राधाकृष्ण नावाने भारतीय पद्धतीचे बॅले बसवले. ते जगभर गाजले. दीड वर्षांनी त्या विशीतल्या मुलाने स्वतःचा ग्रुप बनवला, उदय शंकर बॅले ट्रूप. 

उदय शंकर यांनी भारतीय शास्त्रीय नृत्याचं कोणतंही प्रशिक्षण घेतलं नव्हतं. मात्र वडिलांच्या बदल्यांमुळे गावागावातली लोकनृत्य मात्र भरपूर पाहिली होती. झालावारच्या राजदरबारात शास्त्रीय नृत्याचा आस्वाद घेतला होता. ते सगळं संचित एकत्र करून उदय शंकर यांनी आधुनिक बॅलेशैलीत बसवलं. या फ्युजनने नृत्याच्या जगात क्रांतीच घडवली. भारतीय नृत्यालाही आधुनिक आकार आला. त्याचप्रमाणे पाश्चात्त्य नृत्यालाही नवी दृष्टी मिळाली. उदय शंकर यांनी जगाला नवी नृत्यशैली दिली. त्याचबरोबर अनेक महान कलाकारही घडवले. त्यातले एक होते, त्यांचे लहान भाऊ, जग जिंकणारे सतारवादक रविशंकर. २६ सप्टेंबर १९७७ला त्यांचं निधन झालं. 

हिंदीचा हिमॅन धर्मेंद्र (जन्म १९३५)

सिनेमातले स्टंट कोणत्याही डुप्लिकेटची मदत न घेता धर्मेंद्र स्वतः करायचे. ‘मां’ सिनेमात त्यांनी चित्त्यासोबत खरीखुरी फाइट केली होती. अशा पद्धतीची रिस्क घेणारे बॉलीवूडमधले ते पहिले अॅक्टर ठरले. बॉलीवूडमधली सूपरस्टार जोडी म्हणून धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्याकडे बघितलं जातं. साठ वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत धर्मेंद्र यांनी अनेक सुपरहिट सिनेमे दिले. सनी देओल, बॉबी देओल आणि ईशा देओल ही त्यांची मुलंही बॉलीवूडमधे आहेत.

बॉलीवूडला अमिताभ बच्चनसारखा तगडा अॅक्टर देणाऱ्या ‘जंजीर’ सिनेमासाठी अगोदर धर्मेंद्र यांना विचारणा झाली होती. पण प्रकाश मेहरासोबत काम करणार नाही, असा शब्द बहिणीला दिल्यामुळे धर्मेंद्र यांनी हा सिनेमा सोडून दिला. पूर्वीच १९६० मधे 'दिल भी तेरा हम भी तेरी' या सिनेमातून त्यांची बॉलीवूडमधे एंट्री झाली. त्यानंतर आजपर्यंत त्यांनी हिट सिनेमे दिले. ते खासदारही बनले. २०१२ मधे त्यांना पद्मभूषणने सन्मानित करण्यात आलं. अलीकडे 'यमला पगला दीवाना', 'सेकंड हसबंड', 'डबल दी ट्रबल', 'सिंह साहब द ग्रेट' यासारख्या सिनेमात धर्मेंद्र यांनी काम केलंय. 

तैमूरची आजी शर्मिला टागोर (जन्म १९४६)

सिनेमातल्या अॅक्टिंगच्या जोरावर पद्मभूषण मिळवलेल्या शर्मिला टागोर सध्या तैमूरची आजी म्हणून चर्चेत आहेत. बॉलीवूडमधे सध्या स्टारकीडची क्रेझ आहे. यामधे सगळ्यात जास्त भाव खाऊन जातोय तो शर्मिला टागोर यांचा नातू छोटा नवाब तैमूर अली खान. शर्मिला यांची दोन्ही मुलं सैफ अली खान आणि सोहा अली खान बॉलीवूडमधे आहेत. अलीकडेच करीना कपूरने आपल्या सासूबाई शर्मिला टागोर यांच्यावर बायोपिक करण्याची इच्छा व्यक्त केलीय.

आज ८ डिसेंबरला धर्मेंद्र यांच्यासोबतच शर्मिला टागोर यांचाही आज वाढदिवस. दोघांनी ८ सिनेमांत एकत्र काम केलं. यापैकी १९६९ मधे आलेला ‘सत्यकाम’ हा हिंदीतला क्लासिक सिनेमा ठरला. पहिल्यांदा १९५९ मधे एक बाल कलाकार म्हणून अपूर संसार या सत्यजित राय यांच्या जगप्रसिद्ध बंगाली सिनेमात रोल केला. १९६४ ला कश्मीर की कली मधून त्या हिंदी सिनेमात आल्या. राजेश खन्ना यांच्यासोबत त्यांनी अनेक सिनेमांत काम केलं. ६०-७० च्या दशकात आलेले 'अमर प्रेम', 'दाग', 'आराधना' यासारखे सिनेमे शर्मिला टागोर यांच्या भूमिकेमुळे अजूनही प्रेक्षकांच्या ध्यानात आहेत. एकेकाळी त्या हिंदी सिनेमाच्या सेक्स सिंबल होत्या. स्वतः सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष झाल्यावर मात्र त्यांनी शरीरप्रदर्शनाला कात्री लावायला सुरवात केली. 

पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल (जन्म १९२७)

पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांचा आज ९१ वा वाढदिवस आहे. राष्ट्रपतीपदासाठी रामनाथ कोविंद यांच्याआधी बादल यांच्या नावाची चर्चा होती. १९५७ मधे पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक जिंकलेले बादल हे शिरोमणी अकाली दल या पंजाबमधल्या प्रादेशिक पक्षाचे प्रमूख आहेत.

चारवेळा पंजाबचे मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांच्या नावावर आहे. १९७० ते ७१, १९७७ ते ८०, १९९७ ते २००२ आणि २००७ ते २०१७ या काळात बादल मुख्यमंत्री राहिले. पंजाबच्या एका जाट शीख घरात त्यांचा जन्म झाला. त्यांचा मुलगाही सुखबीर सिंह हेही पंजाबच्या राजकारणात सक्रिय आहेत. २००९ ते २०१७ पर्यंत सुखबीर हे पंजाबचे उपमुख्यमंत्री होते.

इगोमधे अडकलेली सार्क (स्थापना १९८५)

जागतिकीकरण तोंडावर आलं असताना आपलं प्रादेशिक वेगळेपण जपण्याच्या उद्देशाने सार्कची ८ डिसेंबरला स्थापना झाली. सार्क अर्थात दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेचा उद्देश परस्पर सहकार्यातून भारतीय उपखंडाला शांतता आणि समृद्धी मिळवून देणं, हा आहे. भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान आणि मालदीव हे सात सार्कचे संस्थापक सदस्य आहेत. नेपाळची राजधानी काठमांडू इथं मुख्यालय असलेल्या सार्कमधे अफगाणिस्तानचा नव्यानेच समावेश करण्यात आलाय. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सार्कच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला. सार्क देशांच्या राष्ट्रप्रमूखांनी दरवर्षी शिखर संमेलनात भाग घेऊन आपल्या अडीअडचणींविषयी चर्चा करावी, अशी कल्पना होती. पण आपापसातील इगो प्रॉब्लेममुळे काही देश या संमेलनावर बहिष्कार टाकतायत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या तणावाचा सार्कला मोठा फटका बसतोय.