७ नोव्हेंबरः आजचा इतिहास

०७ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ७ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या.

मराठीचे पाणिनी मोरो केशव दामले यांची दीडशेवी जयंती

मराठीच्या अभ्यासकांना आजही ज्यांना टाळून पुढे जाता येत नाही, असे व्याकरणकार मोरो केशव दामले यांची आज शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती. जन्म ७ नोव्हेंबर १८६८. कविवर्य केशवसुत त्यांचे मोठे भाऊ. मराठी कवितेत केशवसुतांची कामगिरी जितकी महत्त्वाची तितकीच मराठी व्याकरणात मोरो केशव दामलेंची. त्यांचा जवळपास हजार पानांचा ग्रंथ `शास्त्रीय मराठी व्याकरण` मराठीच्या व्याकरणालाच वळण देणारा ठरला. १९११ साली प्रकाशित झालेल्या या ग्रंथाने हिंदीचं आधुनिक व्याकरण रचतानाही उपयोगी ठरला. भाषेच्या अभ्यासकांना आजही हा ग्रंथ माहितीपूर्णच नाही तर रंजकही वाटतो. कारण हजारो शब्दांची आणि वाक्यरचनांची उदाहरणं देऊन मराठी व्याकरणाची मांडणी त्यात आहे. त्यात त्यांनी व्याकरणाच्या अनेक प्रश्नांची चर्चाही केलीय. कोकणापासून अमरावतीपर्यंत आणि पुण्यापासून बडोद्यापर्यंत महाराष्ट्रभर फिरल्यामुळे त्यांना भाषेची उत्तम जाण होती. समाज उभा करायचा असेल तर त्याची भाषा उभी करावी लागते, अशी त्यांची भूमिका होती. उज्जैन आणि नागपूर इथे त्यांनी प्राध्यापकी केली. न्यायशास्त्र या विषयावर दोन महत्त्वाचे ग्रंथ लिहिले. त्यांचं निधन ३० एप्रिल १९१३ला झालं. कृ. श्री. अर्जुनवाडकर यांनी लिहिलेलं `व्याकरणकार मोरो केशव दामले‘ हे चरित्र आवर्जून वाचावं असं आहे.

 

आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसुत (निधन १९०५)

`एक तुतारी द्या मज आणुनि`, म्हणून नवकाव्याचा दणका उडवून देणाऱे कविवर्य केशवसुत उर्फ कृष्णाजी केशव दामले यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म ७ ऑक्टोबर १८६६चा. इंग्रजी कवितेतली माणूसकेंद्री जाणीव त्यांनी ठामपणे आणि वास्तववादी शैलीत मराठी कवितेत आणली. त्यामुळे मराठी कवितेला क्रांतिकारी वळण मिळालं. कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे, असा ते बंडखोरीचा आत्मविश्वास व्यक्त करत होते. `जुने जाऊ द्या मरणालागुनी`, असं म्हणत त्यांनी मराठी वाचकांनाही आधुनिकतेकडे नेलं. झपुर्झा सारख्या गूढ तरीही रोमँटिक कविता त्यांनी लिहिल्या. पण त्यांच्या कविता त्यांच्या काळाला पेलणाऱ्या नव्हत्या. त्यामुळे ते हयात असेपर्यंत त्यांची एकही कविता प्रसिद्ध झाली नाही. त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध करण्याचं श्रेय ह. ना. आपटेंचं. `केशवसुतांची कविता` या त्यांच्या एकमेव काव्यसंग्रहाने त्यांना अजरामर केलं. आजही त्यांच्या कवितेचा प्रभाव मराठी कवींवर आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या मालगुंड या त्यांच्या जन्मगावी त्यांचं स्मारक उभारण्यात आलंय.

 

आहे मनोहरच... सुनीताबाई देशपांडे (निधन २००९)

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या पत्नी ही त्यांची लोकप्रिय ओळख असली तरी सुनीताबाईंची ओळख त्याच्यापलीकडे खूप आहे. सुनीताबाईंची सोबत नसती तर आपण पुलंची जन्मशताब्दी इतक्या उत्साहात साजरा करत असतो, हा प्रश्नच आहे. त्या दोघांचं लग्न १२ जून १९४६ ला झालं. त्या शिक्षिका होत्या. त्या शिक्षकी खाक्यानेच त्यांनी पुलंच्या एकूण करियरला नीट वळण लावलं. स्वतंत्र प्रतिभा असूनही त्यांनी पुलंची सावली बनून राहण्यात समाधाना मानलं. ‘वंदे मातरम’ या मराठी सिनेमात त्या हिरोईन होत्या. नंतरही पुलंच्या ‘बटाटय़ाची चाळ’, ‘वाऱ्यावरची वरात’ या पुलंच्या प्रयोगातही त्यांनी अभिनय केला. त्यांनी पुलंसोबत बा. भ. बोरकर, आरती प्रभू, बा. सी. मर्ढेकर या कवींच्या कवितांच्या सादरीकरणाचे कार्यक्रमही केले. ‘आहे मनोहर तरी’ या पुलंसोबतच्या सहजीवनावर लिहिलेल्या पुस्तकाने त्यांना साहित्यिक म्हणून ओळख मिळवून दिली. ‘मण्यांची माळ’, ‘मनातलं अवकाश’, ‘सोयरे सकळ’ ही पुस्तकं मात्र तितकी गाजली नाहीत. पण त्यांनी जी. ए. कुलकर्णींना लिहिलेल्या पत्रांचं पुस्तक ‘प्रिय जी. ए.’ मात्र एक मास्टरपीस ठरलं. पु. ल. देशपांडे फाऊंडेशनमधून त्यांनी जवळपास एक कोटी रुपयांची मदत विविध संस्थांना मिळवून दिली.

अभिनयाचं विश्वरूपम कमल हासन (जन्म १९५४)

`तेरे मेरे बीच में ऐसा क्या हैं बंधन, अंजाना` अशी साद घालत कमल हासन एक दुजे के लिए या सुपरहिट सिनेमातून हिंदीत आला तेव्हा त्याने देशभरातल्या सिनेरसिकांशी अनोखं बंधन निर्माण केलं. पण त्याचं अभिनयाशी असलेलं बंधन तर सहाव्या वर्षीच होतं. त्याला पहिल्याच सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवलाय. त्यानंतरच्या कारकीर्दीतही त्याने या पुरस्कारावर तीनदा मोहर उमटवली. त्याचबरोबर पाच भाषांमधे वीस फिल्मफेअर पुरस्कारही त्याला मिळालेत. त्याचे सदमासारखे डब किंवा रिमेक हिंदीत गाजले. पण खास बॉलीवूडसाठी केलेले 'सागर' ते  'चाची ४२०' हा प्रवासही प्रभावीच होता. विश्वरूपमचा दुसरा भाग तर याच वर्षी येऊन गेलाय. एकूण १९० सिनेमांत त्याने काम केलंय. पण निर्मितीपासून गीतलेखनापर्यंत अनेक क्षेत्रात त्याची प्रतिभा सिद्ध झालीय. पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कारांनी सन्मानित कमल हासन सध्या त्याच्या नव्या राजकीय पक्षाची उभारणी करतोय. तामिळनाडूत जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करतोय.

 

मिस्टर योगी मोहन गोखले (जन्म १९५३)

नाईन्टीजच्या पिढीला मोहन गोखले माहीत आहेत ते `मिस्टर योगी` म्हणून. याच नावाच्या दूरदर्शनवरच्या एका सिरियलमधे ते मुख्य भूमिकेत होते.  दूरदर्शनच्या अशाच अनेक सिरियलमुळे त्यांचे देशभर चाहते होते. खोल घारे डोळे आणि त्याहीपेक्षा खोलातला आवाज ही त्यांच्या अभिनयाची शक्तिस्थळं होतं. ज्येष्ठ पत्रकार बापू गोखले यांचे ते चिरंजीव. पुण्यात त्यांनी स्पर्धा गाजवल्या. शिवाय 'घाशीराम कोतवाल', ' महापूर', 'मिकी आणि मेमसाब' अशी नाटकंही. मुंबईत व्यावसायिक रंगभूमीवर त्यांची 'कस्तुरीमृग', 'सूर्याची पिल्ले', 'बेबी', 'डॉक्टर तुम्हीसुद्धा', 'नरू आणि जान्हवी' या नाटकांनी यश मिळवलं. त्यातबरोबर 'हेच माझे माहेर', 'माफीचा साक्षीदार', 'आज झाले मुक्त मी' हे सिनेमेही चालले. 'बन्या बापू' या सिनेमातलं त्यांच्यावर चित्रित झालेलं `प्रीतीचं झुळझुळ पाणी` हे गाणं आजही त्यांची आठवण करून देते. हिंदीतल्या समांतर सिनेमांमधेही छोट्या पण प्रभावी भूमिकांतून त्यांनी ठसा उमटवला. त्यांची प्रमुख भूमिका होती. त्यात ' मिर्च मसाला', `स्पर्श',  'मोहन जोशी हाजिर हो', 'जाने भी दो यारो', ' मिसिसीपी मसाला' प्रमुख होत्या. कमल हसनच्या `हे राम` या सिनेमात गांधीजींच्या भूमिकेचं शूटिंग सुरू असताना चेन्नईत त्यांचं २९ एप्रिल १९९९ला निधन झालं. त्यामुळे देशभरातले रसिक हळहळले. त्यांच्या पत्नी शुभांगी गोखले आणि मुलगी सई गोखले यांनी त्यांच्या अभिनयाचा वारसा पुढे सुरू ठेवलाय.