चे गवेराची मुलगी दिल्लीत येऊन काय बोलली?

२६ जुलै २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


आज २६ जुलै. हा दिवस क्युबामधे क्रांतीदिन म्हणून साजरा केला जातो. क्युबातल्या या साम्यवादी क्रांतीला ६० वर्ष पूर्ण झालीत. या क्रांतीमधे अर्नेस्टो चे गवेरा आणि फिडेल कॅस्ट्रो यांचं योगदान मोठं आहे. तरुणाई या दोघांची चाहती होती. चे गवेरा तर आजही टी-शर्टवरून आपल्याला भेटतो. त्यांची मुलगी अलिदा गवेरा यांनी नुकतीच भारताला भेट देत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

अर्नेस्टो चे गवेरा हा जगभरातल्या तरुणाईचा आयकॉन. त्यानं क्युबात क्रांती घडवून आणली. साम्यवाद या जगाला तारू शकतो असं चे गवेराला वाटायचं. संपूर्ण जगामधे साम्यवादी क्रांती घडवून आणायची हे त्याचं स्वप्न होतं. जगभरातल्या हुकूमशाही सरकारांच्या विरोधात पेटून उठायला हवं असं तो सांगत फिरायचा. त्यामुळे जगभरातल्या लोकांमधे त्याचं एक वेगळं वलय होतं. आजही आहे.

क्युबन क्रांतीचा इतिहास अभ्यासताना चे गवेराला समजून घेताना तो आपल्या मनावर गारुड करतो. अमेरिकेसारख्या बलाढ्य शक्तीला ५०, ६० च्या दशकात त्याने सळो की पळो करुन सोडलं. १९५९ मधे चे गवेरा भारतभेटीवरही आला होता. क्युबातल्या सशस्त्र क्रांतीला यंदा ६० वर्ष झालीत. त्यानिमित्तानं चे गवेरांची मोठी मुलगी डॉक्टर अलिदा गवेरा भारतात आल्या.

अलिदा गवेरा या वडलांसारखंच पेशाने डॉक्टर आहेत. दिल्लीतल्या कॉन्स्टिट्युशन क्लबमधे त्यांचं एक छोटेखानी भाषणही झालं. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलंय.

क्रांती विचार मांडणाऱ्या अलिदा गवेरा

वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी क्युबाच्या सरकारमधे चे उद्योगमंत्री होते. याच काळात दक्षिण अमेरिकेतले  सर्वसामान्य लोक अनेक आव्हानं पेलत होते. मोठ्या प्रमाणात लोकांचं शोषण होतं होतं. यासाठी सशस्त्र क्रांती हाच उपाय आहे असं चे गवेरांना वाटायचं. त्यामुळे अमेरिकेत क्रांतीचा विचार पोचवण्यासाठी त्यांनी मंत्रीपदावर लाथ मारली.

त्यानंतर सातत्याने अमेरिकेशी पंगा घेतला. अमेरिकेचा एक नंबरचा शत्रू अशी त्यांची जगभरात ओळख झाली. आपल्या वडलांचा हाच संघर्ष पुन्हा नव्यानं जगभरात पोचवण्याचं काम त्यांची मुलगी अलिदा या करताहेत. माणसा माणसांमधे समानता आणि एकजूट निर्माण व्हावी या स्वप्नासाठी त्या झपाटून कामाला लागल्यात. ही भूमिका मांडत त्या जगभर फिरत आहेत.

दिल्लीतल्या छोट्याशा भाषणात त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. आजच्या वर्तमानावर भाष्य केलं. चे गवेरांची वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी हत्या झाली. त्यावेळी अलिदा यांचं वय अवघं ६ वर्ष होतं. वडलांबद्दल त्या भरभरुन बोलल्या. त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

वडलांना मारल्यानंतरही संघर्ष

चे गवेरा क्रांतीचा विचार पसरवायचे. त्याचा राग अमेरिकेच्या मनात होता. कारण हे लोण आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतही पसरत होतं. त्यामुळे त्यांना संपवण्याचा घाट घालण्यात आला. त्यासाठी अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा चे यांच्या मागावर होती. अनेक बंडखोरांना प्रशिक्षण देण्याची मोहिम चे गवेरांनी सुरु केली होती. अखेर बोलवियातल्या सैन्याच्या मदतीनं चे गवेरांना पकडण्यात आलं.

१९६७ मधे त्यांची हत्या करण्यात आली. बोलवियातल्या सैन्यानं त्यांना मारलं. त्यांचं प्रेत देशात आणण्यासाठीही संघर्ष करावा लागला, असं अलिदा यांनी सांगितलं. फिडेल कॅस्ट्रोंशी त्यांच्या कुटुंबाचे खूप जिव्हाळ्याचे संबंध होते. पण वडील राजकारणाच्या पलीकडे एक सामान्य जीवन जगण्याला जास्त महत्व द्यायचे. अलिदांचं अख्खं आयुष्य हे वडलांचा क्रांतिकारी वारसा आणि संघर्ष यांच्याशी जोडलं गेलंय.

हेही वाचा: मोहम्मद मोर्सी आणि अरब स्प्रिंगचा वारसा

अमेरिकेचं धोरण आत्मघातकी

शीतयुद्धाच्या काळात क्युबा आणि अमेरिकेत मोठ्या प्रमाणात संघर्ष झाला. मात्र अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी पुढाकार घेत २०१४ मधे क्युबाबाबत एक धोरणं आखलं. क्युबाला भेटही दिली. ट्रम्प यांनी मात्र हे धोरणच रद्द केलं. आणि आपल्या फायद्याचं असं नवं धोरण लागू करण्याची घोषणा केली. त्यामुळे या दोन देशातले संबंध अधिकचं बिघडलेत. अमेरिका आणि क्युबा हा संघर्ष अनेक वर्षांचा आहे.

चे आणि फिडेल कॅस्टो यांनी या महासत्तेविरोधात सातत्याने आवाज उठवला. सातत्याने अमेरिकेच्या धोरणांशी संघर्ष केला. आम्हाला विकासापासून वंचित ठेवण्याचं धोरण अमेरिकेनं अवलंबलं. आपण एका शक्तिशाली देशाविरोधात उभे आहोत. अमेरिका आपल्याला हरवू शकत नाही, असं अलिदा यांनी ठामपणे सांगितलंय.

ट्रम्प हे मानवतेच्या विरोधात

क्युबात राऊल कॅस्ट्रो यांची सत्ता होती. त्यावेळी कॅस्ट्रोची मक्तेदारी खपवून घेणार नसल्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. अलिदांनी भारतभेटी दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सडकून टीका केलीय. याआधीही त्यांनी ट्रम्प यांच्या धोरणांना विरोध केला होता. क्युबातल्या लष्कर, गुप्तचर सेवांना दिला जाणारा पैसा आम्ही रोखू, पर्यटनावर बंदी घालू, असं ट्रम्प त्यावेळी म्हणाले होते.

त्यांची आताची धोरणंही तशीच आहेत. सर्व बाजूंनी क्युबाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न ट्रम्प यांनी सुरू केलाय. ट्रम्प जुन्या काळात रमलेले दिसतात. झालं गेलं विसरून जाऊन क्युबाशी ओबामा यांनी पुढे केलेला मैत्रीचा हात झिडकारायला नको होता, असं अलिदांना वाटतं. अलिदांनी २०१७ ला ‘द वीक’ मॅगझिनला एक मुलाखत दिलीय. त्या मुलाखतीतही त्यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली होती. ट्रम्प हे मानवताविरोधी आहेत असं त्यांना वाटतं.

हेही वाचा: इस्रायलला घडवणाऱ्या आयर्न लेडी गोल्डा मेयर

म्हणून आम्ही अमेरिकेला हरवू शकतो

अलिदा म्हणाल्या, समाजामधे जागरुकता निर्माण होण्याची गरज आहे. सगळ्यांना चांगलं शिक्षण मिळायला हवं. पब्लिक हेल्थ हा सगळ्यांचा अधिकार बनायला हवा. लोकांचं जगणं हा काही व्यवसाय नाही. त्यासाठी आपल्याला जगभरातल्या लोकांसाठी, चांगल्या समाजासाठी लढण्याची गरज आहे. एकटी व्यक्ती काहीच करु शकत नाही. पण एका संघटीत समाजाला कुणीही नष्ट करु शकत नाही. आयुष्य वेगळ्या पद्धतीनं जगता येऊ शकतं हे क्युबानं शिकवलं.

‘आम्ही जगातल्या सगळ्यात शक्तिशाली देशापासून अगदी हाकेच्या अंतरावर राहतो. पण अमेरिकेतलं सरकार आम्हाला त्यांच्यासमोर गुडघे टेकण्याच्या स्थितीपर्यंत आणू शकत नाही. हे शक्य कसं झालं? आमची लोकसंख्या ११ मिलियन आहे. आणि अमेरिकेची ४०० मिलियन. तरीही अमेरिका आम्हाला हरवू शकत नाही. कारण आमचा रस्ता योग्य आहे. आमच्या जनतेत एकी आहे.’

भारत आणि क्युबा यांचं नातं

१९५९ मधे चे गवेरा भारत भेटीवर आले होते. त्यावेळी ते क्युबा सरकारमधे मंत्री होते. पंडित नेहरु भारताचे पंतप्रधान होते. त्यांनी मोठ्या भावासारखं आपलं स्वागत केल्याची नोंदही चे गवेरा यांनी केली होती. अलिदा म्हणतात, चांगल्या समाजासाठी क्युबा प्रयत्नशील आहे. यासाठी जगभरातल्या देशांची एकजूट व्हायला हवी. आपण एक एकटे राहून समाज नाही बांधू शकत.

क्युबामधे आठवड्य़ाच्या दर शुक्रवारी टीवीवर एक भारतीय फिल्म दाखवली जाते. भारत आणि क्युबानं एकमेकांना अधिक समजून घेण्याची गरज आहे. एकजूट म्हणजे काहीतरी एक्स्ट्रा असलेलं मिळवणं नाही. जे थोडफार आहे ते आपण सगळ्यांनी मिळवावं हा त्याचा खरा अर्थ आहे. त्यातूनच चांगला समाज निर्माण होईल. भारत, क्युबा आणि आपण सगळे मिळून हे करु.

भविष्यकाळ चांगला घडवण्यासाठी

आम्ही प्रेम वाटणारी माणसं आहोत. आपल्या सगळ्यांंच्या ताकदीला आपण एकजूट करण्याची गरज आहे. तरच आपण लढू शकू. संघर्ष करु शकू. चांगल्या समाजासाठी याची गरज आहे. असा समाज जिथं समानता असेल. आपला रंग कोणताही असला तरी चांगलं आयुष्य आपल्याला जगता येईल असा समाज निर्माण करण्याची आज गरज आहे. चांगल्या भविष्यासाठी चांगल्या माणसांची गरज आहे.

जोसे मार्टी नावाचा क्युबन कवी आहे. त्यानं क्युबाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. संघर्षात सहभागीही झाला. त्यानं प्रेम पेरलं. आपण चांगला माणूस कसं बनायचं हा संदेश त्याच्या कविता देतात.

जोसे मार्टी आपल्या मित्रांसाठी एक गुलाबाचं फूल घेऊन जायचे. ते म्हणायचे की हे फूल मी मित्रासाठी घेऊन जातोय तसंच ते माझ्या शत्रूसाठी घेऊन जायला तयार आहे. हा असा क्युबा आहे. प्रेम करणारा. याच मार्गानं आपण गेलो तर एक चांगलं भविष्य आपण बनवू शकू.

हेही वाचा: 

उत्तर कोरिया आतून नेमका दिसतो कसा? 

ट्रम्पतात्यांनी भारतासोबत खोटारडेपणा का केला? 

प्रिय मोदीजी, आम्ही देशाच्या भविष्याबद्दल चिंतेत आहोत

काट्याच्या शर्यतीत भारताचा जावई झाला इंग्लंडचा पंतप्रधान 

ट्रम्पतात्यांचा दोस्त नरेंद्र मोदींना शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी झटका