६ डिसेंबरः आजचा इतिहास

०६ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ६ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

क्रांतिसिंह नाना पाटील (निधन १९७६)

महात्मा गांधींनी १९४२ला करेंगे या मरेंगेचा आदेश दिल्यानंतर देशभरात काही ठिकाणी समांतर सरकार उभारणीचे प्रयोग झाले. त्यात सातारा जिल्ह्यातल्या प्रतिसरकारचाच प्रयोग यशस्वी झाला आणि दीर्घकाळ चालला. देश पारतंत्र्यात असताना जवळपास दीड हजार गावांत तेव्हा क्रांतिसिंह नाना पाटलांच्या नेतृत्वात लोकांचं सरकार सुरू होतं.

क्रांतिसिंहांचा जन्म ३ ऑगस्ट १९००. लहानपणापासून वारकरी आणि सत्यशोधक विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता. असहकार आंदोलनाच्या काळात ते सरकारी नोकरी सोडून स्वातंत्र्यलढ्यात उतरले. प्रभावी वक्तृत्व आणि धाडसी स्वभावाच्या जोरावर त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात जाळ पेटवला. १९४२च्या आधीच त्यांना नऊवेळा तुरुंगवास झाला होता. प्रतिसरकारच्या काळात मात्र त्यांना कुणी पकडू शकलं नाही. स्वातंत्र्यानंतर त्यांनी आधी शेतकरी कामगार पक्ष आणि नंतर कम्युनिस्ट  पक्ष आपला मानला. ते सातारा आणि बीडमधून खासदार झाले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचंही त्यांनी नेतृत्व केलं.

ज्ञानोदय काव्योदय रेव्हरंड टिळक (जन्म १८६१)

नारायण वामन टिळक खरं तर हिंदू धर्माचे गाढे अभ्यासक. उत्तम कीर्तनकार आणि पुराणिकही. त्यासाठी त्यांनी ऋषी नावाचं नियतकालिकही चालवलं. कविता आणि लेख लिहिले. पण अचानक त्यांची ख्रिश्चन धर्माशी ओळख झाली. त्याच्या अभ्यासानंतर ते १८९५ ला विचारपूर्वक ख्रिश्चन झाले. पुढे ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलं. ज्ञानोदय या प्रसिद्ध मासिकाचे ते संपादक होते. ख्रिश्चनांच्या उपासनापद्धतीला भारतीय आणि त्यातही मराठी रूप देण्यात त्यांचं योगदान महत्त्वाचं होतं. रेव्हरंड  ही ख्रिस्ती धर्मातली सन्माननीय उपाधीही त्यांना मिळाली. यापेक्षाही एक कवी म्हणून मराठीसाठीचं योगदान फार मोठं आहे. आधुनिक मराठी कवितेचा पाया रचणाऱ्या कवींपैकी ते एक मानले जातात. अभंगांजली, वनवासी फूल, ख्रिस्तायन ही त्यांची काव्यं गाजली. त्यांचं निधन ९ मे १९१९ला झालं. त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई टिळक यांचं आत्मचरित्र स्मृतिचित्रेमुळे ते अजरामर झालेत. 

लोकप्रिय तरीही दर्जेदार वसंत सबनीस (जन्म १९२३) 

बालपण पंढरपुरात गेलेल्या वसंत सबनीसांवर लोककलेचे समृद्ध संस्कार होते. त्या लोककलेला मराठी नाटकांच्या मुख्य प्रवाहात आणून प्रतिष्ठा देण्यात त्यांचं योगदान महत्वाचं होतं. त्यांच्या विच्छा माझी पुरी कराने इतिहास घडवला. दादा कोंडकेच्या साथीने ते अनेकदा बतावणीसाठी उभेही राहत. 
पण तेवढीच त्यांची ओळख नाही. घरोघरी हीच बोंब, कार्टी श्रीदेवी, सौजन्याची ऐशी तैशी, आप्पाजींची सेक्रेटरी, गेला माधव कुणीकडे अशी यशस्वी नाटकं त्यांनी दिली. शिवाय १२ कथासंग्रह, दोन आठवणींची पुस्तकं,  जयवंत दळवींच्या निवडक ठणठणपाळचं संपादन, किशोर मासिकाचं संपादन असं लोकप्रिय तरीही दर्जेदार काम त्यांच्या नावावर आहे.  सोंगाडया आणि एकटा जीव सदाशिवनंतर त्यांनी सचिनबरोबर नवरी मिळे नवऱ्याला, गंमत जंमत, एकापेक्षा एक, अशी ही बनवाबनवी, बाळाचे बाप ब्रह्मचारी असे सुपरहिट सिनेमे लिहिले.

मिस्टर इंडिया शेखर कपूर (जन्म १९४५)

शेखर कपूरच्या नावावर तसे एका हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेही सिनेमे नाहीत. त्याने केलेल्या सिनेमांपेक्षा अर्धवट राहिलेल्या सिनेमांचीच यादी मोठी होऊ शकते. तरीही शेखर कपूर भारतातल्या फार मोठ्या डायरेक्टरपैकी एक आहे आणि पुढेही असेल. मासूम, मिस्टर इंडिया, बँडिट क्वीन, एलिझाबेथचे दोन भाग आणि द फोर फीदर्स हे त्याने डायरेक्ट केलेले सगळेच सिनेमे वेगळे होते आणि जगभर गाजले. 

शेखर कपूर खरं तर देव आनंदचा भाचा. घरच्यांनी त्याला सिनेमापासून दूर ठेवण्याचा खूप प्रयत्न केला. त्या काळात सीए बनून त्याने मल्टीनॅशनल कंपन्यांमधे काम केलं. पण सिनेमाने त्याला भारतात खेचून आणलं. दूरदर्शनच्या सुवर्णकाळात तो अभिनेता म्हणूनही गाजला. विशेषतः त्याच्या आवाजाने लोकांना वेड लावलं. सध्या तो लाईमलाईटपासून दूर असला तरी एक बुद्धिमान कलाकार म्हणून त्याला कायम लक्षात ठेवलं जाईल. 

सर रवींद्र जडेजा (जन्म १९८८)

भारताचा डावखुरा ऑलराउंडर रवींद्र जडेजाचा आज तिसावा बड्डे. वडील सिक्युरिटी गार्ड आणि आई नर्स असलेल्या जडेजाने मोठ्या संघर्षाने टीम स्थान मिळवलंय. सर हे टोपण नाव खरं तर त्याला चिडवण्यासाठी आलं. पण आज त्याने आपल्या कर्तृत्वाने स्वतःची मास्टरकी सिद्ध करून दाखवलीय.  

सौराष्ट्रात जन्मलेल्या जडेजाने २००९ मधे इंटरनॅशनल क्रिकेटमधे आपलं करिअर सुरू केलं. त्याआधी ज्युनियर क्रिकेटमधेही त्याने आपला ठसा उमटवला. टी२०, वनडे आणि टेस्ट अशा तिन्ही प्रकारात जडेजाने आतापर्यंत २००हून अधिक मॅच खेळल्या आहेत. रवीचंद्रन अश्विनसह त्याची बॉलर म्हणून जोडी जमली होती. त्या दोघांनी मिळून देशाला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले. त्यात २०१३चा ऑस्ट्रेलियाला दिलेला ४-० असा व्हाईटवॉशही आहे. त्याने स्थानिक फर्स्ट क्लास क्रिकेटमधे तीन ट्रिपल सेचुरी केल्यात. असा तो एकमेव भारतीय आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमधेही त्याने संघासाठी अनेक उपयुक्त खेळी केल्यात. तरीही आपल्या कामगिरीत तो गुणवत्तेला न्याय देत सातत्य टिकवू शकलेला नाही.