मोनालिसाच्या पलीकडचे युनिवर्सल तत्त्वज्ञ लिओनार्दो दा विंची

०२ मे २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


मागं एका भाषणात राज ठाकरे यांनी लिओनार्दो दा विंचीचा उल्लेख केला होता. इटलीमधे विमानतळाला लिओनार्दोचं नाव दिलंय, हे ऐकताना आनंद झाला, असं त्यांनी सांगितलं. तसा आनंद आपल्या सगळ्यांनाच व्हायला हवा कारण एक चित्रकार म्हणूनच नाही, तर तत्त्वज्ञ, लेखक, वैज्ञानिक, संगीतकार, इंजिनियर म्हणून त्यांनी या युनिवर्सल मॅनने माणसाचं जग आणि भविष्य घडवलं. आज त्यांचा ५००वा स्मृतिदिन.

अनैसर्गिक लैंगिक संबंधाचा त्यांच्यावर १४७६ मधे आरोप झाला. कुणीतरी अनामिकाने न्यायालयाच्या तक्रारपेटीत ९ एप्रिल १४७६ रोजी तशी तक्रार दाखल केली. बराच काळ हा खटला चालला. मात्र कोणताही पुरावा न मिळाल्याने त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता झाली. ते महान प्रतिभावंत होते. शिल्पकार, चित्रकार, वैज्ञानिक, शरीररचनाशास्त्रज्ञ, लेखक, संगीतकार, आर्किटेक्ट, सिविल, मेकॅनिकल, हायड्रोलिक्स आणि मिलिटरी इंजिनिअर अशा प्रतिभांचे ते धनी होते. लिओनार्दो दी सेर पिएरो दा विंची हे त्या महान प्रतिभावंताचं नाव. त्यांनी आजच्याच दिवशी २ मे १५१९ ला त्यांनी जगाचा निरोप घेतला.

लिओनार्दोंचं निसर्गप्रेम

इटलीतल्या फ्लॉरेंस मधल्या विंची येथे १५ एप्रिल १४५२ला अनौरस म्हणूनच त्यांचा जन्म झाला. ते पाच वर्षं आईसोबत राहिला आणि पाच वर्षांनी वडलांनी त्यांना स्वीकारलं. आईने मात्र एका बांधकाम कारागिराशी लग्न केलं. लिओनार्दोला अन्य सात भावंडं होती. पुढे चालून प्रॉपर्टीसाठी यांच्यात वादही झाले. 

लहानपणापासूनच लिओनार्दो तासन् तास निसर्गाच्या आणि पशुपक्ष्यांच्या हालचालीचं बारीक  निरीक्षण करायचा. लिओनार्दोची शिल्पकला, चित्रकला, वास्तुकला अथवा कोणतीही निर्मिती असो, त्यावर निसर्गाचा प्रभाव दिसायचाच. निसर्गाचं संगीत त्यांच्यात अंतर्बाह्य वसलेलं, ठसलेलं होतं. लायर नावाचं तंतुवाद्य ते सुरेख वाजवायचे आणि सुंदर गायचेदेखील. 

हेही वाचा: विज्ञानदिनी ना सीवी रमण यांचा जन्मदिन, ना स्मृतिदिन

निसर्गातच वाढलेल्या लिओनार्दोचं पशू, पक्षांवरही विशेष प्रेम होतं. बाजारात जाऊन पिंजऱ्यातले किंवा बांधून ठेवलेले पक्षी विकत घेत. मग त्यांना आकाशात मोकळं सोडून देत, असा त्यांचा नित्यक्रमच असायचा. घोडा आणि अन्य काही प्राण्यांवर त्यांना ग्रंथदेखील लिहायचा होता. तशा नोंदीदेखील त्यांनी काढून ठेवल्या होत्या.

गुरू वेरोशिओकडे प्रशिक्षण घेतलं

लिओनार्दोंनी शहरातील प्रसिद्ध कलावंत आँद्रेआ देल वेरॅशिओ यांच्याकडे शास्त्रशुद्ध कला प्रशिक्षण सुरू घेतलं. तिथे त्यांनी चित्रकला, शिल्पकला आणि अनेक कलांचा अभ्यास केला. या व्यतिरिक्त इतर कलांकडे त्याचा ओढा होताच. तो अनेक कलांमधे पारंगत झाले होते. किशोरवयातच त्यांना शिल्पकलेचा छंद जडला.

१४७५ साली ‘बॅप्टिजम ऑफ क्राईस्ट’ हे चित्र गुरू  व्हेरोशिओ काढत होते. मुख्य चित्र तसं पूर्णच झालं होतं. लिओनार्दोंनी फक्त देवदूतांचं छोटंसं चित्र त्यात रेखाटलं होतं. मात्र मुख्य चित्राचा भाव खाऊन जावं असं ते रेखाटन केलं होतं. शिष्याची ही अद्भूत प्रतिभा पाहून गुरू व्हेरोशिओ थक्कच झाले. असं म्हणतात की, त्यानंतर त्यांनी कधीच कोणतं चित्र काढलं नाही.

हेही वाचा: १५० वर्षांपूर्वी २०० शोध लावणारे, भारताचे एडिसन शंकर आबाजी भिसे

मिलिटरी इंजिनियर, चित्रकार लिओनार्दो गुरु बनले

लिओनार्दो यांनी १४८२ मधे मिलानचा ड्युक ल्युडोविको स्फोर्जाने लिओनार्दो यांच्यासाठी मिलिटरी इंजिनिअर म्हणून काम केलं. लिओनार्दो अत्यंत शांतताप्रिय आणि मानवतावादी होते. मात्र तरिही विरोधाभास बघा की, त्यांना युद्धासाठी आवश्यक अशा शस्त्रास्त्रांची आणि इतर साधनांची डिझाईन्स तयार करावी लागली. याच दरम्यान त्यांनी किल्ले, चर्च, रस्ते, नाले, कालव्यांची इत्यादी अशा खूप डिजाईन्स बनवल्या. संशोधित तोफांवरही त्यांनी बरंच काम केलं. विविध समारंभाचं आयोजन आणि व्यवस्थापनदेखील लिओनार्दो यांनी पाहिलं.

येथील मठाने येशूच्या जन्माचं स्वागत करणाऱ्या थिमवर आधारित ‘अॅडोरेशन ऑफ द मॅगी’ हे काम केलं. पुढे लिओनार्दो यांनी ड्युकसाठी ‘द लास्ट सपर’ हे जगप्रसिद्ध चित्र बनवलं. द वर्जिन ऑफ द रॉक्स हे चित्र त्याकाळात बरंच गाजलं. हायड्रोलिक आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधली त्यांची कामगिरी डोळे दिपवणारीच होती. 

लिओनार्दो यांनी मिलानला स्वतःचा स्टुडिओ उभारला. या काळात त्यांनी चित्रकला आणि अन्य कला त्यांनी अधिक समृद्ध केल्यात. नवनवीन शिष्य त्यांनी घडवलेत. १४९० मधे सलाई हा शिष्य त्यांच्या संपर्कात आला. त्याचं खरं नाव जियान जिआकोमो कैप्रोटी दा ओरेनो होतं. मात्र हा आणि काही शिष्य लिओनार्दोच्या शेवटच्या क्षणापर्यंत सोबत होते.   

लिओनार्दोंचा शिष्य सलाईवर खूप जीव होता. तेवढाच जीव मोनालिसाया चित्रातही होता. मोना लिसा म्हणजे ‘माय लेडी’ असा अर्थ होतो. जाता जाता त्यांनी मोनालिसाचं चित्र सलाईला सुपूर्द दिलं. त्यानंतर ते अनेक ठिकाणी गेले. अगदी नेपोलियन बोनापार्टच्या बेडरूमपर्यंतही.

हे चित्र मुळातच एक रहस्य आहे. ‘द सिक्रेट ईज हिअर’, रहस्य इथे आहे अशी नोंद लिओनार्दोने चित्रावरच केली असं म्हटलं जातं. तसेच लिओनार्दो या चित्रातील बुबुळावर स्वाक्षरीदेखील केल्याचं सांगितलं जातं.

हेही वाचा: पहिल्या अग्निबाणाच्या यशस्वी उड्डाणाची आज पन्नाशी

लिओनार्दोंनी भविष्यातल्या गोष्टी मांडल्या

लिओनार्दो दोन्ही हातांचा उपयोग कौशल्याने करायचे. एका हाताने लिहीत असताना दुसऱ्या हाताने चित्रदेखील काढण्याचं कौशल्य त्यांच्यात होतं असं म्हणतात. ते मीरर इमेजमधे लिहीत. आरशात जशी अक्षरं दिसतात, तसं ते लिहीत. काही जणांच्या मते ते आपलं सिक्रेट लपवण्यासाठी म्हणून असं लिहीत. तर काहींच्या मते ते अत्यंत स्वाभाविक होतं.

टाईम ट्रॅवहलरमधून पुढील कितीतरी शतकांचा प्रवास करून त्यांनी भविष्यातलं जग प्रत्यक्ष पाहिलं की काय असंही वाटायला लागतं. आज प्रत्यक्षात दिसणाऱ्या कितीतरी संकल्पना त्यांनी लेखनातून, रेखाटनांतून मांडल्या होत्या. पक्षांसारखं माणसाला उडता येईल काय, याचाही ते विचार करायचे. आजचं हेलिकॅप्टर, पॅराग्लाईडर, पॅरॅशूटसदृश्य अनेक स्केचेस त्यांच्या नोंदवहीत सापडतात. अलार्मचं घड्याळ, कात्री, झुलते पूल, पॅडल बोट, पाणबुडीचा पोषाख, कॉण्टॅक्ट लेंस अशा कितीतरी गोष्टी भविष्यासाठी देण ठरल्यात.

पुढे त्यांची अभिरूची या विषयात शरीररचनाशास्त्राचा अभ्यास या अंगानेही वाढत गेली. तेव्हा अॅण्टनी पॉलिओलो या क्षेत्रातले एक्सपर्ट म्हणून प्रसिद्व होते. त्यांच्या हाताखाली त्यांच्या प्रयोगशाळेत आणि अन्य हॉस्पिटल्समधे ते मानवी शरीररचनाशास्त्राचं अध्ययन केलं. त्यांच्या आयुष्यात त्यांनी जवळपास ३० मानवी देहांची डिसेक्सशन्स केली. त्यांनी या दरम्यान मानवी शरीररचनांची २४०  चित्र काढलीत. १३ हजार शब्दांमधे त्यांनी त्यांचं वर्णन केलं. जे पुढे चालून आधुनिक वैद्यकशास्त्रालाही एक आधार ठरलं.

हेही वाचा: स्टीफन हॉकिंगः आयुष्यभर खुर्चीत बसून उलगडलं अवकाशातलं गूढ

पंचमहाभूतांमधला भाग लिओनार्दोंनी सांगितला

भारतीय संस्कृतीमधे पंचमहाभूत सांगितले आहेत. मानवी देह हा आप, तेज, जल, वायू आणि अवकाशाचा बनला आहे असं म्हटलं जातं. हेच तत्त्व लिओनार्दोनी मांडलं. यात अवकाश वगळता, चार तत्त्व मांडली आहेत. 

लिओनार्दो  म्हणतात की, माणूस हा पृथ्वी, जल, वायू आणि अग्निपासून बनला आहे. आपलं शरीर हे पृथ्वीसारखंच आहे. जसे खडक हे पृथ्वीला सपोर्ट करतात, तशीच आपली हाडं आपल्या देहाचा भार सांभाळतात. तसेच जल फुप्पूस काम करतं तसंच समुद्राची भरती आणि ओहोटी ही जणूकाही पृथ्वीच्या श्वसनाचं काम करतात.

चित्रांपासून ते रहस्यमयी नोंदवह्यापर्यंत सगळंच लोकप्रिय

लिओनार्दो प्रयोगशील चित्रकार होते. त्यांनी लाल खडूने काढलेलं आत्मचित्र तर जगप्रसिद्ध झालं. मानवी शरीररचेचा अभ्यास करताना त्यांनी एक चित्र काढलं होतं. ते विट्रुविअन मॅन म्हणून प्रसिद्ध आहे. मानवी देह हा त्यांनी एकाच वेळी चौकटीत आणि वर्तुळात काढला होता. हे चित्र इटलीच्या करंसीवरदेखील वापरण्यात आलं. या चित्रातील व्यक्ती म्हणजे स्वतः लिओनार्दोच असल्याचं म्हणतात. लिओनार्दो यांची मेडोना ऑफ द रॉक्स, द लास्ट सपर, ही चित्र जगप्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक चित्रं काढलीत.

तसंच लिओनार्दो दा विंची प्रत्येक घटनेची, वस्तूची नोंद आपल्या नोंदवहीत घेत. त्यात काही रेखाटंनं म्हणजे स्केचेस काढत, काही मजकूर लिहीत. त्यांच्या डोक्यात जे जे येईल ते आपल्या नोंदवहीत नोंद केलं. अशा एकूण २०च्या आसपास हजारो पानांच्या नोंदवह्या त्यांच्याकडे होत्या. त्यांचा शिष्य मेल्झी याने या नोंदवह्या शेवटपर्यत सांभाळल्यात. .याबद्दलची वृत्त अधून मधून येत असतात. बिल गेट्स १९९४ ला लिओनार्दोचं एक असंच पुस्तक विकत घेतलं होतं. पुढे विंडोज ९५ चं ते स्क्रिनसेव्हर म्हणूनही वापरलं गेलं होतं.

हेही वाचा: खरं तर ओबामा महाराष्ट्रात घडायला हवे होते 

लैंगिकजीवनावर सतत वाद झाले

लिओनार्दो त्यांनी लग्न केलं नव्हतं. त्यांचे त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांसोबत लैंगिक संबंध असल्याच्याही त्या काळात चर्चा होत्या. मात्र लिओनार्दोच्या मृत्यूचं पत्र जेव्हा शिष्यांनी त्यांच्या कुटुंबियांना पाठवलं होतं त्यात एक महत्त्वपूर्ण उल्लेख होता. त्यात असं म्हटलं होतं की, लिओनार्दो यांनी त्यांना बापाच्या मायेनं सांभाळलं.

एकदा तर त्यांच्यावर अनैसर्गिक लैंगिक संबंधाच्या आरोपावरून खटलाही चालला होता. त्यातून ते निर्दोष मुक्त झाले. त्यांच्या आयुष्यात कोणती स्त्री आल्याचा उल्लेख त्यांच्या नोंदीत किंवा इतर  कुठेही आढळत नाही. त्यांच्या लैंगिक जीवनावर सिग्मण्ड फ्रॉईड पासून अनेक लेखकांनी स्वतंत्र लेखनदेखील केलंय.

युनिवर्सल मॅनने जगाचा निरोप घेतला

१५१३ नंतर रोममधे लिओनार्दो यांनी तीन वर्षं त्यांनी काम केलं. तिथे डोनॅटिओ, राफायल, मायकल एंजेलो, ब्रॅमेंटे आदी कलावंत काम करीतच होते. १५१६ ला इटली कायमचं सोडलं. पहिल्या किंग फ्रांसीसच्या दरबारात चित्रकार म्हणून रुजू झाले.  फ्रांसमधील एंबोईस येथे चातेऊ डु क्लॉस लुसे हे त्यांच आलिशान निवासस्थान होतं. या निवासस्थानी लिओनार्दोचा शिष्यपरिवार आणि कलाकृती होत्या. 

१५१९ ला लिओनार्दो यांना पॅरॅलिसीसचा अटॅक आला. लिओनार्दो आणि पहिला किंग फ्रांसीस यांच्यात अत्यंत दृढ मैत्री होती. किंग फ्रांसीसच्याच मांडीवर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अशा आख्यायिका प्रसिद्ध आहेत. लिओनॉर्दोच्या मृत्यूनंतर त्यांच्या कलाकृती, स्थावर आणि जंगम संपत्ती त्यांच्या शिष्यांच्या वाट्याला आली.

लिओनार्दो यांच्या संकल्पना आजही मानवी कल्याणात महत्त्वाची भूमिका बजावतात. निसर्गप्रेमी, सहृदयी अशा या बहुपैलू व्यक्तिमत्त्वाचं जीवन कार्य २ मे १५१९ रोजी संपलं. ‘युनिवर्सल मॅन’ लिओनार्दो यांनी विश्वावर अनंत उपकार केलेत. 

हेही वाचा: भविष्यात डेटा डिक्टेटरशिपचा धोकाः युवाल नोआ हरारी