घाशीराम कोतवाल : राजकीय व्यवस्थेवरचं अस्सल भाष्य

१६ डिसेंबर २०२२

वाचन वेळ : ७ मिनिटं


घाशीराम कोतवाल हे मराठीच नाही तर भारतीय रंगभूमीवरचं महत्वाचं नाटक मानलं जातं. १६ डिसेंबर १९७२ या दिवशी पीडीए या नाट्यसंस्थेनं पुण्यात ‘घाशीराम कोतवाल’चा पहिला प्रयोग सादर केला. त्याला आता पन्नास वर्ष झाली. संहिता आणि प्रयोगमूल्य या दोन्ही अर्थानी हे नाटक वेगळं ठरतं. अर्धशतकानंतरही ते कालबाह्य ठरलेलं नाही.

साधारणपणे साठ-सत्तरच्या दशकांमधे भारतीय रंगभूमी अनेक नाटकं आणि नाटककार यांच्यामुळे समृद्ध झाली. कन्नड रंगभूमीवर गिरीश कार्नाड, बंगालच्या रंगभूमीवर बादल सरकार, हिंदीत मोहन राकेश, धर्मवीर भारती यांची नाटकं सादर होत होती. त्याचकाळाच्या आसपास मराठी रंगभूमीवर विजय तेंडुलकर यांची ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘घाशीराम कोतवाल,’ ‘सखाराम बाईंडर,’ ‘गिधाडे’ अशी नाटकं प्रयोगरुपाने आली.

भारतीयच नाही तर जगभरातली उत्तम नाटकंही याच काळात प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर सादर होत होती. रंगायन, अविष्कार, पीडीए, थिएटर अकादमी या संस्थांच्या माध्यमातून ही नाटकं झाली. मुंबई, पुणे या दोन शहरांपुरतीच मर्यादित ही प्रायोगिक नाटकांची चळवळ होती. पण फक्त नाटकच नाही तर बहुतेक सर्वच साहित्य प्रकारामधे या कालावधीत सशक्त लेखन झाल्याचं दिसतं. महानगरी आणि ग्रामीण अशा दोन्हीत हे अविष्कार घडत होते.

दलित साहित्याचा प्रवाहसुद्धा याच काळात जोमाने मध्यवर्ती विचारधारेत आला. त्याला कदाचित त्याकाळची परिस्थितीही कारणीभूत ठरली असावी. स्वातंत्र्यानंतरचं स्वप्नरंजन संपलं होतं. राजकीय, सामाजिक, साहित्य, नाटक, सिनेमा यातून चळवळीच्या रुपाने, विविध आंदोलनातून एक घुसळण सुरु होती. त्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पडसाद साहित्य आणि कलाप्रकारांवर पडल्याचं दिसतं. तेंडुलकरांची नाटकं त्याला अपवाद नव्हती.

हेही वाचाः भीमा कोरेगावमधे २०१ वर्षांपूर्वी नेमकं घडलं काय?

वेगळी नाटकं आणण्याचं धाडस

तेंडुलकर नाटकं लिहत होते त्याकाळात मुंबईत रंगायनच्या माध्यमातून विजया मेहता, अरविंद देशपांडे, कमलाकर सारंग, सत्यदेव दुबे, पुण्यात भालबा केळकर, जब्बार पटेल यांच्यासारखे दिग्दर्शक वेगळी नाटकं रंगभूमीवर आणण्याचं धाडस करत होते. श्रीराम लागू, अमोल पालेकर हे नंतरच्या काळात प्रस्थापित झालेले नटही ऐन उमेदीत आणि नवं काही करण्याच्या उत्साहात होते. एकूण तेंडुलकरांची नाटकं यशस्वी होण्यासाठी अनूकूल असं वातावरण त्यावेळच्या समांतर रंगभूमीने तयार केलं होतं.

तेंडुलकरांची बहुतेक नाटकं त्याकाळात वादग्रस्त ठरली. सखाराम बाईंडरमुळे कमलाकर सारंग यांना न्यायालयात झुंजावं लागलं. गिधाडेच्या निमित्ताने श्रीराम लागू यांनी सेन्सॉरशी दिलेला लढा त्यावेळी चांगलाच गाजला होता. घाशीराम कोतवालनेही त्यावेळी मोठं वादळ उठवलं होतं.

तेंडुलकरांच्या नाटकांनी जे वाद निर्माण केले त्याची कारणं आज कदाचित हास्यापद वाटू शकतील. पण आज त्यांच्या नाटकांची प्रयोग मूल्यं, आशयमूल्यं यादृष्टीने चिकित्सा होऊ शकते. त्यांची सगळीच नाटकं कसोटीला उतरणार नाहीत. पण घाशीराम कोतवाल, सखाराम बाईंडर, पाहिजे जातीचे, शांतता कोर्ट चालू आहे अशा काही नाटकांचा त्याला अपवाद करावा लागेल.

घाशीराम कोतवाल आणि तेंडुलकर

घाशीराम कोतवाल हा विषयापासून सादरीकरणापर्यंत अत्यंत वेगळा असा प्रयोग होता. मराठी रंगभूमीवरल्या तोपर्यंतच्या ऐतिहासिक नाटकांना छेद देणारं हे नाटक होतं. उत्तर पेशवाईत नाना फडणवीस हे मात्तबर प्रस्थ होतं. त्यावेळी पुण्यात घाशीराम हा काही काळ कोतवाल होता. पण तेंडुलकरांना इतिहास मांडण्यात रस नव्हता. इतिहासातल्या काही पात्रांच्या आधाराने कालातीत अशी शाश्वत कथा त्यांना सादर करायची होती.

घाशीराम कोतवाल हे नाटक ऐतिहासिक नाही. ऐतिहासिक आधार असलेली ही एक अनैतिहासिक नृत्यसंगीतमय दंतकथा आहे. पेशवाई, नाना फडणवीस, घाशीराम कोतवाल यांच्या इतिहासातल्या बर्‍यावाईट अव्वल अस्तित्वाविषयी मतप्रदर्शन करण्याचा कोणताही हेतू लेखकाचा नाही. या दंतकथेमधला बोध वेगळाच आहे, अशी स्पष्ट भूमिका तेंडुलकरांची होती. पण वादाच्या गदारोळात त्याकडे कुणाचं लक्ष गेलं नाही. ती नीट समजून घेण्याचा प्रयत्न झाला नाही.

वादामुळे घाशीरामविषयी अनेक कथा आणि दंतकथांचा जन्म झाला. आज पन्नास वर्षांनंतर घाशीराम कोतवाल या नाटकाकडे प्रयोगात्मदृष्टीने पाहतांना हे नाटक कालबाह्य तर मुळीच झालेलं नाही. उलट आजच्या काळाला अधिक समयोचित वाटेल असं हे नाटक आहे.

हेही वाचाः पेशवाईला वंदा किंवा निंदा, त्याआधी हे वाचा

राजकीय रूपक असलेलं नाटक

हे नाटक रंगभूमीवर आलं तेव्हा इंदिरा गांधी सत्तेवर होत्या. त्यांची वाटचाल एकाधिकारशाहीच्या दिशेने सुरू होती. महाष्ट्रातही काँग्रेसची पकड घट्ट होती. शिवसेनेचा उदय झाला होता. संघाच्या पोटातून भाजपचा जन्म व्हायचा होता. पण त्यावेळच्या थेट राजकीय पार्श्वभूमीशी याचा कुठेच संबंध येत नाही. पण सर्वच पातळ्यांवर राजकारणाची अधोगती सुरू आहे हे तेंडुलकरांसारख्या द्रष्ट्या नाटककाराला जाणवली असावी. पत्रकार म्हणून ते आसपास जे घडत होतं, त्याचं निरीक्षण करत होते. त्या वास्तवाला नाटक, सिनेमा या माध्यमातून समजूत घेत होते.

तेंडुलकरांच्या बहुतेक नाटकांच्या मध्यवर्ती हिंसा केंद्रस्थानी असते. घाशीराम कोतवाल हे नृत्यसंगीतमय नाटक असलं तरी त्या गाभा राजकीय आहे. त्या अर्थाने ते राजकीय रूपक आहे. या नाटकात नीचतम पातळीला गेलेला पेशवाईचा काळ आहे. भारतातल्या राजकीय वास्तवाकडे पाहिलं तर नाना फडणवीस आणि घाशीराम यांची अनेक रूपं वेगवेगळ्या प्रकाराने अस्तित्वात असल्याचं दिसतं.

खरं तर नाना फडणवीस यांचं नाटकातलं रूप इतिहासापेक्षा वेगळं होतं. घाशीरामची कथा त्यांच्या पद्धतीने मांडताना तेंडुलकरांनी संपूर्ण नाटकभर ब्राह्मण समूहाचा वापर केला तो अधिक अंगावरा येणार होता. या नाटकाला सुरवातीच्या काळात प्रचंड विरोध झाला असला तरी ते प्रचंड प्रमाणात यशस्वीही झालं. अनेक भाषांमधे त्याचे प्रयोग झाले. परदेशातही त्याचे प्रयोग झाले.

नाटक दिवानखानी नाही

आशय आणि प्रयोग या दोन्ही अंगानी घाशीराम कोतवालचा अभ्यास अनेकांनी आजवर केला आहे. हे नाटक दिवानखानी नाही. संपूर्ण रंगमंचीय अवकाशाचा पात्रांनी केलेला प्रभावी वापर, त्यांचं संगीताच्या तालावरचं नृत्यमय वावरणं हे या नाटकाचं वैशिष्ट्य आहे. पारंपरिक मध्यमवर्गीय नाटक पहायला सरावलेल्या प्रेक्षकाला घाशीराम कोतवालने दिलेला मानसिक धक्का तेव्हा मोठाच असणार आहे.

हा संपूर्ण समूह पुणेरी ब्राह्मण आहे. हाच समूह गातो, नाचतो, नेपथ्य तयार करतो. एखादं पात्र म्हणून भूमिकाही करतो. नानासुद्धा नाचत येतो. नाटकातल्या संवादांना काव्य आणि गीतात्मक अशी लय आहे. तेंडुलकरांनी संहितेमधे अनेक सुचना लिहिलेल्या आहेत. त्यावरून मनोकल्पीत प्रयोग त्यांना स्पष्ट दिसला होता असं म्हणता येतं.

हेही वाचाः पानिपतच्या आधी नेमकं काय झालं होतं?

आताचे दिग्गज घाशीराममधे

हे नाटक रूपाने रंगमंचावर जिवंत करणं खरं आव्हान होतं. दिग्दर्शक म्हणून जब्बार पटेल यांना खऱी ओळख या नाटकाने मिळवून दिली. सतीश आळेकर हे नाटकाचे सहदिग्दर्शक होते. कृष्णदेव मुळगुंद यांचं नृत्य आणि भास्कर चंदावरकर यांचं संगीत या दोघांचा नाटकाच्या प्रयोगातला वाटा मोठा होता. चंद्रकांत काळे, रविंद्र साठे यांच्यासारखे गायक नाटकात होते. सुत्रधार श्रीराम रानडे होते.

नाना फडणवीसाच्या भूमिकेत डॉ. मोहन आगाशे होते. रमेश टिळेकर घाशीराम होते. जब्बार पटेल, आळेकर, मोहन आगाशे यांच्यासह नाटकातल्या बहुतेक कलाकारांनी नंतरच्या काळात नाटक, सिनेमा अशा दोन्ही माध्यमांना मोठं योगदान दिलं. घाशीराम करताना ते ऐन तारुण्याच्या उमेदीत होते.

बंडखोरीची, नव्या उमेदीने नवं काही करण्याची शक्यता तरुण वयातच जास्त असते. बंडखोरी करायची म्हणूनही ती होत नसते. ती झाल्यानंतर कळते. पण त्याची तयारी अनेक दिवस अनेकांच्या मनात सुरू असते. घाशीरामबद्दलही ते जमून गेलं.

नाटकातला आशय

घाशीराम त्याकाळात प्रयोग म्हणून नवीन वाटला. पण त्याची सादरीकरण शैलीची मुळं भारतीय लोकपरंपरेत सापडतात. मराठी किर्तन, दशावतार अशा काही लोककलांशी त्याचं नातं सांगता येतं. या नाटकाच्या प्रयोगाची चर्चा झाली. तेवढी त्यातल्या राजकीय आशयाची झाली नाही. त्यामुळेच कदाचित घाशीरामनंतर समूहनाट्याच्या प्रयोगांची लाटच आल्यासारखं झालं. नाटकातल्या आशयापेक्षा समूह कवायतीलाच महत्व आलं. ही नाटकं काळाच्या ओघात विस्मरणातही गेली. घाशीरामचं तसं झालं नाही.

उत्तर पेशवाईत खासकरून सवाई माधवरावांच्या काळात पुण्यात असलेलं वातावरण पार्श्वभूमी म्हणून या नाटकात आहे. या भ्रष्ट राजव्यवस्थेचा प्रतिनिधी आहे स्त्रीलंपट नाना फडणवीस. रमण्यात दक्षिणेसाठी धडपडणारे ब्राह्मण रात्री बावणखणीत रमतात. कारण तिथं मथुरा अवतरलेली असते. या पुण्यात दक्षिणेच्या आशेनं कनौजी ब्राह्मण घाशीराम येतो. तिथं त्याच्यावर चोरीचा आळ येतो. त्याला मारहाण होते.

सुडाने पेटलेला घाशीराम अंदरसे सैतान आणि बारहसे सुव्वर होतो. सार्‍या पुण्यनगरीला सुव्वरोका राज बनवण्याची शपथ घेतो. त्यासाठी लंपट नानाच्या शेजेला आपली मुलगी देतो. त्याबदल्यात कोतवाली हस्तगत करतो. त्याच्या अन्यायी कोतवालीमुळे सारी पुण्यनगरी वेठीस धरली जाते. एका प्रसंगात काही ब्राह्मणांना घाशीराम कोठडीत ठेवतो. गुदमरुन ते मरतात. घटनेची चौकशी होते. घाशीरामला ठेचून मारलं जातं.

हेही वाचाः शनिवारवाडा १८१८:  पेशवाई बुडाली त्याची गोष्ट

सत्तेच्या राजकारणातली दोन रूपकं

घाशीरामला कोतवाल करताना नाना जे म्हणतो ते राजकीय व्यवस्थेवरलं अस्सल भाष्यच आहे. दुबार बंदुकीनं कोवळी पोरगी लोळवणारा नाना सार्‍या पुण्यनगरीला खेळवण्याची महत्वाकांक्षा बाळगून आहे. तमाम कपटींना परस्पर काटशह देण्यासाठी उपरा घाशीराम त्याला एक हत्यार वाटतो. करनेको हम और भरनेको कोतवाल.

कोतवालीवर चढवलेला दारीचा श्वान एवढीच घाशीरामची त्याच्यादृष्टीनं किंमत आहे. त्यामुळे वेळ येताच हा नाना घाशीरामच्या मुलीला संपवतो. बोहल्यावर चढतो. घाशीरामला लोकाच्या हवाली करतो. सर्वांना छळणार्‍या घाशीरामरुपी नरकासुराचा वध झाल्यावर श्रींच्या कृपेने पुण्यनगरीवरचं संकट दूर झाल्याचं नाना सांगतो. पापी घाशीरामला कोल्ही कुत्री फाडून खाऊ देत असंही नाना म्हणतो.

नाना आणि घाशीराम हे सत्तेच्या राजकारणातली दोन वेगळी रूपं आहेत. राजकीय व्यवस्थेतून नाना फडणवीस निर्माण होतात. आपल्या राजकीय सोयीसाठी, अस्तित्वासाठी नानासारखे राजकारणी घाशीराम निर्माण करत असतात. त्यांच्या अनैतिक सौदेबाजीतून घाशीराम तयार होत असतात. उपयोगीता संपली की हेच घाशीराम पद्धतशीरपणे नाहीसे होतील याची दक्षता राजकारणी नाना घेत असतात.

नाना-घाशीराम आसपासही

सत्तेच्या जीवघेण्या खेळात असे नाना आणि घाशीराम तयार होतात. काही काळ राज्यही करतात. पण ते मुळात तयार होतात त्याला कारणीभूत ठरते नीचतम पातळी गाठलेली समाज व्यवस्था. मग तो काळ पेशवाईचा असो की लोकशाहीचा. तेंडुलकरांना सांगायचं होतं ते याच प्रकारचं असावं असं घाशीराम कोतवाल पाहताना वाटतं.

समाजमाध्यमांनी प्रभावित केलेल्या काळात यूट्युबवर जाऊन या नाटकाचा अनुभव सहजपणे घेता येईल. कोण नाना, कोण घाशीराम हे स्वतःच्या मनाशी ताडूनसुद्धा पाहता येईल. कारण आपल्या आसपासच नाना-घाशीराम असतात. ते आपल्याला कधी जाणवतात. कधी नाही. एवढंच.

हेही वाचाः 

पुण्याचे पेशवे: किती होते? कोण होते? कसे होते?

पानिपत : प्रत्यक्षात लढलं कोण? सिनेमात कौतुक कुणाचं?

पेशवाईच्या स्वैराचाराला 'फटका'वणारा तमासगीर कीर्तनकार

शंभूराजांना औरंगजेबाच्या कैदेतून सोडवण्याचे प्रयत्न का झाले नाहीत?