५ डिसेंबरः आजचा इतिहास

०५ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ५ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

तामिळ जनतेच्या अम्मा जे जयललिता (मृत्यू २०१६)

तामिळ लोकांच्या ‘अम्मा’ जे. जयललिता यांच्यासारखी लोकप्रियता देशातल्या फार थोड्या मुख्यमंत्र्यांच्या वाट्याला आली. आई संध्या यांच्याकडून मिळालेला वारसा घेऊन जयललिता सिनेमात आल्या. तामिळ, तेलुगू आणि कन्नड सिनेमातून जयललिता हिट झाल्या. तामिळ सिनेमातले सुपरस्टार आणि प्रसिद्ध राजकारणी एमजी रामचंद्रन यांनी जयललितांना राजकारणात आणलं. १९८७ मधे एमजीआर यांचा मृत्यू झाला. जयललितांनी स्वतःला एमजीआर यांचा वारसदार जाहीर केलं. आपल्या करिश्माई नेतृत्वाच्या जोरावरच अय्यंगर ब्राम्हण कुटुंबात जन्मलेल्या अम्मा १९९१ मधे मुख्यमंत्री झाल्या. ब्राह्मण असूनही द्रविड राजकारणाचा प्रभाव असलेल्या तामिळनाडूच्या तीनवेळा मुख्यमंत्री झाल्या. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात २०१४ मधे त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. अम्मांना तामिळनाडूच्या आर्यन लेडी आणि तामिळनाडूच्या मार्गरेट थॅचर असंही म्हटलं जायचं. ५ डिसेंबर २०१६ ला दीर्घ आजाराने त्यांचं निधन झालं.

काश्मीर का शेर शेख अब्दुल्ला (जन्म १९०५)

काश्मीर म्हटलं की अब्दुल्ला घराणं आलं. या घराण्याचे आद्य पुरुष म्हणजे शेख अब्दुल्ला. काश्मीरातला पहिला राजकीय पक्ष काश्मीर मुस्लीम कॉन्फरन्सचे ते पहिले अध्यक्ष होते. काश्मीर संस्थानच्या राजा हरिसिंग यांच्याविरोधात त्यांनी १९४६ मधे छोडो काश्मीर आंदोलन छेडलं होतं. त्यामधे अब्दुल्ला यांना तुरुंगवास झाला. पुढे १९५३ मधेही त्यांना काश्मीर सरकारविरुद्धच्या कटात सहभागी असल्यावरून जेलमधे जावं लागला. १९६४ मधे जेलमधून सुटल्यावर काश्मिरी लोकांनी त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. १९७७ ते १९८२ पर्यंत ते मुख्यमंत्री राहिले. मुख्यमंत्री पदावर असतानाच ८ सप्टेंबर १९८२ ला निधन झालं. त्यांच्यानंतर मुलगा फारूक अब्दुल्ला मुख्यमंत्री झाले. आता त्यांचा नातू ओमर अब्दुल्ला काश्मीरच्या राजकारणात केंद्रस्थानी आहे.

दक्षिण आफ्रिकेचे मदिबा नेल्सन मंडेला (निधन १९१३)

नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष होते. शेकडो वर्षांचा वर्णभेदांची कटुता पुसण्याचं काम त्यांनी केलं. त्यांनी नव्या दक्षिण आफ्रिकेचा पाया रचला. म्हणून ते दक्षिण आफ्रिकेचे मदिबा म्हणजे राष्ट्रपिता ठरले. त्यांच्या ६७व्या वर्षी युनायटेड नेशन्सने त्यांचा जन्मदिन १८ जुलै मंडेला दिन म्हणून घोषित केला. त्या दिवशी २४ तासातली किमान ६७ मिनिटं लोकांनी इतरांना मदत करायची असते. यूएननेच कैद्यांशी वागण्याचे नियम बनवलेत. त्यालाही मंडेला रूल्स म्हणतात. कारण आयुष्याची सलग २७ वर्षं मंडेलांनी कैदेत काढलीत. भारत आणि पाकिस्तानात कितीही भांडणं असोत, पण या दोन्ही देशांनी आपल्या देशाचे सर्वोच्च पुरस्कार मंडेलांना दिलेत. जिवंत असतानाच ते देशप्रेमाचं, संघर्षाचं, वर्णभेदविरोधाचं, मानवी हक्कांचं आणि लोकशाहीचं प्रतीक बनले. महात्मा गांधी आणि मार्टिन ल्युथर किंग यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. पण मंडेलांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन स्वतःचं वेगळं तत्त्वज्ञान उभं केलं. त्यामुळेच ते नव्या आफ्रिकेची उभारणी द्वेषाच्या नाही तर प्रेमाच्या पायावर केली.

कार्टूनचा बाप वॉल्ट डिस्ने (जन्म १९०१)

जगभरातले कार्टून, अॅनिमेशन फिल्म इंडस्ट्री आणि वॉल्ट डिस्ने या गोष्टी एकमेकांपेक्षा वेगळ्या आहेत, असं वाटतच नाही. जगातल्या अॅनिमेशन इंडस्ट्रीचा पायाच वॉल्ट डिस्ने यांनी एक कलाकार आणि एक उद्योजक म्हणूनही घातला. त्यांनी १९२८ साली जन्माला घातलेला मिकी माऊस आजही सगळ्यांचं मनोरंजन करतोय. अशी जगभर गाजलेली अनेक कार्टून कॅरेक्टर आणि सिनेमे त्यांनी बनवले. कागदावरच्या कार्टूनना सिनेमे आणि टीवीवर नेऊन जगभर पोचवण्यासाठी अनेक प्रयोग त्यांनी केले. त्यासाठी त्यांनी डिस्नेलॅंड हे अम्युझमेंट पार्कही बनवलं. आज वैयक्तिक २२ ऑस्कर अवॉर्ड आणि ५९ नॉमिनेशन असा विक्रम त्यांनी करून ठेवलाय. अमेरिकेच्या सांस्कृतिक इतिहासावर त्यांचा ठसा इतका घट्ट आहे की ते आजही अमेरिकेसाठी एक सांस्कृतिक आदर्श आहेत.

तडाखेबाज धडाकेबाज शिखर धवन (जन्म १९८५)

भारतीय क्रिकेट टीमचा ऑस्ट्रेलिया दौरा सध्या शिखर धवन गाजवतोय. टीट्वेंटीच्या दोन्ही मॅचमधे त्याला खेळता आलं तेव्हा त्याने आपली चमक दाखवलीय. हे २००४पासून सुरू आहे. अंडर १९ टीमसाठी शिखरची बॅट तळपली होती. तरीही त्याला फारशी संधी मिळाली नाही. कारण सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर असे दिग्गज ओपनर संघात होते. मात्र २०१२ला लग्न झाल्यानंतर त्याची बॉक्सर बायको आयेशा त्याच्यासाठी नशिबाची दारं उघडी करूनच आली. २०१३ला सेहवागला टीममधून कमी केल्यानंतर त्याला संधी मिळाली. तो पदार्पणात सर्वात फास्ट सेंच्युरी बनवणारा क्रिकेटर बनला. त्यानंतर तो तडाखेबाजच खेळत राहिला. अनेकदा फॉर्म त्याच्यावर रूसला. पण तो झगडत राहिला. तो टुकूटुकू खेळताना कधी दिसला नाही. आज भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमधे तो आपलं योगदान देतोय.