मास्क आपल्या रोजच्या जगण्यातली गोष्ट झालीय. फार सहजतेनं आपण मास्क वापरतो आणि तितक्याच सहजतेने मास्क घालताना अनेक चुकाही करतो. या चुका आपल्याला सहजासहजी लक्षात येत नाहीत. त्यामुळे आपण याच चुका वेळोवेळी न चुकता करतो. मास्क वापरत असाल तर या चुका नक्की टाळता येण्यासारख्या आहेत.
मास्क आपल्या रोजच्या जगण्यातली गोष्ट झालीय. कपड्यांप्रमाणे आपण मास्कचीही नियमित खरेदी करतोय. त्यात रंग, कापडाचा दर्जा वगैरे बघतोय. इतर कपड्यांसोबत आता कपड्यांच्या ढिगात मास्कही धुवायला पडलेले असतात. हाताने किंवा मशीनमधे स्वच्छ धुवून इतर कपड्यांसोबत दांडीवर वाळत घातलेले मास्क आपल्या नजरेला पडतात. हे मास्क आपल्या इतके सवयीचे होतायत की आता घराबाहेर एखाद्याने मास्क घातला नसेल तर आपल्याला आश्चर्य वाटतं.
मास्क हे न्यू नॉर्मल झालंय. न्यू नॉर्मल म्हणजे कोरोनानंतरच्या जगात बदललेली पण तितकीच साधारण झालेली गोष्ट. हा मास्क आपण आधी वापरत नव्हतो. पण आता घरातून बाहेर निघताना पाकिट, रूमाल, पिशवी घ्यावी तितक्या सहजतेनं आपण मास्क घेतो. आणि तितक्याच सहजतेने मास्क घालताना अनेक चुकाही करतो.
या चुका आपल्याला सहज लक्षात येत नाहीत. अमेरिकेच्या युनिवर्सिटी ऑफ मेरिलँडमधल्या मेडिकल विभागात काम करत असलेले डॉक्टर फहीम युनुस यांनी या चुकांची जाणीव आपल्याला करून दिलीय. त्यांनी ट्विटर अकाऊंटवर टाकलेल्या एका वीडियोत मास्क घालताना हमखास होणाऱ्या ५ चुकांबद्दल माहिती दिलीय.
हेही वाचा : विटॅमिन डीच्या कमतरतेमधे दडलंय देशांच्या वेगवेगळ्या मृत्यूदराचं गुपित?
मास्कचं काम आहे आपल्या नाका तोंडात जाणाऱ्या वायरसची वाट अडवणं. त्यामुळे वायरस आपल्या नाकात जाण्याऐवजी मास्कच्या पुढच्या भागावर जमा होऊन बसतात. गंमत म्हणजे मास्क नीट बसवण्यासाठी आपण नेमका तिथेच हात लावून मास्क हलवतो. मग ते वायरस आपल्या हातावर येतात. एकदा का मास्क तोंडावर चढवला की त्याच्याशी कुठल्याच प्रकारची छेडछाड करायला नको. नेहमीसारखं चुकून मास्कला हात लावलाच तर चटकन हात धुवायला हवा.
घरातून बाहेर पडल्यावर बसस्टॉपवर किंवा रिक्षा स्टँडवर पोचल्यावर आपण बॅगेतला, खिशातला मास्क बाहेर काढून तोंडावर लावतो. घरी परत येताना बसमधून उतरलं की लगेचच मास्क काढून टाकतो. घरापर्यंत चालत जाण्याइतका दम आपल्याला नसतो. पण खरंतर, घरातून बाहेर पडण्याआधी मास्क चढवायला हवा आणि घरी परत आल्यावर हात धुतल्यानंतर मगच मास्क काढणं योग्य ठरेल.
हेही वाचा : कोरोना काळात आपल्याला पेशंटचे १७ अधिकार माहीत असायला हवेत!
आपण मास्क एकदा धुतला की पुढचे किमान दोन तीन दिवस सहज चालवतो. काहीजण तर आठवडा आठवडा एकाच मास्कवर धकवतात. पण खरं म्हणजे, मास्क एकदा घातला की लगेचच धुवायला हवा. मास्क वापरण्याआधी व्यवस्थित वाळला असल्याची खात्री करून घ्यायला हवी. त्यासाठी मास्कच्या दोन तीन जोड्या तयार ठेवता येतील.
बोलता येत नाहीय, गरम होतंय किंवा आसपास कुणी नाहीय अशी वेगवेगळी कारणं शोधत आपण सतत मास्कची काढ घाल करत असतो. पूर्ण मास्क काढण्याऐवजी आपण तो हनुवटीवर किंवा डोक्यावर लावून ठेवतो. आपल्याला मास्कची सवय नाही म्हणून आपण असं करतो खरं. पण आता ही सवय करून घ्यायला हवी.
मास्क घातला की आपण एकदम सुरक्षित असं आपल्याला वाटू शकतं. पण प्रत्यक्षात मास्क घातल्यानंतरही हात धुणं, सहा फुटांचं अंतर ठेवणं या मुलभूत गोष्टीचंही काटेकोरपणे पालन करायला हवं. या सगळ्यांच्या एकत्रित परिणामातूनच आपण कोरोनाला फैलाव रोखू शकतो.
हेही वाचा :
कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?
कोरोना पॉझिटिव आलो तरी आम्ही घरीच राहिलो, कारण
सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?
एडवर्ड जेन्नरः देवी संपवणाऱ्या या देवमाणसाने लसीकरण शोधलंय