‘द हॅपिनेस प्रोजेक्ट’ सुरू करणारी तरूणी सांगतेय आनंदी लोकांच्या चार सवयी

०१ जुलै २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


आपण आयुष्यभर आनंद मिळवण्यासाठी झटतच रहातो. पण हाताला काहीच लागत नाही. पण आनंद मिळवलेल्या माणसांना तो कुठे सापडतो? आनंदामागचं हेच विज्ञान शोधण्यासाठी अमेरिकेतल्या मिशेल वॅक्स या तरुणीनं ‘द हॅपिनेस प्रोजेक्ट’ सुरू केला. त्यांनी स्वतःला आनंदी म्हणवणाऱ्या ५०० लोकांच्या मुलाखती त्यांनी घेतल्यात. त्यातून गवसलं ते ‘अमेरिकन हॅपिनेस’ या डॉक्युमेंटरीतून आपल्यासमोर मांडलं.

सुखवाद ही तत्त्वज्ञानातली एक शाखा. या सुखवादाच्या सिद्धांतानुसार, जगात आनंद ही एकमेव साध्य मूल्य असलेली गोष्ट आहे. इतर सगळ्या गोष्टींना साधन मूल्य असतं. याचा अर्थ असा की बाकी सगळ्या गोष्टी आपण दुसरं काहीतरी मिळवण्यासाठी करत असतो. शाळा शिकतो ते नोकरी लागावी म्हणून.

नोकरी करतो ते पैसे मिळावेत म्हणून. पैसे मिळवतो ते कुटुंबासाठी वेळ घालवता यावा म्हणून. आणि कुटुंब, त्यांच्यासोबतचा वेळ आपल्याला हवा असतो कारण त्याच्यातून आपल्याला आनंद मिळतो म्हणून. मैत्री, प्रेम, पैसे, छंद, प्रवास, लग्न, मुल झालंच तर धर्म, देव अशी जगातली कोणतीही गोष्ट आनंद मिळवण्यासाठीच केली जाते.

आनंदामागचं विज्ञान काय?

पण तरी आपण खरंच आनंदी असतो का? रोज सकाळी झोपेतून उठल्यावर उगवलेल्या दिवसाविषयीचं कुतूहल आपल्या मनात कधीच नसतं. याचा अर्थ आपण दुःखात असतो, असं नाही. पण आपण आनंदीही नसतो. एक वेगळ्या प्रकारची उदासीनता आपल्या सगळ्यांच्या जगण्याला व्यापून राहिलेली असते. पण जगात असं मलूल वातावरण असतानाही काही लोक मात्र स्वतःच्या आयुष्यात इंद्रधनुष्य फुलवतात.

नेमकी कोण असतात ही माणसं? आनंदी राहण्यासाठी ती नेमकं काय करतात? त्यांचा रोजचा दिवस नेमका कसा असतो? हे शोधण्याच्या प्रयत्नात असलेल्या अमेरिकेतल्याच मिशेल वॅक्स या तरुणीनं द हॅपीनेस प्रोजेक्ट सुरू केला. आनंदी असण्याचं विज्ञान नेमकं काय असतं हे शोधण्यासाठी त्यांनी स्वतःला आनंदी म्हणवणाऱ्या, आनंद आतून अनुभवणाऱ्या लोकांच्या मुलाखती घेतल्यात. त्यातून समोर आलेल्या आनंदी लोकांच्या ४ महत्त्वाच्या सवयी त्यांनी ‘फास्ट कंपनी’ या अमेरिकन मासिकात मांडल्यात.

हेही वाचा : कोरोनाच्या या काळात आपल्याला विचित्र स्वप्नं का पडतात?

अस्वस्थतेचं खोदकाम

या लेखात दिलेल्या चित्रात हसणाऱ्या मिशेल यांचा आनंद किती मनातून आलाय हे त्यांना पाहिल्यावर लगेच कळतं. त्यांच्याकडे नुसतं पाहूनच आनंदी वाटू लागतं. लोकांच्या आनंदाचं मूळ शोधण्याची चटक मिशेल वॅक्स यांना लागली कारण त्या स्वतःच कधी आनंदी नव्हत्या. त्यांच्या आयुष्यात दुःख होती असं नाही. उलट, सगळं तर मस्त सुखात चाललं होतं. आनंदाच्या शोधयात्रेची सुरवात करण्याआधी त्या अन्न उद्योगात काम करत होत्या.

लहानपणी पाहिलेलं कुकीची म्हणजे खास अमेरिकन बिस्किटांची कंपनी काढण्याचं स्वप्न त्यांनी मोठेपणी पूर्ण केलं. कुकी बनवण्याचा, ते विकण्याचा लघुउद्योग बोस्टनमधे चालू केला. त्यासोबतच आणखी एक फुड पॅकेजची कंपनी काढली. तीही मोठी केली. व्यावसायिक यशाच्या टोकावर त्या होत्या. या टोकावर त्यांनी आनंदी असणं अपेक्षित होतं.

फ्लरिश बाय बेको मॅनेजमेंट या युट्यूबचॅनेलवरच्या त्यांच्या मुलाखतीत त्या म्हणतात, ‘आपल्याला लहानपणापासून एकच शिकवलं जातं. तुम्ही मेहनत केलीत, तुम्हाला काय हवं ते मिळवलं की तुम्ही आनंदी व्हाल. मी खरंच खूप मेहनत केली. मला हवं ते मिळवलं. पण तरीही मी रोज सकाळी उठायचे तेव्हा मला ठिक वाटायचं. सगळं बरं चाललंय असं वाटायचं. त्यात आनंद नव्हता. अपराधीपणाची भावना माझ्या मनात येऊ लागली. मी आनंदी असायला हवं असताना मला जे वाटतंय तसं नेमकं का वाटतंय याचं खोदकाम करायला मी सुरवात केली.’

समाजाच्या अपेक्षांचं ओझं

या अस्वस्थतेतूनच शेवटी २०१७ ला त्यांनी त्यांच्या दोन्ही कंपन्या विकल्या. एक जीप घेतली आणि अमेरिकेतल्या एका राज्यातून दुसऱ्या राज्यात फिरू लागल्या. देशातली सगळी ५० राज्य धुंडाळून त्यांनी स्वतःला आनंदी म्हणवणाऱ्या ५०० लोकांच्या मुलाखती घेतल्या. त्यातून जे काही हाताला लागलं ते ‘अमेरिकन हॅपिनेस’ या डॉक्युमेंटरीतून जगासमोर मांडलं.

या डॉक्युमेंटरीत मिशेल म्हणतात, ‘अमेरिकेतल्या प्रत्येक माणसाला आनंद हवा आहे. पण समाजाच्या अपेक्षा सतत आपल्याभोवतीच असतात. आपण कोण असलं पाहिजे, काय मिळवलं पाहिजे आणि कसं जगलं पाहिजे याचं ओझं या अपेक्षा आपल्याला देत राहतात. यातूनच आनंद हे क्षितीजासारखं बनतं. आपण जितकं त्याच्याकडे जायला लागू तितकं ते लांब लांब जात राहतं.’

‘आपण आहोत त्या परिस्थितीत आनंदी कसं रहायचं हे कधीही कुणीही आपल्याला शिकवत नाही. मग समाजाच्या चौकटीत बसण्यासाठी आपण समोर येईल त्याला सामोरं जात जगत असतो. पण जगात काही माणसं खऱ्या अर्थानं आनंदी आहेत. ही माणसं सकाळी उठतात तेव्हा आयुष्याबदद्ल भरपूर उत्साही असतात. जगण्यासाठीच सुंदर कारण त्यांच्याकडे सतत तयार असतं. ही माणसं नेमकं असं काय करतात हे समजून घेण्याची ही वेळ आहे.’

विमीयो या वेबसाईटवर ही डॉक्युमेंटरी पहायला मिळते. पण ती विकत घेण्यासाठी साधारण ११ डॉलर मोजावे लागतात. म्हणजे भारतीय ८९१ रुपये. भाड्यावर घ्यायची असेल तर ३ ते ४ डॉलर म्हणजे साधारण २९६ रूपये.

हेही वाचा :  सारं काही चांगलं असूनही डिप्रेशन येतंय ना, मग दीपिकाची ही गोष्ट वाचा

आनंदी माणसांच्या ४ सवयी

आपण नेहमी आनंदाची संकल्पना गुंतागुंतीची करून टाकतो. पण आनंद मिळवलेल्या लोकांशी बोलून आनंद ही अतिशय सोपी गोष्ट असल्याचं मिशेल फास्ट कंपनी मासिकात आलेल्या लेखात म्हणतात. या आनंदी लोकांच्या चार सवयी त्यांनी या लेखात सांगितल्यात. या सवयी आत्मसात केल्या तर आपण सगळेच दिर्घकाळ आनंदाच्या वाटेवर जाऊ शकू असं त्यांचं म्हणणं आहे.

१) आवडत्या गोष्टींची यादी

मनापासून आनंद मिळवण्यासाठी करायची पहिली गोष्ट म्हणजे आपला आनंद कशामुळे तयार होतो आणि कशामुळे नष्ट होतो हे समजून घेणं. आपल्याला कोणत्या गोष्टी आनंद देतात आणि कोणत्या गोष्टी तो हिरावून घेतात यांची यादी करता येईल. पण या यादीत लिहिलेल्या गोष्टी आपल्या नियंत्रणातल्या असतील याची काळजी घ्यायला हवी. एकदा का ही यादी झाली की आपल्याला आवडतात त्या गोष्टी करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ कसा द्यावा याची आणखी करता येईल

२) अर्थपूर्ण दिवस

आपलं ध्येय मिळवणं ही मोठी गोष्ट आहे. पण ध्येयप्राप्तीनंतर मिळालेलं समाधान क्षणभरच टिकतं. आपण खोलात जाऊन विचार केला तर ध्येयप्राप्तीपेक्षा त्या ध्येयाशी झालेल्या भावनिक गुंतवणूकीची भूक आपल्याला जास्त असते. त्यामुळे ध्येय मिळवल्यावरही अनेक लोक आनंदी दिसत नाही. आनंद हा एखाद्या स्नायू सारखा असतो. सतत व्यायाम केला, त्या स्नायूचा सतत उपयोग केला तरच तो तयार होतो. तसंच, आनंद मिळवण्यासाठीही रोज सकारात्मक विचारांचा व्यायाम करावा लागेल. आपल्याला ज्या भावनेसोबत रहायचं आहे त्या भावनेचे शब्द लिहून काढायला हवेत. उदाहरणार्थ, आज आपल्याला कसं वाटायला हवंय? शांत? मोकळं? उत्साही? की आनंदी? अशा शब्दांचीही यादी करायला हवी. आपल्याला ध्येय मिळाल्यानंतर कसं वाटायला पाहिजे त्या भावनेचे शब्द त्यात हवेत. यादी तयार झाली की आपली कृती, विचार आणि बोलणं या भावनांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करता येईल. आपण कोणताही निर्णय घेणार असतो तेव्हा या यादीकडे पाहून आपण यादीतल्या शब्दांप्रमाणे वागतोय का हे तपासून घेता येईल. याने आपला दिवस सकारात्मक आणि अर्थपूर्ण बनेल.

हेही वाचा : मानसिक ताणतणावांकडे दुर्लक्ष करणं आपल्याला परवडणारं नाही

३) आपली सकाळ आपल्या मुठीत

आपली सकाळ एका सकारात्मक गोष्टीपासून सुरू करणं ही दिवसभराच्या आनंदावर परिणाम करणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. सकाळी उठल्या उठल्या कामं सुरू करण्याची घाई करण्याऐवजी किंवा आपला मोबाईल घेऊन सोशल मीडियावर स्क्रोल करण्याऐवजी स्वतःसाठी एक मिनिटभर बाजूला काढायला हवा. पुढचे काही तास काय करायचं याचं नियोजन करता येईल. आपल्याला काय पूर्ण करायचंय, कसं पूर्ण करायचंय आणि कोणत्या भावनेने करायचंय हे ठरवायला हवं. दिवसभर पटकन राग येत बसणं, दुःख होणं हे टाळायचं असेल तर परिस्थितीला कशापद्धतीने सामोरं जायचं हे सकाळीच ठरवायला हवं. या छोट्याशा मनाच्या व्यायामानं आपणच आपल्या भावनांकडे सजगपणे बघायला लावेल.

४) स्पार्क शोधायला हवा

अमेरिकेतल्या माझ्या प्रवासात भेटलेल्या स्वतःला आनंदी म्हणवणाऱ्या ७० टक्के लोकांनी आपल्या आयुष्यात किंवा करिअरमधे असे काही बदल केले होते ज्यांना त्यांचं कुटुंब आणि मित्रमंडळ मूर्खपणाचं म्हणेल. या प्रॅक्टिकल नसलेल्या बदलांमुळे त्यांच्या आयुष्यातला स्पार्क त्यांना मिळाला. त्यामुळे आपल्याला वाटत असणाऱ्या अशा भावनांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्यांच्या पाठपुरावा करायला हवा. एखादा लेख वाचून, डॉक्युमेंटरी पाहून किंवा एखाद्या मित्राशी बोलून त्याबद्दलचे वेगळे दृष्टिकोन आपल्याला मिळवता येतील. तुमचं हे ध्येय कसं अशक्य आहे, प्रॅक्टिकल किंवा विवेकी नाहीय अशी कारण देऊ नका. उलट, अशाच भावनांच्या मागे जा आणि त्या तुम्हाला कुठं घेऊन जातायत ते पहात रहा.

हेही वाचा : 

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

लॉकडाऊनमधे पॉर्न पहातच आहात; तर त्याआधी हे वाचा

टोमॅटो फ्रिजमधे ठेवणं योग्य नाही, असं शास्त्रज्ञ का म्हणतात?

करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस : मानसिक आरोग्य मोजण्याचा थर्मामीट

हमीद पर उम्मीद : कोरोनाचं औषध सिप्ला शोधेल असं जगाला का वाटतं?