धर्ममार्तंडांच्या ‘बाई शिकली तर भातात अळ्या पडतील’छाप भाकितांना जोतिबा-सावित्री या फुले दाम्पत्याने अठराव्या शतकात मूठमाती दिली. सनातनी धमक्यांना न जुमानता त्यांनी शिक्षणाच्या जोरावर स्त्रीमुक्तीचा पाया रचला. सावित्रीबाई फुलेंनी स्वतः दगडगोटे-शेण झेलून लावलेलं स्त्रीशिक्षणाचं रोपटं आता चांगलंच बहरलंय. यूपीएससी परीक्षेत पहिल्या चार जागा मिळवणाऱ्या पोरींच्या रुपाने त्या रोपट्याची फळं दिसू लागलीत.
२३ मे १९८४. माऊंट एवरेस्ट या जगातल्या सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकला. खरं तर तिरंगा फडकवण्याची ही भारताची काही पहिलीच संधी नव्हती, पण ती एक सुवर्णसंधी म्हणून इतिहासात नोंदवली गेली. याचं कारण म्हणजे यावेळी एवरेस्ट सर करण्याचा बहुमान बच्छेंद्री पाल नावाच्या एका भारतीय महिलेने पटकावला होता. असाच एक गौरवास्पद २३ मे भारताने नुकताच पाहिला.
निमित्त होतं २०२२ला झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच युपीएससीच्या निकालाचं. यावर्षी युपीएससीत पास झालेल्या मुलींची संख्या लक्षणीय असल्याचं हा निकाल सांगतोय. पहिल्या दहा जणांमधे सहा मुलीच असून पहिल्या चार जागांवरही मुलींनीच आपलं वर्चस्व मिळवल्याचं या निकालावरून दिसून येतं. पहिल्या ३ जागा मुलींनी मिळवण्याचं हे सलग दुसरं वर्ष ठरलंय.
इशिता किशोर, गरिमा लोहिया, उमा हरती आणि स्मृती मिश्रा या चार पोरींनी पहिल्या चार जागा मिळवत 'आम्ही सावित्रीच्या लेकी'चा नारा आणखीनच बुलंद केलाय. त्याशिवाय नव्या गहनाने सहावा तर कनिका गोयलने नववा क्रमांक मिळवत 'टॉप टेन'मधलं पोरींचं वर्चस्व बळकट केलंय. इतकंच नाही तर पहिल्या २५ जागांपैकी १४ जागा पोरींनी मिळवत स्त्रीशिक्षणाचं महत्त्व वाढवलंय.
हेही वाचा: दिशा कायदा लागू झाल्यास बलात्कारी पुरुषांचा २१ दिवसांत निकाल
उत्तर प्रदेशच्या इशिता किशोरने या निकालात पहिला क्रमांक मिळवलाय. दिल्ली युनिवर्सिटीच्या श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून डिग्री घेणाऱ्या इशिताचा यूपीएससी देण्याचा हा तिसरा प्रयत्न होता. विशेष म्हणजे याआधीच्या दोन प्रयत्नांमधे तिला प्रिलीमसुद्धा पास करता आली नव्हती. आता थेट पहिल्या स्थानावर उडी घेत तिने जिद्द आणि चिकाटीचं आशादायी उदाहरण सर्वांसमोर उभं केलंय.
इशिताचं मूळ गाव बिहारच्या पटनामधे आहे. पण तिचे वडील भारतीय वायुदलात विंग कमांडर असल्यामुळे तिचं बालपण उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा भागात गेलंय. अर्थशास्त्रात ऑनर्स करणाऱ्या इशिताची आणखी एक ओळख म्हणजे ती राष्ट्रीय स्तरावरची फुटबॉलपटू आहे. २०१२च्या सुब्रतो कप फुटबॉल स्पर्धेत तिने भारताचं प्रतिनिधित्वही केलंय.
वडलांसोबतच खाजगी शाळेत शिक्षिका असलेल्या आईने इशिताला वेळोवेळी भक्कम आधार देत, तिच्या आयएएस बनण्याच्या स्वप्नाची पायाभरणी केलीय. शिक्षणाचं महत्त्व जाणणारी आपली आई आपल्या पाठीशी समर्थपणे उभी राहिल्याने आपण हे यश मिळवू शकल्याचं इशिता सांगते. वयाच्या पंचविशीतही आपल्या करियरबद्दल फारसं जागरूक नसलेल्या तरुणाईपुढे २६ वर्षीय इशिता एक आदर्श म्हणून उभी आहे.
बिहारच्या गरिमा लोहियाने आपल्या दुसऱ्याच प्रयत्नात दुसऱ्या क्रमांकावर उडी मारलीय. गंगेच्या तीरावरचं बक्सर हे गरिमाचं छोटंसं गाव. रामायणात विश्वामित्र ऋषींच्या आश्रमाचं स्थान असलेल्या या गावाची ख्याती आज गरिमाच्या यशाने द्विगुणित झालीय. इतक्या लहान खेड्यातून येऊनही आपण इतकं मोठं यश मिळवू शकतो, याबद्दल एकाचवेळी आश्चर्य आणि अभिमानाची भावना गरिमाच्या मनात आहे.
सात वर्षांपूर्वीच गरिमाच्या डोक्यावरून बापाचं छत्र हरवलं. कपड्यांचचा व्यवसाय करणारे तिचे वडील नारायणप्रसाद लोहिया २०१५मधे हार्ट अटॅकने गेल्यावर आई सुनीता लोहियाने आपल्या चारही पोरांना व्यवस्थित शिक्षण देत सांभाळलं. नुकतीच वयाची विशी गाठलेली गरिमा ही त्या कुटुंबात सगळ्यात छोटी. इतक्या कमी वयातही परिस्थितीची जाणीव ठेवून केलेल्या अभ्यासाचं फळ तिला आज मिळालंय.
गरिमाने सुरवातीपासूनच यूपीएससीच्या कोचिंगपायी होणारा अवास्तव खर्च टाळण्यावर विशेष भर दिला. अकाऊंटिंगमधे बॅचलर डिग्री मिळवणाऱ्या गरिमाने कोरोनाकाळात यूपीएससीची तयारी सुरु केली. कोचिंग क्लासला फाटा देऊन इंटरनेटचा प्रभावी करत तिने आपला अभ्यास सुरुच ठेवला. पहिल्या प्रयत्नात तिला प्रिलीम पार करण्यात अपयश आलं खरं, पण त्यातून खचून न जाता तिने यावेळी दुसरा क्रमांक पटकावून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय.
हेही वाचा: आता पुरुषांना बायकांचं ऐकावंच लागेल
तेलंगणाच्या उमा हारतीने खरं तर सिविल इंजिनिअरिंगमधे बी टेककेलंय आणि तेही आयआयटी हैदराबादमधून. पण आयएएस बनण्याचं तिचं जुनं स्वप्न मात्र ती विसरली नव्हती. स्वतः पोलीस अधिकारी असलेल्या व्यंकटेश्वरलू यांनी लहानपणापासूनच आपल्या लेकीच्या पंखात प्रशासकीय अधिकारी बनण्याचं बळ भरलं होतं. त्यामुळे उमाने जेव्हा यूपीएससी द्यायचं ठरवलं, तेव्हा ते सगळं काही सोडून तिच्या पाठीशी उभे राहिले.
इतरांप्रमाणेच उमाही यूपीएससीच्या तयारीसाठी दिल्लीला आली. पण कोचिंग क्लासच्या गजबजाटात तिचं मन फारसं रमलंच नाही. त्यामुळे आपल्या गावी येऊन तिने तिच्या मित्रमैत्रिणींसोबत गृप स्टडी करण्यावर भर दिला. उमाचा हा निर्णय योग्यच ठरला कारण, गेल्यावर्षी त्या गृपमधल्या दोघांची निवड झाली होती: तर यावर्षी उमासकट आणखी तीन जण या परीक्षेत पास झाले आहेत.
२७ वर्षीय उमाचा हा पाचवा प्रयत्न होता. त्यामुळे अपयशाचा बाऊ करून खचून न जाण्याचा संदेश ती देते. स्वतःवर आणि स्वतः आखलेल्या अभ्यासपद्धतीवर विश्वास ठेवून परीक्षेला सामोरं जाण्याचं तिने ठरवलं होतं. तिच्या या यशाचं श्रेय पूर्णतः ती तिच्या वडलांना देते, ज्यांनी वेळोवेळी तिला योग्य संसाधनांचा पुरवठा करत बहुमूल्य मार्गदर्शन केलंय.
प्रयागराजच्या स्मृती मिश्रा आपल्या तिसऱ्याच प्रयत्नात यूपीएससी पास झालीय. यावेळी चौथा क्रमांक मिळवत तिने स्त्रीशिक्षणाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. दहावीत असल्यापासूनच स्मृतीला प्रशासकीय सेवेत जायचे वेध लागले होते. त्यामुळे स्पर्धापरीक्षांची तयारी करायला तिला फार वेळ घालवावा लागला नाही. घरातूनही तिच्या या निर्णयाला जोरदार पाठिंबा मिळाला.
मिरांडा हाऊसमधून बीएससी केलेली स्मृती सध्या दिल्लीत लॉ करतेय. तिचे वडील बरेलीमधे सीओ म्हणजेच सर्कल ऑफिसर आहेत. पोलीस खात्यात त्यांचे चांगले संबंध आहेत, हे दिवसभर अभिनंदनासाठी वाजणाऱ्या फोनवरून कळतच होतं. लहानपणापासूनच घरात असं वातावरण पाहत असल्याने स्मृतीला प्रशासकीय सेवेत जावंसं वाटणं साहजिकच होतं.
प्रचंड अभ्यासू असलेली स्मृती या परीक्षेसाठी आठ-आठ तास सलग अभ्यास करायची. एकीकडे लॉचं शिक्षण, दुसरीकडे कोचिंग क्लास आणि वरून यूपीएससीची जोरदार तयारी अशा सर्व आघाड्या समर्थपणे सांभाळत स्मृतीने चौथ्या क्रमांकावर आपली मोहर उमटवलीय. या चार पोरींनी देशातल्या सर्वाधिक अवघड परीक्षेत कमावलेलं हे यश सावित्रीच्या इतर लेकींसाठी आदर्शाचे नवे मापदंड प्रस्थापित करतंय, यात शंकाच नाही.
हेही वाचा:
कोरोनाचं युद्ध लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या महिला लीडर
‘थप्पड’च्या आरशात दिसणारा पुरुष आपण पाहिलाय का?