३० ऑक्टोबर : आजचा इतिहास

३० ऑक्टोबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज 30 ऑक्टोबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. होमी भाभा, बेगम अख्तर, भाऊ पाध्ये, कोर्टनी वॉल्श आणि जगातली पहिली किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यांच्याविषयीच्या.

शांतीचा ‘अणु’ होमी भाभा (जन्म १९०९)

भारतीय अणु ऊर्जा प्रकल्पाचे जनक होमी भाभा यांचा आज बड्डे. होमी भाभांचे वडील बॅरिस्टर होते. त्यांच्या लहानपणी घरी खूप पुस्तकं असायची. घरातली पुस्तकं वाचूनच भाभांना विज्ञानात आवड निर्माण झाली. गणित आणि भौतिकशास्त्रात आवड असलेल्या आपल्या होमींनी वडलांच्या आग्रहाखातर केंब्रिज विद्यापीठातून इंजिनअरिंग केलं. न्यूक्लिअर फिजिक्सचा अभ्यास करुन त्यांनी १९३३ ला डॉक्टरेट मिळवली. १९४० ला भारतात परतल्यावर प्राध्यापकी सुरू केली. १९४५ ला टाटा इन्स्टीट्यूट ऑफ फंडामेंटलच्या (टीआयएफआर) स्थापनेसाठी त्यांनी मदत केली. त्यानंतर ते टीआयएफआरचे संचालक झाले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९४८ ला पुढाकार घेत त्यांनी अणु ऊर्जा आयोगाची स्थापना केली. त्यांच्यामुळे भारतात अणुभट्टीची स्थापना झाली. अणुचा वापर हा शांतीच्या मार्गानेच झाला पाहिजे, असं ठाम मत संयुक्त राष्ट्रात मांडणारे होमी भाभा हे पहिलेच वैज्ञानिक.

मल्लिका-ए-गजल बेगम अख्तर (मृत्यू १९७४)

बेगम अख्तर यांचं खरं नाव अख्तरी बाई फैजाबादी. गजल, दादरा, ठुमरी या संगीत प्रकारासाठी त्या ओळखल्या जायच्या. लहानपणापासूनच त्यांना संगीताची आवड होती. त्यांनी लाहोरच्या मोहम्मद खान, अब्दुल वाहीद खान यांच्यासारख्या दिग्गजांकडून गायन शिकल्या. त्यानंतर उस्ताद झान् खान यांच शिष्यत्व घेतलं. बेगम अख्तर यांनी ‘एक दिन का बादशाह’ सिनेमातून बॉलीवूडमधे एंट्री केली. पण सिनेमा हिट न झाल्याने त्या लखनऊला परतल्या. तिथं निर्माते-दिग्दर्श्क मेहबुब खान यांच्याशी भेट झाली आणि त्यांनी बेगम अख्तर यांना मुंबईत बोलावलं. त्यानंतर अख्तर बाईंनी पाठी पाहिलंच नाही. ‘वो जो हममें तुममे करार था,’ ‘तुम्हे याद हो के न याद हो’, ‘ऐ मोहबब्त तेरे अंजाम पे रोना आया’, ‘मेरे हमनफस’, ‘मेरे हमनवा’, ‘मुझे दोस्त बन के दवा न दे’ यासारख्या गझला त्यांनी गायल्या. अख्तर बाईंनी वयाच्या १५ व्या वर्षीच स्टेजवर गायला सुरवात केली. संगीतातील कामगिरीसाठी त्यांना १९६८ ला पद्मश्री तर १९७५ मधे पद्मभूषणने (मरणोत्तर) गौरवण्यात आलं.

‘राडा’कार भाऊ पाध्ये (निधन १९९६ )

मराठी साहित्यात वादळ निर्माण करणारे साहित्यिक अशी भाऊ पाध्येंची ओळख. भाऊ पाध्ये यांच पूर्ण नाव प्रभाकर नारायण पाध्ये. १९४८ ला त्यांनी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी मिळवली. १९४९ ते ५१ पर्यंत ते कामगार संघटनेचे कार्यकर्ते होते. काहीवर्ष शिक्षक म्हणून काम केल्यावर त्यांनी मिल कामगार तसंच एलआयसीमध्ये काम केलं. ‘हिंदू मजदूर’, ‘नवाकाळ’ आणि ‘नवशक्ति’ या पेपरांमधे पत्रकार म्हणून काम केलं. नवशक्ती सोडल्यावर त्यांनी दिनांक, माणूस, क्रिडांगण, चंद्रयुग, सोहत यासारख्या नियतकालिकांसाठी लेखन केलं. डोंबाऱ्याचा खेळ, वैतागवाडी, वासूनाका, अग्रेसर, राडा यासारख्या कांदबऱ्या लिहिल्या. भाऊंचं ३० ऑक्टोबर १९९६ ला निधन झालं.

कोर्टनी वॉल्श (जन्म १९६२)

वेस्ट इंडिजच्या क्रिकेट संघातला आघाडीचा बॉलर कोर्टनी वॉल्शचा आज वाढदिवस. वॉल्शने टेस्टमध्ये १९८४ ला ऑस्ट्रेलियाविरोधात तर वनडेमध्ये १९८५ मधे श्रीलंकेविरोधात पदार्पण केलं. १३२ टेस्टमधे त्याने ५१९ विकेट्स घेतल्या तर २०५ वनडेमधे २२७ विकेट्स मिळवल्या. टेस्ट क्रिकेटमधे सगळ्यांत आधी ५०० विकेट्स घेण्याचा विक्रम कोर्टनीच्या नावावर आहे. आपल्या बॉलिंगच्या जोरावर त्याने अनेकदा वेस्टइंडीजला एकहाती विजय मिळवून दिला. बॉलिंगमध्ये विक्रमी कामगिरी असेलेल्या वॉल्शच्या नावावर बॅटींगमधे वाईट खेळीचाही रेकॉर्ड आहे. टेस्ट क्रिकेटमधे सर्वाधिक वेळा शुन्यावर आऊट होण्याचा विक्रम त्याने केलाय. टेस्टमधे एकूण ४३ वेळा तो शुन्यावर आऊट झालाय. त्यापैकी ११ वेळा पहिल्याच बॉलवर (गोल्डन डक) आऊट झाला.

पहिली यशस्वी किडनी प्रत्यारोपण (१९६०)

सध्या जगभरात अवयवदान चळवळीला चांगले दिवस आलेत. भारतातही लोक मोठ्या संख्येनं अवयवदान करत आहेत. आजचा दिवस हा किडनी प्रत्यारोपणाच्या दृष्टीनं खूप महत्वाचाय. कारण जगात पहिल्यांदाच ३० ऑक्टोबरला यशस्वीरित्या जीवंत व्यक्तीला किडणी प्रत्यारोपण करण्यात आलं होतं. ५८ वर्षांपूर्वी मायकल वुडरफ यांनी ब्रिटनच्या हॉस्पीटलमध्ये जिवंत व्यक्तिवर किडनी प्रत्यारोपण केलं होतं. याआधी १९५४ ला अमेरिकाचे डॉक्टर जोसेफ ई मरे यांनी पहिल्यांदा प्रत्यारोपण केलं होतं. पण ते मृत व्यक्तीवर केलं होतं.