३० नोव्हेंबरः आजचा इतिहास

३० नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ३० नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

मोबाईलचे पणजोबा जगदीशचंद्र बोस (जन्म १८५८)

वनस्पतींना संवेदना असतात हे तोवर कोणालाही मान्य नव्हतं. १० मे १९०१ला लंडनच्या रॉयल सोसायटीचा हॉल वैज्ञानिकांच्या गर्दीने भरला होता. मंचावरच्या शास्त्रज्ञाने एका रोपट्याला विषारी द्रवात बुडवलं. त्या रोपट्याला केस्कोग्राफ नावाच्या यंत्राला जोडलं होतं. ते यंत्र रोपट्याच्या हालचाली मोठी करून दाखवत होतं. ती स्पंदनं पडद्यावर स्पष्टपणे दिसली. आजवर वनस्पती शास्त्रज्ञांच्या धारणांना त्यामुळे धक्का बसला. त्यामुळे साधार सिद्ध होऊनही रॉयल सोसायटीने त्या शास्त्रज्ञाच्या प्रबंधांना मान्यता दिली नाही. शास्त्रज्ञाने आणखी दोन वर्षं त्यावर मेहनत घेतली. आता रॉयल सोसायटीला मान्यता देण्याशिवाय पर्यायच नव्हता. कोलकात्याचे जगदीशचंद्र बोस रॉयल सोसायटीचे सदस्य बनले. तो मान मिळवणारे ते पहिलेच भारतीय ठरले. ब्रिटिश सरकारनेही त्यांना सर ही पदवी दिली. 

पण बोस मुळात वनस्पती शास्त्रज्ञच नव्हते. ते डॉक्टर बनण्यासाठी इंग्लंडला गेले होते. तिथे भौतिकशास्त्राचं आकर्षण निर्माण होऊन त्यांनी त्यात संशोधन केलं. शिक्षणातलं अत्युच्च यश मिळवलं. तिथलं करियर सोडून देशप्रेमापोटी भारतात परतले. समान पदावरच्या इंग्रज प्राध्यापकापेक्षा कमी पगार मिळतो म्हणून पगार घेतलाच नाही. सरकारला नमावं लागलं. भारतात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रयोग केले. भिंतीतून पार होणाऱ्या वायरलेस टेलिग्राफीमधे उपयोगी होईल अशा सूक्ष्मतरंगांचा पहिला यशस्वी प्रयोग १८९५ला त्यांनी केला. आज आपण सॅटेलाईटपासून मोबाईलपर्यंत अत्याधुनिक सोयी वापरतो, त्याचं मूळ त्या शोधात होतं. विज्ञानाच्या पलीकडेही त्यांचं योगदान होतं. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचं साहित्य जगाला कळावं यासाठीही त्यांनीच प्रयत्न केलं. त्यांनी आपली संशोधनसंस्थाही देशाला अर्पण केली आणि आपली सारी संपत्तीही. त्यासोबत त्यांनी पारतंत्र्यात भारतीयांना नवा आत्मविश्वास आणि स्वाभिमान मिळवून दिला. त्याला तोड नव्हती. 

अमेरिकेचे सांस्कृतिक दैवत मार्क ट्वेन (जन्म १८३५)

प्रसिद्ध अमेरिकी विनोदी लेखक, कादंबरीकार मार्क ट्वेन यांचा आज जन्मदिवस. सॅम्युअल क्लेमेन्स हे त्यांचं मूळ नाव. वडील अकाली वारल्यामुळे ट्वेन यांना वयाच्या १२ व्या वर्षीच शिक्षणासोबत मोलमजुरी करावी लागली. नाविक म्हणून काम केलं. नंतर पत्रकार आणि मग संपादक झाले. याच काळात त्यांना आपल्या लहानपणीच्या गमती गमती लिहण्याची कल्पना सुचली. यासाठी त्यांनी मार्क ट्वेन नावाच्या एका आपल्याच बॉसच नाव टोपननाव म्हणून घेतलं. आणि त्यांची पहिलीच कादंबरी ‘द अॅडवेन्चर्स ऑफ टॉम सॉयर’ लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली.

याच कादंबरीचा पुढचा भाग म्हणून ‘द अॅडवेन्चर्स ऑफ हकलबेरी फिन’कडे बघितलं जातं. त्यांच्या या दोन्ही कादंबऱ्या अमेरिकी साहित्यातल्या महान कादंबऱ्या आहेत. जगण्यातल्या बारक्या बारक्या गोष्टी मांडणारे मार्क ट्वेन आता अमेरिकेचे सांस्कृतिक दैवत म्हणून ओळखले जातात. हजरजबाबी आणि मिश्किली स्वभावाच्या ट्वेन यांनी आपल्या विनोदी लिखाणातून जगण्याचं तत्त्वज्ञान मांडलं. पुस्तकाच्या कॉपीराईटचा मुद्दाही त्यांनी लावून धरला. लेखकाच्या मृत्यूनंतर ५० वर्ष संबंधित पुस्तकावर कुटुंबाची मालकी असायला हवी, अशी मागणी त्यांनी लावून धरली होती. पण प्रकाशकांच्या विरोधामुळे त्यांच्या हयातीत यासंबंधीचा कायदा झाला नाही. २१ एप्रिल १९१० ला त्यांचं निधन झालं.

दिव्यत्वाची प्रचिती बा. भ. बोरकर (जन्म १९१०)

वयाच्या विसाव्या वर्षीच त्यांचा प्रतिमा हा काव्यसंगह प्रकाशित झाला. त्याने भारावून जाऊन कविवर्य भा. रा. तांबेंची प्रतिक्रिया होती, हा पहा क्षितिजावर एक नवा तारा आलाय. तांबेंच्या कवितेचा त्यांच्यावर प्रभाव होताच. पण तो फक्त त्यांच्या एकट्याचा नव्हता. ज्ञानेश्वर तुकोबांपासून बालकवींपर्यंत अनेकांचे संस्कार त्यांनी पचवले होते. शिवाय गोव्याच्या मातीचा सकस संस्कार होता तो वेगळाच. फक्त दहावी शिक्षण असणारे बोरकर साधे शिक्षक होत. नंतर ते आकाशवाणीत अधिकारी झाले. 

गोवा मुक्तिलढ्यातही ते सक्रिय होते. ते मराठी आणि कोकणीतला दुवा होते. त्यांच्या अनेक कविता आणि गाणी गाजली. तेथे कर माझे जुळती, नाही पुण्याची मोजणी, जीवन त्यांना कळले हो, माझ्या गोव्याच्या भूमीत ही त्याची उदाहरणं. १२ कवितासंग्रह, २ कथासंग्रह, ४ कादंबऱ्या, अनुवाद असं त्यांचं साहित्य आहे. त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं होतं. गांधीजींवरचं त्यांचं महाकाव्य महात्मायन अपूर्ण राहिलं, याची रूखरूख मात्र कायम राहील. ८ जुलै १९८४ला त्यांचं पुण्यात निधन झालं.

झोंबीकार आनंद यादव (जन्म १९३५)

ग्रामीण साहित्य चळवळीचे प्रवर्तक, कादंबरीकार आनंद यादव यांचा आज जन्मदिवस. ४० हून जास्त पुस्तक लिहणाऱ्या आनंद यादव यांची ‘झोंबी’ ही आत्मकथनपर कादंबरी खूप गाजली. गावपणातलं जगण मांडणाऱ्या या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला. कोल्हापूर, पुण्यात शिक्षण झालेल्या यादव यांनी सुरवातीला काही काळ आकाशवाणीत काम केलं. त्यानंतर ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक झाले.

संत तुकारामांच्या जीवनावरील ‘संतसूर्य तुकाराम’ ही त्यांची कादंबरी वादग्रस्त ठरली. वारकऱ्यांनी या कादंबरीला प्रचंड विरोध केला. त्यामुळे २००९ ला अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊनही त्यांना ते स्वीकारता आलं नाही. वाढता विरोध बघून त्यांनी ही कादंबरीच मागे घेतली. वारकऱ्यांनी लेखक आणि प्रकाशकाविरुद्ध पोलिसात तक्रार दिली. या प्रकरणात यादव यांना जामीन मिळाला होता. आणि जामिनावर असतानाच २७ नोव्हेंबर २०१७ ला त्यांचं निधन झालं.

एक नंबरी नोट (१९१७)

भारतात आजच्याच दिवशी १०१ वर्षांपूर्वी एक रुपयाची नोट चलनात आली. त्यानंतर वेळोवेळी या नोटेमधे बदल झाले. पण पहिल्या नोटेची आपली खास बात अजून कायम आहे. ३० नोव्हेंबर १९१७ ला ब्रिटनमधून छापून आलेल्या या नोटेवर किंग पंचम जॉर्जची सही असायची. ‘मी धारकाला कोणत्याही कार्यालयीन कामासाठी एक रुपया अदा करण्याची हमी देतो’ अशी ग्वाही या नोटेवर छापण्यात आली होती. यानंतर एक रुपयाच्या नोटांवरून हे वाक्य काढून घेण्यात आलं. विशेष म्हणजे, फाळणीनंतरही काही वर्ष पाकिस्तानात एक रुपयाची भारतीय नोट चलनात होती. 

गेल्या शंभर वर्षांत जवळपास १२५ प्रकारच्या एक रुपयाच्या नोटा चलनात आल्या. यावर वेगवेगळ्या २८ प्रकारची डिझाईन आहे. भारतात नोटा छापण्याचा अधिकार हा फक्त रिझर्व बँक ऑफ इंडियाकडेच आहे. पण याला अपवाद फक्त एक रुपयाच्या नोटेचा आहे. त्यामुळेच यावर केंद्रीय अर्थमंत्र्यांची सही असते. नोटांच्या छपाईला काहीवेळा त्याच्या चलनी मुल्याहून अधिक खर्च लागतो. त्यामुळे १९९५ मधे एक रुपयाची नोट छापणं बंद करण्यात आलं होते. २०१५ मधे पुन्हा ही छपाई सुरू झालीय. पण या नोटेची चलनात खूप टंचाई आहे.