३० डिसेंबर: आजचा इतिहास

३० डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ३० डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

संस्थात्मक वैज्ञानिक विक्रम साराभाई (निधन १९७१)

भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार विक्रम साराभाई यांचा आज स्मृतीदिवस आहे. स्वातंत्र्यानंतर देशात तब्बल ४० संस्थांची स्थापना करून वैज्ञानिक संस्थांच्या पायाभरणी त्यांनी मोठं योगदान दिलं. साराभाई यांच्यामुळेच अंतराळ संशोधनात भारताचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतलं जाऊ लागलं. केरळच्या थुंबा इथल्या रॉकेट लाँचिंग स्टेशनची स्थापना त्यांनी केली. या केंद्राला नंतर विक्रम साराभाई यांचं नाव देण्यात आलं. परदेशात संशोधन करत असलेल्या डॉ. वसंत गोवारीकर यांच्यासारख्या ख्यातनाम शास्त्रज्ञांना मायदेशात आणण्यासाठी प्रयत्न केले.

१२ ऑगस्ट १९१९ ला जन्मलेल्या विक्रम साराभाई यांचा यंदा जन्मशताब्दी आहे. एका उद्योगपतीच्या घरात वाढलेल्या साराभाई यांच्या घरात महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू यांसारखे नेते यायचे. त्यामुळे उद्योगासोबतच राजकारणात जाण्याची त्यांना संधी होती. पण त्यांनी शास्त्रज्ञ होऊन देशाचं भविष्य बदललं. त्यांना लहानपणापासूनच गणित आणि फिजिक्समधे विशेष आवड होती. अवकाश संशोधनाबरोबरच त्यांनी टेक्सटाईल, फार्मासिटिकल, अणुऊर्जा, कला या क्षेत्रातही विशेष योगदान दिलं. डॉ. साराभाई यांना १९६६ मधे पद्मभूषण आणि १९७२ मधे मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

जगाला हॉटमेल देणारे सबीर भाटिया (जन्म १९६८)

आता आपण ईमेल म्हटलं की जीमेल म्हणतो. पण इमेलच्या बालपणात ईमेल म्हटलं की हॉटमेल म्हटलं जायचं. या हॉटमेलमागचं डोकं होतं भारतात जन्मलेल्या सबीर भाटिया यांचं. भाटिया आता पन्नाशीत पोचलेत. पण २८ व्या वर्षीच त्यांनी १९९६ मधे हॉटमेलच्या माध्यमातून मेल आयडी सेवा द्यायला सुरवात केली होती. यामुळे भाटियांचं जगभरात नाव झालं. नंतर त्यांनी हॉटमेलची ही सेवा मायक्रोसॉफ्टला विकली. त्यानंतरही २००४ मधे जीमेल येईपर्यंत हॉटमेलने आपलं स्थान कायम राखलं होतं.

चंदीगडमधल्या एका पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या भाटियांचं सुरवातीच्या काळातलं शिक्षण भारतातचं झालं. नंतर त्यांनी अमेरिकेतल्या स्टॅनफोर्ड युनिवर्सिटीतून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधे एमएस केलं. काही काळ जगप्रसिद्ध अॅपल कंपनीत काम केलं. १९९४ मधे आपल्या एका सहकाऱ्यासोबत स्वतःचं काम सुरू केलं. ४ जुलै १९९६ ला त्यांनी हॉटमेल ही वेबमेल सेवा सुरू केली. मायक्रोसॉफ्टने हॉटमेल डॉटकॉम विकत घेतल्यावर आऊटलूक डॉट कॉम नावाने इमेल सेवा द्यायला सुरवात केली.

मोगलीचा बाप रुडयार्ड किपलिंग (जन्म १८६५) 

सध्या नेटफ्लिक्सवर गाजत असलेला मोगलीचा सिनेमा जगभरातल्या लोकांना आवडतोय. रुडयार्ड किलपिंग यांनी १८९३ साली जंगल बूक हा कथासंग्रह लिहिला तेव्हापासून असंच सुरू आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या पेंच अभयारण्यात त्यांनी जंगलात वाढलेला एक मुलगा पाहिला होता. त्यावरची ही कथा आतापर्यंत गाजतेय. 
१८९९ ला मोगलीवरचा पहिलं नाटक आलं. त्यानंतर १९४२ला मोगली नावाचा सिनेमा आला. त्यानंतर अनेकदा अनिमेनश सिनेमे, सिनेमे येतच राहिले. त्यावरून प्रेरणा घेतलेल्या टारझनचेही असेच अनेक अवतार आले. हे एवढं अस्सल आलं कारण रुडयार्ड यांचा जन्म भारतातच झाला होता. तोही मुंबईत. पुढे पत्रकार म्हणून ते देशभर फिरले. त्यावर आधारित कथा, कविता, कादंबऱ्या लंडनला परतल्यावर लिहिल्या. ज्यांनी एकूणच इंग्रजी साहित्यावर प्रभाव पाडला. वयाच्या अवघ्या ४२व्या वर्षी त्यांना साहित्याचं नोबेल मिळालं. इतक्या कमी वयात दुसऱ्या कोणालाच साहित्याचं नोबेल मिळालेलं नाही. 

जीवनाचे गीतकार मंगेश पाडगावकर (निधन २०१५) 

या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावं, असं जगण्याचं साधंसोपं तत्त्वज्ञान सांगणारे कवी. याने प्रेम केलं किंवा त्याने प्रेम केलं, मला सांगा यात तुमचं आमचं काय गेलं, असा प्रेम करणाऱ्या तरुणांना हुरूप देणारे कवी. श्रावणात घननिळा बरसला, असं निसर्गाचं दर्शन घडवणारे कवी. लाथेच्या भयाने डावा हात गांडीवर ठेवून उजव्या हाताने सलाम, म्हणणारे बंडखोर कवी. 
त्यांनी कविता लिहिल्या, गीतं लिहिली, गजला लिहिल्या, विडंबन गीतं लिहिली आणि बालगीतंही लिहिली. विंदा करंदीकर आणि वसंत बापट यांच्यासोबत राज्यभर कविता सादर केल्या. शेवटच्या काळात मीरा, कबीर यांच्या कवितांचे अनुवाद केले. महाभारताचाही अनुवाद केला. अखेरपर्यंत लिहिते राहिले आणि अनेक पिढ्यांना आवडत राहिले. 


पडद्यामागचे संगीतकार एन. दत्ता (निधन १९८७) 


तेरे प्यार का आसरा चाहता हूं, औरत ने जनम दिया मर्दों को, अश्कों ने जो पाया हैं, हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, मस्ती भरा ये समा, हे चिंचेचे झाड दिसे मज अशी एकाहून एक गाजलेली गाणी देणारे संगीतकार एन. दत्ता. यातलं एन म्हणजे नाईक. ते मूळ गोव्यातल्या महाराष्ट्राच्या सीमेजवळ असणाऱ्या आरोबा या गावातले. पारतंत्र्यातल्या शिरस्त्याप्रमाणे ते मुंबईला आले. 
त्यांच्या घरात संगीताची परंपरा नव्हती. पण खूप संगीत ऐकलं होतं. त्याच जोरावर त्यांनी मेळ्यांत गाणी गायला सुरवात केली. हेमंत केदार आणि गुलाम हैदर यांच्यानंतर सचिनदेव बर्मन यांना असिस्टंट म्हणून दीर्घकाळ काम केलं. बर्मनदांच्या अनेक गाजलेल्या गाण्यांवर त्यांचा ठसा मानला जातो. बीआर चोप्रांच्या साधना या सुपरहिट सिनेमाच्या गाण्यांनी त्यांना स्वतंत्र संगीतकार म्हणून ओळख मिळवून दिली. त्यानंतर त्यांना मोठी लोकप्रियता मिळत गेली. सोपी चाल आणि वाद्यांचा गोड मेळ ही त्यांची वैशिष्ट्यं होती.