३ डिसेंबर: आजचा इतिहास

०३ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ३ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

देशरत्न डॉ. राजेंद्र प्रसाद (जन्म १८८४)

देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा आज जन्मदिवस. त्यांचं देशरत्न हे नाव लोकप्रिय झालं. स्वातंत्र्य चळवळीतील सक्रीय सहभागासोबतच संविधान सभेचे या नात्याने संविधानाच्या निर्मितीत त्यांचं मोठं योगदान राहिलं. २६ जानेवारी १९५० ला संविधान अमलात येणार होतं. आदल्या दिवशी २५ जानेवारीला प्रसाद यांची बहीण भगवती देवी यांचं निधन झालं. पण बहिणीच्या अंत्यसंस्काराला जाण्याऐवजी राजेंद्रबाबू देशाच्या प्रजासत्ताक स्थापना सोहळ्याला उपस्थित राहिले. बिहारच्या सिवान जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला.

२६ जानेवारी १९५० ते १४ मे १९६२ या काळात ते राष्ट्रपती राहिले. या १२ वर्षांच्या काळात राजेंद्र प्रसाद यांनी अनेक चांगले पायंडे पाडले. सर्वाधिकार कठोरपणे वापरून त्यांनी राष्ट्रपती पदाची ताकद दाखवून दिली. राष्ट्रपती होण्याआधी ते काहीकाळ केंद्रीय मंत्री होते. 'बापू के कदमों में', 'इंडिया डिवाइडेड', 'सत्याग्रह ऐट चम्पारण', 'गांधी जी की देन' यासारखी अनेक पुस्तकं त्यांनी लिहली. राष्ट्रपती पद सोडल्यावर त्यांनी पाटण्याजवळच्या एका आश्रमात राहण्याचा निर्णय घेतला. तिथंच २८ फेब्रुवारी १९६३ साली त्यांचा मृत्यू झाला. 

हॉकीचे जादूगार ध्यानचंद सिंह (मृत्यू १९७९)

जगप्रसिद्ध हॉकीपटू मेजर ध्यानचंद सिंह यांचा आज स्मृतीदिवस. सलग तीन वेळा १९२८, १९३२ आणि १९३६ मधे भारताला हॉकीत गोल्ड मेडल जिंकून देणाऱ्या टीमचा ते भाग राहिले. शाळेतल्या अभ्यासामधे जेमतेम मजल असलेले ध्यानचंद आपल्या कठोर मेहनतीतून हॉकीतले जादूगार झाले. मिलीट्रीत शिपाई असलेल्या ध्यानचंद यांनी आपल्या खेळाच्या बळावरच मेजर पदापर्यंतची पदोन्नती मिळवली. त्यांच्या स्टीकच्या पकडीत बॉल अक्षरशः चिकटून बसायचा. त्यामुळे ते जादुई स्टीकने खेळत असल्याचा संशय विरोधी टीमला यायचा. हॉलंडमधे तर एका मॅचमधे विरोधी टीमने त्यांची स्टीक तोडून त्यात लोहचुंबक तर नाही ना याची खात्री करून घेतली होती. फुटबॉलमधे पेले, क्रिकेटमधे ब्रॅडमन यांना जसा मान आहे, तसा ध्यानचंद यांना या जादुई खेळीमुळे सन्मान मिळाला.

ध्यानचंद यांच्या खेळातल्या योगदनाच्या गौरवार्थ दरवर्षी त्यांच्या जन्मदिनी ५ ऑगस्टला राष्ट्रीय खेळ दिवस साजरा केला जातो. आपल्या कारकीर्दीत त्यांनी हजारहून अधिक गोल केले. १९५६ मधेच पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित ध्यानचंद यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी दरवर्षी पुढे येते. 

जगण्याचे धडे देणाऱ्या बहिणाबाई चौधरी (मृत्यू १९५१)

आपल्या साध्या सोप्या जगण्यातून जीवनदृष्टी देणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा आज स्मृतीदिवस. जळगाव जिल्ह्यातल्या एका महाजन कुटुंबात जन्मलेल्या बहिणाबाई घरकाम, शेतकाम करताना स्वरचित ओव्या गात असत. बहिणाबाईंनी आपल्या कविता 'लेवा गणबोली'मधे रचल्या. त्या कविता त्यांचा मुलगा सोपानदेव चौधरी यांनी कागदावर उतरवल्या.

सोपान चौधरींनी बहिणाबाईंच्या या सगळ्या कविता आचार्य अत्रे यांना दाखवल्या. त्यावर अत्र्यांनी 'हे तर बावनकशी सोनं आहे! हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे!', असं म्हणत या कविता प्रकाशित करण्यासाठी पुढाकार घेतला. अत्रेंच्याु सविस्तर प्रस्तावनेसह बहिणाबाईंची गाणी १९५२ मध्ये प्रकाशित झाली आणि ‘धरतीच्या आरशात स्वर्ग पाहणाऱ्या या कवयित्रीची’ महाराष्ट्राला ओळख झाली. माझी माय सरोसती, मन वढाय वढाय, अरे खोप्यामधी खोपा, माझी मुक्ताई मुक्ताई, आखाजीचा आखाजीचा यासारख्या त्यांच्या कविता रसिकांच्या काळजात घर करून आहेत. 

धडाकेबाज कॅप्टन मिताली राज (जन्म १९८२)

भारतीय महिला क्रिकेट टीमची घडी बसवणारी कप्तान मिताली राजचा आज बर्थडे. राजस्थानच्या जोधपूरमधे जन्मलेल्या मितालीने वयाच्या १७ व्या वर्षीच इंटरनॅशनल क्रिकेटमधे पाऊल ठेवलं. आयर्लंड विरुद्धच्या पहिल्याच मॅचमधे तिने नाबाद ११४ रन काढत क्रिकेट जगताचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. २००२ मधे टेस्ट क्रिकेटमधे आलेल्या मितालीने तिसऱ्याच मॅचमधे नवाच विक्रम केला. इंग्लंडविरुद्धच्या मॅचमधे ४०७ बॉलवर १९ चौक्यांच्या मदतीने २१४ रन काढणाऱ्या मितालीने सर्वांत मोठ्या खेळीचा विक्रम आपल्या नावावर केला. ५९८ मिनिटं ती मैदानावर तळ ठोकून होती. 

मितालीच्या नेतृत्वातच भारताची टीम पहिल्यांदाच २००५ मधे महिला वर्ल्डकपच्या फायनलमधे पोचली. जुलै २००६ मधे ती क्रिकेटमधे सहा हजार रन बनवणारी एकमेव क्रिकेटपटू बनली. तिने आपल्या करिअरमधे १० टेस्ट आणि १९७ वनडे मॅच खेळल्या. यात तिने क्रमशः ६६३ आणि ६५५० रन काढले. डबल सेंच्यूरी काढणारी पहिली महिला क्रिकेटपटू आहे. महिला क्रिकेटमधल्या या घवघवीत यशाच्या गौरवार्थ तिचा २००३ मधे अर्जून पुरस्कार आणि २०१५ मधे पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला. कोच रमेश पोवार यांच्यासोबतच्या मतभेदांमुळे सध्या ती चर्चेत आहे.

बेधडक बोलणारी कोंकणा सेन शर्मा (जन्म १९७९)

बॉलीवूड अॅक्ट्रेस कोंकणा सेन शर्मा हिचा आज वाढदिवस आहे. कुठलीही भीडभाड न राखता बेधडक बोलणारी कोंकणा अॅक्ट्रेस और प्रोड्यूसर अपर्णा सेन यांची मुलगी आहे. कोंकणाने 'पिकनिक', 'पेज 3', 'सिर्फ 24 घंटे', 'ट्रैफिक सिगनल', 'आ जा नचले', 'फैशन', '7 खून माफ', 'एक थी डायन', 'तलवार', 'वेकअप सिड', 'लिपिस्टिक अंडर माइ बुर्खा' यासारख्या अनेक सिनेमांमधे अॅक्टींग केलीय. ‘अ मानसून डेट’ या आगामी सिनेमात तिने एका समलैंगिकाचा रोल केलाय. 

घरातूनच अॅक्टींगचा वारसा मिळालेल्या कोंकणाला वयाच्या चौथ्या वर्षीच १९८३ मधे 'इंदिरा' सिनेमात एक बाल कलाकार म्हणून रोल मिळाला. २००२ मधे 'मिस्टर अँड मिसेस अय्यर' हा तिचा पहिला इंग्रजी सिनेमा आला. यासाठी तिला बेस्ट अॅक्ट्रेस म्हणून नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळाला. 'ओमकारा' और 'लाइफ इन ए मेट्रो' या सिनेमांसाठी बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस म्हणून फिल्मफेयर अवॉर्डही मिळाला.