२९ ऑक्टोबर : आजचा इतिहास

२९ ऑक्टोबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २९ ऑक्टोबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. जोसेफ गोबेल्स, कमलादेवी चटोपाध्याय, विजेंदर सिंग, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था आणि चीनचं एक मूल धोरण यांच्याविषयीच्या.

जोसेफ गोबेल्स (जन्म १८९७)

कुठल्याही देशात निवडणुकीचा हंगाम हा रेटून खोटं बोलण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पुढं याच गोष्टीला अभ्यासक गोबेल्स तंत्र, नीती म्हणायला लागले. तर आज गोबेल्स नीतीचा जनक जोसेफ गोबेल्स याचा जन्मदिवस. सोशल मीडिया आल्यापासून तर गोबेल्स नीतीचा सुवर्णकाळच आलाय. जर्मन हूकूमशहा हिटलरचा प्रचारमंत्री असलेल्या गोबेल्सच्या मते, ‘एखादं असत्य हजारदा सांगा म्हणजे लोकांना ते सत्यच वाटायला लागेल.‘ आपल्या अवतीभवतीही सराईतपणे खोटं बोलणाऱ्यांची काही कमी नाही. त्यांनी गोबेल्सपासूनच प्रेरणा घेतली असेल. पण असं सराईत खोटं बोलणं हा वेळ मारून नेण्याचा प्रकार असल्याचं आता मानसशास्त्रज्ञांनी प्रयोगानिशी सिद्ध केलंय.

१९२१ ला पीएचडी मिळवल्यानंतर १९२८ मधे गोबेल्स राजकारणात आला. काही काळातच बर्लिनमधला प्रभावशाली राजकारणी बनला. १९३३ मधे नाझी पक्षाची सत्ता आल्यावर त्याने प्रसारमाध्यमांवर नियंत्रण मिळवून हिटलरच्या सामाजिक आणि राजकीय धोरणांची अमंलबजावणी केली. गोबेल्सने ज्यूंविरोधात अनेक सिनेमे बनवले. १९३३ ते १९४५ दरम्यान तो मंत्री होता. ३० एप्रिल १९४५ ला हिटलरनं आत्महत्या केल्यानं गोबेल्सची चान्सलेरपदी वर्णी लागली. पण पदभार स्वीकारल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याने १ मे १९४५ ला आपल्या कुटंबासोबत आत्महत्या केली.

कमलादेवी चट्टोपाध्याय (निधन १९८८)

भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि हस्तकला क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व कमलादेवी चट्टोपाध्याय यांचं आजच्या दिवशी निधन झालं. त्यांनी १९२० मधे अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना केली. गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहात आणि असहकार चळवळीत त्यांचा सहभाग होता. स्वातंत्र्यानंतर कमलादेवींनी रंगभूमी आणि हातमाग उद्योगच्या माध्यमातून समाजातील शोषित घटकांना मुख्य प्रवाहात आण्ण्यासाठी प्रयत्न केले. कमलादेवींच्या दूरदृष्टीमुळे आज आपल्याला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, संगीत नाटक अकादमी आणि क्राफ्ट काऊंसिल ऑफ इंडिया या कला क्षेत्राशी संबंधित असलेल्या संस्था बघायला मिळतात. गेल्या ३ एप्रिलला ११५ व्या जयंतीनिमित्त गुगलने डुडल बनवून कमलादेवींना आदरांजली वाहिली होती. कमलादेवींना पद्म भूषण, पद्म विभूषण, रॅमन मॅगससे या पुरस्काराने गौरवण्यात आलं.

विजेंदर सिंग (जन्म १९८५)

बॉक्सर विजेंदर सिंगचा आज बड्डे. हरयाणातल्या भिवानी इथं जन्मलेल्या विजेंदरचा मोठा भाऊ मनोज हा बॉक्सर होता. त्यामुळं लहानपणापासून खेळाची आवड असलेल्या विजेंदरला व्यावसायिक बॉक्सर बनवण्याचा निर्णय मोठा भावानेच घेतला. माजी राष्ट्रीय बॉक्सिंगपटू जगदीश सिंग यांच्या कल्बमधे विजेंदर सराव करायचा. स्थानिक पातळीवरील अनेक स्पर्धा जिंकलेल्या विजेंदरला खरी ओळख मिळाली ती २००८ मधे. बिजिंग इथं झालेल्या ऑलिंम्पिक स्पर्धेत विजेंदरने भारताला पहिल्यांदाच बॉक्सिंगसाठीचं ब्रांझ पदक मिळवून दिलं. २०१० मधे त्याला पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. जून २०१४ ला आलेल्या ‘फगली’ या हिंदी सिनेमात विजेंदरचा रोल आहे.

चीन : एक मूल धोरण रद्द (२०१५)

सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीननं वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी १९७९ मधे एक मूल धोरण आणलं होतं. लोकसंख्या कमी करण्याच्या नादात या धोरणामुळं देशाच्या सामाजिक आरोग्यवर दुष्परिणाम होत असल्याचं दिसून आलं. त्यामुळं २०१५ मधे आजच्या दिवशी चीननं आपलं एक मूल धोरण रद्द केलं. एक मूल धोरणामुळं चीनमधे एकाएकी म्हाताऱ्यांची संख्या वाढली. चीन मोठी आर्थिक वाटचाल करत आहे. त्यामुळं उद्योगधंद्यात मोठं मनुष्यबळ लागायला लागलं. तरुणांच्या हाताला काम मिळू लागलं. पण काम करायला लोकच नाही, अशी अवस्था देशात निर्माण झाली. दुसरीकडं वृद्धांची काळजी घ्यायला एक मूल धोरणामुळं घरात कुणीच नसायचं. त्यामुळं सरकारनं एक मूल धोरण रद्द केलं.

महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था (स्थापना १८९४)

मराठी भाषेचं संवर्धन आणि प्रसार व्हावा या हेतूने १८९४ मधे महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेची स्थापना झाली. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, लोकमान्य टिळक यासारख्या २५ लोकांनी मिळून पुण्यात या संस्थेची स्थापना केली. त्यावेळी संस्थेचे नाव डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी असं होतं. या संस्थतर्फे गेल्या सव्वाशे वर्षांपासून मराठीतील उत्कृष्ट पुस्तकांना पुरस्कार देऊन प्रोत्साहन दिलं जातं. स्वातंत्र्यानंतर १९४८ ला संस्थेचे इंग्रजी नाव बदलून महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था असं मराठी नामकरण करण्यात आलं. ही महाराष्ट्रातली सगळ्यांत जुनी साहित्य संस्था म्हणून ओळखली जाते.