२९ नोव्हेंबरः आजचा इतिहास

२९ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २९ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

सोशल इंजिनियर ठक्कर बापा (जन्म १८६९)

चेन्नईमधल्या कष्टकऱ्यांची स्वतःची एक तमिळची बोलीभाषा आहे. त्यात एक शब्द प्रचलित आहे, अप्पाटक्कर. अगदी सिनेमांतही तो गाजतो. त्या शब्दाचा अर्थ आहे, सगळं माहीत असणारा. आश्चर्य वाटेल पण गुजरातच्या भावनगरमधे जन्मलेल्या ठक्कर बाप्पांवरून घेतलाय. ठक्कर बापांचा देशभर संचार होता. मूळ नाव अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर. ते चांगले इंजिनियर होते. सांगली संस्थानाचं चीफ इंजिनियरपदही भूषवलं. मुंबई महापालिकेत काम करताना त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांची दयनीय अवस्था पाहिली. त्याने ते अस्वस्थ झाले. इतके की आफ्रिकेतल्या युगांडा देशातला पहिला रेल्वेमार्ग उभारण्यासाठी गेलेले असताना, ते काम अर्धवट सोडून परतले.

सुरवातीला ते गोपाळ कृष्ण गोखलेंच्या भारत सेवक समाजाशी जोडले. नंतर त्यांनी स्वतंत्रपणे तेव्हाच्या मुंबई प्रांतातल्या भिल्ल आदिवासींच्या सेवेत जोडून घेतलं. पुढे ते महात्मा गांधींच्या हरिजन सेवक संघाचे सेक्रेटरी बनले. त्यांनी दलित आणि आदिवासींच्या सेवेत आयुष्य घालवलं. त्यासाठी देशभर सतत प्रवास केला. संघटन केलं. त्यांनी गोळा केलेल्या माहितीच्या आधारे संविधानात दलित आदिवासींच्या भल्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी जोडल्या गेल्या. २० जानेवारी १९५१ला त्यांचं निधन झालं. 

स्पॅनिश चित्रकार बार्तोलोम एस्तेबान मुरिलो (जन्म १६१७)

स्पॅनिश चित्रकार बार्तोलोम एस्तेबान मुरिलो (Bartolomé Esteban Murillo) यांना गुगलने ४०० व्या जयंतीनिमित्त आज डूडल काढून आदरांजली वाहिलीय. डूडलसाठी मुरिलो यांचं १६५५ मधे काढलेलं जगप्रसिद्ध 'टू विमेन अॅट अ विंडो' हे चित्र वापरलंय. खिडकातून जग न्याहाळणाऱ्या लहान मुलीच्या मागं अर्धवट तोंड झाकलेली बाई त्यांनी या चित्रात साकारलीय. सध्या हे चित्र 'वॉशिंग्टन नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट'च्या चित्रसंग्रहात आहे. त्यांच्या बऱ्याचशा पेंटिंग सेंट पीटर्सबर्गच्या संग्रहालयात आहेत.

मुरिलो यांची वाढती लोकप्रियता बघून एका राजानं त्यांच्या चित्रकलेवरच बंदी घातली होती. हातावर पोट असणाऱ्या एका कुटुंबात जन्मलेले मुरिलो आपल्या काकांकडून चित्रकारी शिकले. आपल्या कुंचल्यातून साकारलेली चित्रं ते जत्रेत विकायचे. हे बघून इतरांनीही जत्रेत चित्र विकायला सुरवात केली. आपल्या धार्मिक चित्रांमुळे मुरिलो यांना तरुणपणातच लोकप्रियता मिळाली. पण त्यांची जगभर ख्याती झाली ती रोजचं जगणं चित्रात उतरवायला सुरवात केल्यावर. १६१७ मधे डिसेंबरच्या सुरवातीला स्पेनच्या सविले शहरात जन्मलेल्या मुरिलो यांच्या जन्मतारखेची अधिकृत नोंद नाही. ३ एप्रिल १६८२ मधे वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

संघर्षशील शायर अली सरदार जाफरी (जन्म १९१३)

आपल्या कविता, शायरीत रोमँटिकपणासोबतच संघर्षाची भावना मांडणारे उर्दू साहित्यिक अली सरदार जाफरी यांचा आज जन्मदिवस. अलीगड मुस्लीम युनिवर्सिटीमधे बीए करत असताना जाफरी यांना कम्युनिस्ट असल्याचं सांगून संस्थेतून काढून टाकण्यात आलं होतं. त्यानंतर ते लखनऊ, दिल्लीत शिकले. शिकून थेट मायानगरी मुंबई गाठली. इथं ते कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सक्रीय सदस्य झाले. आपल्या कवितेतूनही ते सर्वसामान्यांमधे राजकीय जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. १९३८ मधे त्यांचा मंजिल हा पहिला लघुकथा संग्रह आला.

स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेणाऱ्या जाफरी यांनी अनेकदा तुरुंगवास भोगला. त्यातूनच त्यांच्यातल्या शायराचा जन्म झाला. ‘परवाज़’ (१९४४) हा त्यांचा पहिला शायरीसंग्रह आहे. ‘नई दुनिया को सलाम’ (१९४७), ख़ून की लकीर (१९४९), अम्मन का सितारा (१९५०), एशिया जाग उठा (१९५०), पत्थर की दीवार (१९५३), मेरा सफ़र (१९९९) आदी साहित्यकृती त्यांच्या नावावर आहेत. आपल्या शायरीमधे नवे शब्द आणि नवा विचार मांडणाऱ्या या शायरचा १ ऑगस्ट २००० ला मृत्यू झाला.

झंझावाती क्रिकेटपटू सदानंद विश्वनाथ (जन्म १९६२)

विशू फार इंटरनॅशनल क्रिकेट खेळलाच नाही. तीन टेस्ट आणि २२ वनडे. पण भारतीय क्रिकेटवेडे त्याला विसरू शकत नाहीत. ऑस्ट्रेलियात १९८५ला झालेली चॅम्पियन्स ट्रॉफी आणि त्यापाठोपाठ शारजातल्या रॉथमन्स कपमधलं भारतातचं झंझावाती यश. त्यात देखण्या सदानंद विश्वनाथने स्टम्पमागे केलेली कामगिरी. त्याचा हसरा चेहरा. विजयाचा जल्लोष. रवी शास्त्रीने जिंकलेल्या ऑडीवर लोळत आनंद साजरा करणं. हे सारं सदानंद विश्वनाथ म्हटल्यावर लक्षात येतं.

तो आक्रमक बॅटसमन होता. पण त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. त्याच्या आई वडिलांचा एकामागून एक अचानक मृत्यू झाला. त्यातून तो सावरेपर्यंत त्याची जागा किरण मोरेसारख्या आणखी एका चांगल्या विकेटकीपरने आणि अधिक सातत्यपूर्ण बॅटसमनने घेतली. विशू आता कोच आणि अंपायर म्हणून काम करतो. सुनील गावस्करने त्याच्या पुस्तकात चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयाचं क्रेडिट सदानंद विश्वनाथला दिलंय. तेवढंच त्याच्यापाशी उरलं असावं.

भारतीय बिटल जॉर्ज हॅरिसन (निधन २००१)

आजवर जगात झालेल्या सर्वोत्कृष्ट गिटार वाजवणाऱ्यांपैकी एक असणारा जॉर्ज हॅरिसन. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी बिटल्स या जगप्रसिद्ध बॅंडचा सदस्य बनून जगाला वेड लावणारा जॉर्ज हॅरिसन. त्याला भारताचं आकर्षण त्याच्या जन्माच्या आधीपासून होतं म्हणे. तो जन्मायचा होता तेव्हा त्याची गरोदर आई आठवड्यातून एकदा रविवारी दुपारी रेडियोवर लागणारं भारतीय शास्त्रीय संगीत आवर्जून ऐकायची. सतारवादक रविशंकर यांना भेटल्यावर त्याला भारताचं जणू वेड लागलं. तो रविशंकरांचा शिष्य बनला. सतार शिकला.

आपल्या गाण्यांमधे त्याने भारतीय वाद्य आणि सूर आणला. गुरूंच्या शोधात भारतभर फिरला. आपल्या परीने अनंताचा शोध घेत राहिला. तसं त्याचं संगीतही बदलत राहिलं. इतकंच नाही तर बांग्लादेश युद्धातल्या निर्वासितांसाठी त्याने अल्बम काढला. कार्यक्रम केले. दीर्घकाळ कॅन्सरशी त्याने लढा दिला. तो गेला तेव्हा त्याच्या अंतिम इच्छेनुसार त्याच्या शरीराची थोडी राख करून ती गंगायमुनेत वाहण्यात आली. त्याच्या निधनानंतर त्याचा शेवटचा अल्बम ब्रेनवॉश्ड आला. त्याच्या आतल्या पानावर आत्म्याचं अमरत्व सांगणारा श्लोक होता. पण जॉर्ज हॅरिसन त्याने लिहिलेल्या, संगीतबद्ध केलेल्या आणि साथ दिलेल्या गाण्यांतून आधीच अमर झाला होता. संगीतासाठी पश्चिमेकडे आशाळभूतपणे पाहणाऱ्या भारतीयांना त्यांच्या संगीताची ओळख करून देण्याचं मोठं काम मात्र त्याने केलं.