२९ डिसेंबर: आजचा इतिहास

२९ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २९ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

भूमिहीनांचे तारणहार दादासाहेब गायकवाड (निधन १९७१)

गेल्यावर्षी गुजरातच्या उना इथल्या दलितांनी मेलेल्या गायी न उचलण्याचं आंदोलन केलं. ‘गाय की पुंछ तुम रखो, हमें हमारी जमीन दो’ या घोषणेने देशभर खळबळ उडाली. तर या घोषणेमागची प्रेरणा होते दादासाहेब गायकवाड. या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या तरुण जिग्नेश मेवाणीनेचं एका मुलाखतीत हे सांगितलंय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडून जे राहिलं ते मिशन दादासाहेबांनी पूर्ण केलं. दादासाहेबांनी भूमिहीन दलित आणि दलित्तेतरांना हक्काची जागा मिळवून दिलं. भाऊसाहेब किशनजी गायकवाड हे दादासाहेबांचं पूर्ण नाव.

आज महाराष्ट्रात भूमिहीन दलितांसाठी गायरान जमिनीचा जो काही तुकडा मिळतोय तो दादासाहेबांच्या १९५९ मधल्या आंदोलनामुळे. या आंदोलनाला कम्युनिस्ट, शेतमजुरांनीही पाठिंबा दिला. बाबासाहेबांचे विश्वासू सहकारी असलेले दादासाहेब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सक्रीय कार्यकर्ते होते. भूमिहीनांना जमीन मिळवून देण्याच्या आंदोलनामुळे दादासाहेब गावखेड्यात धोत्र्या म्हणून ओळखले जातात.

मास्टर दीनानाथ मंगेशकर (जन्म १९००)

मराठी संगीत नाटकांचा सुवर्णकाळ आपल्या तेजस्वी गायनाने उजळून टाकणारे रंगकर्मी, संगीतकार, गायक दीनानाथ मंगेशकर यांची आज जयंती. श्री. कृ. कोल्हटकरांनी त्यांना मास्टर ही उपाधी बहाल केली. आणि ते मास्टर दीनानाथ मंगेशकर म्हणून ओळखले जाऊ लागले. अस्खलित वाणी, तल्लख बुद्धी अशा उपजत गुणांमुळे मराठी नाट्य अभिनय कलेच्या जोरावर त्यांनी आपली विशेष छाप सोडली. १९१४ मधे बालगंधर्वांच्या नाटक कंपनी सोडून ते किर्लोस्कर मंडळात गेले. नंतर त्यांनी ‘बलवंत संगीत मंडळी’ ही नाटक कंपनी सुरू केली.

‘भावबंधन’, ‘पुण्यप्रभाव’, ‘उग्रमंगल’ ही नाटकं त्यांनी आपल्या गायन अभिनयाने विशेष गाजली. ‘अंधेरी दुनिया’ सिनेमातली त्यांची भूमिकाही गाजली. लता, आशा, उषा, मीना, हृदयनाथ या त्यांच्या मुलांनी त्यांचा वारसा प्रकाशित केला. कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला, असं पी. सावळाराम यांनी केलेलं वर्णन खरं ठरलं. 

सुपरस्टार काका राजेश खन्ना (जन्म १९४२)

सुपरस्टार राजेश खन्ना यांनी आपल्या कारकीर्दीत हिंदी सिनेमातले अॅक्टर ते राजकीय नेता असा प्रवास केला. बॉलीवूडमधे पहिले आणि सर्वात लोकप्रियता मिळवणारे सुपरस्टार असं त्यांचं वर्णन केलं जातं. १९६९ ते १९७१ या काळात लागोपाठ १५ वेगवेगळ्या सिनेमांत काम करून त्यांनी आपल्या अॅक्टिंगची जादू दाखवली. या सिनेमांनी भारतीय सिनेजगतात कधीही न तुटणारा रेकॉर्ड बनवला.

पंजाबमधे जन्मलेल्या राजेश खन्ना आपल्या फॅन्समधे ‘काका’ म्हणून लोकप्रिय होते. १९६६ मधे ‘आखिरी खत’ या सिनेमातून त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरवात केली. सुरवातीला सतत अपयश. त्यानंतर सातत्याने मिळवलेलं फार मोठं यश. शेवटी पुन्हा अपयशाच्या गर्तेत. लोकांनी त्यांना जितकं डोक्यावर उचलून घेतलं तितकंच दूरही ढकललं. तरीही नितांतसुंदर सिनेमे, निखळ अभिनय, श्रवणीय गाणी यामुळे सिनेरसिक वर्षानुवर्षं विसरू शकणार नाहीत 

टीवीचे वाल्मिकी रामानंद सागर (जन्म १९२७)

ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात रामायण या दूरदर्शनवरच्या सीरियलने सबंध भारतावर गारुड केलं होतं. त्या मालिकेचे डायरेक्टर, प्रोड्युसर होते रामानंद सागर. त्यांचं मूळ नाव चंद्रमौली चोप्रा. त्यांचा जन्म लाहोरजवळच्या एका गावातला. १६ व्या वर्षीच त्यांची पहिली कविता प्रकाशित झाली. पुढे लेखक, पत्रकार, कवी, संपादक म्हणून ते रामानंद या टोपण नावाने गाजले. एक टीबी पेशंट की डायरी आणि और इंसान मर गया ही त्यांची स्वतःच्या अनुभवांवरची पुस्तकं गाजली.

फाळणीनंतर ते मुंबईत आले. राज कपूरसाठी त्यांनी लिहिलेला बरसात हा पहिलाच सिनेमा सुपरहिट झाला. नंतर स्वतःची फिल्म कंपनी काढून जिंदगी, आरजू, आंखें, चरस असे सिनेमे काढले. त्याच पुण्याईवर रामायण सीरियल त्यांच्याकडे आली. त्याने इतिहास घडवला. पुढे त्यांच्या कृष्णा, अलिफ लैला, जय गंगा मैया या टीवी सीरियलनेही खूप लोकप्रियता मिळवली. १२ डिसेंबर २००५ ला त्यांचं निधन झालं.

मिशीतले कवी अशोक नायगावकर (जन्म १९४७)

आपल्या उपहासात्मक कवितांमधून समाजातल्या चांगल्या वाईटावर भाष्य करणारे कवी म्हणून अशोक नायगावकर सगळ्यांना परिचित आहेत. देशात आणि देशाबाहेरही त्यांनी कवितांच्या मैफिली खुशखुशीत सादरीकरणाने गाजवल्या. अतिशय बिकट परिस्थितीत बालपण गेलेल्या नायगावकरांना कवितेने नाव मिळवून दिलं. सत्यकथेसारख्या एलिट मासिकात त्यांच्या कविता छापून यायच्या. 

अशोक नायगावकरांनी जगण्याच्या विविध अंगांवर तिरकस भाष्य करणाऱ्या कविता लिहिल्या. त्यांची भाषा सोपी आहे. सहज समजेल अशा त्यांच्या कविता कोपरखळ्या मारणाऱ्या आणि विचार करायला लावणाऱ्या असल्या तरी बोचकारणाऱ्या नाहीत. बँकेत ३१ वर्षे नोकरी केलेल्या नायगावकरांनी राज्यभर कवितांचे कार्यक्रम केले. तेव्हा अख्ख्या महाराष्ट्राने त्यांना डोक्यावर घेतलं. वाटेवरच्या कविता हा त्यांचा कवितासंग्रह बेस्टसेलर ठरला होता.