२८ ऑक्टोबर : आजचा इतिहास

२८ ऑक्टोबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २८ ऑक्टोबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. भगिनी निवेदिता, अशोक चव्हाण, इंदिरा नुई, बिल गेट्स आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी यांच्याविषयीच्या.

भगिनी निवेदिता (जन्म १८६७)

भारतीय लोकांच्या मनावर काही मोजक्या परदेशी लोकांनी आपल्या कामानं गारूड घातलं. त्यापैकी एक म्हणजे भगिनी निवेदिता. त्यांच मूळ नाव मार्गरेट एलिजाबेथ नोबुल. आयर्लंडमधे जन्मलेल्या मार्गरेटच्या जीवनाला १८९५ मधे स्वामी विवेकानंदांशी लंडनमधे झालेल्या भेटून कलाटणी मिळाली. तीन वर्षांनी त्या भारतात आल्या आणि कायमच्या भारताच्याच झाल्या. यानंतर मार्गरेट एलिजाबेथ नोबुलची भगिनी निवेदिता झाली. आपले गुरु स्वामी विवेकानंद यांच्यासोबतच्या भारतभ्रमणानंतर त्या कोलकात्यात स्थायिक झाल्या. तिथं मुलींसाठी शाळा काढली. भारताला स्वातंत्र्य मिळावं यासाठी देशभक्तांना मदत केली. १३ नोव्हेंबर १९११ ला त्यांचा मृत्यू झाला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण (जन्म १९५८)

माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा आज वाढदिवस. विज्ञान शाखेची पदवी घेतलेल्या अशोकरावांनी वडील माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा वारसा चालवत राजकारणात पाऊल ठेवलं. सुरवातीलाच महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीचे सचिव म्हणून त्यांची निवड झाली. १९८७-८८ ला नांदेड मतदारसंघातून ते लोकसभेवर गेले. मुंबईवर झालेल्या २६/११च्या हल्ल्याने विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर मराठवाड्यातीलच अशोकरावांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली. यानंतर २००९ मधे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस जिंकल्याने ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. आदर्श घोटाळ्याच्या आरोपानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत सगळीकडं मोदी लाट असतानाही अशोक चव्हाण आपल्या बळावर मोठ्या मताधिक्यानं नांदेड मतदारसंघातून विजयी झाले.

मायक्रोसॉफ्टचा जन्मदाता बिल गेट्स (जन्म १९५५)

कधीकाळी कुणाच्या गावीही नसलेल्या मायक्रोसॉफ्टनं आज आपल्या जीवनात कळीची भूमिका घेतलीय. त्या मायक्रोसॉफ्टचे निर्माते बिल गेट्स यांचा वाढदिवस. मौजमजा करायची असते, त्या वयात गेट्स यांनी १३ व्या वर्षी टिक-टॅक-टो या कॉम्प्युटर प्रोग्रमिंगचा शोध लावला. याचा वापर गेम खेळण्यासाठी केला जायचा. शालेय जीवनातच आपल्यातल्या कल्पकतेची चुणूक दाखवत त्यांनी पुढं यशाचे अनेक टप्पे पार केले. जगातील श्रींमतांपैकी एक म्हणून बिल गेट्स यांची ओळख आहे. ते फक्त पैशांच्याबाबतीत श्रीमंत नाहीत, तर ते दातृत्वासाठीही ओळखले जातात. बिल यांनी 2000 मधे आपल्या पत्नीच्या सोबतीने बिल अॅतड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून समाजातील गरजू लोकांना मदत केली जाते. The Road Ahead आणि Business@The Speed of Though ही त्यांची पुस्तकं गाजली.

उद्योगपती इंदिरा नुई (जन्म १९५५)

आपण जी पेप्सी पितो, त्या पेप्सिकोच्या अध्यक्ष इंदिरा नुई यांचा आज बड्डे. तामिळनाडूत जन्मलेल्या इंदिराबाईंनी रसायन विज्ञानात पदवी घेऊन एमबीए केलं. १९९४ मधे पेप्सिकोसोबत जोड्ल्या गेल्या. २००६ ला त्यांची मल्टीनॅशनल कंपनी पेप्सिकोच्या अध्यक्षपदी निवड झाली. इंदिरा नुईंच्या काळातच कंपनीची मोठी आर्थिक भरभराट झाली. उद्योग आणि व्यापार क्षेत्रातल्या कामगिरीसाठी २००७ मधे भारत सरकारने त्यांना पद्मभूषणने सन्मानित केलं. 

स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा (अनावरण १८८६)

सिनेमात आपण अनेकदा समुद्रात हात वर केलेला पुतळा नक्की बघितला असेल. हा पुतळा स्वांतत्र्यदेवतेचा पुतळा आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा पुतळा अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातल्या लिबर्टी किनाऱ्यावर उभा आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्याला १०० वर्ष झाल्यानिमित्तानं फ्रान्सने हा पुतळा भेट म्हणून दिला होता. या पुतळ्याचे २८ ऑक्टोबर १८८६ ला अनावरण करण्यात आलं होतं. १५१ फुट उंचीच्या पुतळ्याच्या उजव्या हातात स्वातंत्र्याची मशाल आहे. तर डाव्या हातात पुस्तक आहे. त्या पुतळ्यावर ४ जुलै १७७६ ही तारीख लिहीली आहे. ही तारीख अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाची तारीख आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपासूनच जगभरात समुद्रामधे पुतळे उभारण्याची क्रेझ आली.