प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २८ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.
भारतातले सगळ्यात यशस्वी उद्योगपती रतन नवल टाटा यांचा आज ८१ वा जन्मदिवस आहे. १९९१ मधे टाटा ग्रुपची सूत्र हाती घेणाऱ्या टाटांनी समूहाला एका नव्या उंचीवर पोचवलं. सकारात्मकता आणि व्यापक विचार घेऊन उत्तम पद्धतीने उद्योगधंदा करता येतो, हा आदर्श त्यांनी सगळ्यांपुढे घालून दिला. २०१२ मधे टाटांनी ग्रुपची सुत्रं सायरस मिस्त्री यांना आपला वारसदार म्हणून निवडलं. पण मतभेदानंतर २०१७ मधे रतन टाटा ग्रुपचे कार्यकारी अध्यक्ष झाले.
जॅग्वार, लँडरोवर यासारख्या महागड्या गाड्यांच्या कंपनीचे मालक असलेले रतन टाटा स्वतः मात्र टाटा नेक्सॉन आणि होंडा सिविक यासारख्या कमी किमतीच्या गाड्या वापरतात. रतन टाटांच्या काळातच कंपनीने आपला जगभर विस्तार केला. अनेक कंपन्या विकत घेतल्या. कॉर्नेल आणि हार्वर्ड युनिवर्सिटी यासारख्या ख्यातनाम बिझनेस स्कूलमधून त्यांनी डिग्रीचं शिक्षण घेतलं. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण यासारख्या सन्मानांनी गौरवलंय.
धीरूभाई आज असते तर ८५ वर्षांचे असते. नात ईशाच्या लग्नात जग अंबानींच्या तालावर नाचतं हे बघून खुश झाले असते. पण त्यांनी जेव्हा धंद्यात उडी घेतली तेव्हा त्यांच्या घरातल्या कुणाच्याच बँक अकाऊंटमधे फुटकी कवडीही नव्हती. तेव्हापासून आजपर्यंतचं साम्राज्य ही धीरूभाईंची पुण्याई आहे.
आफ्रिकेतल्या यमन नावाच्या देशात त्यांनी दहा वर्षं मार्केटिंगचा जॉब केला. आपलं म्हणणं लोकांच्या गळी उतरवण्याच्या त्यांच्या कौशल्याचा पाया तेव्हा रचला गेला. त्या जोरावर त्यांनी ५८००० लोकांच्या गुंतवणुकीतून कृत्रिम कापडाचा उद्योग उभारला. विमल हा जगप्रसिद्ध ब्रँड बनला. त्यांनंतर साम, दाम, दंड, भेद सगळे मार्ग चोखाळत रिलायन्सचं साम्राज्य उभं केलं. ऑईल रिफायनरी, सिमेंट, वीजनिर्मिती, मोबाईल सारख्या उद्योगात अभूतपूर्व यश मिळवलं. आजही त्यांच्या निधनाला १६ वर्षं झाल्यानंतरही त्यांच्या नावाचा दबदबा कायम आहे.
दिल्लीच्या एलिट वर्तुळातला कसलेला राजकारणी म्हणून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली ओळखले जातात. गेल्या आठवड्यातलीच गोष्ट आहे. बिहारमधल्या लोकजनशक्ति पार्टीने एनडीएतून बाहेर पडण्याची धमकी दिली होती. त्यावेळी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची मनधरणी करण्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहांनी संकटमोचक जेटलींवर टाकली. त्यांनी दोघांत शिष्टाई करत पेच सोडवला. एवढंच नाही तर सरकारच्या कुठल्याही खात्यावर कोणताही आरोप झाला, की सरकारची बाजू मांडण्यासाठी जेटलींनाच पुढे केलं जातं. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री म्हणून गोव्याला गेल्यावर काहीकाळ जेटलींकडेच संरक्षणमंत्रीपदाची सुत्रं देण्यात आली होती.
मोदी सरकार सत्तेत येण्याआधी २००९ ते २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. वाजपेयी सरकारमधेही त्यांनी मंत्रीपदाची धुरा सांभाळलीय. राजधानीतच शिक्षण झालेले जेटली दिल्ली युनिवर्सिटीमधे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षही होते. वडिलांकडूनच त्यांना वकिलीचा वारसा मिळाला.
स्वातंत्र्याआधीच्या पिढीतले राजकारणी ए. के. अँटोनी आजही तेवढेच समकालीन आहेत. २०१४ मधे झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेसने माजी संरक्षणमंत्री ए. के. यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली. त्या समितीने काँग्रेस मुस्लिमांचा पक्ष असल्याची लोकधारणा बदलण्याची गरज बोलून दाखवली होती. तेव्हापासूनच काँग्रेसने आपला सॉफ्ट हिंदुत्वाचा चेहरा ठळकपणे दाखवायला सुरवात केली.
बालपणीच १९५९ मधे वडील वारल्याने अँटोनींनी वेगवेगळ्या ठिकाणी कामं करून शिक्षण घेतलं. एक विद्यार्थी नेता म्हणून अँटोनी राजकारणात आले. १९७२ मधे काँग्रेसने त्यांना प्रदेशाध्यक्ष केलं. १९७७ मधे ३७ व्या वर्षीच केरळच्या मुख्यमंत्रीपदाची सुत्रं त्यांनी सांभाळली. त्यानंतर १९९५ आणि २००१ मधे ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. २००६ ते २०१४ या काळात ते सलग दोनवेळा संरक्षणमंत्री होते.
ब्रिटिश सत्तेविरुद्ध भारतीयांच्या असंतोषाला हिंसक वळण मिळू नये म्हणून अॅलन ह्युम या इंग्रजानेच इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना करण्यात पुढाकार घेतला. १३३ वर्षांपूर्वी मुंबईच्या तेजपाल हॉलमधे काँग्रेसची स्थापना झाली. व्योमेशचंद्र बॅनर्जी त्याचे पाहिले अध्यक्ष होते. खरंतर ही स्थापना पुण्यातच होणार होती. पण प्लेगच्या साथीमुळे हा मान मुंबईला मिळाला.
काँग्रेसनेच भारतीय स्वातंत्र्यलढा चालवला. सनदशीर, मवाळ, जहाल, गांधीयुग, समाजवाद, लोकलढा, नेहरुयुग, इंदिरायुग, जागतिकीकरण, धर्मवादासमोर शरणागती, पुन्हा गांधी घराणं असा काँग्रेसचा प्रवास आज राहुल गांधीपर्यंत पोचलाय.