२७ ऑक्टोबर : आजचा इतिहास

२७ ऑक्टोबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २७ ऑक्टोबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. के. आर. नारायणन, भा. रा. तांबे, अनुराधा पौडवाल, अरविंद मफतलाल आणि इरफान पठाण यांच्याविषयीच्या.

पत्रकार राष्ट्रपती के. आर. नारायणन (जन्म १९२०)

पेशानं पत्रकार असलेल्या आणि नंतर राजकारणात आलेल्या माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच ९८ वा वाढदिवस. त्यांचं पूर्ण नाव कोच्चेरी रामण नारायणन. केरळ विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदवी घेतलेल्या नारायणन यांनी ४० च्या दशकात ‘द हिंदू’ आणि ‘टाईम्स ऑफ इंडिया’साठी पत्रकारीता केली. इंदिरा गांधींच्या आग्रहामुळे ते राजकारणात आले. १९८४, १९८९ आणि १९९१ ला नारायणन हे ओट्टापलल या मतदारसंघातून लोकसभेत गेले. राजीव गांधींच्या मंत्रिमंडळात महत्वाच्या खात्यांचं काम बघितलं. ऑगस्ट १९९२ मधे ते उपराष्ट्रपती झाले. त्यांच्या रुपाने स्वातंत्र्याच्या ५० वर्षांनी भारताला दलित समाजातून पहिला राष्ट्रपती लाभला. ‘इंडिया अण्ड अमेरिका एस्सेस इन अंडरस्टैडिंग’, ‘इमेजेस अन्ड’ आणि ‘नॉन अलाइमेंट इन कंटपरेरी इंटरनेशनल रिलेशन्स’ ही त्यांची उल्लेखनीय पुस्तकं आहेत. ९ नोव्हेंबर २००५ ला नारायणन यांचा वयाच्या ८४ व्या वर्षी मृत्यू झाला.

राजकवी भा. रा. तांबे (जन्म १८७३)

भास्कर रामचंद्र तांबे अर्वाचीन मराठीतील मान्यताप्राप्त कवी. त्यांची आज जयंती. ते ग्वाल्हेर संस्थानाचे राजकवी होते. आग्रा इथं कॉलेजचं शिक्षण घेतल्यावर ते काही काळ देवासच्या संस्थानात पीए म्हणून कामाला लागले. त्यानंतर काही वर्ष एका गावात न्यायाधीश म्हणून काम केलं. १९३२ ला कोल्हापूरला झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या कविता विभागाचं त्यांनी अध्यक्षपद भूषवलं. तांबेंच्या ‘डोळे हे जुलमि गडे’, ‘तुझ्या गळा माझ्या गळा’, ‘या बाळांनो या रे या’, ‘पिवळे तांबुस ऊन कोवळे’ या कविता गाण्याच्या माध्यमातून लोकप्रिय झाल्या. ७ डिसेंबर १९४१ ला त्यांचं निधन झालं.

उद्योगपती अरविंद मफतलाल (जन्म १९२३)

प्रसिद्ध उद्योगपती अरविंद मफतलाल यांचा आज जन्मदिवस. मुंबईच्या सेंट झेवियर्स आणि सिडनेहॅम कॉलेजमधून त्यांचं शिक्षण झालं. आजोबांनी १९०५ मधे सुरू केलेल्या मफतलाल उद्योग समुहाची धुरा त्यांनी १९५५ ला आपल्या हाती घेतली. समुहाच्या कारभारात कपडे, केमिकल्ससारखे उद्योग जोडले. ९१ च्या आर्थिक सुधारणांआधी देशातला प्रमूख उद्योगसमूह म्हणून मफतलालची ओळख होती. १९६७ ला मफतलाल हे गुरु रणछोडदास यांच्या संपर्कात आले. १९६८ ला सद्गरु सेवा संघाच्या ट्रस्टच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. या माध्यमातून मफतलाल यांनी समाजातील वंचितांची सेवा करण्यासाठी स्वत:ला झोकून दिलं. अरविंद मफतलाल यांचं वयाच्या ८८ व्या वर्षी मध्यप्रदेशातील चित्रकूट इथं निधन झालं.

भक्तिगीतांचा गळा अनुराधा पौडवाल (जन्म १९५२)

अनेकांच्या दिवसाची सुरवात ज्या भक्तिगीतांनी होते, तो आवाज म्हणजे अनुराधा पौडवाल. ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांचा आज बड्डे. ‘अभिमान’ सिनेमापासून त्यांची गायन कारकीर्द सुरू केली. ‘धक धक करने लगा’, ‘तू मेरा हिरो’, ‘हम तेरे बिन’, ‘मैया यशोदा’, ‘चाहा है तुझको’, ‘एक मुलाकात जरुरी है सनम’ ही त्यांची गाणी लोकप्रिय झाली. आपल्या यशस्वी कारकिर्दीनंतर त्यांनी फक्त टी सीरीज कंपनीसोबत गाण्याचा निर्णय घेतला. ‘लाल दुपट्टा मलमल का’, ‘आशिकी’, ‘तेजाब’ आणि ‘दिल है के मानता नही’ यासारख्या लोकप्रिय सिनेमांच्या गाण्यांनी अनुराधा पौडवाल टी सीरीजचा नवा चेहरा बनवलं. टी सीरीजच्या बऱ्याच भक्तीगीतांना अनुराधा पौडवाल यांचाच आवाज असायचा. २०१७ ला त्यांना पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं.

ऑलराउंडर इरफान पठाण (जन्म १९८४)

भारताचा माजी ऑलराउंडर क्रिकेटटर इरफान पठाणचा आज बड्डे. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या इरफाननं आपल्या कामगिरीच्या बळावर वयाच्या १३ व्या वर्षीच बडोद्याच्या अंडर १६ संघात एंट्री मिळवली. २००१ ला बडोद्याने जिंकलेल्या रणजी करंडकात इरफानचा मोठा वाटा होता. डिसेंबर २००३ मधे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीतून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. २००६ ला पाकिस्तान विरोधातल्या कसोटीत इरफाननं बॉलिंग करताना हॅट्रिक केली होती. पहिल्याच ओवरमध्ये हॅट्रिकचा विक्रम इरफानच्या नावे आहे. इरफानन २९ कसोटी सामन्यांत ११०५ धावा आणि १०० विकेट घेतल्या. त्याने पहिला वनडे सामना ऑस्ट्रेलियाविरुद्धच खेळला. वनडेच्या ५९ मॅचमध्येच १०० विकेट घेण्याचा विक्रम केला. २००७ ला झालेल्या पहिल्या टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये इरफानने ४ ओवरमध्ये १६ रन देउन, ३ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. यासाठी त्याची मॅन ऑफ द मॅच म्हणून निवड झाली होती. कपिल देवचा वारसरदार म्हणून इरफान पठाणकडे पाहिलं जायचं.