२७ डिसेंबर: आजचा इतिहास

२७ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २७ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

शायरांचा बाप मिर्झा गालिब (जन्म १७९६)

उर्दूतले सगळ्यात लोकप्रिय शायर मिर्झा गालिब यांचा आज २२१ वी जयंती आहे. 'इश्क़ ने 'ग़ालिब' निकम्मा कर दिया, वरना हम भी आदमी थे काम के', 'दिल-ए-नादां तुझे हुआ क्या है, आख़िर इस दर्द की दवा क्या है' यासारख्या शायरींमुळे आजही त्यांची लोकप्रियता टिकून आहे. गालिब यांनी उर्दूतल्या शेर, शायरियां, रुबाई, कसीदा यासारख्या साहित्य प्रकारात मुशाफिरी केली. 

मिर्झा गालिब यांचं पूर्ण नाव असद उल्लाह बेग ख़ां उर्फ गालिब होतं. दिल्लीचा शेवटचा बादशाह आणि ख्यातनाम शायर बहादुरशाह जफर यांनी गालिब यांना मिर्झा ही उपाधी दिली. गेल्या वर्षी गुगलने डुडल बनवून गालिब यांना आदरांजली वाहिली होती. सोहराब मोदी यांनी १९५४ मधे ‘मिर्ज़ा ग़ालिब' नावाने सिनेमा बनवला. त्यानंतर गुलजार यांनी १९८८ मधे ‘मिर्ज़ा ग़ालिब' नावाची टीवी सीरियल बनवली. या सीरियलमुळे गालिब घराघरात पोचले. 

पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख (१८९८)

अमरावती जिल्ह्यातल्या पापळच्या एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या भाऊसाहेब शामराव देशमुख यांचा डॉ. पंजाबराव देशमुख होण्यापर्यंतचा प्रवास खूप कष्टाचा आहे. सुरवातीपासूनच अभ्यासात हुशार असलेले पंजाबराव उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. तिथे केंब्रिज युनिवर्सिटीतून बॅरिस्टरकी मिळवली. १९२६ मधे शिक्षण पूर्ण करून मायदेशी आल्यावर त्यांचा विदर्भात खूप जल्लोषात सत्कार करण्यात आला. शिक्षणाचं महत्त्व ओळखलेल्या पंजाबरावांनी नंतर श्री शिवाजी मराठा हायस्कूल काढलं. आज या संस्थेत हजारो मुलं शिक्षण घेतायंत.

त्यांनी श्रद्धानंद बोर्डिंगची स्थापना केली. सगळ्या जाती धर्मांतील लोकांसाठी हे बोर्डिंग खुलं ठेवलं. हे त्याकाळी एक क्रांतिकारी पाऊल होतं. शिक्षणासोबतच तरुणांचं शरीर मजबूत आणि सदृढ राहावं म्हणून त्यांनी श्री शिवाजी व्यायाम प्रसारक मंडळाचीही स्थापना केली. शेतीच्या प्रश्नाची जाण असल्यामुळे त्यांनी ‘भारत कृषक समाज’ स्थापन केला. शेतीप्रश्नाबद्दलची पंजाबरावांची जाण बघून पंडित नेहरूंनी त्यांची स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री म्हणून निवडलं. या काळात त्यांनी देशाच्या कृषी धोरणाला वळण दिलं. १० एप्रिल १९६५ ला त्यांचं निधन झालं.

माणसाचं आयुष्य वाढवणारे लुई पाश्चर (जन्म १८२२)

अतिशय गरिबीत वाढलेल्या लुई यांना शाळेतले शिक्षक मंदबुद्धी म्हणून टोमणे मारायचे. त्यामुळे त्यांनी शाळाही सोडली. पण वडलांच्या आग्रहामुळे ते पॅरिसला शिकायला गेले. पण पुढे हाच पोरगा फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ आणि सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ लुई पाश्चर म्हणून ओळखला जाऊ लागला. कॉलेजच्या काळात त्यांना रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रमधे आवड निर्माण झाली. मात्र त्यांचा जीवशास्त्राकडेच जास्त कल होता. पुढे त्यांच्या सुक्ष्मजंतू सिद्धांताला जगभरात मान्यता मिळाली. दूध टिकवण्यासाठी निर्जंतुकीकरण प्रक्रियेचा त्यांना लावलेला शोध ‘पाश्चरायजेशन’ या नावाने ओळखला गेला. पाश्चर यांनी देवी या रोगावरची लस शोधून काढली. 

देवी, रेबीज या रोगावरील लस शोधण्याचं महत्त्वाचं काम पाश्चर यांनी केलं. अनेक प्रकारच्या रोग प्रतिकारक लसींचा शोध पाश्चर यांनी लावला. याच लसींवर पुढच्या काळात अधिक संशोधन, अभ्यास झाल्याने माणसाचे आयुर्मान वाढलं. याचं श्रेय लुई पाश्चर यांच्या शोधांमागील निरीक्षण आणि कल्पक वृत्तीला जातं. आयुष्याच्या अखेरपर्यंत वेगवेगळ्या रोगांवर उपचारासाठी संशोषन करणाऱ्या पाश्चर यांचा १८९५ मधे झोपेतच मृत्यू झाला.

बंडखोर बाई बेनझीर भुत्तो (जन्म १९५३)

घरातला राजकारणाचा वारसा एखाद्या बाईने आपल्या हाती घेणं ही गोष्ट एखाद्या मुस्लीम देशात आजही खुपणारी आहे. पण बेनझीर भुत्तो यांनी लोकांच्या या खुपण्याला फाट्यावर मारलं. पाकिस्तानची सुत्रं हाती घेत एखाद्या मुस्लिम देशाची पहिली महिला पंतप्रधान होण्याची बंडखोरी केली. दोनदा पंतप्रधान होण्याचा पहिला मान त्यांना मिळाला. एका जमीनदार घरातल्या बेनझीरचे वडील झुल्फीकार अली भुत्तो हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान होते. 

खात्यापित्या घरातल्या बेनझीर यांनी ऑक्सफर्ड युनिवर्सिटीतून उच्च शिक्षण घेतलं. तिथे ऑक्सफर्ड युनियनच्या अध्यक्ष झाल्या. असा मान मिळवणाऱ्या पहिल्या आशियाई महिला ठरल्या. शिक्षण झाल्यावर बेनझीर यांना परराष्ट्र सेवेत नोकरी करायची होती. पण त्यांचे वडील झुल्फीकार यांना पाकिस्तानातल्या क्रूर राजकारणातून १९७९ मधे फाशीची शिक्षा झाली. त्यामुळे बेनझीर राजकारणात आल्या. १९८८ मधल्या विजयानंतर त्या पंतप्रधान झाल्या. १९९३ मधे पंतप्रधान झाल्या. २७ डिसेंबर २००७ मधे ऐन निवडणुकीच्या तोंडावर कट्टरवाद्यांनी त्यांची आत्मघातकी बॉम्बस्फोट आणि गोळ्या घालून हत्या केली.

भाईजान सलमान खान (जन्म १९६५)

बॉलीवूडचा ‘भाईजान’ सलमान खान आज ५३ वर्षांचा झालाय. बॉलीवूडला जगभरात पोचवणाऱ्या मोजक्या लोकांमधे सलमानचं नाव घेतलं जातं. तसंच १०० कोटीच्या क्लबमधे त्याच्या १२ सिनेमांचा समावेश आहे. सलमानच्या नावावर हा रेकॉर्ड आहे. या रेकॉर्डसोबतच त्याच्या नावावर काही हाय प्रोफाईल अफेअरही नोंदवले गेलेत. मॉडेल संगीता बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या राय बच्चन आणि कतरिना कैफ यांच्यासोबतच्या त्याच्या अफेरअरची खूप चर्चा झाली. आता सध्या तो युलिया वंतूरसोबत डेट करतोय, अशी चर्चा आहे.

अब्दुल राशिद सलीम सलमान खान हे त्याचं पूर्ण नाव. वडील, पटकथालेखक सलीम खान यांच्याकडूनच त्याला सिनेमाचा वारसा मिळाला. १९८९ मधे 'मैंने प्यार किया' सिनेमात त्याला पहिल्यांदाच लीड रोल मिळाल. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरच्या कमाईसोबतच अनेक अवॉर्डही मिळवले. या सिनेमांनी तो जगभर पोचला. 'हम आपके हैं कौन'ने त्याला नवी ओळख मिळवून दिली. त्याचबरोबर काळवीट शिकार, फूटपाथवर झोपलेल्यांवर गाडी घालून मारणं, सहकलाकरांची मारहाण अशा अनेक वादांत तो अडकला. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याने समाजसेवा केली. चांगल्या इमेजचे सिनेमे केले. त्यामुळे रागीट सलमानपासून त्याचा सज्जन भाईजानपर्यंतचा प्रवास झालाय.