२६ ऑक्टोबर : आजचा इतिहास

२६ ऑक्टोबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २६ ऑक्टोबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. गणेश शंकर विद्यार्थी, अनंत भालेराव, ह्रदयनाथ मंगेशकर, लक्ष्मीकांत बेर्डे आणि रवीना टंडन यांच्याविषयीच्या.

थोर पत्रकार गणेश शंकर विद्यार्थी (जन्म १८९०)

थोर पत्रकार गणेश शंकर विद्यार्थी यांचा आज जन्मदिवस. त्यांच्या पत्रकारितेला इलाहाबाद इथून सुरवात झाली. सुरवातीला उर्दू दैनिकात काम करणारे गणेश शंकर विद्यार्थी नंतर हिंदी पत्रकारितेकडं वळले. त्यांनी ‘सरस्वती’ मासिकातून कामाला सुरवात केली. चार मित्रांना सोबत घेऊन ९ नोव्हेंबर १९१९ला ‘प्रताप’ नावाचं हिंदी साप्ताहिक सुरू केलं. ते या मासिकाचे संपादक होते. हे सोळा पानी असलेलं साप्ताहिक आपल्या लोकप्रियतेमुळं १९३० सालापर्यंत चाळीस पानांचं झालं. ‘प्रताप’चं ऑफीस क्रांतीकारकांसाठी हक्काची जागा तर तरुणांसाठी पत्रकारितेचं प्रशिक्षण केंद्र बनलं होतं. ब्रिटीशांनी प्रतापविरुद्ध वेळोवेळी कारवाया केल्या. पत्रकारितेमधे आपल्या तडाखेबाज लेखणीद्वारे क्रांतीकारी आंदोलनाला जनआंदोलनाशी जोडण्यात त्यांचं योगदान होतं. इंग्रजांनी भगतसिंगांना फाशी दिल्यावर देशभरात लोक रस्त्यावर उतरले. याचवेळी २५ मार्च १९३१ ला एका केसमुळं तुरुंगात असलेल्या विद्यार्थी यांची सुटका झाली. लोकांना शांत करण्यासाठी ते कानपूरच्या रस्त्यावर उतरले. लोकांचा संताप हा जातीय दंगली असल्याचं सांगत पोलिसांनी गणेश शंकर विद्यार्थी या क्रांतीकारक पत्रकाराची हत्या केली.

वारकरी पत्रकार अनंत भालेराव (निधन १९९१)

‘मराठवाडा’ दैनिकाचे संपादक, स्वातंत्र्यसैनिक अनंत भालेराव यांचं आज निधन झालं. हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्यात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला. यासाठी त्यांना सक्तमजुरी आणि तुरुंगवासही झाला. मराठवाड्याच्या विकासासाठी ते रस्त्यावर उतरले.  ‘मराठवाडा’च्या माध्यमातून त्यांनी पत्रकार आणि साहित्यिकांची एक पिढी घडवली. समकालीन पेचप्रसंगांवर निर्भीडपणे भूमिका घेणारं दैनिक म्हणून मराठवाडा ओखळला जायचा. पुढं हे दैनिक बंद पडलं. आणीबाणीच्या काळात सरकाराच्या मंजूरीनंतर दररोजचा पेपर छपाईला जायचा. याचा निषेध म्हणून त्यांनी अग्रलेखाची जागा रिकामी ठेवली होती. नंतरच्या काळात ही कृती निषेधाचं एक प्रतिकच बनली. आणीबाणीत सत्याग्रह केल्याबद्दल अनंतरावांना अटकही झाली होती.  ‘पळस गेला कोकणा’, ‘आलो याचि कारणासी’, ‘कावड’, ‘पेटलेले दिवस’ ही त्यांच्या काही पुस्तकांची नावं. अशा या कार्यकर्त्या-पत्रकाराचं आजच्या दिवशी निधन झालं. औरंगाबाद जिल्ह्यातील एका वारकरी कुटुंबात वाढलेल्या अनंतरावांचं यंदा जन्मशताब्दीवर्ष सुरू होतं आहे.

महाराष्ट्राचे भावगंधर्व ह्दयनाथ मंगेशकर (जन्म १९३७)

आज सुप्रसिद्ध संगीतकार ह्दयनाथ मंगेशकर यांचा जन्मदिवस. घरातूनच संगीताचा वारसा मिळालेल्या ह्दयनाथांनी १९५५ मधे आपली कारकीर्द सुरू केली. ‘गेले ते दिन गेले’, ‘गजानना श्री गणराया’, ‘नको देवराया’, ‘मराठी पाऊल पडते पुढे’, ‘शूर आम्ही सरदार’,  ‘गोड गोजिरी लाज लाजरी’, ‘आज गोकुळात रंग खेळतो’ यासारख्या ऑल टाईम फेवरीट गाण्यांना त्यांनी संगीत दिलं. गीतेतील अनेक श्लोक स्वरबद्ध केले. मराठीतील ‘चानी’, ‘जैत रे जैत’, ‘उंबरठा’, ‘निवडुंग’ तर हिंदीतील ‘धनवान’, ‘सुबह’, ‘मशाल’ आणि ‘माया मेमसाब’ या सिनेमांचं संगीत दिग्दर्शन त्यांनी केलंय. कवी बी यांची ‘चाफा’, बालकवींची ‘आनंदी आनंद गडे’, वसंत बापटांची ‘गगन सदन तेजोमय’, ना. धों. महानोरांची ‘मी कात टाकली’ आणि ‘जांभुळ पिकल्या झाडाखाली’ यासारख्या रचना लोकप्रिय झाल्या त्यात  ह्द्यनाथांच्या चाली आणि संगीताचा मोठाच वाटा होता. त्यांना २००९ मधे पद्मश्री देऊन  सन्मानित करण्यात आलं.

प्रतिभावंत विदूषक : लक्ष्या (जन्म १९५४)

मराठी सिनेसृष्टीतलं एक अढळ नाव म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. आपल्या चाहत्यांमधे ते ‘लक्ष्या’ नावाने ओळखले जातात. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या लक्ष्मीकांत यांना शाळा आणि कॉलेजमधे वेगवेगळ्या भूमिकांसाठी बक्षीसं मिळायची. शिक्षण झाल्यावर ‘मुंबई मराठी साहित्य संघा’मार्फत त्यांनी व्यावसायिक नाट्यसृष्टीत पाऊल ठेवलं. पुरुषोत्तम बेर्डे यांच्या ‘टूर-टूर’ (१९८३-८४) नाटकामध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारली. या नाटकामुळेच त्यांना खरा ब्रेक मिळाला. यानंतर ‘बिघडले स्वर्गाचे दार’, ‘शांतेचं कोर्ट चालू आहे’ ही त्यांची नाटकं गाजली.
‘लेक चालली सासरला’ हा त्यांचा पहिला सिनेमा. यानंतर लक्ष्याने मागं वळून पाहिलंच नाही. ‘धूमधडाका’, ‘थरथराट’, ‘दे दणादण’, ‘हमाल दे धमाल’, ‘झपाटलेला’ या सिनेमात काम केलं. ‘धनंजय माने इथंच राहतात का?’ हा ‘बनवाबनवी’मधला डायलॉग आजही लोकप्रिय आहे. ‘मैने प्यार किया’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. प्रेक्षकांना खळाळून हसवणारा लक्ष्या किडनीच्या आजारानं २००४ साली मुंबईत कायमचा पडद्याआड गेला.  

अखियोंसे गोली मारणारी रवीना (१९६४)

‘तु चिज बडी है मस्त मस्त’सारख्या अनेकानेक गाण्यांमधून सिनेरसिकांना भूरळ घालणाऱ्या रवीना टंडनचा आज वाढदिवस. रवीनाचं शालेय शिक्षण मुंबईच्या जुहू भागातल्या जमनाबाई नर्सी शाळेतून झालं. लहानपणापासूनच बॉलीवूडचं आकर्षण असलेल्या रवीनाला मिठीबाई कॉलेजमधे असतानाच एका सिनेमाची ऑफर आली. त्यामुळं तिनं अर्ध्यावरच कॉलेज सोडलं. ‘पत्थर के फूल’ (१९९२) सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. पहिल्याच सिनेमाला जोरदार प्रतिसाद मिळाला. सोबतच नवोदित कलाकारासाठीचा फिल्मफेअरही तिनं पटकावला. ‘मोहरा’, ‘दिलवाले’सारख्या लोकप्रिय सिनेमांमधे ती दिसली. अॅपक्शन, थ्रिलर, कॉमेडी अशा अनेकरंगी भूमिका रवीनाने केल्या. १९९६ ला आलेल्या ‘खिलाडीयों का खिलाडी’मधे रवीना टंडन आणि अक्षय कुमार ही जोडी पाहायला मिळाली. हा सिनेमा खूप गाजला. यानंतर सन्नी देओलसोबत ‘जिद्दी’मधे ती दिसली.  १९९८ ला ‘बडे मिया छोटे मिया’सह तिचे ८ सिनेमे आले. तिनं अनेक सिनेमांच्या ऑफर नाकारल्यासुद्धा. ‘कुछ कुछ होता है’ मधल्या काजोलच्या भूमिकेसाठी आधी रवीनाला विचारणा झाली होती, पण तिनं नकार दिला.