२६ डिसेंबर: आजचा इतिहास

२६ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २६ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

कुष्ठरोग्यांचे जीवनदाते बाबा आमटे (१९१४)

कुष्ठरोग्यांना माणुसकीची वागणूक देत त्यांच्यात जगण्याची नवी उमेद निर्माण करणाऱ्या बाबा आमटे यांचा आज १०४ वा जन्मदिवस. मुरलीधर देवीदास आमटे हे त्यांचं मूळनाव. बाबा एका सधन घरात वाढलेल्या बाबांवर गांधीवादाचा मोठा प्रभाव होता. बाबांनी वकिलीचं शिक्षण झाल्यावर  समाजाने दूर लोटलेल्या कुष्ठरूग्णांच्या सेवेसाठी आपलं आयुष्य समर्पित करण्याचा निर्णय घेतला. महारोग्यांच्या पुनर्वसनासाठी चंद्रपूर जिल्ह्यात ‘आनंदवन’ची स्थापना केली. आज आनंदवनात पाच हजाराहून अधिक लोक राहत असून तिथे एक सुसज्ज हॉस्पिलल उभारण्यात आलंय. शाळाही आहे.

स्वतःच्या कामासोबतच दुसऱ्यांच्या कामांना, आंदोलनांमधे सक्रीय सहभाग घेणारे कार्यकर्ते म्हणून बाबांची ख्याती होती. भारत जोडो आंदोलन, नर्मदा बचाओ आंदोलन यामधे बाबांनी सक्रीय सहभाग घेतला. समाजवादी चळवळीला बळ दिलं. बाबांना पद्मश्री, पद्मभूषण यासारख्या अनेक सन्मानांनी गौरवण्यात आलंय. `उज्ज्वल उद्यासाठी', `ज्वाला आणि फुले' आणि `माती जागवील त्याला मत' ही त्यांची पुस्तकंही गाजली. ९ फेब्रुवारी २००८ ला या महान कार्यकर्त्याचं वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झालं.

रात्रपाळीचा क्रांतिकारक माओ त्से तुंग (जन्म १८९३)

आधुनिक चीनचे शिल्पकार, साम्यवादी विचारवंत माओ त्से तुंग यांच्या सव्वाशेव्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून सुरवात होतेय. १९४९ ला चीनमधे त्यांनी पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाची स्थापना केली. तेव्हापासून १९७६ पर्यंत त्यांनी चीनचं नेतृत्व केलं. मार्क्सवादी, लेनिनवादी विचारधारेला सैन्याशी जोडण्याचा विचाराच पुढे माओवाद म्हणून रूढ झाला. अनेकजण माओला एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणतात. पण चीनी लोकांसाठी ते एक महान क्रांतिकारक, स्ट्रॅटेजिस्ट, सैन्य अधिकारी आहेत. त्यांना रात्रभर जागून दिवस झोपण्याची सवय होती. तसंच ते कधीही ब्रश करत नव्हते.

शेती आणि उद्योग ही देशाच्या विकासाची दोन चाकं आहेत, असं सांगणाऱ्या माओंचा ग्रेट लीप फॉरवर्ड हा कार्यक्रम वादात पाडला. या काळात भीषण दुष्काळासोबतच चीनी समाज, अर्थव्यवस्था आणि संस्कृतीला खूप मोठी ठेच लागल्याचा आरोप त्यांच्यावर होतो. जवळपास २५ वर्ष चीनचा एकहाती कारभार बघणाऱ्या माओंचा टाईम मॅगझिनने २० व्या शतकातल्या सर्वाधिक प्रभावशाली लोकांच्या यादीत समावेश केला होता.

गांधीजींच्या डॉक्टर सुशीला नायर (जन्म १९१४)

देशाच्या पहिल्या आरोग्यमंत्री ही डॉ. सुशीला नायर यांची पूर्ण ओळख नाही. त्या महात्मा गांधीच्या खासगी डॉक्टरही होत्या. भाऊ प्यारेलाल यांच्यामुळे त्या गांधीजींच्या संपर्कात आल्या. त्यानंतर १९३९ मधे त्यांनी स्वतःला वर्ध्यातल्या सेवाग्रामशी जोडून घेतलं. वर्ध्यात कॉलऱ्याची साथ आली होती. त्यावेळी डॉ. सुशीला यांचं काम बघून गांधीजी खूप प्रभावित झाले होते. त्यामुळे गांधीजींच्या सांगण्यावरूनच त्यांनी एमडीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर गांधीजींच्या खासगी डॉक्टर म्हणून त्यांच्यासोबत राहिल्या. नथुराम गोडसेने गांधीजींची हत्या केली. त्यावेळीही त्या गांधीजींसोबत होत्या.

डॉ. सुशीला यांनी १९४५ मधे कस्तुरबा हॉस्पिटलची स्थापना केली. आता हे हॉस्पिटल महात्‍मा गांधी इंस्‍टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या नावाने ओळखलं जातं. गांधी हत्येनंतर त्या अमेरिकेला गेल्या. तिथे त्यांनी सार्वजनिक आरोग्यावरच्या पदव्या मिळवल्या. नंतर १९५२ ते १९५५ या काळात पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री म्हणून काम केलं. त्यानंतर वर्षभर दिल्ली विधानसभेच्या अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली. १ जानेवारी २००१ मधे त्यांचं निधन झालं.

बंडखोर अभिनेत्री लालन सारंग (जन्म १९४१)

भारतीय रंगभूमीवरील बंडखोर अभिनेत्री अशी ओळख असलेल्या लालन सारंग यांनी आपल्या अॅक्टिंगमधून जगण्याचं नवं भान दिलं. ‘सखाराम बाइंडर’, ‘रथचक्र’ आणि ‘कमला’ ही त्यांचा रोल असलेली तीन नाटकं गाजलं. पण जगाच्या नजरेत त्या तेंडुलकरांची नायिका होत्या. ख्यातनाम लेखक विजय तेंडुलकर यांच्या सखाराम बाईंडर, घरटे आमचे छान, बेबी, कमला या नाटकांमधे त्यांनी काम केलं. सखाराम बाईंडरमधल्या ‘चंपा’ने त्यांना नाट्यसृष्टीत नवी ओळख मिळवून दिली. गुजराती, मराठी आणि हिंदी रंगभूमीवर त्यांनी काम केलं.

रंगभूमीसोबतच त्यांनी सिनेमातही काम केलं. सामना, हा खेळ सावल्यांचा, महक यासारख्या गाजलेल्या सिनेमांसोबत टीवी सीरियलमधेही त्या दिसल्या. नाटकांच्या माध्यमातून साकारलेल्या भुमिकांमधून केवळ मनोरंजन न करता सामाजिक संदेश देण्यावर त्यांचा नेहमी कटाक्ष होता. कणकवली इथे झालेल्या ८७ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. आपल्या बहारदार अॅक्टिंग जवळपास पाच दशकं रंगभूमी गाजवणाऱ्या या अभिनेत्रीचं गेल्या महिन्यात निधन झालं.

आक्रमक ऑफस्पिनर निखिल चोप्रा (जन्म १९७३) 

निखिल चोप्रा खरंतर डेंटिस्ट बनण्यासाठी परदेशी चालला होता, पण रणजी स्पर्धेसाठी त्याचं सिलेक्शन झालं. आणि क्रिकेट हेच त्याचं सर्वस्व बनलं. खरं तर तो फार क्रिकेट खेळला नाही. कारण तो  करियरिस्टीक नव्हता, बेफिकीर होता. ३९ वनडे आणि १ टेस्ट इतकाच त्याचा इंटरनॅशनल क्रिकेटमधला सहभाग. वनडे स्पेशालिस्ट म्हणून त्याला टेस्टमधे संधीच मिळाली नाही.

ऑफस्पिनर म्हणून तो आक्रमक होता. थोडा उशिरा जन्मला असता तर टी ट्वेन्टीच्या युगात चमकला असता. पण त्याच्याही मर्यादा होत्या आणि त्याच्या काळाच्याही. पुढे टीवी शोमधे एक्सपर्ट म्हणून तो दिसला. दिल्लीचा सिलेक्टर म्हणूनही चर्चेत राहिला. तो सदस्य असलेल्या कमिटीला दिल्ली क्रिकेट बोर्डाने बरखास्त केलं, पण कोर्टाने सिलेक्टरची बाजू योग्य ठरवली. १९९९च्या वर्ल्ड कप मधल्या टीम इंडियाचा एक सदस्य म्हणून तो लक्षात राहील.