२५ ऑक्टोबर : आजचा इतिहास

२५ ऑक्टोबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २५ ऑक्टोबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. पाब्लो पिकासो, साहिर लुधियानवी, अपर्णा सेन, जसपाल भट्टी आणि भारतातली पहिली लोकसभा निवडणूक यांच्याविषयीच्या.

पहिली लोकसभा निवडणूक (१९५१-५२)

स्वातंत्र्यानंतरच्या १७ व्या लोकसभेसाठी येत्या मे महिन्यात निवडणूक होईल. १७ व्या निवडणुकीपर्यंतचा हा प्रवास आजच्याच दिवशी १९५१ मधे सुरू झाला होता. स्वातंत्र्यानंतर चार वर्षांनी लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीचा कार्यक्रम २५ ऑक्टोबरला सुरू होऊन पाच महिन्यांनी २७ मार्च १९५२ ला संपला. १७ एप्रिलला लोकसभेची स्थापना झाली. साठेक वर्षांपूर्वी १० फेब्रुवारी १९५२ ला निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. ४८९ जागांवर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसनं ३६४ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली होती. १६ जागा आणि ३.२९ टक्के मतदान मिळवून भारतीय कम्युनिस्ट पक्ष या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. काँग्रेसला लोकांचा मोठा पाठिंबा असतानाही शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतीय जनसंघाचे शामाप्रसाद मुखर्जी, समाजवादी पार्टीचे राममनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांनीही निवडणूक लढवून लोकशाहीमधे विरोधी पक्षांची भूमिका पार पाडली होती. १८७४ उमेदवारांसह ५३ पक्षांनी या निवडणुकीत भाग घेतला होता.

रंगरेषांचा जादूगार पाब्लो पिकासो (जन्म १८८१)

जगप्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासो यांचा आज बड्डे. स्पेनमधे जन्मलेल्या पिकासोंना वडलांकडूनच चित्रकलेचा वारसा मिळाला. पिकासो लहानपणीच वेगवेगळी चित्रं काढून मित्रांची फिरकी घ्यायचे. सुरवातीला ते डान्सर, सर्कशीतले कलाकार आणि विदुषकांचे चित्रं काढायचे. नंतरच्या काळात त्यांनी फ्रान्समधल्या विचारवंतांनाही आपल्या चित्रांमधून नव्या पद्धतीची मांडणी करायला विषय दिले. १९०६ ला त्यांनी प्रसिद्ध वूमन ऑफ अल्जीयर्स ही कलाकृती बनवायला सुरवात केली. हे चित्र वर्षभरानंतर पूर्ण झालं. पिकासोंच्या कलात्मक अस्वस्थतेला त्यांच्या प्रेयसींशीही जोडून बघितलं जातं. कारण नंतरच्या काळात त्यांनी आपल्या प्रेयसींची खूप सारी चित्र काढली. रोमँटिक पिकासोंच्या चित्रांमधे पुढं हिरव्यागार रंगांची जागा उदासपणानं घेतली. १९५० च्या सुमारास १० वर्षे सोबत असणाऱ्या बायकोनं पिकासोला सोडून दिलं. हा पिकासोच्या आयुष्यातला वाईट काळ म्हणून ओळखला जातो. त्यांनी ४० हजाराहून अधिक चित्रं, मूर्ती साकारल्या. या महान चित्रकाराचा ८ एप्रिल १९७३ ला मृत्यू झाला.

हर एक पलका शायर साहिर लुधियानवी (निधन १९८०)

लाजवाब शायरीनं देशविदेशातल्या चाहत्यांचं मन जिंकणाऱ्या साहीर लुधियानवी यांचं १९८० मधे आजच्या दिवशीच ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. लुधियानातल्या एका जहागिरदाराच्या घरात जन्मलेल्या साहिर यांची शायरी कॉलेजमधे असतानाच फेसम झाली होती. याच काळात साहिर आणि अमृता प्रीतम ही सुप्रसिद्ध लवस्टोरी जमली. साहिर मुस्लीम असल्यानं या प्रेमाला अमृताच्या घरच्यांनी विरोध केला. साहिरला कॉलेजमधून काढून टाकलं गेलं. त्यानंतर ते १९४३ मधे लाहोरला आले. त्याचवर्षी आलेल्या ‘तल्खियाँ’ कवितासंग्रहानं साहिर यांना नवी ओळख मिळाली. उर्दू पेपर ‘अदब-ए-लतीफ’ आणि ‘शाहकार’चे ते संपादक बनले. ‘आझादी की राह पर’ (१९४९) सिनेमासाठी त्यांनी पहिल्यांदा गाणी लिहिली. पण त्यांना खरी ओळख मिळाली ‘नौजवान’मधून. ‘ठंडी हवाएं लहरा के आये..’ हे गाणं खूप गाजलं. यानंतर ‘बाजी’, ‘प्यासा’, ‘फिर सुबह होगी’, ‘कभी-कभी’ या सिनेमासाठी त्यांनी गाणी लिहिली. साहिर हे पहिले गीतकार होते, ज्यांना गाण्यांसाठी केवळ मानधन नाही तर रॉयल्टीसुद्धा मिळायची. ‘अल्लाह तेरो नाम, ईश्वर तेरो नाम’, ‘मैं पल दो पल का शायर हूं’ ‘तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा’, यासारखी लोकप्रिय गाणी साहिर यांनी लिहिली.

'मिस कलकत्ता' अपर्णा सेन (जन्म १९४५)

हिंदी, बांगलादेशी सिनेमातल्या अॅक्टर, डिरेक्टर आणि स्क्रिप्ट रायटर अपर्णा सेन आजच्या दिवशीच जन्मल्या. १९६१ मधे वयाच्या १५ व्या वर्षीच त्यांनी सत्यजीत रे यांच्या ‘तीन कन्या’ नावाच्या सिनेमातून आपली कारकीर्द सुरू केली. रे यांच्या सिनेमातली अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख आहे. आधुनिक तत्वज्ञानाच्या कुठल्याही चौकटीचा आधार न घेता त्यांनी आपल्या अभिनयातून अनिष्ट रूढींवर नेमकं भाष्य केलं. १९७६ मधे आलेल्या ‘आमी मिस कलकत्ता’मधला त्यांचा रोल गाजला. १९८१ मधे ‘३६ चौरंगी लेन’ सिनेमाचं त्यांनी दिग्दर्शन केलं. यासाठी त्यांना नॅशनल सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय सन्मान मिळाला. १९८७ ला त्यांना ‘पद्मश्री’नं गौरवण्यात आलं. तीन राष्ट्रीय पुरस्कार आणि आठ आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले. पुढं मुलगी कोंकणा सेन-शर्मासोबतही  त्यांनी काम केलं. सध्या पश्चिम बंगालमधे गाजत असलेल्या ‘शारदा चिटफंड घोटाळ्या’त त्यांचं नाव आलं होतं.

विनोदाची जमलेली 'भट्टी' (निधन २०१२)

छोट्या पडद्यावरच्या ‘उल्टा-पुल्टा’  आणि ‘फ्लॉप शो’  या कार्यक्रमातून प्रेक्षकांना मनमुराद  हसवणाऱ्या जसपाल भट्टी यांचा आज अपघाती मृत्यू झाला. पंजाब इंजिनिअरिंग कॉलेजमधून पदवीचं शिक्षण घेतलेल्या भट्टी यांनी ‘द ट्रिब्यून’ पेपरसाठी व्यंगचित्रकार म्हणून काम सुरू केलं. प्रामुख्यानं सर्वसामान्यांशी संबधित विषय आणि सरकारच्या भूमिका याबाबत ते व्यंगचित्राच्या माध्यमातून चिमटे काढत. १९९९ ला पंजाबी सिनेमा ‘माहौल ठिक है’मधून त्यांनी दिग्दर्श्क म्हणून सुरवात केली. ‘धरती’, ‘मौसम’, ‘चक दे फट्टे’, ‘फना’, ‘कुछ मिठा हो जाये’, ‘कुछ ना कहो’, ‘हमारा दिल आपके पास है’, ‘जानम समझा करो’, या हिंदी सिनेमांत त्यांनी काम केलं. ‘पावर कट’ हा सिनेमा रिलीज होण्याच्या एक दिवस आधी जस्पाल भट्टी यांचा अपघातात मृत्यू झाला.