२५ नोव्हेंबरः आजचा इतिहास

२५ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २५ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

झुंजार क्रांतिकारक फिडेल कॅस्ट्रो (मृत्यू २०१६)

दोन भावंडांनी १९५९ साली अर्जेंटिनाच्या चे गवेरा यांना मदतीला घेत क्युबातली  हुकुमशाही उलथून टाकली. त्या हुकूमशाहीला अमेरिकेचा पाठींबा होता. भांडवली अर्थव्यवस्थेचं मॉडेल असलेल्या अमेरिकेच्या नाकावर टिच्चून क्युबात साम्यवादी क्रांती घडवून आणली. जगाला कम्युनिझमचं क्यूबा मॉडेल मिळालं. त्या भावंडांपैकी एक, फिडेल कॅस्ट्रो यांचा आज स्मृतीदिवस. त्यांनी जवळपास पाच दशकं क्यूबात एकहाती सत्ता चालवली. १३ ऑगस्ट १९२६ ला एका सुखवस्तू घरात त्यांचा जन्म झाला.

फेब्रुवारी १९५९ ते डिसेंबर १९७६ या काळात ते क्यूबाचे पंतप्रधान राहिले. त्यानंतर २००८ पर्यंत राष्ट्राध्यक्ष म्हणून काम बघितलं. तब्येत साथ देत नसल्यानं त्यांनी २००६ मधे भाऊ राऊल यांना उपराष्ट्राध्यक्ष केलं आणि देशाचा कारभार त्यांच्याकडे सोपवला. हुकूमशाही उलथवून सत्तेवर आलेल्या कॅस्ट्रो यांच्यावर ते लोकशाहीविरोधी असल्याचेही आरोप होतात. मार्क्स आणि लेनिन यांच्या विचारांचा प्रभाव असलेल्या फिडेल यांची जगभरात ओळख आहे, ती क्यूबन क्रांतीकारक म्हणून. 

‘नवाकाळ’कार कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर (जन्म १८७२)

थोर देशभक्त, नाटककार, संपादक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचा आज जन्मदिवस. काकासाहेब नावाने ते प्रसिद्ध होते. त्यांनी ‘केसरी’, ‘लोकमान्य’ या पेपरांमधे संपादक म्हणून काम केलं. टिळकांसारखे अध्यात्मवादी राष्ट्रवादाचे ते पुरस्कर्ते होते. टिळकांच्या मृत्यूनंतर खाडिलकर गांधीजींच्या राजकारणाचे समर्थक झाले. पुढे स्वतःचा ‘नवाकाळ’ पेपर काढला. १९२७ मधे हिंदू-मुसलमान वादावरील लेखावरून नवाकाळवर केस झाली. त्यात खाडिलकरांना शिक्षा झाली. 

पेपरमधे काम सुरू असतानाच खाडिलकर नाट्यलेखनही करायचे. बंगालच्या फाळणीवर भाषण करणारं त्यांचं ‘कीचकवध’ नाटक खूप गाजलं. यावर ब्रिटीश सरकारनं बंदीही घातली होती. कांचनगडची मोहना (१८९८), सवाई माधवराव यांचा मृत्यू, (१९०६), संगीत बायकांचे बंड, भाऊबंदकी, प्रेमध्वज, संगीत मानापमान, सत्त्वपरीक्षा, संगीत स्वयंवर, संगीत द्रौपदी, संगीत त्रिदंडी संन्यास, संगीत सावित्री (१९३३) आदी नाटकं त्यांनी लिहली. यामधे शेक्सपिअरच्या नाट्यशैलीचा त्यांनी वापर केला. नाट्यप्रेमींनी त्यांना ‘नाट्याचार्य’ पदवीनं  सन्मानित केलं. २६ ऑगस्ट १९४८ ला त्यांचं निधन झालं. 

नटवर्य भालचंद्र पेंढारकर (जन्म १९२१)

रंगकर्मी, गायक आणि ‘ललितकलादर्श’चे संचालक भालचंद्र पेंढारकर यांचा आज जन्मदिवस. नाट्यवर्तुळात ते ‘अण्णा’ नावानं परिचित होते. भारतीय रंगभूमीचा गौरवशाली ठेवा असलेली ‘ललितकलादर्श’ संस्था त्यांनी कर्जातून बाहेर काढत नावारूपाला आणली. १९०८ मधे संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी या संस्थेची स्थापना केली होती. वडील व्यंकटेश पेंढारकर यांच्या निधनाने वयाच्या १८ व्या वर्षीच अण्णांवर या संस्थेची जबाबदारी आली. सुरवातीला जुन्याच नाटकांचे प्रयोग त्यांनी सादर केले. पण यातून काही  हाती लागत नाही हे दिसताच त्यांनी नवी नाटकं आणायला सुरवात केली.

बाळ कोल्हटकरांचं 'दुरितांचे तिमिर जाओ', विद्याधर गोखल्यांचं पंडितराज जगन्नाथ, बावनखणी, जय जय गौरिशंकर, आनंदी गोपाळ अशी अनेक नाटकं ललितकलादर्शने आणली. ती तुफान गाजली. नाटकांच्या निर्मितीसोबतच अण्णांनी अभिनय आणि गायनातही नाव कमावलं. दुरितांचे तिमिर जावो, पंडितराज जगन्नाथ, गीता गाती ज्ञानेश्वर, शाब्बास बिरबल शाब्बास ही अण्णांची नाटकं गाजली. ‘दुरितांचे तिमिर जावो’मधील अण्णांनी साकारलेली ‘दिगू’ची व्यक्तिरेखा अजरामर झाली. ११ ऑगस्ट २०१५ ला त्यांचं निधन झालं. 

पाकिस्तानचे कॅप्टन इम्रान खान (जन्म १९५२)

पाकिस्तानच्या १९९२ मधल्या वर्ल्ड कप विजेत्या टीमचे कप्तान, पंतप्रधान इम्रान खान यांचा आज वाढदिवस. क्रिकेटमधे जवळपास दोन दशकं गाजवल्यावर निवृत्तीनंतर त्यांनी सामाजिक कामातून राजकारणात एंट्री केली. मानवतावादी चेहरा पुढे करून त्यांची ‘पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पार्टी’ अर्थात पीटीआय राजकारण करू लागली. आपल्या आक्रमक आणि अवास्तव भूमिकेसाठी इम्रान खान वादग्रस्त ठरत असतानाच लोकप्रिय बनत होते. भारत आणि पाकिस्तानमधला वाद चुटकीसरशी मिटवू असं सांगून राजकारणात मोठं झालेल्या इम्रान यांनी ऐन निवडणुकीत भारतविरोधी भाषणं केली. त्यातूनच ते आता पाकिस्तानचे पंतप्रधान झाले.

लाहोरच्या एका उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या इम्रान यांनी वयाच्या १८ व्या वर्षीच इंग्लंडविरुद्धच्या मॅचमधून क्रिकेटमधे पाऊल ठेवलं. त्यावेळी त्यांचं इंग्लंडमधे शिक्षण सुरू होतं. जवळपास दहा वर्षे पाकिस्तानची कॅप्टनशीप केल्यानंतर १९९२ मधे ते निवृत्त झाले. ३,८०७ रन आणि ३६२ विकेट मिळवून त्यांनी एक ऑलराऊंडर क्रिकेटर म्हणून आपला दबदबा निर्माण केला. वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या इम्रान यांना आता लोकांनी देशाचा कॅप्टन केलंय. पाकिस्तानला दहशतवादासोबतच आर्थिक, धार्मिक संकटातून बाहेर काढण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे. 

तडकभडक राखी सावंत (जन्म १९७८)

फिल्म इंडस्ट्रीत तडकेवाली आयटम गर्ल म्हणून प्रस्थापित झालेल्या राखी सावंतचा आज बड्डे आहे. लहानपणी ५० रुपयांसाठी अनिल अंबानींच्या मुलाच्या लग्नात एक वेटर असलेली राखी आता मुंबईत आलिशान घरात राहते. चाळीशी पार केलेली राखी ‘अग्निचक्र’ सिनेमातून बॉलीवूड़मधे आली. जोरू का गुलाम, जिस देस मे गंगा रहता हैं आणि ये रास्ते हैं प्यार के या सिनेमात तिनं छोटे रोल आणि डान्स केला. तेलगू, कन्नड, मराठी, तामिळ सिनेमातही तिनं लहान-लहान  रोल केले. पण तिला लोकप्रियता मिळाली ती आयटम गर्ल बनल्यावर. २००५ मधे आलेला रिमिक्स गाण्यांचा परदेसिया अल्बम हिट झाला. २००६ मधे बिग बॉसच्या पहिल्याच सिझनमधे तिनं भाग घेतला. मिका सिंगच्या बर्थडे पार्टीत त्याला किस करणाऱ्या राखीनं हंगामा उडवून दिला होता.  

२०१४ च्या निवडणुकीत तिनं ‘राष्ट्रीय आम पार्टी’ काढून लोकसभा लढवली. नंतर ती रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टीमधे गेली. इन कॅमेरा वादग्रस्त बोलणारी, खुलासे करणारी आणि त्यानंतर माफी मागणारी राखीही सगळ्यांना माहीत आहे. कदाचित या थेट-स्ट्रेट स्वभावातूनच तिला यश मिळत गेलं. आता राखी सेक्स सिम्बॉलसोबतच अनेकांसाठी सक्सेस सिम्बॉलपण झालीय!