२४ ऑक्टोबर : आजचा इतिहास

२५ ऑक्टोबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २४ ऑक्टोबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. कॉमन मॅन आर. के. लक्ष्मण, मल्लिका शेरावत, इस्मत चुगताई, मार्क टुली आणि संयुक्त राष्ट्र यांच्याविषयीच्या.

‘कॉमन मॅन’ आर. के. लक्ष्मण (जन्म १९२४)

आपल्या ‘द कॉमन मॅन’च्या फटकाऱ्यांतून सर्वसामान्यांच्या चेहऱ्यांवर हसू तर काहींच्या चेहऱ्यावर आसू आणणारे कार्टूनिस्ट आर. के. लक्ष्मण यांचा आज जन्मदिवस. भारतातील सगळ्यात महान कार्टूनिस्ट म्हणूनही त्यांचा आज लौकिक आहे. लक्ष्मण यांचे मोठे भाऊ आर. के. नारायणन हे इंग्रजीतले मोठे कादंबरीकार होते. ‘द हिंदू’तल्या भावाच्या लेखांसाठी लक्ष्मण हे कार्टून काढून द्यायचे. ‘द टाईम्स ऑफ इंडिया’त जॉईन होण्याआधी ते मुंबईतल्या ‘द फ्री प्रेस जर्नल’मधून राजकीय व्यंगचित्रकार म्हणून आपली कारकीर्द सुरू केली होती. टाईम्समधे ५० वर्षांहून अधिक काळ त्यांचे कार्टून छापून यायचे. इथली त्यांची ‘द कॉमन मॅन’ ही  पॉकेट सिरीज आजही लोकांच्या लक्षात आहे. कमीत कमी रेषा आणि शब्दांमधे जगण्यातली विसंगती टिपण्यात त्यांची व्यंगचित्रं यशस्वी व्हायची. मॅगसेसे, पद्मभूषण, पद्मविभूषण यासारख्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांचं २०१५ मधे पुण्यात निधन झालं.

बंडखोर कलमवाली इस्मत चुगताई (निधन १९९१)

एरवी सामान्यांच्या बोलण्या-ऐकण्यात ‘टॅबू’ समजलं जाणारं वास्तव लेखणीतून धाडसानं समोर आणणाऱ्या उर्दू लेखिका म्हणजे इस्मत चुगताई. त्यातही पर्दा-बुरखा यांच्याआड लपलेलं-लपवलेलं मुस्लीम जनाना जग त्यांनी कथा-कादंबऱ्यांतून समर्थपणे मांडलं. चाहत्यांसाठी त्या ‘इस्मतआपा’ बनल्या. 

इस्मतआपांची पहिली कादंबरी ‘जिद्दी’ १९४१ ला आली. एक कतरा-ए-खून, दिल की दुनिया, मासूमा, बहरूप नगर आदी कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या. चोटें, छुईमुई, एक बात, कलियाँ, एक रात, दो हाथ दोज़खी, शैतान असे त्यांचे कथासंग्रहसुद्धा प्रकाशित झाले. त्यांच्या ‘लिहाफ’ कथेमुळं कथित भावना दुखावल्याचं सांगत संस्कृतीरक्षकांनी १९४२ मधे लाहोर कोर्टात केस केली. अर्थात, ही केस इस्मतआपांनीच जिंकली! लिहाफच्या माध्यमातून भारतीय साहित्यात पहिल्यांदाच लेस्बियन प्रेमाची हळूवार कथा उलगडली.

सिनेमांच्या पटकथा लिहण्यासोबतच ‘जुनून’मधे त्यांनी अभिनयही केला. १९४३ मधे त्यांचा छेड-छाड हा पहिला सिनेमा आला होता. त्यांचा शेवटचा सिनेमा असलेल्या ‘गर्म हवा’ला (१९७३) अनेक पुरस्कार मिळाले. साहित्य अकादमीसोबतच त्यांना अनेक महत्वाचे पुरस्कार मिळाले. उर्दू साहित्यजगताच्या ‘इस्मत आपा’चं आजच्याच दिवशी १९९१ मधे  निधन झालं. त्यांच्या इच्छेनुसार धार्मिक संस्काराला फाटा देत मुंबईच्या चंदनवाडी स्मशानभुमीत त्यांच्या देहाला अग्नी देण्यात आला.

भारतीय इंग्रज सर मार्क टुली (जन्म १९३४)

बीबीसीच्या दिल्ली ब्युरोचे प्रमूख म्हणून काम केलेल्या मार्क टुली यांचा आज वाढदिवस. कोलकत्यातील एका ब्रिटीश उद्योगपतीच्या घरात जन्मलेल्या मार्क यांना लहानपणी घराबाहेर जाऊन सर्वसामान्य लोकांशी बोलायला परवानगी नव्हती. १० वर्षांचे असताना त्यांना शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवण्यात आलं. केंब्रिज विद्यापीठात धर्मशास्त्राचं शिक्षण घेतलेल्या टुली यांना ख्रिश्चन धर्मगुरू व्हायचं होतं. मात्र कॉलेजमधल्या दोनेक लेक्चरनंतरच त्यांनी हा विचार सोडून दिला. ‘धर्मगुरू होणं ही काही सोप्पी गोष्ट नाही. माझ्यातल्या तीव्र लैंगिक भावनांमुळंच मी धर्मगुरू व्हायचा नाद सोडला असेल‘, असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

टुली यांनी १९६४ मधे बीबीसीत काम सुरू केलं. ६५ मधे भारतीय प्रतिनिधी म्हणून त्यांनी दिल्लीतून कामास सुरवात केली. हा सारा काळ बीबीसीच्या दबदब्याचा होता. माहितीसाठी अख्खं जग बीबीसीवर अबलंबून असायचं. आपल्या कारकीर्दीत त्यांनी दक्षिण आशियातल्या सर्वच महत्वाच्या घटना, घडामोडी कवर केल्या. उदा. भारत-पाक युद्ध, इंदिरा गांधींची हत्या, राजीव गांधींची हत्या, बाबरी मशीद विध्वंस. १९९४ मधे त्यांनी बीबीसीच्या महासंचालकांशी झालेल्या वादानंतर राजीनामा दिला होता. पण आजही त्यांचं बीबीसीशी नातं संपलेलं नाही. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. ती जवळपास सर्वच भारतावर आहेत. ते सध्या दिल्लीतच राहतात.

सेक्स सिम्बॉल मल्लिका शेरावत (जन्म १९७६)

मल्लिका शेरावत बॉलीवूडमधली एक बोल्ड अक्टर म्हणून प्रसिद्ध आहे. आज तिचा बत्तीसावा वाढदिवस. तिचा जन्म हरयाणातील हिसार जिल्ह्यात झाला. तिचं मूळ नाव रीमा लांबा आहे. मल्लिका शेरावतच्या आईचं माहेरचं आडनाव शेरावत होतं. बॉलीवूडमधे नाव बदलतान तिने हेच आडनाव घेतलं.  

जीना सिर्फ मेरे लिए या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केलं. या सिनेमात मात्र ती रिना लांबा या मूळ नावानेच आली होती. ती जाट कुटुंबातून असल्यामुळे सिनेमात काम करण्यासाठी तिला घरातून विरोध होतो. ख्वाहिश आणि मर्डर या सिनेमांतून हॉट अंगप्रदर्शन आणि अभिनय करत तिने नवी ओळख मिळवली. ते २००३ हे वर्ष होतं. त्यानंतर तिने जॅकी चैन हिरो असणाऱ्या मिथ नावाच्या चिनी सिनेमात काम केलं. पाठोपाठ हिस्स या आणखी एका आंतरराष्ट्रीय सिनेमात काम केलं. त्यानंतर ती फारशी दिसली नाही. तिचे हिरोईन म्हणून सिनेमे आले त्यात प्यार के साईड इफेक्ट्स त्यातल्या त्याल लक्षात ठेवण्याजोगा होता. वेलकमसारख्या सिनेमात साईड रोल किंवा आयटम नंबरपुरतीच ती मर्यादित राहिली. आज आश्चर्य वाटतं, पण जून २००७ साली हाँगकाँगच्या प्रसिद्ध मॅगझिनने आशियातील १०० सुंदर स्त्रियांच्या यादीत समावेश केला होता.

युद्ध नसलेल्या जगासाठी संयुक्त राष्ट्र (स्थापना १९४५)

संयुक्त राष्ट्राची स्थापना २४ ऑक्टोबर १९४५ ला दुसऱ्या महायुद्धानंतर झाली. युनायटेड नेशन्स म्हणजेच यूएन या इंग्रजी आद्याक्षरांनुसार या संस्थेला ओळखलं. दुसऱ्या महायुद्धात झालेल्या हिंसेमुळे चिंताग्रस्त झालेल्या देशांनी जगात शांतता प्रस्थापित होऊन पुन्हा परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी संयुक्त राष्ट्रांची स्थापना करण्यात आली. स्थापनेच्या वेळेस फक्त ५० राष्ट्र हे सदस्य होते. आता १९३ देश संयुक्त राष्ट्राचे सदस्य आहेत.

२५ एप्रिल १९४५ ला अमेरिकेतील सेन फ्रॅन्सिसको इथे आंतरराष्ट्रीय संघटनांची संयुक्त राष्ट्र संम्मेलन झालं. इथे उपस्थित असलेल्या ५० देशाच्या सरकारांनी संयुक्त राष्ट्राच्या अधिकारपत्रावर सहमती दिली. सुरक्षा परिषदेच्या पाच सदस्यीय देशांच्या हस्ताक्षरानंतर २४ ऑक्टोबरला संयुक्त राष्ट्र अस्तित्वात आलं. संयुक्त राष्ट्राच्या एकूण १७ समित्या आहेत. त्यात विश्व आरोग्य संस्था, वर्ल्ड बँक यासारख्या समित्यांचा समावेश आहे. युनिसेफ या संस्थेमार्फत संयुक्त राष्ट्र मानव विकासाचं काम करते. संयुक्त राष्ट्राचं मुख्यालय अमेरिकेतील न्यूयॉर्क इथं आहे. इंग्रजी, फ्रेंच, रशियन, चिनी, अरबी, आणि स्पॅनिश या सहा यूएनच्या अधिकृत भाषा आहेत. अनेकदा गंभीर संघर्ष होऊनही संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेनंतर महायुद्धाची स्थिती आली नाही, हे संयुक्त राष्ट्रांचं यशच आहे.