२४ डिसेंबर: आजचा इतिहास

२४ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २४ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

मानवधर्म सांगणारे साने गुरूजी (जन्म १८९९) 

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे हा मानवधर्म सांगणाऱ्या साने गुरुजींचा आज जन्मदिवस. थोर स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते असलेले साने गुरुजींनी तब्बल ८२ पुस्तकांचं लिखाण केलं. ‘श्यामची आई’ या पुस्तकांचं अजूनही मुलांच्या पालकांच्या मनावरलं गारूड कायम आहे. पांडुरंग सदाशिव साने हे त्यांचं पूर्ण नाव.

गांधीवादी विचारांच्या गुरुजींनी शिक्षकी सोडून सवियन कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न केले. बलसागर भारत होवो यासारख्या कविता लिहणाऱ्या गुरुजींचा पत्री हा कवितासंग्रह इंग्रज सरकारने जप्त केला होता. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर हरिजनांना प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन केलं. हे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर 'एका पांडुरंगाने दुसर्‍या पांडुरंगाला खर्‍या अर्थाने मुक्त केलं' असं म्हटलं गेलं. १९४८ मधे त्यांना साप्ताहिक 'साधना' सुरु केलं. साने गुरुजींचं ११ जून १९५० ला निधन झालं.

अॅक्टर सीएम एमजी रामचंद्रन (निधन १९८७)

एमजी रामचंद्रन यांच्या रुपाने पहिल्यांदाच एखादा अॅक्टर थेट सीएम झाला. ते एमजीआर नावाने लोकप्रिय आहेत. गांधीजींच्या विचाराने प्रभावित झालेल्या एमजीआरनी तरुणपणीच राष्ट्रीय काँग्रेसमधे प्रवेश केला. नंतर ते डीएमकेमधे गेले. पुढे त्यांनी स्वतःचा अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम नावाचा पक्ष काढला. १९७७ साली पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. आपल्या लोककल्याणकारी धोरणांमुळे त्यांना दक्षिण भारतात खूप प्रसिद्धी मिळाली.

तीस वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी शंभरहून अधिक तामिळ सिनेमात काम केलं. कुटुंबाच उदरनिर्वाह चालवण्यासाठी एमजीआर हे आपल्या भावासोबत नाटकात काम करू लागले. तिथूनच त्यांना सिनेमात काम मिळू लागलं. बघता बघता ते तामिळ सिनेमातले करिश्माई अॅक्टर बनले. मुख्यमंत्री असताना त्यांनी शाळांमधे सुरू केलेली मध्यान्ह भोजन योजना खूप गाजली. मातृभाषेसाठी प्रचंड आग्रही असलेल्या एमजीआर यांचे यावरून केंद्र सरकारशी खूप खटके उडायचे. एमजीआर यांचं बोट धरूनच जयललिता यांच्या रूपाने सिनेमातला आणखी एक चेहरा तामिळनाडूच्या राजकारणात उगवला.

शहंशाह-ए-तरन्नुम मोहम्मद रफी (जन्म १९२४)

सुप्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांचा आज जन्मदिवस. आपल्या गोड गळ्याने रफी साहेबांनी हिंदी सिनेमात स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवला. त्यांनी सर्वाधिक गाणी संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासाठी गायली. संगीतकाराला पैसे न विचारता गाणं गाणारा माणूस म्हणूनही त्यांची ख्याती होती. मोहम्मद अझीझ, सोनू निगम यासारख्या अनेक गायकांना रफीचा गळा म्हणूनच आजही ओळखलं जातं. आजही लग्नात वाजवल्या जाणाऱ्या 'बाबुल की दुआएं लेती जा' या गाण्याला पर्याय होऊ शकला नाही.

१९४० च्या दशकात करिअर सुरू करत त्यांनी जवळपास २६ हजार गाणी गायली. यामधे हिंदी सिनेमासोबतच देशभक्तीपर गीत, गझल, भजन, कव्वाली आणि दुसऱ्या भाषेतल्या गाण्यांचाही समावेश आहे. १९६५ मधे त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं. ‘आस पास’ सिनेमातलं 'शाम फिर क्यों उदास है दोस्त' हे त्यांचं अखेरचं गाणं ठरलं. ३१ जुलै १९८० ला निधनाच्या दोन दिवस आधीच त्यांनी हे गाणं रेकॉर्ड केलं होतं. मुंबईतल्या मुसळधार पावसातही त्यांच्या अंत्यसंस्काराला दहाऐक हजार लोक जमले होते.

सोनमचे पप्पा अनिल कपूर (जन्म १९५९)

सुप्रसिद्ध बॉलीवूड अॅक्टर अनिल कपूर यांचा आज ५९ वा जन्मदिवस. कधीकाळी तब्बूची बहीण फराह नाजला मोठं करायचं की माधुरी दीक्षितला याचं राजकारण करणारे अनिल कपूर आता पोरगी सोनमला सेट करण्याच्या प्रयत्नात आहेत. वडील निर्माते सुरेंद्र कपूर यांच्याकडून मिळालेल्या वारसामुळे त्यांची १९७९ मधेच सिनेमात एंट्री केली. २००१ मधे ‘नायक’ सिनेमातली एक दिवसाच्या सीएमची त्यांची भूमिका आजही चर्चेत आहे.

'पुकार', 'तेजाब', 'बेटा' या सिनेमांसाठी बेस्ट अॅक्टर आणि 'मशाल', 'ताल' यासाठी बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर म्हणून त्यांना अॅवार्ड मिळाला. 'हम पांच', 'लव मॅरेज', 'मोहब्बत', 'इंसाफ की आवाज', 'मिस्टर इण्डिया', 'राम लखन', 'किशन कन्हैया', 'बेनाम बादशाह', '१९४२: ए लव स्टोरी', 'दीवाना मस्ताना', 'बीवी नंबर १', 'सलाम-ए-इश्क', 'वांटेड' यासारख्या शंभरहून अधिक सिनेमात त्यांनी दमदार रोल केला.

फिरकीपटू पीयूष चावला (जन्म १९८८)

टीम इंडियाचा माजी फिरकीपटू पीयूश चावला याचा आज बड्डे आहे. आयपीएलमधे कोलकाता नाईटरायडर्ससाठीही तो खेळतो. त्याने पहिल्यांदा २००६ मधे इंग्लंडविरुद्ध खेळत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे एंट्री केली. इंग्लंडविरुद्धच २०१२ मधे त्याने शेवटची मॅच खेळली. इंटरनॅशनल क्रिकेटमधे तीन टेस्टसोबत २५ वनडे मॅच खेळल्या आहेत.
२०११ मधे २३ वर्षांच्या पीयूषला वर्ल्डकपसाठीच्या भारतीय संघात निवडण्यावरून खूप चर्चा रंगली होती. पण कॅप्टन महेंद्रसिंह धोनीने पीयूषच्या निवडीचं खंबीरपणे समर्थन केलं होतं. उत्तर प्रदेशच्या अलीगडसारख्या छोट्याशा शहरात त्याचा जन्म झाला. २००७ ते २०११ यादरम्यान २५ वनडेत पीयूषने १३१२ बॉलवर विरोधी टीमला १११७ रन दिले. यात ३२ विकेट पटकावल्या.