२३ नोव्हेंबरः आजचा इतिहास

२३ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २३ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

कंत्राटदार ते विमान कंपनी मालक वालचंद हिराचंद (जन्म १९८२)

भारतातल्या पहिल्या विमान निर्मिती कंपनीचे संस्थापक वालचंद हिराचंद यांचा जन्मदिवस. १८८२ मधे सोलापुरात त्यांचा जन्म झाला. धंद्याकडे कल असल्याने त्यांनी सुरवातीच्या काळातचं शिक्षण सोडलं. वडिलांचा आडतीचा धंदा सोडून ते बांधकाम व्यवसायात उतरले. बार्शी लाइट रेल्वेचं कंत्राट त्यांनी घेतलं. जवळपास १४ वर्षे त्यांनी भागीदारीत अनेक पुलांची उभारणी केली. येडशी-तडवळे, बोरीबंदर-करी रोड-ठाणे-कल्याण आणि हार्बर ब्रँच लाइन यांसारखे मोठे प्रकल्पही त्यांनी तडीस नेले. या प्रकल्पाचे कंत्राट घेण्यासाठी त्यावेळी मुंबईतल्या आणि ब्रिटिशांच्या मर्जीतल्या उद्योजकांची साखळी त्यांनी मोडून काढली.

मुंबईचा तानसा प्रकल्प, बोरघाट बोगदा, सिंधू आणि इरावती नदीवरच्या पुलांचे बांधकामही त्यांच्या कंपनीनंच केलं. बोगदा बनवण्याचं तंत्रज्ञानही त्यांनीच पहिल्यांदा देशात प्रत्यक्षात उतरवलं होतं. अनेकदा ब्रिटीश सरकार आपल्याच देशाच्या कंपन्यांना झुकतं माप देत कंत्राट द्याचे. ब्रिटीशांच्या या भूमिकेविरुद्ध जोरदार आवाज उठवत वालचंद यांनी सरकारशी पंगा घेतला. उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी इंडियन मर्चंट्‌स, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅणन्ड इंडस्ट्री (फिक्की) आदी संस्थांच्या उभारणीत त्यांनी पुढाकार घेतला.

हवाई अवतार सत्य साईबाबा (जन्म १९२६)

भारतातल्या सर्वाधिक प्रभावशाली अध्यात्मिक गुरुंपैकी असलेल्या सत्य साईबाबा यांचा आज जन्मदिवस. वयाच्या चौदाव्या वर्षीच ते स्वतःला शिर्डीच्या साईबाबांचा अवतार असल्याचं सांगायला लागले. एवढंच नाही तर ते स्वतःला शिर्डीच्या साईबाबांचं पूर्व शरीर असल्याचं सांगायचे. पुढे सत्यनारायण राजू हा सत्य साईबाबा झाला. आपल्या चमत्कारांमुळे प्रसिद्ध असलेल्या सत्य साईबाबांचा भक्त परिवार देशातच नाही तर परदेशातही पसरलाय.

आंध्र प्रदेशातल्या पुट्टपर्थी या जन्मगावी त्यांचं मोठं आश्रम आहे. इथला दवाखाना मोफत औषधोपचारामुळे सर्वसामान्यांमधे खूप प्रसिद्ध आहे. मोठमोठे राजकारणी, श्रीमंत भक्त यांना ते हवेतून सोनंनाणं यासारख्या गोष्टी प्रकट करून द्यायचे. त्यांचे हे हवाई चमत्कार वादात अडकले. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमूख, माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर हे त्यांचे भक्त होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर अशोक चव्हाण यांनी सत्यसाईंना वर्षा बंगल्यावर बोलावल्यावरून खूप टीका झाली होती. २४ एप्रिल २०११ मधे वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.

एकाकी गीता दत्त (जन्म १९३०)

जुन्या काळातल्या प्रसिद्ध सिंगर गीता दत्त यांचा आज जन्मदिवस. बांगलादेशातील फरीदपूर इथं जन्मलेल्या गीताला घेऊन कुटुंब मुंबईला शिफ्ट झालं. इथंच त्यांचं शिक्षण झालं. प्लेबॅक सिंगर म्हणून त्यांनी बॉलीवूडमधे एंट्री केली. १९४७ मधे त्यांनी पहिल्यांदा 'दो भाई' सिनेमात 'मेरा सुंदर सपना बीत गया' गाणं गायलं होतं. त्यानंतर त्यांनी शेकडो गाणी गायली. कमी वयातच बॉलीवूडमधे प्लेबॅक सिंगर म्हणून त्यांचं नाव झालं. काही सिनेमात त्यांनी कामही केलं.

गीता दत्त यांनी 'वो सपने वाली रात', 'हम आपकी आंखो में', 'जरा सनम आ', 'जाने कहां मेरा जिगर गया जी', 'मेरे जिंदगी के हमसफर', 'ऐ दिल है मुश्किल', 'मेरा नाम छिन छिन छू', 'जय जगदीश हरे', 'चले आओ चले आओ', 'मेरा दिल जो मेरा होता' यासारखी अनेक गाणी गायली. एकदा असंच स्टूडिओमधे गाणं गात असलेली गीता गुरुदत्त यांच्या प्रेमात पडली. दोघांनी लग्नही केलं. नंतर घटस्फोटही झाला. गुरूदत्त यांचं अकाली निधन झालं. या एकटेपणातून व्यसनात अडकलेल्या गीता दत्त यांचं वयाच्या ४२ व्या वर्षी २० जुलै १९७२ ला मुंबईत निधन झालं.

कादंबरीकार ना. सं. इनामदार (जन्म १९२३)

ऐतिहासिक कादंबरीकार ना. सं. इनामदार यांचा आज जन्मदिवस. इतिहासातली दुर्लक्षित आणि वादग्रस्त व्यक्तिमत्व घेऊन त्यांनी अत्यंत रंजक, चित्रमय पद्धतीने आपल्या कादंबऱ्या लिहल्या. हे सगळं ऐतिहासिक साहित्य त्यांनी ललित भाषेतून वाचकांपर्यंत पोचवलं. १९९७ ला अहमदनगर इथं झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं. 

झुंज, मंत्रावेगळा, झेप, राजेश्री, शिकस्त आदी कादंबऱ्या त्यांनी लिहल्या. थोरले बाजीराव पेशवे यांच्या जीवनावर आधारलेल्या राऊ कादंबरीचं ’राऊ स्वामी’ नावानं हिंदीत भाषांतर झालं. औरंगजेबाच्या व्यक्तीमत्वाचे पैलू उलगडणाऱ्या इनामदार यांच्या शहेनशाह कादंबरीचा नुकताच इंग्रजीत अनुवादित झालाय. वाळल्या फुलांत हे आत्मचरित्र त्यांनी लिहलं. १६ ऑक्टोबर २००२ मधे त्यांचं निधन झालं.

क्रिकेटपटू गॅरी कर्स्टन (जन्म १९६७)

दक्षिण आफ्रिकेचे डावखुऱ्या हाताचे बॅट्समन गॅरी कर्स्टन यांचा आज बड्डे. भारतानं २०११ मधे क्रिक्रेट वर्ल्ड कप जिंकला. त्या संघाचे कर्स्टन कोच होते. कर्स्टन यांच्या २००७ ते २०११ या कोचपदाच्या काळातच भारतानं आयसीसी क्रमवारीत अव्वल क्रमांक पटकावला. ७ पैकी ६ वनडे सीरिज जिंकल्या.

कर्स्टन यांनी १९९३ ते २००४ या काळात १०१ टेस्ट आणि १८५ वनडे मॅच खेळल्या. ओपनिंग बॅट्समॅन म्हणून त्यांनी आपली कारकीर्द गाजवली. २०११ ते २०१३ मधे दक्षिण आफ्रिकेच्या टीमला त्यांनी प्रशिक्षण दिलं. सध्या ते आयपीएलमधे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमचे कोच आहेत. सोबत स्वतःच्या नावानं त्यांनी कोचिंग अकॅडमी सुरू केलीय.