२२ नोव्हेंबरः आजचा इतिहास

२२ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २२ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

गांधीवादी संपादक दादासाहेब पोतनीस (जन्म १९०९)

स्वातंत्र्यसैनिक, संपादक दादासाहेब पोतनीस यांचा आज जन्मदिवस. दतात्रेय शंकर पोतनीस हे दादासाहेबांचं मूळ नाव. साताऱ्याच्या वाईत जन्मलेल्या दादासाहेबांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. स्वातंत्र्य चळवळीला पुरक म्हणून त्यांनी ‘गांवकरी’ ही साप्ताहिक चालवलं. पुढे या साप्ताहिकाचं दैनिक झालं. ‘अजिंठा’ हे दैनिकही त्यांनी चालवलं. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात ही दोन्ही दैनिकं खूप गाजली. दादासाहेबांनी नाशिक परिसरात अनेक संस्था उभ्या केल्या. दादासाहेबांचं एक वैशिष्टय म्हणजे, एखादी संस्था येत्या काळात सक्षमपणे चालू शकते, असं वाटलं की ते त्यातून बाहेर पडायचे आणि नवं काम हाती घ्यायचे.

अनेकदा तुरुंगात गेलेल्या दादासाहेबांनी गांधीजींच्या सत्याग्रहात हिरहिरीने भाग घेण्यासोबतच सर्वोदयी चळवळीत सक्रीय राहिले. स्वातंत्र्यानंतर त्यांनी नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावात शिक्षणप्रसाराचं काम सुरू केलं. विडी कामगारांच्या संघटना चालवल्या. स्वदेशीचा वसा घेतलेल्या दादासाहेबांचं २७ ऑगस्ट १९९८ ला निधन झालं.

समाजवादी मुलायमसिंग यादव  (१९३९)

राम मनोहर लोहिया आणि राज नारायण यांच्या मुशीत घडलेले समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायमसिंह यादव आज वयाच्या ८० व्या वर्षांत पदार्पण करत आहेत. गेल्या पाच दशकांपासून देशाचं, युपीचं राजकारण घडण्या बिघडवण्यामागं मुलायमसिंहाचा एक हात राहिलाय. राजकीय वर्तुळात ते ‘नेताजी’ नावानं प्रसिद्ध आहेत. तीनवेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेल्या नेताजींनी एकदा संरक्षण मंत्री म्हणूनही कारभार केला. 

उत्तर प्रदेशच्या एका छोट्याशा गावात जन्मलेल्या नेताजींनी आग्रा विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केले. त्यानंतर काही काळ शिक्षक राहिले. पैलवान असलेल्या नेताजींनी जनता पार्टीकडून १९६७ मधे राजकारणात पाऊल ठेवलं ते आमदार म्हणून. १९९२ ला त्यांनी समाजवादी पार्टीची स्थापना केली. यानंतर त्यांनी बीएसपीसोबत आघाडी करत दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद मिळवलं. एवढ्या वर्षांत एकमेकांचे कट्टर वैरी झालेल्या एसपी आणि बीएसपी यांच्यात आता पुन्हा आघाडीची चर्चा सुरू आहे. यावेळी आघाडीसाठी पुढाकार घेतलाय तो त्यांचा मुलगा, माजी मुख्यमंत्री अखिलेख यादव यांनी. पाच भाऊ असलेल्या नेताजींनी आपला पक्षही त्या जोरावरच वाढवलं. पण आता मुलगा आणि लहान भाऊ शिवपाल यांच्या वारसा संघर्ष सुरू आहे. त्यातूनच दोन्ही वारसदारांमधे नेताजींचा वाढदिवस कोण धुमधडाक्यात साजरा करता यासाठी स्पर्धा लागलीय. गेल्या काही काळापासून पडद्यामागे असलेले नेताजी लोकसभा निवडणुकीवेळी काय भूमिका घेतात यावरही युपीचं आणि पर्यायानं देशाच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे.

नाटककार पार्श्वनाथ आळतेकर (मृत्यू १९५९)

जुनेजाणते मूकपट डायरेक्टर, अॅक्टर पार्श्वनाथ यशवंत आळतेकर यांचा आज स्मृतीदिवस. १९२४ पासून त्यांनी वेगवेगळ्या मूकपटांमधे रोल केला. काही मूकपटांचं दिग्दर्शनही केलं. ‘इंपिरियल’, ‘सरस्वती सिनेटोन’ ‘रणजित’ ‘नटराज फिल्म्स’ या सिनेमा कंपन्यांसाठी त्यांनी डायरेक्टर, अॅक्टर म्हणून काम केलं. मराठी, हिंदीसोबतच कन्नड, तमिळ बोलपटांचेही ते डायरेक्टर राहिले. रत्ना्गिरी जिल्ह्यातल्या खारेपाटण इथं १४ सप्टेंबर १८९८ ला त्यांचा जन्म झाला.

अनेक सिनेमात काम केलेल्या आळतेकरांना आज ओळखलं जातं ते नाटककार म्हणून. सुरवातीच्या काळात त्यांनी स्वस्तिक बँक, खरा ब्राम्हण ही नाटकं रंगभूमीवर आणली.  रेडिओ स्टार्स, नाट्यमन्वंतर या सस्थांच्या माध्यमातून त्यांनी नाट्य कलावंत घडवले. नाट्याभिनय आणि वाईस कल्चरसाठी त्यांनी नॅशनल थिएटर अकॅडमी चालवली. इंग्लंड, अमेरिकेतल्या ‘लिट्ल थिएटर्स’, ‘कम्युनिटी थिएटर्स’ यांच्या धर्तीवरच त्यांनी ‘लिट्ल थिएटर’ (१९४१) ही संस्था सुरू केली. ‘अण्णासाहेब’ (आंधळ्यांची शाळा), ‘रामशास्त्री’ (भाऊबंदकी), ‘बापूसाहेब’ (रंभा) या त्यांच्या भूमिका गाजल्या. आळतेकरांच्या स्मरणार्थ हौशी नाट्यसंस्थांसाठी १९६४ पासून नाट्यस्पर्धा घेतल्या जातात.

समतावादी टेनिसपटू बिली जीन किंग (१९४३)

खेळातल्या समतेसाठी लढणाऱ्या जगप्रसिद्ध अमेरिकन टेनिसपटू बिली जीन किंग यांचा आज जन्मदिवस. त्यांनी ३९ ग्रँडस्लॅम जिंकले. यामधे एकेरीत १२, महिला दुहेरीत १६ आणि मिश्र दुहेरीतल्या ११ ग्रँडस्लॅमचा समावेश आहे. टेनिसमधल्या या डोळे दिपवून टाकणाऱ्या कामगिरीसोबतच त्यांनी आपल्या अधिकारांसाठी संघर्ष केला. खेळांमधल्या स्त्री, पुरुष समतेचा मुद्दा मांडणाऱ्या बिली नंतर पुरुष खेळाडूंच्याही हक्कासाठी लढल्या.

७० च्या दशकात जगप्रसिद्ध टेनिसपटू बॉबी रिग्ज यांनी महिला खेळाडू कमजोर असतात, असं म्हटलं होतं. यावर बिली यांनी ५५ वर्षांच्या रिग्ज यांना आपल्यासोबत टेनिसची मॅच खेळण्याचं आव्हान दिलं होतं. १९७३ मधे वयाच्या २९ व्या वर्षी त्यांनी बॅटल ऑफ सेक्सेस ही टेनिस मॅच जिंकून रेकॉर्ड केला होता. खेळातले महिलांच्या विरोधातले नियम बदलण्यासाठी बिली यांनी पुढाकार घेतला.

डान्सगुरू सरोज खान (१९४८)

बॉलीवूडच्या प्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खान यांचा आज ७० वा वाढदिवस आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षीच त्यांनी एक बाल कलाकार म्हणून त्यांनी सिनेमातलं आपलं करिअर सुरू केलं. १३ व्या वर्षीच नृत्यगुरू सोहनलाल यांच्यांशी त्यांचं लग्न झालं. आतापर्यंत दोनशेहून अधिक सिनेमांमधे त्यांनी कलाकारांना डान्स शिकवण्याचं काम केलंय. १९८९ मधे तेजाब सिनेमातलं त्यांनी बसवलेलं ‘एक दो तीन’ हे गाणं खूप गाजलं. फिल्मफेअर अवार्डवाल्यांनाही या कामाची दखल घ्यावी लागली. त्यांच्यापासूनच कोरिओग्राफर कॅटेगरीसाठीही पुरस्कार दिला जाऊ लागला. 

सरोज खान यांना २००६ मधे ‘देवदास’ आणि २००७ मधे ‘जब वी मेट’ सिनेमातल्या गाण्यांसाठी बेस्ट कोरिओग्राफर पुरस्कार मिळालाय. 'गुरु', 'देवदास', 'हम दिल दे चुके सनम', 'खलनायक', 'बेटा', 'सैलाब', 'चालबाज' और 'तेजाब' या सिनेमातलं त्यांचं कामही नावाजलं गेलं. सरोज यांनी शिकवलेल्या डान्सवरच अनेक हिरोईन सुपरहिट झाल्या.