२२ डिसेंबरः आजचा इतिहास

२२ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २२ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

शिखांचे दहावे गुरू गुरु गोविंद सिंह (जन्म १६६६)

धर्म आणि समाजाच्या संरक्षणासाठी खालसा पंथाची स्थापना करणाऱ्या गुरु गोविंद सिंह यांची आज जयंती. या पंथाने समानता प्रस्थापित करण्यासाठी जातीय भेदभाव संपवण्याचा प्रयत्न केला. शीख समाजामधे आत्मसन्मानाची भावना वाढीस लावली. शीख धर्माचे दहावे गुरु असलेल्या गुरु गोविंद सिंह यांनी शीध धर्माचा आद्यग्रंथ 'गुरु ग्रंथ साहिब' लिहिला. त्यांनी प्रेम, एकोपा आणि बंधुभावाचा संदेश दिला.

शिखांचे नववे गुरू गुरु तेग बहादुर हे त्यांचे वडील होते. एक महान योद्धा, कवी, भक्त आणि आध्यात्मिक नेता म्हणून ओळखले जातात. गुरु गोविंद सिंह यांचा पाटणा इथे जन्म झाला. त्यांच्या जन्मानंतर चारच वर्षांनी त्यांचं कुटुंब पंजाबला स्थलांतरित झालं. तिथेच त्यांचं शिक्षण झालं. हिंदीसोबतच फारसी आणि संस्कृत भाषाही त्यांना अवगत होत्या. ७ ऑक्टोबर १७०८ मधे त्यांनी नांदेड इथे अखेरचा श्वास घेतला.

थोर गणिती श्रीनिवास रामानुजन (जन्म १८८७)

जगप्रसिद्ध थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस आहे. गणिताचं कोणतंही औपचारिक शिक्षण, ट्रेनिंग न घेतलेल्या रामानुजन यांनी जगाला नंबर थेअरी दिली. त्यांनी मांडलेल्या अनेक थेअरींचा गुंता अजूनही उलगडला नाही. त्यांच्या फॉर्म्युल्यांची मदत घेऊन विज्ञानानेही अनेक शोध लावले. पण कुठलंही ट्रेनिंग न घेतलेल्या रामानुजन यांनी या एवढ्या गुंतागुंतीच्या थेअरी शोधल्या कुठून याचा अजून कुणाला उलगडा झाला नाही.

तामिळनाडूतल्या एका ब्राम्हण कुटुंबात जन्मलेल्या रामानुजन यांना लहानपणापासूनच गणितात आवड होती. आवडीनेच ते नंबर थेअरीच्या क्षेत्रात काम करण्यासाठी इंग्लंडला गेले. पण इंग्लंडमधल्या कडाक्याच्या थंडीने त्यांची तब्येत खराब झाली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना चारेक वर्षांतच मायदेशी परतावं लागलं. मद्रास युनिवर्सिटीत प्राध्यापक म्हणून नोकरी करू लागले. पण त्यांच्या तब्येतीत काही सुधारणा झाली नाही. वयाच्या ३३ व्या वर्षी २५ एप्रिल १९२० ला त्यांचं निधन झालं.

शाहीर पठ्ठे बापूराव (निधन १९४५)

तमाशा या लोककलेला सूवर्णयूग दाखवणारे शाहीर पठ्ठे बापूराव यांचा आज स्मृतीदिवस. श्रीधर कृष्ण कुलकर्णी हे त्यांचं मूळ नाव. ब्राम्हण कुटुंबातला जन्म आणि घरातलं कुलकर्णीपद या फसव्या ओझ्यामुळे आवड असूनही त्यांना तमाशा बघायला जात येत नव्हतं. रात्री उशिरा चोरून ते फडात जाऊ लागले. तमासगीरांना लावण्या लिहून देऊ लागले. बापूरावांच्या लावण्या आणि कवनं गायली जाऊ लागली. `श्रेष्ठवर्ण मी ब्राह्मण असूनी! सोवळे ठेवले घालूनी घडी!! मशाल धरली हाती तमाशाची लाज लावली देशोधडी!!` असं म्हणतं तमाशाला सूवर्णकाळ दाखवण्याची बापूरावांनी शपथच घेतली. 

सांगलीचे पठ्ठे बापूराव मुंबईत आले. इथे पवळाबाईचा गळा आणि ठसकेबाज नृत्याने त्यांची काव्यप्रतिभा चांगलीच बहरली. या जोडीची कीर्ती महाराष्ट्रभर पसरली. पुढे त्यांचा फड बंद पडला. ९०० रुपयांच्या लिलावावर मुंबईतल्या एका शेठने दोघांना विकत घेतलं. दोघांना बघण्यासाठी थिएटरवर तिकीट लावलं. तमाशाला बरे दिवस आले असतानाच या जोडीत बेबनाव झाला. पवळाबाई बापूरावांचा फड सोडून गेल्या. नंतर त्यांना फडात यश आलं नाही.

तिशीतले क्रिकेटर दिलीप दोशी (जन्म १९४७)

तिशीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे येऊन १०० विकेट घेण्याचा रेकॉर्ड जगभरात चार जणांच्या नावावर आहे. दिलीप दोशी त्यापैकी एक. क्लॅरी ग्रिमेट, सईद अजमल आणि रायन हॅरीस या तिघांचं नावही त्यांच्यासोबत येतं. त्या काळात टीम इंडियामधे गोलंदाज बेदी, प्रसन्ना, वेंकटराघवन आणि चंद्रशेखर या चौकडीचा दबदबा होता. त्यामुळे टीम इंडियात स्थान मिळवायला फिरकीपटू दोशींना तिशीपर्यंत वाट बघावी लागली.
 
दोशी भारतासाठी १९७९ ते १९८३ या काळात ३३ टेस्ट आणि १५ वनडे मॅचमधे खेळले. त्यात त्यांनी टेस्टमध्ये ११४ आणि वनडेमध्ये २२ विकेट्स मिळवल्या. टेस्टमधली त्यांची कामगिरी चांगली असली तरी सातत्याच्या अभावामुळे ते फार काळ टीम इंडियात टिकाव धरू शकले नाहीत. अकराव्या क्रमांकावर ३८ वेळा बॅटिंगला आलेल्या दोशींनी ३३ टेस्टमध्ये केवळ १२९ रन्स काढल्या. यातही त्याचं अॅवरेज होतं ४.२९ इतकं. यामुळे टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वाईट बॅट्समनमधे त्यांच्या नाव घेतलं जातं.

वर्षातला सगळ्यात छोटा दिवस

आजच्या दिवशी दिवस छोटा आणि रात्र मोठी असते. फक्त १० तास ५७ मिनिटंच सुर्याचं दर्शन होतं. रात्र मात्र तब्बल १३ तास ३ मिनिटाची असते. २२ डिसेंबरला सुर्य दक्षिणेच्या बाजूने कललेला असतो. हे सगळं एका बिंदूवर ठरतं. तो बिंदुला ‘विंटर सोलस्टाईस’ म्हणतात. गुगलनेही याबाबत काल डूडल बनवलं. सुर्य या बिंदूच्या दक्षिण किंवा उत्तर गोलार्धात असण्यावरून सगळ्यात छोटा दिवस आणि सगळ्यात मोठ्या रात्रीचं गणित ठरतं. 

या दिवशी पृथ्वीचा अक्ष २३.५ अंशाने कललेला असतो. त्यामुळे सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायण यांचा अनुभवही आपल्याला येतो. कुठल्याही वस्तुच्या सावलीकडे बारकाईने बघितल्यास सूर्याच्या दक्षिणायण आणि उत्तरायणातला फरक सहज लक्षात येतो. २१ जूनला सगळ्यात मोठा दिवस असतो. त्या दिवसापासून सूर्याच्या दक्षिणायनाला सुरवात होते. हे चक्र पुढे पुढे जात २३ डिसेंबरला रात्र आणि दिवस दोन्ही बारा बारा तासांचे होतात. आजच्या दिवशी उत्तरायणाचं चक्र सुरू होतं.