२२ ऑक्टोबरः आजचा इतिहास

२२ ऑक्टोबर २०१८

वाचन वेळ : ५ मिनिटं


आजचा दिवस भारतीय विकासाच्या दोन महत्त्वाच्या पाऊलखुणा दाखवणारा ठरला. भाक्रासारखं जगातल्या एका मोठ्या धरणांपैकी एक देशाला अर्पण करण्यात आलं. तर दहा वर्षांपूर्वी चांद्रयान चंद्राच्या दिशेने झेपावलं. आजच कादर खान यांचा जन्मदिवस, तसंच बॅ. विठ्ठलभाई पटेल आणि ना. सी. फडके यांचा स्मृतीदिवस.

कादर खान : हसवण्यासाठी जन्म आमचा ( जन्म १९३५)

कादर खानचं नाव डोळ्यापुढं आलं तर आजही रसिकांना हसू फूटत. अफलातून टायमिंग, सोपी भाषा आणि निर्विष विनोद यामुळे आजही त्यांचा चेहरा टीवीवर दिसताच कित्येकांचा रिमोट थांबतो. आज त्यांचा जन्मदिन. त्यांचा जन्म अफगाणिस्तानच्या काबूल इथं जन्म झाला. फाळणीनंतर त्यांचं कुटुंब भारतात आलं. जन्मापासून गरीबी पाहिलेल्या कादर खान यांना आईनं शिक्षणासाठी एका मशिदीत घातलं. तिथून पळून जंगलात जाऊन ते जोरजोरात ओरडायचे. हे बघून एकानं त्यांना नाटकात रोल दिला. कॉलेजमधे असताना एका नाटकातला खान यांचा अभिनय बघून दिलीपकुमार खूपच प्रभावित झाले. तिथूनच कादर खानच्या आयुष्यातली गरिबीची रेषा नाहीशी व्हायला सुरवात झाली. दिलीप कुमार यांनी आपल्या सगीना आणि  बैराग या दोन सिनेमांच्या लिखाणासाठी कादर खानशी करारमदार केले.

कादर खान यांनी अडीचशेहून जास्त सिनेमांच्या स्टोऱ्या आणि डायलॉग लिहिलेत. कधीकाळी अनवाणी फिरणाऱ्या कादर खानला ‘रोटी’च्या स्टोरी लेखनासाठी १ लाख २० हजार रुपये मानधन मिळालं होतं. ७० च्या दशकात अमिताभ बच्चनच्या सुहाग, मुकद्दर का सिकंदर आणि अमर अकबर एंथोनी या सिनेमांचे संवाद गाजले. हिम्मतवाला, कुली नं वन, मैं खिलाडी तू अनाडी, खून भरी मांग, कर्मा, सरफरोश आणि धर्मवीर सारख्या सुपर हिट सिनेमांच्या स्टोऱ्या त्यांनी लिहिल्या. बऱ्याचदा विनोदी हिरोचा रोल हा साईडला जातो. पण कादर खानमुळं अनेक चित्रपटांना नाव मिळालं. पोस्टरवर कादरखानचा फोटो बघूनच लोक सिनेमाचं तिकीट काढायचे.

ना. सी. फडके : कलेसाठी कला (निधन : १९७३)

‘कलेसाठी कला’ हा विचार आपल्या लिखाणातून मांडणारे ना. सी. फडके यांचे आजच्या दिवशीच निधन झाले. यंदा त्यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती आहे. कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. १९१७ला अल्ला हो अकबर! या कादंबरीनं त्यांची कारकीर्द सूरू झाली. इंग्रजीतल्या मारी कोरेली यांच्या ’टेंपरल पॉवर’ कादंबरीवर ती आधारीत होती. कमला दीक्षित ही विद्यार्थिनीचं पुढं त्यांची दुसरी बायको झाली.

फडक्यांच्या कथा तंत्रशुद्धता, आखीवरेखीवपणा आणि डौलदार भाषा यासाठी ओळखल्या जायच्या. एखाद्या प्रसंगाचं रसभरीत वर्णन आणि बांधेसूद व्यक्तीदर्शन त्यांच्या लिखाणातून घडायचं. असं असलं तरी त्यांच्यावर निव्वळ मनोरंजन करणारा माणूस, अशी टीका व्हायची. त्यांच्या लिखाणामुळंच मराठीत कलेसाठी कला की जीवनासाठी कला हा वाद सुरू झाला. त्यांच्या नावानं २५ हून अधिक कथासंग्रह आहेत. काही कथा कादंबऱ्यांचा इंग्रजीत अनुवाद झालाय. ‘कलंक शोभा’ या कादंबरीवरून त्याच नावाचा एक सिनेमाही आला. १९४० च्या रत्नागिरी इथं भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९६२ मधे पद्मविभूषण सन्मान देण्यात आला होता.

विठ्ठलभाई पटेल (१९३३)

थोर देशभक्त आणि संसदपटू विठ्ठलभाई जव्हेरभाई पटेल यांचं आजच्या दिवशी निधन झालं होतं. मुंबईत वकिलीचं शिक्षण घेऊन त्यांनी गोध्रा कोर्टात काम सुरू केलं. मोठा भाऊ म्हणून त्यांनीच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या शिक्षणाची जबाबदारी पार पाडली. पुढं इंग्लंडहून बॅरिस्टरची पदवी मिळवली. लंडनमधे दादाभाई नौरोजी यांच्या मार्गदर्शनात त्यांनी भारतीय प्रश्नांचा अभ्यास केला. स्वातंत्र्य चळवळीसाठी न्यूजपेपर, वेगवेगळे मंच आणि कायदेमंडळ यांचा परस्परपूरक वापर करण्याच्या धडे त्यांनी इथं गिरवले. मुंबईला परतल्यावर त्यांनी पुन्हा वकिली सुरू केली. १९११ मधे मुंबई कायदेमंडळात ते निवडून आले. त्यांनी सगळ्या बिगरसरकारी सभासदांत एकमत घडवून आणत सरकारी धोरणावर आपला प्रभाव टाकला. १९१६ मधेच त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करण्यासाठी एक विधेयक मांडलं. त्यांनी हिंदू मिश्रविवाहाचा प्रस्तावही मांडला. परंतु कौन्सिल बरखास्त झाल्यामुळं त्याचा विचार झाला नाही.

भाक्रा धरण : हे तर नवं देऊळच (लोकार्पण १९६३)

माणसांची प्रचंड कष्ट घेऊन माणसाच्या भल्यासाठी उभारलेलं हे धरण आहे. त्यामुळे तुम्ही याला देऊळ म्हणू शकता किंवा गुरुद्वारा किंवा मशीदही. ५५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भाक्रा धरण देशाला अर्पण करताना केलेल्या भाषणात हे ऐतिहासिक उद्गार काढले होते. विकासाच्या दिशेने पावलं टाकणाऱ्या देशाला यातून मोठी प्रेरणा मिळाली. हिमाचल प्रदेशमधल्या बिलासपूर जिल्ह्यात सतलज नदीवर भाक्रा धरण बांधण्यात आलंय. याच नदीवर खालच्या बाजूला नांगल नावाचं आणखी एक धर पंजाब राज्यात आहे. त्यामुळे या योजनेला एकत्रपणे भाक्रा नांगल म्हटलं जातं. स्वातंत्र्यानंतर अगदी सुरुवातीलाच देशाने हातात घेतलेला हा प्रकल्प होता. पण त्याचं प्लानिंग त्याआधीच झालं होतं. १७ नोव्हेंबर १९५५ ला कोरड्या नदीपात्रात काँक्रिटचं घमेलं टाकून नेहरूंनीच याच्या कामाची सुरुवात केली होती. तिथे कामगारांना अभिवादन करण्यासाठी स्मारक उभारण्याचीही घोषणा केली. १९६३ साली जेव्हा हे धरण पूर्ण झालं. तेव्हा आशियातलं सर्वाधिक वीजनिर्मिती करणारा जलविद्युत प्रकल्प बनला. जगातल्या सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असणाऱ्या या प्रकल्पातून ४० हजार चौरस किलोमीटर जमिनीला पाणी पुरवता येतंय. पण याच्या धरणग्रस्तांच्या पुनर्वसनावर अजूनही समाधानकारक तोडगा निघालेला नाही. 

आकाशाला गवसणी घालणारं चांद्रयान भरारी (२००८)

भाक्रा धरणापासून सुरू झालेली देशाच्या वैज्ञानिक प्रगतीचा आलेख एकविसाव्या शतकातही सुरू राहिला. त्याचं प्रतीक आहे, चांद्रयान. नेहरूंच्याच संकल्पनेतून निर्माण झालेल्या इस्रोच्या चंद्र संशोधन कार्यक्रमाच्या अंतर्गत चंद्राच्या दिशेने कूच करणारं चांद्रयान १ हे भारताचं पहिलं अंतरिक्ष यान होतं. ते आजच्याच दिवशी बरोबर दहा वर्षांपूर्वी आकाशात झेपावलं. ते ३० ऑगस्ट २००९ पर्यंत काम करत होतं. पीएसएलवी मालिकेच्याच रॉकेटच्या मदतीने ते सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातून चंद्राकडे झेपावलं. त्याला चंद्रापर्यंत पोचण्यासाठी ५ दिवस लागले आणि चंद्राच्या कक्षात स्थिर होण्यासाठी १५ दिवस. त्याने चंद्रावर १०० किलोमीटर अंतरावर ध्रुवीय कक्षेत एक सॅटेलाईट स्थापित केला. त्याने चंद्राचे फोटो पाठवले. ते दोन वर्षं सक्रिय राहील, अशी अपेक्षा होती. पण नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटल्यामुळे एका वर्षाच्या आधीच त्याला निकामी करण्यात आलं.

चांद्रयानामुळे चंद्रावर यान पाठवणारा भारत जगातला आठवा देश बनला. ते मानवरहित असलं तरी त्यामुळे मानवसहित यान पाठवण्याचा देशाचा मार्ग खुला झाला. हॉलीवूडच्या अंतरिक्षाविषयीच्या सिनेमावर होणाऱ्या खर्चापेक्षा कमी खर्चात चंद्रयान चंद्रावर पोचलं. भारताच्या शास्त्रज्ञांचं हे फार मोठं यश मानलं गेल. त्यामुळेच नोटाबंदीनंतरच्या नव्या नोटांरवही चांद्रयानाला स्थान मिळालं.