२१ नोव्हेंबर : इतिहासात आज

२१ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २१ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

संस्थान विलीनीकरणाचे जनक हरेकृष्ण महाबत (जन्म १८९९)

भारतात संस्थानाच्या विलीनीकरणाचा विषय येतो, तेव्हा डोक्यात पहिल्यांदा सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव येतं. पण स्वतंत्र भारत पहिल्यांदा कुणी संस्थानांचं विलीनीकरण असेल तरे ते ओडिशाचे तत्कालीन मुख्यमंत्री हरेकृष्ण महाबत. ओडिशा प्रांतातल्या २६ संस्थानांच्या विलीनीकरणाचा मुद्दा मांडला. सगळ्या संस्थानिकांना ओडिशात विलीन होण्याचा आदेशच काढला. पण संस्थानिकांनी यास विरोध केला. मिलिटरीच्या मदतीनं कोणत्याही रक्तपाताशिवाय १४ नोव्हेंबर १९४७ ला संस्थानांचं विलीनिकरण झालं. आज महाबत यांचा जन्मदिवस.

ओडिशाचे पहिले मुख्यमंत्री असलेल्या महाबत यांना लोकांनीच ओडिशाचे सिंह अशी पदवी दिली. आधुनिक सोयीसुविधांच्या दृष्टीनं त्यांनी ओडिशाची राजधानी कटकहून भुवनेश्वरला हलवली. पुढं ते पंडित नेहरूंच्या मंत्रीमंडळात गेले. मुंबई प्रांताचे गवर्नर म्हणूनही काम केलं. १९७७ मधे सक्रीय राजकारणातून निवृत्ती ठेतलेल्या महाबत यांचे २ जानेवारी १९८७ ला निधन झालं. 

मराठवाड्याचे विश्वस्त गोविंदभाई श्रॉफ (मृत्यू २००२)

हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्यसैनिक गोविंदभाई श्रॉफ यांचा आज स्मृतीदिवस. निजामाच्या तावडीतून हैदराबाद संस्थांन मुक्त व्हावं म्हणून त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासोबत काम केलं. त्यानंतर मराठवाडा विनाअट महाराष्ट्रात सामील झाला. मराठवाड्याच्या विकासाचा प्रश्न गोविंदभाईंनी लावून धरला. सरस्वती भूवन या आता शंभर पार केलेल्या शिक्षण संस्थेची स्थापना केली. कधीकाळी या संस्थेच्या ऑफीसातूनच मराठवाड्याच्या विकासाची, आंदोलनाची दिशा ठरवली जायची. 

स्वातंत्र्यानंतर मराठवाड्यातले, मराठवाड्याशी संबंधित सगळे राजकारणी, समाजकारणी वेगवेगळ्या प्रश्नांवर गोविंदभाईंचा सल्ला घ्यायला यायचे. मराठवाडा जनता विकास परिषदेच्या माध्यमातून त्यांनी मराठवाड्याच्या अनुशेषाचा मुद्दा लावून धरला. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरले. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनाला त्यांनी केलेला विरोध वादग्रस्त ठरला. गांधीवादी मुल्य जपणारे मार्क्सवादी विचारवंत गोविंदभाईंचे २००२ मधे निधन झालं.

आनंदाचं झाड शं. ना. नवरे (जन्म १९२८)

एखाद्या शहराचा एक लेखक असतो. डोंबिवलीचा तसा लेखक म्हणजे पु. भा. भावेंपेक्षाही शं. ना. नवरेच ठरतात. मुंबईत शिक्षण, मंत्रालयात नोकरी, लोकलच्या प्रवासात लेखन ही डोंबिवलीकरांची वैशिष्ट्य ते जगले. त्यांचं हे अनुभवविश्वच अभिजनी तोंडवळ्याचं आणि मध्यमवर्गीय होतं. त्यामुळे ते त्याच विषयांवर लिहीत राहिले. पण त्यात कुठेही कट्टरता किंवा संकुचितपणा नव्हता. उलट होता तो प्रसन्न आणि मिस्कील आनंदाचा शिडकावा. त्यांनी कधीच विचारवंताचा आव आणला नाही आणि दुसरीकडे उथळपणाही केला नाही. छोटे छोटे अनुभव अनुभवांतून ते जगण्याचं सूत्र मांडत. त्यामुळे शहाणी सकाळसारखी कथा वाचकांना आपली वाटली. त्यांचे २५ हून अधिक कथासंग्रह आहेत. गुंतता हृदय हे, सूर राहू दे सारखी अनेक सुपरहिट नाटकं, अनेक कादंबऱ्या तसंच कित्येक सिनेमे त्यांनी लिहिले. त्यात कळत नकळत, सवत माझी लाडकी, तू तिथं मी, आनंदाचं झाड, एक उनाड दिवस, पसंत आहे मुलगी गाजले. समाधानी आयुष्य जगलेल्या शन्नांचं २०१३ला निधन झालं.

अभिनयातली सहजता प्रेमनाथ (जन्म १९२६)

प्रेमनाथचा चेहरा तसा हिरोचा नव्हता. तसा विलनचाही नव्हता. पण तो त्याच्या तरुणपणी हिरोही शोभला. नंतर विलन म्हणूनही शोभला. आपला बुलंद आवाज, बेरकी नजर आणि ताकदीचा अभिनय यातून तो कोणतीही भूमिका लीलया पेलायचा. सहजता ही त्याचं सर्वात महत्त्वाचं शक्तिस्थळ होतं. त्याने त्याच्या तरुणपणात पैलवानछाप अॅक्शन हिरोच्या भूमिका केल्या. विलन म्हणून तर तो मूर्तिमंत दहशतच वाटायचा. हिरो आणि विलन दोन्ही नसलेल्या भूमिकाही त्याने त्याच्या पन्नाशीत गाजवल्या. मग तो धर्मात्मातला धर्मात्मा सेठ धरमदास असो किंवा बॉबीतला डिंपलचा बाप जॅक ब्रागान्झा असो. त्याने साठच्या दशकात अमेरिकन टेलिविजन सिरियलमधे काम केलं होतं. हॉलीवूडच्या केन्नर नावाच्या सिनेमातही तो होता. ढासळत्या तब्येतीमुळे त्याने हम दोनो नंतर चित्रपट संन्यास घेतला. पण राज कपूर आणि प्रेम चोप्राचा मेहुणा म्हणून तो कायम इंडस्ट्रीत वावरत राहिला. प्रसिद्ध अभिनेत्री बीना रॉय हिच्याशी त्याने लग्न केलं होतं. १९९२ ला वयाच्या पासष्टाव्या वर्षी हार्टअटॅकने त्याचं निधन झालं.

जगाला ऐकवणारा फोनोग्राफ (शोध १८७७)

एका शोधामुळे आपलं जगणं संगीतमय झालंय. तो शोध म्हणजे फोनोग्राफ. आवाज रेकॉर्ड करून तो पुन्हा ऐकण्याची सोय या शोधामुळं झाली. माणसाच्या शब्द फिरवाफिरवीला खोटारडेपणाचा आरसा दाखवणारं यंत्र म्हणजे फोनोग्राफ. अमेरिकी शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसनने लावलेल्या या शोधामुळे जगाचं रुपडंच बदललं. आजच्याच दिवशी १८७७ मधे एडिसनने जगाला फोनोग्राफ उपलब्ध करून दिला. टेलीग्राफ आणि टेलीफोन यांच्याशी संबंधित प्रयोग सुरू असताना एडिसन यांना हा शोध लागला. २९ नोव्हेंबरला हा शोध सगळ्यांसाठी खुला करण्यात आला. १८८७ मधे फोनोग्राफच्या शोधामधे एडिसन यांनी आणखी भर घातली. १९१२ मधे एडिसन यांचा डिस्क फोनोग्राफ बाजारात आला. त्यानंतर १९२० च्या दशकात रेडिओच्या आगमनाने फोनोग्राफची लोकप्रियता कमी होऊ लागली. रेकॉर्डिंगचं हे तंत्रज्ञान आज खूप पूढे आलंय, पण त्याची सगळी बीज १८७७ मधे आजच्या दिवसात आहेत.