श्यामकांत मोरे: कम्युनिटी किचनच्या जनकाची जन्मशताब्दी

०८ फेब्रुवारी २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


माजी खासदार श्यामकांत मोरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सध्या साजरं होतंय. गरिबांना स्वस्तात दोन वेळचं जेवण मिळवून देणारं आशिया खंडातलं पाहिलं कम्युनिटी किचन त्यांनी १९७२ला पुणे जिल्ह्यात सुरू केलं. महाराष्ट्रात झुणका भाकर योजनेपासून सध्या सुरू असलेल्या शिवभोजनापर्यंत आणि तामिळनाडूतल्या अम्मा किचनपर्यंत गाजलेल्या प्रकल्पांची मुळं शोधत आपल्याला श्यामकांत मोरेंपर्यंत जावं लागतं.

माजी आमदार आणि स्वातंत्र्यसेैनिक श्यामकांत दामोदर मोरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालंय. ६ डिसेंबर १९२१ ला देहूमधे त्यांचा जन्म झाला.  तर २६ नोव्हेंबर २००६ ला त्यांचा मृत्यू झाला. तुकाराम महाराजांच्या वंशावळीतल्या या लोकप्रिय नेत्याने जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकारण जवळ केलं. पण त्यासोबत समाजकार्याचा हात सोडला नाही.

१९५७ ला ते पहिल्यांदा शिरूर मतदरसंघातून निवडून आले. त्यानंतर १९६२ ला जिल्हा परिषदेवर आणि १९६७ ला बाबा आढाव यांचा पराभव करून पुन्हा त्यांनी शिरुर मतदारसंघ जिंकून घेतला. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त  ज्येष्ठ लेखक महावीर जोंधळे यांनी लिहिलेला त्यांच्या सामाजिक कामाचा आढावा घेणारा लेख इथं देत आहोत.

नितिनियमांमधे काही बदल होत नसतात. मतं बदलतात. नैतिकता अबाधित असते. आपले डोळे उघडे असतात तेव्हा आपल्याला सूर्य दिसतो. डोळे बंद असले की सूर्य दिसत नाही. हा झालेला बदल आपल्या दृष्टीतला असतो. सूर्याच्या अस्तित्वात काहीही बदल झालेला नसतो. गांधींनी सांगितलेली ही गोष्ट माजी खासदार, आमदार श्यामकांत मोरे यांच्या राजकीय काळात प्रत्येक ठिकाणी दिसत राहते.

२०२१ हे श्यामकांत मोरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. चुकीच्या हनीलाभाची, फायद्या तोट्याची बेरीज वजाबाकी नैतिकतेच्या दृष्टीकोनातून प्रत्येक माणसानं करायला हवी. विचार करण्याच्या काळात केला नाही तर नागरिकत्वाचा अर्थ शून्य होत जातो. गांधीच्या विचार प्रवाहाखाली राजकारणात वावरणारे कृतीशील नेते म्हणून मी त्यांना अनुभवलेलं आहे. हा माणूस समजून घेण्याचा हा छोटा प्रयत्न आहे. त्यातून तत्त्कालीन समाजविज्ञान समजून यावं हा उद्देश.

स्पष्ट भूमिकेचा नेता

तुकारामाच्या वंशपरंपरेतल्या श्यामकांत मोरे यांनी त्यांच्या समाजवादी मनाला कधीही मुरड घातली नाही. म्हणून त्यांच्यातल्या कळकळीला गांधी विचारांची भक्कम जोड होती. सामाजिक प्रश्न घेऊन लढे उभे करण्याच्या आत्मप्रेरणाचा शोध घेण्याची सवय जोपर्यंत आपल्याला लागत नाही तोपर्यंत हळवेपणाने माणसाचं मुल्यांकन होत राहील. तसं झालं की, वैचारिक विसंवाद वाढतो.

सतत समोर येणारी सत्य डोळ्यासमोर होऊ न देता डावी विचारसरणी काम करत राहिली. ती श्यामकांत मोरे यांच्या रूपाने. वेदनामय राजकीय प्रवासावर मात करत ते कसे काम करत राहिले हे समजून घेणंही तितकंच महत्वाचं वाटतं. स्पष्ट भूमिकेच्या नेत्याची जन्मशताब्दी यावी हीसुद्धा आशावादी मनाला एक प्रकारची प्रेरणाच म्हणायची.

स्वार्थानं बरबटलेल्या राजकारणापासून दूर रहायचं असेल तर स्वीकारलेल्या विचाराची मशागत हवी असते. प्रश्नांची उकल करण्यासाठी चिंतनाची गरज असते. ती श्यामकांत मोरे यांच्याकडे होती. म्हणून तत्कालीन आणि वर्तमानातल्या लोकप्रतिनिधींचा सर्वस्पर्शी अभ्यास करणं नक्कीच महत्वाचं ठरेल.

हेही वाचा: डॉ. मानवेंद्र काचोळे : मातीशी जोडलेला कार्यकर्ता संशोधक

सामाजिक दर्शन घडावं

नैसर्गिक परिस्थितीकडे बघून निर्णय घ्यायला लावणारे लोकप्रतिनिधी आणि आग्रही नेते अशी त्यांची महाराष्ट्राला ओळख होती. व्यवहारातली स्वच्छ नितळता त्यांच्यात आली कुठून असा प्रश्न आपल्याला पडला तरच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा नेमका उलगडा करणं सोपं जातं. सर्वोत्कृष्टतेला जवळ येऊ न देणारे काही नेते त्या काळात होते. त्यामुळे कर्तृत्ववान राजकारणी चर्चेत यायचे नाहीत.

राजकीय दर्शनापेक्षा सामाजिक दर्शन त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने घडावं ही यामागची भूमिका. नाकर्ती आणि कर्ती यांच्यातला फरक अजून आपल्याला समजत नाही. श्यामकांत मोरे यांच्या कार्यासोबत त्यांचं बहुआयामी असणं ठसशीतपणे अभ्यासाकासमोर येतं. ही वेगवेगळी वैशिष्ट्यं म्हणजेच नागरिकशास्त्र असतं हेच आपल्याला अजूनही लक्षात येत नाही.

आठ भाषांवर प्रभुत्व

सेवाभावी कर्तव्यसंपन्न माणसांचं आयुष्य समजून घेण्याची ओढ का कमी झाली तर असं म्हणता येईल की, तशी माणसं तरी कुठं उरली म्हणा! बहुआयामी असणं काय असतं याची कल्पना श्यामकांत मोरे यांच्या व्यक्तिमत्वातून सहज समजू शकते. विद्यार्थी दशेत गांधी विचाराने स्वातंत्र्य लढ्यात ओढले गेले.

कष्ट करून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. ते करत समाजाशीही जोडले. अभ्यासू स्वभावामुळे त्यांनी आठ भाषांवर प्रभुत्व मिळवलं. संस्कृतच्या अभ्यासामुळे परखड व्यक्तीमत्व असूनही संस्कृत प्रचूर भाषणामुळे एक उत्तम वक्ता म्हणून नावारूपाला आले.

हेही वाचा: बी जे खताळ पाटीलः एका शतायुषी तत्त्वनिष्ठ राजकारण्याची गोष्ट

राजकारण जवळचं वाटलं कारण,

बंडखोर संत आणि कवी तुकारामांच्या वंशातली सर्वज्ञान संपन्नता त्यांच्याकडे होती. पश्चिम बंगालमधल्या दुष्काळात सापडलेल्या जनतेच्या सेवेसाठी सतत सहा महिने पाय रोवून ते उभे राहिले. खादीचं व्रत स्वीकारून खेडोपाडी जाऊन खादी विषयीची जनजागृती करणं, गोवा मुक्ती संग्रामात प्रत्यक्ष काम करत राष्ट्रभाषा हिंदीसाठी वणवण फिरणारे श्यामकांत मोरे हे गुरूवर्य बाबूराव जगतापांचे शिष्य होय. बहुआयामी शब्दाचा इथं पूर्णपणे अर्थ लागतो.

स्वातंत्र्य चळवळीतून मिळालेली जनसेवेची प्रेरणा आणि त्यातून गोरगरीब, वंचित यांच्या प्रश्नांचा आणि समस्यांचा झालेला उलगडा त्यांना रस्त्यावरच्या लढ्यात घेऊन आला. लढे लढता लढता मोरे यांना जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकारण जवळचं वाटलं. ते विधानसभेवर निवडून आले. नंतर राज्य खादी मंडळाचे अध्यक्ष झाले.

समाजवादी नेते बाबा आढाव यांची बहिण इंदिरा आढाव या गांधी विचाराच्या कार्यकर्त्या, आणि स्वातंत्र्यलढ्यातल्या लढावू शिक्षकेशी त्यांचा विवाह झाला. त्यामुळे एक कृतीशील कार्यकर्त्याचा पाठिंबा त्यांच्या कामाला मिळत गेला.

साने गुरुजींसोबत दलितांच्या मंदिर प्रवेशासाठी पंढरपूर इथं या चळवळीचा एक भाग म्हणून झालेल्या कार्यक्रमात ‘प्रभात’कार वा. रा. कोठारी यांच्यासोबत ते होते.

आंदोलनाची लत लागली

पेशाने वकील असलेले श्यामकांत मोरे यांनी ‘नाही रे’ वर्गासाठी न्यायालयात बाजू मांडली. हिंदी, गुजराती, पाली, संस्कृत, इंग्रजी आणि इतर भाषांच्या अभ्यासामुळे न्यायालयीन कामकाजात त्यांचा दबदबा होता. ‘Role of Buddhism in the politics of south Vietnam’ या विषयावर अभ्यासपूर्ण रिसर्च त्यांनी लिहिला.

श्यामकांत मोरे हे सत्तावादी किंवा तडजोडवादी नव्हते. पण हटवादी होते. एसएम जोशी आपल्या आत्मकथानात म्हणतात, ‘मी चळवळीच्या प्रवाहात वहात गेलो, जिथं गेलो तिथं चारित्र्यवान माणसं होती. गांधीजींच्या पडवीत जो राहिला तो संसाराला मुकला. श्यामकांतना चळवळीची बाधा झाली होती. आंदोलनाची लत लागली होती.'

एसएम पुढे म्हणतात, 'त्याकाळातही समाजवादी चळवळ प्रामुख्यानं ब्राम्हणांचीच होती. मराठा व्यक्ती ‘शेकाप’मधे असायच्या, पण श्यामकांत नानासाहेब गोरे, मधू लिमये, साने गुरूजी यांच्यासोबत राहिले. यशवंतरावांनी निमंत्रण देऊनही ते गेले नाहीत. ‘मराठा’ असल्याचा किंवा देहूच्या मोरे घराण्याचा त्यांना थोडाही दंभ नव्हता.’

हेही वाचा: आप्पासाहेब सा. रे. पाटील: असाही असतो 'साखर कारखान्याचा चेअरमन'

जमली नाही ती संस्थात्मक उभारणी

१९७२ च्या दुष्काळात भूमिहीन माणसांसाठी आणि दुष्काळात होरपळून निघालेल्या सामान्य कुटुंबातल्या कष्टकऱ्यांसाठी मिळवून दिलेल्या कामाबद्दल त्यांच्याविषयी सगळीकडे आदराची भावना होती. हे करत असतानाच हिंदी भाषेच्या प्रचारासाठी ते वणवण भटकायचे. त्या भाषेत डॉक्टरेट करण्यासाठी एका बाजूला अभ्यास चालू असतानाच गौतम बुद्धांच्या शांततेच्या विचाराने प्रभावित होऊन त्यांनी जपान, मलेशिया, कोरिया या देशांचाही अभ्यास केला.

मुळातच लढाऊ बाणा असल्याने इतरांना हेवा वाटावा असं काम त्यांनी विविध क्षेत्रांत केलं. जमली नाही ती संस्थात्मक उभारणी. दलित, मुस्लिम, ख्रिश्चन समाजात त्यावेळी श्यामकांत मोरे यांना जी सन्मानाची वागणूक मिळायची, तशी वागणूक अन्य समाजवादी आमदारांना कधीही मिळाली नाही. ते जिल्हा परिषदेत सदस्य असताना अन्न, वस्र, निवारा या गोष्टींसाठी सातत्याने भांडायचे.

घोडनदीच्या पहिल्या दौऱ्याचा फायदा

श्यामकांत मोरे काँग्रेस पक्षात गेल्यावर उठलेल्या वादळावर बातमी लिहायची वेळ माझ्यावर आली होती. त्यासाठी पहिल्यांदा शिरूरला आल्यानंतर ज्या अनेक गोष्टी समजल्या त्यापैकी एक म्हणजे एस. एम. जोशी यांच्यावर श्रद्धा असूनही ते समाजवादी पक्षातल्या इतरांच्या कार्यपद्धतीला कसे कंटाळले होते, ते अनेक कार्यकर्त्यांकडून समजलं.

त्या घोडनदीच्या पहिल्या दौऱ्याचा एवढाच एक फायदा झाला. लांबून सगळंच कळतं असं नाही. ते समजून घेण्यासाठी त्या त्या व्यक्तींच्या कार्यक्षेत्रात फिरणंही तेवढंच गरजेचं असतं. दुष्काळी प्रदेशाचं नेतृत्व करत असतानाच त्यांनी शिक्षणाकडे लक्ष द्यायला सुरवात केली. त्यांना पत्नीचं सहकार्यही मिळालं.

इंदिरा कम्युनिटी किचनचे जनक

हळूहळू हा माणूस राजकारणापासून दूर गेला. त्यानंतर ते रमले सामाजिक कामात पण तेही नाममात्र. एक धडाडीचा कार्यकर्ता म्हणून कफल्लक होऊन राहिलेला, पण मनाने मोठा असलेला हा समाजवादी साथी, समतेच्या लढ्यातला पाईक म्हणून आजही लोकांच्या लक्षात आहे. कष्टकऱ्यांसाठी आशिया खंडातला एक नाविन्यपूर्ण प्रयोग त्यांनी हाती घेतला.

कमी किमतीत गरीब, कामगार, विद्यार्थी, नोकरी करणाऱ्या महिला यांना दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत मिटवणाऱ्या इंदिरा कम्युनिटी किचनचे ते जनक होते. ही योजना पुढे अनेकांनी उचलली. शिववड्याची प्रेरणासुद्धा तिकडूनच आली. किंवा झुणका भाकर केंद्रसुद्धा. हा अभिनव उपक्रम अनेक वर्ष चालू होता. काही ठिकाणी अजूनही चालू आहे.

हेही वाचा: 

शीला दीक्षितः काँग्रेसमधल्या एका कर्तृत्ववान पिढीचं जाणं

देशभर चर्चेचा विषय बनलेल्या रिहानाचं वायरल सत्य असत्य

आंदोलन मोडण्याचे मोडीत निघालेले हाथखंडे मोदी सरकारला का हवेत?

आपल्याला काय त्याचं : तरूणाच्या स्थित्यंतराची तरूणीनं सांगितलेली गोष्ट

एका शिक्षकाला बियरने चीनमधला सर्वात श्रीमंत माणूस बनवलं, त्याची गोष्ट

डॉ. नरेंद्रसिंग कपानी: फायबर ऑप्टिक्सचा हा जनक आपल्याला माहीत नाही