२० ऑक्टोबरः आजचा इतिहास 

२० ऑक्टोबर २०१८

वाचन वेळ : ५ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज 20 ऑक्टोबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. शाहीर अमरशेख, नवज्योतसिंग सिद्धू, वीरेंद्र सेहवाग, बाबा कदम, सिद्धार्थ शंकर रे यांच्याविषयीच्या.

दोन तडाखेबाजः सिद्धू आणि सेहवाग (जन्म अनुक्रमे १९६३ आणि १९७८)

१९८३ला सिद्धू पाजींनी पहिल्या टेस्टमधे ९० बॉलमधे २० रन केले, तेव्हा कुणाला वाटलंही नाही की पुढे जाऊन त्यांना सिक्सर सिद्धू असं नाव मिळेल. अशा अपयशी सुरवातीमुळे सिद्धूवर सडकून टीका झाला. प्रसिद्ध क्रीडापत्रकार राजन बाला यांना इंडियन एक्प्रेसमधे लेख लिहिला, सिद्धूः द स्ट्रोकलेस वंडर. तो वाचून सिद्धू इरेला पेटला. १९८७च्या वर्ल्डकपमधे सिद्धूने जोरदार पुनरागमन केलं. ओपनिंगला उतरत त्याने फोर आणि सिक्सचा पाऊस पाडला. त्याने आकडे कधी पाहिले नाहीत. टेन्शन कधी घेतलं नाही. तो खेळत राहिला. गावस्करपासून तेंडुलकरपर्यंत भारतीय क्रिकेटचा प्रवास क्रीझवर उभं राहून पाहिला. ९९ ला तो रिटायर्ड झाला तेव्हा वन डे आणि टेस्ट मिळून आठ हजारांपेक्षाही कमी रन त्याच्या नावावर होते. तरीही सिद्धूने भारतीय क्रिकेटरसिकांच्या मनात कायमचं स्थान मिळवलं.

वीरेंद्र सेहवागचंही तसंच. हा नजफगडचा नवाब कायम तडाखेबंद खेळला. पहिल्या मॅचमधे मात्र तो फेल गेला होता. एक रन आणि शून्य विकेट. त्यानंतर वीस महिने त्याला वाट बघावी लागली. सचिन तेंडुलकरबरोबर तो ओपनिंगला येऊ लागला आणि त्याचं नशीब पालटलं. मग त्याने मागे वळून पाहिलं नाही. सचिन समोर असताना आपला ठसा उमटवणं सोपं नव्हतं. पण ते त्याने करून दाखवलं. १०४ टेस्ट आणि २५१ वनडेमधे प्रत्येकी आठ हजारांहून अधिक रन करून त्याने रसिकांचं मनोरंजन केलं. अनेक मॅच जिंकून दिल्या. टेस्टमधे त्रिपल सेंचुरी आणि वनडेमधे डबल सेंचुरी करण्याचा पराक्रमही त्याने केला.

२०१३ला तो रिटायर्ड झाला. त्यामुळे त्याला फारसं टी२० खेळता आलं नाही. तो जोरात असताना टी२०चा जमाना असता, तर मात्र त्याने रोज दिवाळी साजरी केली असती. 
सिद्धू आणि सेहवाग हे दोघेही पंजाबी. दोघेही ओपनिंगला यायचे. मनाला वाटेल तसं खेळले आणि मनाला वाटेल तसं बोलले. रिटायर्ड झाल्यानंतरही ते गाजले. कॉमेंटेटर म्हणून दोघांचीही कारकीर्द हिट झाली. दोघेही क्रिकेटच्या मैदानासारखेच ट्विटरवरही फोर, सिक्स मारत असतात. सिद्धू राजकारणात आता जुना झालाय. पुढच्या लोकसभा निवडणुकीत सेहवाग बहुतेक भाजपकडून निवडणूक लढवेल.

शाहीर अमर शेख

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपल्या गीतांतून जान फुंकणारे लोकशाहीर अमर शेख यांचा आजच्या दिवशीच १९१६ मधे जन्म झाला. मेहबूब हुसेन पटेल हे त्यांचं मूळ नाव. बार्शीच्या एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या लोकशाहीरांना आईकडूनच लोकगीताचा वारसा मिळाला. बसवर क्लीनर, गिरणी कामगार म्हणून त्यांनी काम केलं. तुरुंगात भेटलेल्या एका कॉम्रेडमुळं प्रभावित होऊन ते कम्युनिस्ट झाले.

कोल्हापुरला मास्टर विनायकांच्या स्टुडिओत कामाला असतानाच दोस्तांनी त्यांचं ‘अमर शेख’ असं नाव ठेवलं. चीन, पाकिस्ताननं भारतावर आक्रमण केल्यावर त्यांनी शाहिरी सादर करून देशासाठी लाखो रुपयांचा निधी गोळा केला. प्र. के. अत्रेंसाठी ते ‘महाराष्ट्राचे मायकोवस्की’ होते. मात्र लोकशाहीर ही पदवीच त्यांची ओळख बनली.

कलश (१९५८) आणि धरतीमाता (१९६३) हे दोन कवितासंग्रह,  अमरगीत (१९५१) हा गीतसंग्रह प्रसिद्ध आहे. पहिला बळी (१९५१) नावाचं नाटकही त्यांनी लिहिलं. छत्रपती शिवाजी महाराज,  होळकर आणि उधमसिंग यांच्यावर पोवाडेही लिहिले. अशा या लोकशाहिराचा २९ ऑगस्ट १९६९ रोजी अपघाती मृत्यू झाला.

भारत चीन युद्धाची भळभळती जखम (सुरवात १९६२)

भारताने पाकिस्तानविरुद्ध प्रत्येक युद्धात विजय मिळवला. अनेकदा तो निर्णायक नसला तरी पारडं भारताचंच जड होतं. मात्र १९६२ सालचं भारत चीन युद्धात मात्र आपल्याला सपाटून मार खावा लागला. ते युद्ध २० ऑक्टोबरलाच सुरू झालं होतं.

हिंदी चिनी भाई भाईच्या घोषणा सुरू असताना चीन भारतावर हल्ला करेल असं कुणालाही वाटलं नव्हतं. पण लडाखमधून आलेल्या निर्वासितांना शरण देण्यापासून दोन देशांमधे धुसफूस सुरू होती. चीनने हल्ला करताना हिमालयातील सीमेच्या वादाचं कारण दिलं. सपाटीपासून १४ हजार फुटांवर चीनच्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारत बिलकुल तयार नव्हता. परिणामी सगळ्याच बाबतीत चीन वरचढ ठरला. विएतनाम युद्धामुळे रशिया किंवा अमेरिका भारताच्या मदतीला येऊ शकले नाहीत. भारत एकटा पडला. तरीही भारतीय सैनिकांनी अतुलनीय शौर्य दाखवलं. चीनने महिनाभराने आपल्या बाजूने युद्धविरामाची घोषणा केली आणि युद्ध थांबलं. तोवर अक्साई चीन भारताच्या हातातून गेला होता.

या सगळ्यामुळे संरक्षणमंत्री कृष्णमेनन यांना राजीनामा द्यावा लागला. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू खचल्यासारखे झाले. दोनेक वर्षांतच त्यांचं निधन झालं.

सुपरहिट कादंबरीकार बाबा कदम (निधन २००९)

गेली जवळपास पाच दशकं मराठी वाचकांवर अधिराज्य गाजवणारे कादंबरीकार म्हणजे बाबा कदम. त्यांच्या कादंबरीवर आजही लायब्रऱ्यांमधे आणि ऑनलाइन पोर्टलवर झुंबड उडते. सोपी कथानकं, अस्सल व्यक्तिचित्रण, मराठमोळं वातावरण आणि उत्कंठा वाढवणारी शैली यामुळे त्यांच्या कादंबऱ्या सुपरहिट ठरल्या.

४ मे १९२९ ला आजोळी अक्कलकोटला त्यांचा जन्म झाला. त्यांचं मूळ नाव वीरसेन आनंदराव कदम. ते सरकारी वकील होते. तिथे त्यांना तऱ्हेतऱ्हेची माणसं भेटली. चित्रविचित्र घटना आतून पाहता आल्या. तिथे त्यांना कथा आणि कादंबऱ्यांची कथानकं सापडली. त्यातून सत्तरहून अधिक कादंबऱ्या आणि वीसहून अधिक कथासंग्रहांनी आकार घेतला. त्यांनी अध्यात्मावरही लेखन केलंय. न्याय, बालंट, एक होती बेगम, एक होता युवराज, रिवॉर्ड, झिंदाबाद, इन्साफ, नजराणा, प्रतिक्षा, दगा, अजिंक्‍य, बलिदान, श्‍वेतगिरी, राही अखेरचे स्टेशन, राजधानी या कादंबऱ्यांच्या अनेक आवृत्या प्रसिद्ध झाल्या.

भालूसारख्या त्यांच्या बारा कादंबऱ्यांवर सिनेमे आले. त्यांचा मुलगा उमेश कदम हेदेखील कथाकार आहेत. त्यांनी त्यांच्या आफ्रिकेतील अनुभवांवर आधारित कथा लिहिल्यात. त्या शापित भूमी या नावाने प्रकाशित झाल्यात.

आणीबाणीचे शिल्पकार सिद्धार्थ शंकर रे (जन्म १९२०)

आणीबाणीचे शिल्पकार अशी ओळख असलेल्या सिद्धार्थ शंकर रे यांचा आज जन्मदिवस. ते बंगालच्या एका सरंजामी कुटुंबात जन्मले. देशबंधू चित्तरंजन दास यांचे ते नातू. इंग्लंडहून बॅरिस्टर होऊन भारतात आल्यावर त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

त्यांच्या काळातल्या सर्वाधिक वादग्रस्त राजकारण्यांपैकी ते एक होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सल्लागार होते. भारतीय लोकशाहीच्या इतिहासातलं काळं पान म्हणून ओळखली जाणारी आणीबाणी ही रेंच्या डोक्यातलीच आयडिया असल्याचं बोललं जातं. एका मुलाखतीत त्यांनी आणीबाणीचं समर्थनही केलं. 

दहा वर्ष केंद्रीय मंत्री म्हणून काम केल्यावर ते १९७२ मधे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री असताना नक्षलवादी आंदोलन मोडून काढण्याची त्यांची पद्धत वादग्रस्त ठरली. १९७७ मधे विधानसभेची निवडणूक हरल्यावर त्यांना १९८६ मधे राज्यपाल म्हणून पंजाबला पाठवण्यात आलं. १९९२ ते ९६ अशी चार वर्षं ते भारताचे अमेरिकेतील राजदूत होते. त्यांचं ६ नोव्हेंबर २०१० ला दीर्घ आजारानं कोलकात्यात निधन झालं.