२० नोव्हेंबरः इतिहासात आज

२० नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २० नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

बंडखोर शायर फैज अहमद फैज (निधन १९८४)

उर्दूतले सर्वाधिक लोकप्रिय शायर आणि आपल्या बंडखोर लेखणीमुळे जेलमधे गेलेल्या फैज अहमद फैज यांचा आज स्मृतीदिवस. शिक्षक, सैन्य दलात कर्नल, तुरुंगवास आणि स्थलांतर असं बहुआयामी जीवन जगलेल्या फैज यांनी कविता, गझल लिहल्या. उर्दू शायरीला आधुनिकेच्या निकषावर अधिक टोकदार केलं. फैज यांच्यावर  कम्युनिस्ट असून इस्लामपासून फटकून राहतात, असे आरोप अनेकदा झाले. परंतु त्यांच्या लिखाणामधे इस्लामचा उल्लेख वेळोवेळी दिसतो.

१९११ मधे एका परंपरावादी बॅरिस्टरच्या घरात जन्मलेल्या फैज अहमद फैज यांना आपल्या बंडखोर लिखाणासाठी तुरुंगात जावं लागलं. जेलमधे लिहलेल्या कविता 'ज़िन्दान-नामा' नावानं प्रसिद्ध झाला. हा काव्यसंग्रह खूप लोकप्रिय झाला. इंग्रजी आणि अरबीत एमए झालेल्या फैज यांनी अमृतसरच्या एका कॉलेजात प्राध्यापकी केली. तिथंच प्रगतीशील लेखक संघाचं काम सुरू केलं. इथल्या कामानं त्यांच्यावर कम्युनिस्ट असल्याचा शिक्का लागला. १९३९ मधे ‘नक्श-ए-फरयादी’ या त्यांच्या पहिल्याच काव्यसंग्रहानं साहित्यविश्वाचं लक्ष वेधून घेतलं. ब्रिटीश भारतीय सैन्यात कर्नल असलेल्या फैज अहमद फैज यांनी फाळणीनंतर नोकरी सोडून पाकिस्तानात लाहोरला जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानतलं सरकार पाडण्याच्या कटात सामील असल्याचा ठपका ठेवत त्यांना जेलमधे टाकण्यात आलं होतं. १९८४ मधे नोबेल पुरस्कारासाठी त्यांचं नामांकन झालं होतं.

राजकारणातून पत्रकारितेत मीनू मसानी (१९०५)

स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, संसदपटू, घटनापंडित, अर्थतज्ज्ञ मीनू मसानी यांचा आज ११३ वा जन्मदिवस. मुंबईत जन्मलेले मसानी ग्रॅज्युएशन झाल्यावर लंडनला गेले. तिथे त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्रात पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. १९२९ ला भारतात येऊन वकिली सुरू केली. स्वातंत्र्य आंदोलन शिगेला पोचल्यावर त्यांनी वकिली सोडून त्यामधे सहभाग घेतला. जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन, युसूफ मेहेर अली यांच्यासोबत त्यांनी काँग्रेस सोशलिस्ट पार्टीची स्थापना केली. कम्युनिस्टांचा प्रभाव वाढल्यानं तिघांनीही पार्टीपासून फारकत घेतली. याच काळात १९४३ मधे ते मुंबईचे सगळ्यात कमी वयाचे महापौर झाले.

दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या लोकसभेत मसानी यांनी गुजरातमधल्या राजकोटचं प्रतिनिधीत्व केलं. वयाच्या सत्तरीत राजकारणातून संन्यास घेऊन त्यांनी पत्रकारिता सुरू केली. आता अनेक ज्येष्ठ पत्रकार आपल्या कामगिरीच्या सेटींगवर राजकारणात जम बसवू पाहतायत. अशावेळी राजकारणात सगळ नीट सुरू असताना मसानींचं पत्रकारितेत येणं उठून दिसतं. मसानी पत्रकारितेत आले त्याचवेळी देशात आणीबाणी लागू झाली होती. याला त्यांनी जोरदार विरोध केला. मीडियाच्या स्वातंत्र्याचा मुद्दा लावून धरला होता. उदारवादी आर्थिक धोरणाचे पाठीराखे असलेल्या मसानी यांनी काही काळ टाटा कंपनीमधेही कामं केलं. २७ सप्टेंबर १९९८ मधे त्यांचं निधन झालं.

फ्लाईंग शीख मिल्खा सिंह (जन्म १९३५)

जगप्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंह यांचा आज जन्मदिवस. १९५८ च्या एशियाड स्पर्धेत २०० मीटर आणि ४०० मीटर धावण्यात त्यांनी भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलं. त्याचवर्षी कॉमनवेल्थ खेळातही त्यांनी गोल्ड मेडल जिंकलं. त्यानंतर १९६२ च्या एशियाडमधेही गोल्ड मेडल मिळवलं. या सगळ्या कामगिरीसाठी त्यांना अर्जून पुरस्कार आणि ‘पद्मश्री’नंही सन्मानित करण्यात आलं.

फाळणीत आईवडील गमावणाऱ्या आणि नंतर ट्रेन पकडून भारतात आलेल्या मिल्खा सिंह यांच्या फिल्मी जीवनावर २०१३ मधे ‘भाग मिल्खा भाग’ नावाचा बायोपिक आला. मिल्खा सिंह यांच्या या स्टोरीला जगभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. यानंतर संघर्षाच्या अशा स्टोऱ्या शोधून भारतीय सिनेमात बायोपिकचं अक्षरशः लोण आलं. सध्या मिल्खा सिंह हे देशातल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम करतायत. यासाठी सरकारनंही त्यांना मदतीचा हात दिलाय.

गांधीगिरी सांगणारा राजकुमार हिराणी (१९६२)

जगाला गांधीजींची नव्यानं ओळख करून देणारे दिग्दर्शक, निर्माते, अॅक्टर आणि लेखक राजकुमार हिराणी यांचा आज वाढदिवस. पंधरा वर्षांपूर्वी २००३ मधे 'मुन्ना भाई एमबीबीएस' या पहिल्याच सिनेमानं त्यांना छप्परफाड यश दिलं. या यशासोबतच जगाला गांधीजींचा रिलेवंट अर्थ सांगणारा पिक्चरवाला म्हणून त्यांना ओळख मिळाली. गांधीवादापुरते मर्यादित असलेले गांधीजी या सिनेमानं गांधीगिरी करू लागले.

लगे रहो मुन्ना भाई (२००६), थ्री इडीयट्स (२००९), पीके (२०१४), संजू (२०१८) यासारखे सुपरहिट सिनेमे हिराणी यांनी बनवले. यासाठी त्यांना बेस्ट डायरेक्टर, बेस्ट एडिटिंग, बेस्ट स्टोरी यासारखे पुरस्कार मिळाले. फाळणीत नागपुरात आलेल्या एका सिंधी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शाळेत जेमतेम मार्क मिळवणाऱ्या हिराणींना लहानपणापासूनच अॅक्टर बनायचं वेड होतं. वडलांना धंद्यात मदत करत असतानाच त्याचा एफटीआयआयला नंबर लागला. तिथूनच त्यांचं बॉलीवूडमधे पाऊल पडलं. १९९३ मधे त्यांना पहिल्यांदा ‘१९४२: अ लव स्टोरी’ या सिनेमाच्या प्रोमो आणि ट्रेलरमधे काम मिळालं.

बोल्ड शिल्पा शिरोडकर (जन्म १९६९)

वयाच्या पन्नाशीत पाऊल ठेवलेल्या लाखो दिलोंकी धडक शिल्पा शिरोडकरचा आज बड्डे. ९० च्या दशकात वयाच्या विसाव्या वर्षीच तिनं बॉलीवूडमधे एंट्री केली. १९८९ मधे 'भ्रष्टाचार' सिनेमात तिला पहिल्यांदा एका आंधळ्या मुलीचा रोल मिळाला. यानंतर दुसऱ्याच वर्षी अनिल कपूरसोबतच्या 'किशन कन्हैया' (१९९०) सिनेमानं तिला नाव मिळवून दिलं. बोल्ड सीनसाठी ती ओळखली जायची.

त्रिनेत्र, हम, दिल ही तो है, आँखें, पहचान, गोपी किशन, मृत्युदंड यासारख्या हिट सिनेमात शिल्पानं काम केलं. २००० मधे लग्न झालेल्या शिल्पाचा त्याच वर्षी आलेला ‘गजगामिनी’ हा शेवटचा सिनेमा ठरला. १० वर्षांच्या ब्रेकनंतर आता शिल्पानं टीवी सीरियलमधे काम सुरू केलंय. १९३८ मधे ‘ब्रम्हचारी’ या मराठी सिनेमात बिकीनीवर आलेल्या मीनाक्षी शिरोडकर यांची ती नात आहे. तिच्या आई गंगूबाई याही सिनेमात होत्या.