२० डिसेंबरः आजचा इतिहास

२० डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २० डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

काँग्रेसचे खजिनदार मोतीलाल वोरा (जन्म १९२८)

कधीकाळी एसटीत कंडक्टर असलेले मोतीलाल वोरा आज गांधी घराण्याच्या विशेषतः सोनिया गांधींचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. राजस्थानी ब्राम्हण कुटुंबात जन्मलेले वोरा सुरवातीच्या काळात मध्य प्रदेश परिवहन विभागात कंडक्टर होते. प्रवाशाचे शिल्लक राहिलेले काही पैसे जपून ठेवत आठवणीने त्याला देण्याचा वोरा यांचा किस्सा आजही दिल्लीचे पत्रकार सांगतात. म्हणूनच हिशोबी वोरांना काँग्रेसने अनेक वर्ष पक्षाच्या खजिनदारापदी ठेवलं असावं.

१९६८ मधे राजकारणात आलेले वोरा १९७२ मधे पहिल्यांदा आमदार झाले. मंत्री, प्रदेशाध्यक्षही काम केलं. अर्जून सिंह यांच्या राजीनाम्यानंतर १९८५ मधे ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. लोकसभा खासदार, राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. आता नव्वदीत पोचलेल्या वोरांची कुठलीच राजकीय महत्त्वकांक्षा नाही. पण गांधी घराण्याच्या किचन कॅबिनेटमधे त्यांचं असणं ही अनेकांच्या डोळ्यात खुपणारी गोष्ट आहे.  

बलुतंकार दया पवार (निधन १९९६)

मराठीच नाही तर भारतीय साहित्यात मैलाचा दगड ठरलेल्या ‘बलुतं’ या दया पवार यांच्या आत्मकथनाची यंदा चाळीशी साजरी होतेय. रेल्वेत कामाला असलेल्या दया पवार यांच्या या आत्मकथनाने अनेकांना आपल्याही जगण्याची चित्तरकथा मांडण्याची प्रेरणा दिली. यानंतरच्या काळातच मराठीमधे दलित आत्मकथनाचा ट्रेंड निर्माण झाला. 

१९७४ मधे त्यांचा ‘कोंडवाडा’ हा पहिला कवितासंग्र आला. त्यानंतर १९७९ मधे ‘बलुतं’ हे आत्मकथन आलं. हिंदी, इंग्रजीसोबत अनेक देशी परदेशी भाषांत अनुवाद झालेल्या बलुतंला वेगवेगळे पुरस्कार मिळाले. चावडी, जागल्या, पासंग यासारख्या कथासंग्रहासोबतच त्यांनी वैचारिक लेखन केलं. ‘बाई मी धरण, धरण बांधिते... माझं मरण, मरण कांडीते’ हे त्यांचं लोकगीत चळवळीचं गीत झालं.

साहित्यिक सुभाष भेंडे (निधन २०१०)

अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवलेल्या सुभाष भेंडेंची कारकीर्द गाजली ती साहित्यीक म्हणून. १९३६ मधे गोव्यात जन्मलेल्या भेंडेंचं शिक्षण महाराष्ट्रात झालं. मुंबईच्या कीर्ती कॉलेजमधे ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. २००३ मधे कराड इथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच वळवयी इथल्या २१ व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं.

प्रा. सुभाष भेंडे यांनी आपल्या अमेरिकावारीनंतर लिहलेला ’गड्या आपुला गाव बरा’ हा लेख खूप गाजला. आमचं गोय आमका जाय, अंधारवाटा, उद्ध्वस्त, एक डोळे, सात गळे, जिथे जातो तेथे, साहित्य संस्कृती, दिलखुलास, निवडक गंभीर आणि गंमतीदार यासारख्या साहित्यकृती त्यांच्या नावावर आहेत. 

मोस्ट ब्युटिफुल नलिनी जयवंत (निधन २०१०)

सर्वात सुंदर हिरोईन कोण, असा एक सर्वे १९५०च्या दशकात फिल्मफेअर मॅगझिनने घेतला होता. मधुबालापासून मीनकुमारीपर्यंत अनेक हिरोईन तेव्हा रसिकांच्या दिल की धडकन होत्या. पण लोकांच्या या सर्वेत वेगळंच नाव समोर आलं, नलिनी जयवंत. अत्यंत लोभस, अवखळ असं त्यांचं व्यक्तिमत्व कुणीही प्रेमात पडावं असंच होतं. 

त्यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९२६. त्या गिरगावकर. लहानपणापासून सुंदर नाचायच्या. शाळेच्या गॅदरिंगमधला त्यांचा डान्स बघायला गर्दी व्हायची. त्या डान्समुळे डायरेक्टर वीरेन्द्र देसाईंनी केवळ चौदाव्या वर्षी  नलिनीना राधिका या सिनेमात काम दिलं. याच देसाईंशी पुढे त्यांनी लग्नही केलं. १९४१ ते ६८ इतकी वर्षं आघाडीच्या हिरोंबरोबर सिनेमे केले. त्यातले अनेक गाजले. १९८३ मधे नास्तिक सिनेमात अमिताभ बच्चनच्या आईच्या भूमिकेत त्या मोठ्या पडद्यावर दिसल्या. २० डिसेंबर २०१०ला त्यांचं निधन झालं.

श्यामा चित्तार (निधन २००९)

जीवन चलने का नाम, तुझ्या कांतीसम रक्तपताका, दर्यावरी रं तरली होडी रं अशी शेकडो अजरामर गाणी गाणाऱ्या श्यामा चित्तार यांची ओळख मात्र या गाण्यामुळे नाही. ती आहे ओम जय जगदीश हरे या भजन कम आरती कम गाण्यामुळे. 

वयाच्या आठव्या वर्षी सुधीर फडकेंकडे त्यांनी पहिलं गाणं रेकॉर्ड केलं. बालगायिका म्हणून गाजल्या. पुढे मराठी आणि हिंदीबरोबरच कोकणी, कन्नड, गुजराती, डोगरी, सिंधी, भोजपुरी भाषांमधेही गाणी गायली. मोहम्मद रफीपासून कुमार सानूपर्यंत त्या गात होत्या.  पार्श्वगायकांसोबत गाणी गायली.