प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.
आजही भारतात हॉलीवूडची क्रेझ आहे. पण १९४० मधेच भारतीय व्यक्तीने हॉलीवूड गाजवलंय. आणि हे गाजवणं निव्वळ गाजवण्यापुरतं नाही तर तिथपर्यंत अजूनही कुणा भारतीय अॅक्टरला जाता आलं नाही. आठ दशकांपूर्वी हॉलीवूडमधे भारताचा झेंडा रोवणाऱ्या साबू दस्तगिर यांचा आज स्मृतीदिवस. १९३७ मधे ‘द एलिफंट बॉय’ हा त्यांचा पहिलाच सिनेमा रॉबर्ट फ्लेहर्टी यांनी बनवला. १९४० मधेच साबू यांचा रोल असलेला ‘द थीफ ऑफ बगदाद’ हा दुसरा सिनेमा आला. सुरवातीला लंडनमधे रिलीज झालेला हा सिनेमा तर नंतर अमेरिकी लोकांच्या घराघरात जाऊन पोचला.
यानंतर आलेल्या ‘अरेबियन नाइट्स’ आणि ‘जंगल बुक’ यांनी ते यशाच्या शिखरावर पोचले. म्हैसूरच्या राजघराण्याने दिलेल्या भाकरीवर दिवस काढणाऱ्या साबूला चक्क अमेरिकेने आपलं नागरिकत्व दिलं. म्हैसूरमधे शुटींगसाठी आलेल्या फ्लेहर्टी यांचं सफाईदारपणे हत्ती सांभाळणाऱ्या दहा बारा वर्षांच्या साबूवर लक्ष गेलं. आणि तिथंच साबूचं आयुष्य बदललं. त्यांनी साबूला लंडनला नेलं. तिथेच साबूने अॅक्टिंगचे धडे गिरवले. हॉलीवूडमधे यशाची शिखरं गाठत असलेल्या साबूला बॉलीवूडमधे मैलाचा दगड ठरलेल्या ‘मदर इंडिया’ सिनेमात नर्गिसच्या मुलाचा रोल करण्यासाठी साबू यांना कॉन्टॅक्ट करण्यात आलं होतं. पण ते शक्य झालं नाही. हॉलीवूडमधे मानसन्मान मिळत असतानाच साबू अमेरिकी हवाई दलात भरती झाले. तिथंही त्यांनी मोठं यश कमावलं. पण तिथून निवृत्त झाल्यावर त्यांनी हॉलीवूडमधे काम मिळत नव्हतं. म्हणून पुन्हा लंडनला जाऊन सर्कशीचे खेळ करणाऱ्या साबूच्या आयुष्याला पुन्हा एक कलाटणी मिळाली. ‘अ टाइगर वॉक्स’ या वॉल्ट डिस्नेच्या सिनेमातून त्यांनी पुनरागमन केलं. २७ जानेवारी १९२४ ला म्हैसूरमधे एका माहूताच्या घरात जन्मलेल्या साबूंचं वयाच्या ३९ व्या वर्षीच २ डिसेंबर १९६३ मधे निधन झालं. त्यांची ही एक्झिट अनेकांच्या काळजाला चटका लावून जाणारी होती. अगोदरच शूटिंग झालेला १९६४ मधे आलेला ‘द टायगर वॉक्स’ हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला.
रूढ संकेतांना धक्के देणारे लघुनिबंधकार, कवी, पत्रकार प्रा. अनंत काणेकर यांचा आज जन्मदिवस. पद्मश्री मिळवणारे मराठीतले पहिले लेखक हा बहूमान नावावर असलेल्या काणेकरांनी एलएलबीनंतर काही दिवस वकिली केली. त्याच काळात १९३३ मधे त्यांचा पहिला आणि एकमेव ‘चांदरात’ हा कवितासंग्रह आला. १९३५ मधे आलेल्या ‘पिकली पाने’ या लघुनिबंधसंग्रहाने ते मराठीतले प्रसिद्ध लेखक झाले. त्यानंतर त्यांनी वकिली सोडून चित्रा आणि आशा या साप्ताहिकात नोकरी केली. इथं पाचेक वर्ष राहिल्यानंतर ते खालसा आणि सिद्धार्थ कॉलेजमधे प्राध्यापक झाले.
‘धुक्यातून लाल ताऱ्याकडे’, ‘निळे डोंगर तांबडी माती’, ‘आमची माती, आमचे आकाश’ आणि ‘खडक कोरतात आकाश’ ही प्रवासवर्णनं त्यांनी लिहिली. प्रवास वर्णनांना मराठीत काणेकरांनीच वाङ्मयीन दर्जा मिळवून दिला. १९३९ मधे आलेल्या माणूस सिनेमाचे डायलॉग त्यांनी लिहले. हाच सिनेमा आदमी नावानं हिंदीतही आला. १९५७ मध्ये औरंगाबादला भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. काणेकरांना १९६५ मधे पद्मश्री सन्मान मिळाला. त्यांच्यानंतर १९६६ मधे पु. ल. देशपांडे यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं. मुंबईतल्या वांद्रे स्टेशनला वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला जोडणाऱ्या रस्त्याला अनंत काणेकर मार्ग असं नाव देण्यात आलंय. सोव्हिएट लँड नेहरू पारितोषिकाने सन्मानित काणेकरांचं २२ जानेवारी १९८० ला निधन झालं.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा पहिल्यांचा निर्णय घेणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचा आज स्मृतीदिवस. अब्दुल रहेमान अब्दुल गफूर अंतुले हे त्यांचं पूर्ण नाव. कुठलाही राजकीय वारसा नसताना बॅरिस्टर अंतुले आपल्या कर्तृत्वाने, समोर येणाऱ्यांशी दोन हात करण्याच्या स्वभावाने राजकारणाच्या पायऱ्या चढत वर गेले. काँग्रेसच्या तिकीटावर दशकभरापासून विधानसभेत असलेले अंतुले ९ जून १९८२ ला महाराष्ट्राचे आठवे मुख्यमंत्री झाले. घेतलेल्या निर्णयावर ठाम राहणाऱ्या अंतुलेंचं आजही त्या काळातले अधिकारी नाव घेतात.
कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांनी कर्जमाफीचा निर्णय घेतला. यामुळे देशभरात चर्चा झाली. नानी पालखीवाला यांच्यासारख्या अर्थतज्ञांनीही चिंता व्यक्त केली. रिझर्व बँकेच्या तंबीनंतरही आपल्या निर्णयावर ठाम राहत अंतुले यांनी कर्जमाफीचा निर्णय जशास तसा लागू केला. आज अनेकांच्या आयुष्यातला आधार असलेली संजय गांधी निराधार योजना त्यांच्या काळातच सुरू झाली. त्यामुळे निराधार ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीवेतनाची सोय झाली. सिमेंटसाठी बिल्डरांना सरकारवर अवलंबून राहावं लागायचं. अंतुलेंनी बिल्डरांना धडाधड परवाने दिले. याबदल्यात सिमेंट उद्योजकांनी अंतुले ट्रस्टी असलेल्या इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठानला देणगी दिल्याचा आरोप झाला. यात अंतुलेंना १२ जानेवारी १९८२ मधे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. आरोपांतून मुक्तता झाल्यानंतर डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रीमंडळात बॅरिस्टर अंतुले अल्पसंख्याक मंत्री होते. २ डिसेंबर २०१४ रोजी त्यांचं निधन झालं.
विद्या बालनचा डर्टी पिक्चर सिनेमा आला तेव्हा सिल्क स्मिताची चर्चा पुन्हा झाली. पण तिला पडद्यावर पाहिलेला पुरुष तिला विसरलेला नव्हताच. ती तशी सुंदर नव्हती. पण आपल्या मादक शरीराचा, चेहऱ्याचा आणि नजरेचा तिने पुरेपूर उपयोग करून घेतला. आंध्र प्रदेशातल्या एलुरू शहरात तिचा जन्म झाला. मूळ नाव विजयालक्ष्मी. अत्यंत गरिबीमुळे शिक्षण चौथीत सोडावं लागलं. सिनेमात काम करण्यासाठी तिने एका हिरोईनकडे मोलकरणीचं आणि नंतर मेकअपवालीचं काम केलं. तिथे एका निर्मात्याचं तिच्याकडे लक्ष गेलं. वंडी चक्रम या दुसऱ्याच सिनेमात तिच्या ठुमक्यांनी सगळ्या साऊथला घायाळ केलं. त्याच भूमिकेने तिला यशाचा मार्ग आणि सिल्क हे नावही दिलं. त्यानंतर १७ वर्षांच्या करियरमधे तिने तब्बल ४५० सिनेमात सेक्सी भूमिका केल्या. तिचं एखादं आयटम साँग टाकलं की सिनेमा हिट व्हायचा. विशेषतः लयनम जो हिंदीत रेश्मा की जवानी बनून आला, तो एक कल्ट हिट ठरला. यशाच्या शिखरावर असताना २३ सप्टेंबर १९९६च्या रात्री तिने पंख्याला लटकून आत्महत्या केली. ती नंतर अनेक आख्यायिका, लेख, पुस्तकांचा विषय बनली. डर्टी पिक्चरमुळे तिचं आयुष्याची एक झलक लोकांसमोर आली.
ग्रँट रोडला त्याच्या वडिलांची बेकरीवजा फरसाण दुकान होतं. तो तीन महिन्याचा असताना वडील वारले. तारे जमीं पर मधल्या मुलाला असतो तसा प्रॉब्लेम. अशावेळेस जवळच्या थिएटरमधे सिनेमे बघत बसायचा. मोठा झाला तसा ताज हॉटेलात वेटर बनला. फोटोग्राफर बनला. सात वर्षं कष्ट करून कुटुंबाला उटीला घेऊन गेला. तर हॉटेलमधून हाकलवून लावलं. तेव्हापासून बोमन इराणीने आयुष्याचे फासे उलटवायचं ठरवलं.
स्पोर्ट्स फोटोग्राफर म्हणून नाव कमावलं. पारशी रंगभूमीवरच्या नाटकांत काम करत होताच. त्याला आधी जाहिरातीत संधी मिळाली. मग सिनेमात. मुन्नाभाई एमबीबीएसने चमत्कार केला. त्यानंतर मैं हूं ना, लगे रहो मुन्नाभाई, दोस्ताना, खोसला का घोसला, हाऊसफुल, लक्ष्य, थ्री इडियट्स, जॉली एलएलबी, पीके, संजू असा त्याच्या अभिनयाचा प्रवास सुरूच आहे. अल्पावधीत त्याने जबरदस्त अभिनेता म्हणून नाव कमावलंय. शिवाय शिरीन फरहाद की तो निकल पडी, वेलडन अब्बा मधे लीड रोलही मिळाले. तसंच तो वेटिलेटर या मराठी सिनेमातही होता. त्याच्यातला अभिनयचा वायरस असाच फुलू दे, या बड्डे शुभेच्छा.