१९ नोव्हेंबरः इतिहासात आज

१९ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १९ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

आयर्न लेडी इंदिरा गांधी (जन्म १९१७)

देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा आज १०१ वा जन्मदिवस. लालबहाद्दूर शास्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर २४ जानेवारी १९६६ ला त्यांनी देशाच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून सुत्रं हाती घेतली. आधी गुंगी गुडिया म्हणून त्यांच्यावर टीका झाली. नंतर टीका करणारेच त्यांना धाडसी निर्णयांमुळे आयर्न लेडी म्हणू लागले. १९७१ च्या बांगलादेश मुक्तीच्या युद्धात इंदिरा गांधींच्या नेतृत्वातच भारतानं पाकिस्तानला माती चारली. संस्थानिकांचे तनखे रद्द करणे, बँकांचं राष्ट्रीयीकरण अशा निर्णयांमुळे त्या लोकप्रिय झाल्या.  १९७५ मधे देशात आणीबाणी लागू करण्याचा त्यांचा निर्णय वादग्रस्त ठरला. परंतु, त्यांनी याचंही ठामपणे समर्थन केलं. १९८४ मधे अमृतसरच्या सूवर्णमंदिरात खलिस्तानवाद्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांनी भारतीय सैनिकांना ऑपरेशन ब्लू स्टार राबवण्यास मंजूरी दिली. भारताच्या अंतर्गत सुरक्षिततेसाठी महत्त्वाची असेलली ही मोहीम सैनिकांनी फत्ते केली. पण याच कारणासाठी शीख बॉडीगार्डनी इंदिरा गांधींची गोळ्या घालून हत्या केली.

व्रतस्थ एकनाथजी रानडे (जन्म १९१४)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सरसंघचालकांइतरकाच ज्यांना मान आहे, असं व्यक्तिमत्त्व म्हणजे एकनाथजी रानडे. मुळात त्यांच्यात सरसंघचालक बनण्याची क्षमता होतीच. त्यामुळे त्यांना विवेकानंद केंद्रसारखं समांतर संघटन उभं करण्याची जबाबदारी देण्यात आली. ते म्हटल्यास संघाचा भाग आहे आणि टेक्निकली नाहीही. अमरावतीच्या टिलटिला गावात जन्मलेल्या एकनाथजींनी सुरवातीला जबलपूर इथं संघाचं काम सुरू केलं. दीर्घकाळ ते संघाच्या विविध पदांवर कार्यरतही होते. ३० जानेवारी १९४८ला महात्मा गांधींच्या हत्येनंतर आरएसएसवर केंद्र सरकारनं बंदी घातली. सगळ्या मोठ्या नेत्यांना अटक झाली. एकनाथजींनी भूमिगत राहून संघाचं काम चालवलं. संघावरची बंदी उठावी म्हणून सरकारकडे अर्ज विनंत्या केल्या. त्यावर सरकारने, संघाच्या कामकाजाची घटना लेखी स्वरूपात द्यायला सांगितली. या घटनेचा मसुदा बनवण्यातही एकनाथजींचं योगदान होतं. कोणत्याही कामाची काटेकोर आखणी आणि त्याची तशीच अंमलबजावणी करून घेणं, हे त्यांचं वैशिष्ट्य. कन्याकुमारी इथं विवेकानंद शिला स्मारक उभारणं हे त्यांनी आपलं जीवितकार्य मानलं. ते त्यांनी उभंही केलं. हिंदू तेजा जाग रे, हे त्यांचं पुस्तक हिंदुत्ववाद्यांत प्रचंड लोकप्रिय ठरलं. विवेकानंदांना कट्टर हिंदुत्ववादाच्या कळपात ओढून घेण्याचं मिशन त्यांनी प्रचंड मेहनतीने यशस्वी बनवलं. अशा या व्रतस्थ कार्यकर्त्याचं २२ ऑगस्ट १९८२ ला निधन झालं.

मिस आशिया झीनत अमान (जन्म १९५१)

७० आणि ८० च्या दशकातली प्रसिद्ध हिरोईन झीनत अमान यांचा आज बड्डे. १९७० मधे फेमिना मिस इंडिया एशिया पॅसिफिक आणि मिस एशिया पॅसिफिक अवॉर्ड त्यांना मिळाले होते. यासोबतच मिस एशिया जिंकणारी दक्षिण आशियातली पहिला महिला होण्याचा मानही मिळाला. मिस एशिया किताब जिंकल्यावरच बॉलीवूडमधे त्यांच्या करिअरला सुरवात झाली. १९७१ मधे 'हलचल' सिनेमानं त्यांनी बॉलीवूडमधे पाऊल ठेवलं. दुसऱ्याच वर्षी १९७२ मधे त्यांना 'हरे रामा हरे कृष्णा' सिनेमासाठी बेस्ट अॅक्ट्रेस अवॉर्ड मिळाला होता. त्यांनी जवळपास ७५ सिनेमांमधे काम केलं. नेहमीच्या भारतीय ठेवणीच्या सौंदर्यापेक्षा वेगळा लूक आणि मोकळं अंगप्रदर्शन यासाठी त्या गाजल्या. लग्नानंतर त्यांचं काम जवळपास थांबलं. त्यांना घरगुती हिंसेलाही सामोरं जावं लागलं. २००६ मधे झीनत अमान यांना फिल्मफेअर जीवनगौरव मिळाला होता.

मिस इंडिया सुष्मिता सेन (जन्म १९७५)

मिस इंडिया पुरस्कार मिळाल्यानंतर सिनेमात एंट्री मिळालेल्या आणखी एका हिरोईनचा आज बड्डे आहे. बॉलीवूडमधली प्रसिद्ध अॅक्टर सुष्मिता सेनचा आज बड्डे. १९९४ मधे ऐश्वर्या रायला हरवून तिनं मिस इंडियाचा किताब जिंकला होता. त्याच वर्षी तिनं मिस युनिवर्स हा किताबही जिंकून जगात भारतीय सौंदर्याचा डंका वाजवला. १९९६ मधे तिचा 'दस्तक' हा पहिला सिनेमा आला. हिन्दुस्तान की कसम, बीबी नंबर वन, नायक, क्योंकि मैं झूठ नहीं बोलता, तुमको ना भूल पाएंगे, मैं हूं ना, बेवफा, मैंने प्यार क्यूं किया, मैं ऐसा ही हूं, चिंगारी आदी सिनेमात सुष्मितानं काम केलंय. ‘बीबी नंबर १’ और ‘फिलहाल’ या सिनेमातल्या अॅक्टींगसाठी तिला बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस पुरस्कार मिळाला. मैं हूं ना सारखे मेन स्ट्रीममधल्या मोठ्या बॅनरचे सिनेमे तिला कमीच मिळाले. त्यामुळे ती चर्चेत राहिली तरी ऐश्वर्या रायसारखी टॉपला पोचू शकली नाही.

जागतिक शौचालय दिन (सुरवात २००१)

जवळपास सगळ्या रोगांचं मूळ हे पोट साफ न होण्यात आहे. आयुर्वेदात तर पोट साफ झाल्याशिवाय कोणतंही औषध घेऊ नका असं सांगतात. आता हे पोट साफ कसं करायचं. कुठं करायचं यासंदर्भात आजचा दिवस मोलाचा आहे. उघड्यावर संडासला बसू नका, हे सांगण्यासाठी आज जागतिक शौचालय दिवस साजरा केला जातोय. शौचालय बांधणीला प्रोत्साहन देण्यासाठी १८ वर्षांपूर्वी वर्ल्ड टॉयलेट डेची सुरवात झाली. १२ वर्षांनी २०१३ मधे जगभरात स्वच्छतेसंबंधी जनजागृती करण्याच्या हेतूनं संयुक्त राष्ट्राने हा दिवस आपल्या वार्षिक दिनविशेष कॅलेंडरमधे घातला. हे अभियान सुरू झालं, तेव्हा भारतात तर घरात संडास करायचा असतो का, असं म्हणून या मोहिमेला खीळ घालण्याचा प्रयत्न झाला. मात्र सरकारनं मोठा पैसा खर्च करून शौचालय बांधणीचं काम स्वतःच हाती घेतलं. लोकांनाही सोय लक्षात आली आणि आता या मोहिमेनं एका चळवळीचं रूप घेतलंय.