१९ डिसेंबरः आजचा इतिहास

१९ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १९ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील (जन्म १९३४)

स्वतंत्र भारताच्या ७० वर्षांच्या इतिहासातल्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून जग प्रतिभा पाटील यांना ओळखतं. पण त्याआधीचा त्यांचा राजकीय प्रवास खूप रोचक आहे. जळगाव कोर्टात वकिली सुरू असतानाच वयाच्या २७ व्या वर्षी त्या राजकारणात आल्या. १९६२ मधे काँग्रेसच्या तिकिटावर आमदारकीची निवडणूक लढवली आणि त्या विजयीही झाल्या. पक्ष संघटनेत वेगवेगळ्या पदावर काम करणाऱ्या प्रतिभाताईंनी अनेक मुख्यमंत्र्यांसोबत काम केलं. एवढंच नाही तर १९८८ मधे त्या प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या.

इंदिरा गांधीच्या किचनमधली बाई म्हणूनही प्रतिभा पाटील यांना हिणवण्यात आलं. राजस्थानमधल्या काँग्रेसच्या एका मंत्र्याला तर यामुळे राजीनामाही द्यावा लागला होता. १९९१ मधे अमरावतीच्या खासदार झाल्या. त्यानंतर प्रतिभा पाटील हे नाव कुठंच चर्चेत नव्हतं. पण २००४ मधे त्यांची अचानक राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. २००७ मधेही ऐनवेळी त्यांच्या नावाची घोषणा झाली आणि त्या मोठ्या मताधिक्याने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जिंकल्या. राष्ट्रपती असताना त्यांनी ३० जणांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलवली होती.

भावगीत गायक जे. एल. रानडे (निधन १९९८)

मराठीत भावगीत नावारुपाला आणणाऱ्या गायकांपैकी एक नाव म्हणजे जे. एल. अर्थात जनार्दन लक्ष्मण रानडे. आज त्यांचा तिसावा स्मृतीदिवस आहे. १९०५ मधे इचलकरंजीत जन्मलेल्या रानडेंना पौराणिक कथांमधे गाणाऱ्या आपल्या आईकडून गायनाचा वारसा मिळाला. सुरवातीपासूनच गायनाचा नाद असलेल्या रानडेंनी पोटापाण्यासाठी काहीकाळ कोर्टात कारकुनाची नोकरी केली. याच दरम्यान मान्यवर गायकांची शिफारसपत्रं मिळवून ते ग्रामोफोन कंपनीकडे गेले. १९३३ मधे आकाशवाणीवर गाण्याची संधी मिळालेल्या रानडेंची १९३४ मधे ग्रामोफोनकडून पहिली रेकॉर्डिंग आली. यानंतर ते फेमस होत गेले. ‘अति गोड गोड ललकारी’ या भावगीताने तर ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोचले.

रसिकांचे आवडते गायक म्हणून त्या काळात रानडेंचा उल्लेख व्हायचा. तोपर्यंत जे. एल. रानडे यांनी भावगीतांमधून चांगलंच नाव कमावलं. ‘नवल ही बासरी हासरी’, ‘तू अन् मी करूनी निगराणी’, ‘तू लिहावी प्रेमगीते’, ‘हासत नाचत ये’, ‘बाई आम्ही लपंडाव मांडला..’ अशी त्यांची अनेक भावगीतं लोकप्रिय झाली. या गीतांना रानडे ‘भावपदे’ म्हणायचे. आजही गायनाच्या क्लासमधे रानडे यांची भावपदं ऐकायला सांगितलं जातं.

कॉमेडीचा बादशहा ओम प्रकाश (जन्म १९१९)

हिंदी सिनेमात आपल्या अॅक्टिंगने प्रेक्षकांना पोट धरून हसवणाऱ्या ओम प्रकाश यांचा आज जन्मदिवस. यंदा त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरवात होतेय. ओम प्रकाश बक्षी हे त्यांचं पूर्ण नाव. प्रोड्यूसर दलसुख पांचोली यांच्या ‘दासी’ सिनेमातून ओम प्रकाश यांनी बॉलीवूडमधे एंट्री केली. या एंट्रीचीही खूप इंटरेस्टिंग कहाणी आहे. राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यासारख्या दिग्गजांसोबत त्यांनी काम केलं. सुरवातीच्या काळात ते रामलीलेत सीतेचा रोल करायचे. 

पांचोली हे एका लग्नासाठी लाहोर गेले होते. तिथं त्यांची नजर ओम प्रकाश यांच्यातल्या कॉमेडी टॅलेंटवर गेली. त्यावेळी ओमप्रकाश रेडिओवर काम करत होते. मायदेशी परत येताच त्यांनी ओम प्रकाश यांना पत्र पाठवून मुंबईला बोलवून घेतलं. तिथंच ‘दासी' सिनेमासाठी ८० रुपयांच्या करारावर ओम प्रकाश यांनी सही केली. त्यानंतर त्यांनी हावड़ा ब्रिज, दस लाख, प्यार किये जा, पड़ोसन, चुपके चुपके, नमक हलाल, गोलमाल, चमेली की शादी, शराबी आणि लावारिस यासारख्या गाजलेल्या सिनेमात काम केलं. २१ फेब्रुवारी १९९८ ला त्यांचं निधन झालं.

मॅच फिक्सर नयन मोंगिया (जन्म १९६९)

आता पन्नाशीत पोचलेल्या विकेटकीपर नयन मोंगियाची मॅच फिक्सिंगच्या कारणावरून भारतीय टीममधून हकालपट्टी करण्यात आली होती. डावखूरा बॅट्समन आणि विकेटकीपर असलेल्या मोंगियाने १९९४ मधे इंटरनॅशनल क्रिकेटमधे एंट्री केली. ४४ टेस्टमधे त्याने २४ च्या सरासरीने केवळ ११४२ रन काढले. १४० वनडे मॅचमधे १२७२ रन काढले. वनडे आणि टेस्ट क्रिकेटमधे अॅवरेज बॅटींग करणारा मोंगिया भारतीय टीममधला सगळ्यांत वादग्रस्त खेळाडू ठरला. 

१९९४ मधेच भारतात झालेल्या विल्स वर्ल्ड सीरीजमधला एक किस्सा आहे. विंडीजविरुद्धच्या मॅचमधे २५७ रनचं टार्गेट पूर्ण करताना भारताचे प्लेअर एकापाठोपाठ बाद झाले. शेवटी शतकी खेळी करणारा प्रभाकर आणि मोंगियाचं मैदानात राहिले. ५४ बॉलमधे ६३ रन काढायचे होते. भारत ही मॅच सहज जिंकेल असं वाटत होतं. मोंगिया ९ ओवरमधे १६ रन काढत नाबाद राहिला. भारताचा या मॅचमधे ४६ रनने पराभव झाला. त्यानंतर प्रभाकर आणि मोंगियाला अख्ख्या सीरीजमधून डच्चू देण्यात आला. सुरवातीपासूनच मोंगियावर भारताच्या हाराकीरीसाठी खेळत असल्याचे आरोप झाले. पण २००१ मधे तो मॅच फिक्सिंगच्या प्रकरणात सापडला. भारतीय संघातूनही त्याची हकालपट्टी करण्यात आला. गेल्या दोन तीन वर्षांपासून मोंगिया कॉमेंटरेटर म्हणून काम करताना दिसतोय.

हाँगकाँग चीनला देण्याचा करार (वर्ष १९८४)

हाँगकाँगवर दीडशे वर्षांहून अधिक काळ ब्रिटीश सत्ता राहिली. आजच्या दिवशी १९८४ मधे ब्रिटीशांची ही वसाहत चीनला देण्याच्या करारावर सह्या झाल्या. ब्रिटन आणि चीनने येत्या १३ वर्षांत म्हणजे १९९७ पर्यंत सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. जवळपास १५५ वर्ष हाँगकाँग हा ब्रिटीश साम्राज्याचा भाग होता. या कराराने दोन्ही देशांतल्या व्यापारी आणि राजनैतिक संबंधांचा नवा अध्याय सुरू झाला.

करारानुसार १ जुलै १९९७ ला हाँगकाँग पुन्हा पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाला दिला जाईल. आणि या हस्तांतरणाचा काळ असेल ५० वर्षांचा. यासाठी दोन्ही देशांमधे ‘वन कंट्री, टू सिस्टम’ तत्त्वावर सहमती झाली. पण करारानंतर पाचेक वर्षांनीच तिआनमेन चौक प्रकरण झालं. लोकशाही समर्थकांच्या आंदोलनावर चीनी सैन्याने रणगाडे फिरवले. यात अनेकांना जीव गमवावा लागला. यावर प्रतिक्रिया म्हणून ब्रिटनने हाँगकाँगच्या ५० हजार नागरिकांना आपला पासपोर्ट दिला. त्यामुळे दोन्ही देशांत पुन्हा तणावाचं वातावरण निर्माण झालं. पण शेवटी १ जुलै १९९७ ला एका दिमाखदार समारंभात हाँगकाँग चीनला देण्यात आला.