१९ ऑक्टोबरः आजचा इतिहास

१९ ऑक्टोबर २०१८

वाचन वेळ : ६ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १९ ऑक्टोबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. तत्वज्ञ मध्वाचार्य, पांडुरंगशास्त्री आठवले, सुब्रमण्यन चंद्रशेखर, शरदचंद्र श्रीखंडे आणि जगाला हादरवणाऱ्या ब्लॅक मंडे यांच्या विषयीच्या.

तेराव्या शतकात झालेले तत्वज्ञ मध्वाचार्य ते विसाव्या शतकात लाखोंना आधार देणारे स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले, ताऱ्यांच्या उत्पत्तिचं गूढ उलगडवून नोबेलवर ठसा उमटवणारे सुब्रमण्यन चंद्रशेखर आणि संख्याशास्त्रांच्या प्रमेयांची नवी उकल करून आधुनिक विज्ञानशाखांचा रस्ता सोपा करणारे शरदचंद्र श्रीखंडे या सगळ्यांचा जन्म आजच्या दिवसाशी जोडला गेलाय.

मध्वाचार्यांचा प्रभाव ७८० वर्षांनंतरही कायम (जन्म १२३८) 

उपनिषद, गीता आणि ब्रह्मसूत्र या तीन ग्रंथांच्या प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहून त्यात एकच तत्त्वज्ञान असल्याची मांडणी करणाऱ्याला भारतीय परंपरेत आचार्य असं म्हटलं जातं. असे पाच आचार्य होऊन गेले. त्यांच्यापैकी एक असणारे मध्वाचार्य मध्ययुगीन भारतावर प्रभाव टाकणारं एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व ठरलं. शंकराचार्य आणि रामानुजाचार्य या पूर्वसुरींपेक्षा वेगळा असा द्वैतवादाचा विचार त्यांनी मांडला.

तसा दसरा हीच मध्वाचार्यांची जयंती मानली जाते. पण यंदा पंचांगातल्या अॅडजस्टमेंटसाठी ती आज साजरी होतेय. ही मध्वाचार्यांची ७८०वी जयंती आहे. कर्नाटकातल्या उडुपीजवळच्या पाजक नावाच्या छोट्याशा गावात १२३८ साली त्यांचा जन्म झाला. लहानपणीच त्यांनी संन्यास घेतला. धर्मग्रंथांच्या अभ्यासात ते गढून गेले. शं‍कराचार्यांचा अद्वैतवादी विचार मानणारे गुरू असतानाही त्यांनी स्वतंत्र मांडणी केली. तत्वमसि या ब्रह्मवाक्याचा `अतत त्वम असि` असा अर्थ मांडला. याचा अर्थ ब्रह्म आणि आत्मा हे वेगवेगळे आहेत. तोवर झालेल्या अद्वैताच्या मांडणीच्या हे पूर्णपणे विरोधी होतं. 
आपल्या या वेगळ्या विचारांची नोंद त्यांनी तब्बल ३७ ग्रंथांतून केली. त्यातली १३ तर भाष्यच आहेत. प्रस्थानत्रयीवरच्या भाष्यांबरोबरच त्यांनी ऋग्वेदाच्या ४० ऋचांवर आणि महाभारतावर लिहिलेलं भाष्य प्रसिद्ध आहे. ते वैष्णव होते. त्यांनी बंगालपासून कन्याकुमारीपर्यंत हिंडून विष्णूभक्तीचा प्रसार केला.

उडुपी इथं प्रसिद्ध कृष्णमंदिर बांधलं. देशभर मठ उभारले. त्यामुळे ते देशातल्या भक्ती चळवळीतील एक प्रभावी भाष्यकार मानले जातात. विशेष म्हणजे त्यांचं तत्त्वज्ञान ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्माच्या प्रसारकांना आपल्या जवळचं वाटलं. १३१७ साली ७९व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

आजही मध्वाचार्यांचा संप्रदाय देशभर लाखोंच्या संख्येने आहे. कर्नाटकातला हरिदास किंवा दासकूट संप्रदाय, बंगालमधे चैतन्य महाप्रभूंचा संप्रदाय यांनी मध्वाचार्यांचा द्वैतवादाचाच विचार घेतला. तसंच आज प्रसिद्ध असणाऱ्या इस्कॉन तसंच वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशनवर द्वैतवादाचा प्रभाव आहे.

पांडुरंगशास्त्रींचा जन्मदिवस मनुष्य गौरव दिन (जन्म १९२०)

स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री वैजनाथशास्त्री आठवले यांचा जन्मदिवस त्यांचे अनुयायी दरवर्षी मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा करतात. गीतेतलं काळाला अनुरूप तत्त्वज्ञान सर्वसामान्य माणसाच्या जीवनात उतरवण्यासाठी त्यांनी सोपा कार्यक्रम दिला. त्यातून देशभरातल्या लाखो स्वाध्यायींच्या जीवनात आनंद फुलला. आयुष्यातली हताशा जाऊन त्याऐवजी स्वतःविषयी सन्मानाची भावना उभी राहिली. त्याची कृतज्ञता म्हणून त्यांनी पांडुरंगशास्त्री म्हणजे दादांचा जन्मदिवस मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा करायला सुरवात केली.

रायगड जिल्ह्यातल्या रोहा या गावात दादांचा जन्म झाला. वैदिक पाठशाळेत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी १४ वर्षं मुंबईच्या एशियाटिक लायब्ररीत ज्ञानसाधना केली. त्यांच्या या व्यासंगामुळे त्यांची गिरगावमधील माधवबाग इथं १९४२ पासून सुरू झालेली गीतेवरची प्रवचनं गाजू लागली. त्याला हजारोंची गर्दी होऊ लागली. पण इतर प्रवचनकारांसारखी बुवाबाजी त्यांनी केली नाही. स्वतःला गुरू मानू दिलं नाही. उलट ते सर्वसामान्य लोकांमधे गेले. त्यांना नीतीने जीवन जगण्याची प्रेरणा दिली.

त्यांच्या या कामामुळे लाखो लोकांची व्यसनं सुटली. जातीपातींची बंधनं तुटून बंधुभाव जागा झाला. हजारो एकर जागेवर झाडं लावलीच नाहीत तर जगवलीही. शोषखड्डा, पाझर तलाव, विहीर रिचार्ज, नदी रिचार्ज सारखे प्रयोग गावोगाव झाले. धर्म आणि तत्त्वज्ञानाचं शिक्षण देण्यासाठी तत्त्वज्ञान विद्यापीठासारख्या संस्था उभ्या राहिल्या.

धर्माची प्रत्येक गोष्ट डोक्याला घासून घ्या, असा आग्रह धरणाऱ्या पांडुरंगशास्त्रींनी सर्वधर्मस्वीकाराचंही तत्त्वज्ञान मांडलं. त्यानुसार मग चर्चेमधे विष्णुसहस्त्रनामाचं पारायण होऊ लागलं. बाबरी मशीद पडल्यावर त्यांनी देवाचं घर पडल्याचं दुःख व्यक्त केलं. स्वाध्याय परिवार जगभर पसरला. त्यांना धार्मिक क्षेत्रातला नोबेल मानला जाणारा टेम्पल्टन प्राईज, मॅगसेसे अवॉर्ड आणि पद्मविभूषण हे पुरस्कार मिळाले. श्याम बेनेगलांनी त्यांच्या कामावर अंतर्नाद हा सिनेमा काढला. २५ ऑक्टोबर २००३ ला त्यांचं निधन झालं.

नोबेलविजेते खगोलशास्त्रज्ञ सुब्रमण्यन चंद्रशेखर (जन्म १९१०)

न्यूटनला झाडावरून सफरचंद पडताना गुरुत्वाकर्षणाचा उलगडा झाला. तसंच अवघ्या चोविसाव्या वर्षी आकाशातून तुटता तारा पडताना बघून सुब्रमण्यन चंद्रशेखर यांना ताऱ्यांच्या उत्पत्तीचं गूढ उकलू लागलं. `चंद्रशेखर लिमिट` या नावाने त्याचं संशोधन ओळखलं जातं. फक्त २५ वर्षांचे असताना त्यांनी ११ जानेवारी १९३५ या दिवशी चंद्रशेखर यांनी लंडनच्या रॉयल एस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या सभेत हा सिद्धांत मांडला. याच क्षेत्रातले दिग्गज डॉ. आर्थर एडिंटन यांनी त्याला विरोध केला. त्यामुळे हा सिद्धांत काही वर्षं मागं पडला.

डॉ. चंद्रशेखर यांनी १९३९ला 'अॅन इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ स्टेलर स्ट्रक्चर' हे पुस्तक लिहून सिद्धांत सविस्तर मांडला. काळाच्या पुढं असणारे चंद्रशेखर बरोबर असल्याचं इतर शास्त्रज्ञांना कळायला आणखी काही दशकं जावी लागली. गणिताच्या आधारे चंद्रशेखर मांडत होते, ते सिद्ध होऊ लागलं. शेवटी १९८३ साली सर्वोच्च नोबेल प्राईजने त्यांच्या संशोधनावर मान्यतेची मोहर उमटवण्यात आली.

डॉ. चंद्रशेखर यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1910 ला लाहोरला झाला. नोबेलविजेते भौतिकशास्त्रज्ञ सी. वी. रमन हे त्यांचे काका. ते भारतापेक्षाही परदेशातच जास्त राहिले. १९५३ला त्यांनी अमेरिकेचं नागरिकत्व स्वीकारलं. तरीही त्यांना भारताच्या विकासाविषयी आस्था होती. त्यांचे भारतातल्या तरुण वैज्ञानिकांशी आणि वैज्ञानिक संस्थांशी जवळचे संबध होते.

१९८० साली ते शिकागो युनिवर्सिटीतून रिटायर्ड झाले. १९८७ला त्याचं प्रसिद्ध पुस्तक ‘ट्रुथ अँन्ड ब्यूटी’ ऑक्सफर्ड प्रेसने प्रकाशित केलं. २१ ऑगस्ट १९९५ला त्यांचं निधन झालं.

शतायुषी संख्याशास्त्रज्ञ डॉ. शरदचंद्र श्रीखंडे (जन्म १९१७)

स्टॅटस्टिक्स म्हणजे संख्याशास्त्रात मोलाची भर टाकणारे जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. शरदचंद्र श्रीखंडे हे आज १०१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील सागर या गावी झाला. तिथे आपलं शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढं नागपूर, जबलपूर, कोलकाता ते गणित शिकले आणि शिकवलंही. १९४६ला एका योजनेनुसार भारत सरकारने त्यांना पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवलं आणि त्यांच्या आय़ुष्याला कलाटणी मिळाली.

अमेरिकेत ते नॉर्थ कॅरोलिना युनिवर्सिटीत दाखल झाले. तिथल्या प्रसिद्ध संख्याशास्त्रज्ञांच्या सोबत त्यांनी महत्त्वाचं काम केलं. पीएचडी पूर्ण झाल्यानंतर १९५१ला त्यांनी कॅनासा युनिवर्सिटीत ‘Non existence of an affine resolvable incomplete block designs’ (ARBIBD) या विषयावरचा पहिला निष्कर्ष मांडला. पुढं त्यांनी आर. सी. बोस यांच्या सोबत स्विस गणितज्ञ लिओनार्द ऑयलर यांच्या १७६ वर्षं कोड्यात टाकणाऱ्या समस्येची उकल केली. त्याने त्यांचं नाव जगभर पोचलं.

१९६० मध्ये डॉ. श्रीखंडे भारतात परत आले. बनारस हिंदू विद्यापीठात पाच वर्षे संख्याशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठात नव्याने सुरू करण्यात आलेल्या गणित विभागाचे प्रमुख या नात्याने कार्यभार सांभाळला.

डॉ. श्रीखंडे यांनी गणिती जगतातील ‘चयन गणित’ (Combinatorics) या विषयात अत्यंत मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांच्या संशोधनाचा उपयोग बीजगणित, भूमिती, प्रोबॅबिलिटी, टोपॉलॉजी, ऑप्टिमायझेशन, संगणकशास्त्र, रसायनशास्त्र अशा अनेक विषयांत केला जातो.

जगाची अर्थव्यवस्था हादरवणारा ब्लॅक मंडे (१९८७)

सध्या भारताच्या अर्थव्यवस्थेवर पुन्हा एकदा मंदीचं सावट आहे. त्याला नोटबंदीसारख्या निर्णयांबरोबरच ढासळत्या जागतिक अर्थव्यवस्थेचीही किनार आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा दिवस होता १९ ऑक्टोबर १९८७.

न्यूयॉर्कच्या वॉल स्ट्रीटवर शेअरच्या किमतींमधे मोठ्या प्रमाणात घसरण झाली. त्याचा झटका फक्त अमेरिकन शेअर बाजाराला किंवा अर्थव्यवस्थेलाच नाही तर जगभर जाणवला. डाओ जॉन्सच्या इंडस्ट्रीयल सेन्सेक्समधे विक्रमी ५०८ अंकांची घसरण झाल्याची नोंद झाली. त्यामुळे सर्वच आघाडीचे शेअर घसरले. त्याचं नुकसान प्रचंड होतं. १९२९च्या महामंदीच्या कुप्रसिद्ध ब्लॅक मंडेपेक्षाही १९ ऑक्टोबरचा हा ब्लॅक मंडे जास्त भयंकर होता. त्यामुळे अमेरिकेतलं वातावरण इतकं हादरलं की अध्यक्षांना निवेदन देऊन गुंतवणूकदारांना शांत करावं लागलं होतं. त्यामुळे आजही जेव्हा मंदीचं सावट दिसू लागतं, तेव्हा ब्लॅक मंडेची आठवण अर्थतज्ञांना होत असते.