१८ नोव्हेंबर : आजचा इतिहास

१८ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १८ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

चित्रपती वी. शांताराम (जन्म १९०१)

विख्यात सिनेदिग्दर्शक वी. शांताराम यांचा आज ११७ वा जन्मदिवस. शांताराम राजाराम वणकुद्रे हे त्यांचं मूळ नाव. अॅक्टर, प्रोड्यूसरही असलेल्या शांतारामबापूंनी सिनेमा दिग्दर्शनाची एक स्वतंत्र पद्धत रूढ केली. तत्कालीन सामाजिक, राजकीय प्रश्नांचे प्रतिबिंब त्यांच्या सिनेमातून दिसायचे. गेल्या वर्षी त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलने डुडल करून आदरांजली वाहिली होती. १९८५ मधे दादासाहेब फाळके पुरस्कार आणि १९९२ मधे पद्मविभूषण पुरस्कारानंही त्यांना गौरवण्यात आलं होतं. १९२७ मधे त्यांनी सहकाऱ्यांसह प्रभात चित्रपट कंपनी सुरू केली. १९४२ मधे मुंबईत राजकमल कलामंदिर सुरू करण्यासाठी शांतारामबापूंनी स्वतःला प्रभातपासून वेगळं केलं. शांतारामाहे त्यांचं आत्मचरित्र खूप गाजलं. १९३० च्या दशकातले मूक सिनेमा ते ८०च्या दशकातल्या डिजिटल सिनेमा युगाचे ते साक्षीदार होते. कोल्हापुरात जन्मलेल्या शांतारामबापूंनी ३० ऑक्टोबर १९९० ला जगाला रामराम केला.

क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त (जन्म १९१०)

भारतीय स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीवर जोर देणाऱ्यांमधे थोर स्वातंत्र्यसैनिक बटुकेश्वर दत्त यांचाही समावेश होता. आजही बटुकेश्वर दत्त म्हटलं की त्यांनी भगतसिंगांसोबत संसदेवर हल्ला करणारा क्रांतिकारक डोळ्यासमोर येतो. आग्रा इथं राहून त्यांनी ब्रिटिशांविरोधात लोकांना स्वातंत्र्य आंदोलनात सामील होण्यासाठी प्रोत्साहन दिलं. कानपुरात पदवीचं शिक्षण घेत असताना त्यांची भगतसिंगांसोबत ओळख झाली. हिन्दुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचं काम सुरू केलं. इथंच ते बॉम्ब बनवायलाही शिकले. ८ एप्रिल १९२९ ला भगतसिंगांसोबत त्यांनी संसदेवर बॉम्बहल्ला केला. यात दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा झाली. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या जोडगळीतलं चौथ नाव म्हणजे बटुकेश्वर दत्त. ब्रिटीश सत्तेविरोधात लढ्यासाठी तिघांना फाशीची शिक्षा झाली, बटुकेश्वर दत्त यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. इथंही त्यांनी ब्रिटीश सत्तेविरोधात दोनदा ऐतिहासिक उपोषण केलं. नंतर त्यांची तुरुंगातून सुटका झाली. देशही स्वतंत्र झाला. पण या महान क्रांतिकारकाला पोटापाण्यासाठी वणवण भटकावं लागलं. सिगारेट कंपनीत एजंट म्हणून काम करावं लागलं.

मुख्यमंत्रिपदाचे दावेदार कमलनाथ (जन्म १९४६)

सलग नऊ वेळा लोकसभेवर जाणारे काँग्रेस नेते कमलनाथ यांचा आज बड्डे. सध्या मध्य प्रदेशात विधानसभेची निवडणूक सुरू असून कमलनाथ हे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार आहे. १५ वर्षांपासून सत्तावनवास भोगणाऱ्या काँग्रेसनं काही महिन्यांपूर्वीच कमलनाथ यांना प्रदेशाध्यक्ष केलंय. मोदी लाटेतही एमपीमधे काँग्रेसला दोनच जागा जिंकता आल्या. त्यापैकी एक छिंदवाड्याची जागा कमलनाथ यांनी जिंकली. राजकारणाचा मोठा अनुभव असलेल्या कमलनाथ यांच्या स्वच्छ इमेजचा फायदा घेण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे.

पूर्णवेळ राजकारणी महिंदा राजपक्षे (जन्म १९४५)

आपल्याकडं जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फूलटाईम राजकारणी म्हणतात, तसं आपल्या शेजारच्या श्रीलंकेत महिंदा राजपक्षे आहेत. आता श्रीलंकेत एखाद्या नाटकातही घडणार नाही एवढ्या नाट्यमय राजकीय घडामोडी सुरू आहेत. या सगळ्यांच्या केंद्रस्थानी आहेत, माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे. २०१५ मधे पराभव झाल्यानंतर कुठल्याही अडचणीशिवाय सत्तांतर व्हावं, असं सांगत राजपक्षे यांनी देशाची सुत्रं मैत्रीपाला सिरीसेना यांना दिली. राजपक्षे यांच्यासाठी हा पराभव अनपेक्षित होता. आता सिरीसेना यांनीचं कट्टर वैरी असलेल्या राजपक्षेंना देशाचा पंतप्रधान केलंय. याआधी कुठलंही पद नसताना राजपक्षे शेजारच्या  देशांत दौरे करायचे. भारताच्या दौऱ्यावरून परत गेल्यावरच या सगळ्या घडामोडी सुरू झाल्या. बहुमत नसतानाही गेल्या ऑक्टोबरमधे रानिल विक्रमसिंघे यांना बाजूला सारत राजपक्षेंना पंतप्रधान करणं संसदेत टिकू शकलं नाही. त्यामुळं आता श्रीलंकेत जानेवारीमधे संसदेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत निवडून येण्याची खात्री राजपक्षे बोलून दाखवतात. यंदाचा त्यांचा वाढदिवस या सगळ्या घडामोडींमधे साजरा होतोय.

बटनवाला फोन (१९६३)

आजच्या दिवशीच जगाला पहिल्यांदा बटनवाल्या फोनची ओळख झाली. आता आपण बटनपासून टन स्क्रीनपर्यंत आलोय. मोबाईलचा वापर करण्यासाठी आता टचही गरज पडू नये यासाठी शास्त्रज्ञ मंडळींचे प्रयत्न सुरू आहेत. हा मोबाईल केवळ बोटांच्या इशाऱ्यावर चालेल. ही झाली भविष्याची बात. आपण इथपर्यंत पोचलो, ते नंबरचा डायलपॅड फिरवत फिरवत. याच दरम्यान, आजच्या दिवशी ५५ वर्षांपूर्वी अमेरिकन टेलीफोन कंपनी बेल सिस्टिम्सनं जगासमोर बटनवाला डायलपॅड असलेला फोन सादर केला. एवढे दिवस फोनवरची नंबर असलेली चकती फिरवून फिरवून कॉल करणं सुरू होतं. बटनवाल्या फोनची गोष्ट कळाल्यावर सुरवातीला लोकांना यावर विश्वासच बसेना. सुरवातीला यामधे दहाच बटन होते. नंतर पाचेक वर्षांनी स्टार * आणि # हॅश ही दोन नवी बटनं आली. आता तर बटनवाल्या फोनवाल्याकडे तो काही प्राचीन माणूस असल्यासारखं बघतात.