आज रेल्वेचा हॅपी बड्डे, तिला विश केलंय ना!

१६ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


आजपासून बरोबर १६६ वर्षांपूर्वी मुंबईपासून ठाण्यापर्यंत भारतीय भूमीवर पहिली रेल्वे धावली. तेव्हा काही जण तिला भुताटकी मानून घाबरले काहींनी चाक्या म्हसोबा म्हणून तिची पूजा केली. पण ती आज आपल्या सगळ्यांच्या जगण्याचा भाग बनलीय. आपल्या देशाला प्रगतीकडे घेऊन जाणाऱ्या आणि बांधून ठेवणाऱ्या आपल्या रेल्वेला हॅपी बर्थडे म्हणायलाच हवं ना?

आपल्यापैकी अनेकजण रोजच रेल्वेचा प्रवास करतो. स्वस्त आणि वेगवान म्हणून आपल्याला तो आवडतो. पण ते करताना त्याचा पसारा कितीय, ते आपल्या ध्यानातही नसतं. सध्या भारतात एक दोन नाहीत तर तब्बल ८ हजार स्टेशन आहेत. देशातल्या एकूण रेल्वे रुळांची लांबीच १ लाख २० हजार किलोमीटर आहे. त्यावर रोज १२ हजार ६१७ ट्रेन धावतात आणि यातून २३ लाख प्रवासी रोज प्रवास करतात. अशी माहिती भारतीय रेल्वेच्या वेबपोर्टलवर उपलब्ध आहे.

युरोपात २५०० वर्षं जुने रूळ

भारतातला हा रेल्वेचा प्रवास सुरू झाला त्याला आज १६ एप्रिलला बरोबर १६६ वर्षं पूर्ण होत आहेत. पण युरोपातला रेल्वेचा इतिहास हजारो वर्षं जुना आहे. ग्रीसमधे रूळ असल्याचे पुरावे पुरातत्व खात्याला मिळाले होते. हे ट्रॅक सहा आणि आठ किमीचे होते. हे रूळ साधारण इसपूर्व ६०० मधे चाकाच्या गाड्यांसाठी बनवले होते. विशेषत: मोठ्या बोटींना जमिनीवर खेचून आणण्यासाठी नदीजवळ या रुळांचा वापर व्हायचा. 

ऑस्ट्रियामधल्या जंगलात रेल्वेसारख्या लाकडी डब्याच्या गाड्या १५१५मधे वापरल्या जात होत्या, याचाही पुरावा मिळतो. १५५० मधे उत्तर अमेरिकेत ट्राम रेल्वेसारख्या लाकडी ट्रेनला सुरवात झाली. जर्मनीत १६०० मधे लोखंडाच्या प्लेट आणि लाकडाचा वापर केला गेला. पुढे युरोपात इतर ठिकाणीसुद्धा अशा प्रकारच्या लाकडी आणि लोखंडी प्लेटच्या रुळांचा आणि लाकडी गाडीचा वापर कोळशाच्या खाणीत होऊ लागला.

हेही वाचाः १५२ वर्षांपूर्वी विरार लोकल सुरू झाली आणि त्यातून एक शहर उभं राहिलं

त्यानंतर दक्षिण लंडनमधे १७६० लोखंड आणि लाकडी रेल्वे गाडी बनवण्यात आली. त्याची चाकं एकमेकांना जोडलेली होती. जेम्स वॉट या स्कॉटिश इंजिनियरने १७७६मधे वाफेवर चालणारं स्टीम इंजिन बनवले. त्यानंतर १८०४ मधे स्टीम लोकोमोटिव तयार झालं. हे इंजिन आजही वेल्समधल्या म्युझियममधे पाहता येतं, अशी माहिती द लंडन आणि साऊथ वेस्टर्न रेल्वेच्या संशोधन पत्रिकेत दिलीय.

भारतात रेल्वे कशी आली?

युरोपात वाफेवर धावणारी पहिली रेल्वे १८३० मधे धावली. त्यानंतर दोन वर्षांतच मुंबईचे एक शिल्पकार महान समाजसेवक नाना जगन्नाथ शंकरशेट यांनी इंग्रज सरकारपुडे रेल्वेचा प्रस्ताव मांडला. वाफेवर चालणाऱ्या जहाजांचा व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे ते एक डायरेक्टर होतेच. १८४४ला रेल्वेच्या प्रस्तावाला परवानगी मिळाली. ग्रेट ईस्टर्न रेल्वे आणि द इनलँड रेल्वे असोसिएशन अशा कंपन्यांचेही ते सदस्य संचालक होते. 

हेही वाचाः तर पूल बांधायची कामं लष्करावरच सोपवावी लागतील

त्यांच्या प्रयत्नांनी भारतात पहिली रेल्वे भारतात मुंबईत धावली, हे आपल्याला माहीत आहेच. पण त्याआधीही भारतात रेल्वे धावली होतीच. मात्र ती प्रायोगिक तत्त्वावर होती. हरिद्वार येथे १८५१ला मालवाहू रेल्वे धावली. मात्र पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ला बोरीबंदर ते ठाणे अशी धावली होती. त्यावेळी १४ डब्यांच्या रेल्वेतून ४०० प्रवाशांनी रेल्वेतून प्रवास केला. दुपारी साडेतीन वाजता ट्रेन निघाली. हे ३४ किमीचं अंतर १ तास १२ मिनिटांत पार केलं. 

चाक्या म्हसोबा धावला आणि पावलाही

त्यावेळी २५ वीआयपी इंग्रज अधिकाऱ्यांसह नाना जगन्नाथ शंकरशेट यांनीही प्रवास केलेला. ट्रेनच्या स्वागतासाठी बोरीबंदर आणि ठाणे दोन्ही स्टेशनांवर जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र भारतातील सामान्यांनी या रेल्वेचं स्वागत केलं नाही. त्यांनी याला लोखंडी राक्षस, भुताटकी, महाकाय राक्षस असं केलेलं. 

रेल्वे कोळशावर चालत होती. इंजिनात सातत्याने कोळसा टाकण्यासाठी माणसं ठेवलेली असे. कोळशामुळे गाडी चालत असताना धुराचे मोठे लोट निघत आणि कर्कश आवाजामुळे लोकांनी ही नावं ठेवलेली होती. सुरवातीला लोक या रेल्वेला पाहून घाबरत असत. ही आपल्या अंगावर किंवा घरावर तर येणार नाही ना याची त्यांना भीती वाटे. चाक्या म्हसोबा म्हणून त्याची पूजापण केली. 

हेही वाचाः पंच्याहत्तरीतही दिमाखात उभा हावडा ब्रिज

पण त्यानंतर हेच सर्वसामान्य लोक रेल्वेचं कौतूक करू लागले. `सायबाचा पोऱ्या कसा अकली, बिनबैलानं की गाडी हाकली`, अशी गाणी रचण्यात आली. पुढे हीच रेल्वे भारतीयांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली.

रेल्वेचा प्रवास प्रायवेट ते सरकारी

रेल्वे भारतात सुरू झाली ती ग्रेट इंडियन पेनिन्सुला कंपनीकडून. तेव्हा रेल्वे सरकारी नव्हती. सरकारकडून परवानगी घेऊन खासगी कंपन्या स्वतःच रूळ टाकायच्या आणि त्यावर रेल्वे चालवायच्या. वेगवेगळ्या संस्थानांमधे वेगवेगळ्या कंपन्या असायच्या. 

१९४७ पर्यंत अशा सगळ्या कंपन्यांची संख्या ४२ इतकी होती. या कंपन्यांनी देशभर रेल्वेचा विस्तार केला. त्यांनी तर १८८५ पासून भारतात इंजिन बनवण्यास सुरवात केली. स्वातंत्र्यानंतर त्यांचं राष्ट्रीयीकरण करण्यात आलं. ४२ रेल्वे कंपन्यांचे विलीनीकरण केल्यानंतर १९५० नंतर प्रदेशानुसार १८ तर व्यवस्थापनानुसार १३ विभागात करण्यात आले.

हेही वाचाः महात्मा फुलेः जितके मोठे समाजसुधारक, तितकेच यशस्वी उद्योजकही

आजचं बोरीबंदर स्टेशनही खासगी रेल्वे कंपन्यांच्या काळातच उभं राहिलं. हे विक्टोरिय टर्मिनस स्टेशन १९७८ ते १८८८ मधे सर्वांसाठी खुलं झालं. शंभर वर्षांपूर्वी बांधलेलं हे स्टेशन आजही उपयुक्त ठरतं. या स्टेशनचे १८ प्लॅटफॉर्म आज वापरले जातात. या स्टेशनला २००४ला युनेस्को हेरीटेजचा दर्जा मिळाला. 

सुरवातीला बोरीबंदर असं त्याचं नाव होतं. त्याचं नाव विक्टोरिया टर्मिनस झालं. त्याला वर्षानुवर्षं वीटी असं म्हटलं गेलं. त्या वीटीचं सीएसटी झालं. पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री असताना त्याचं नामांतर छत्रपती शिवाजी टर्मिनस असं केलं. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी यांनी केलेल्या मागणीनुसार आता एका वर्षापूर्वी रेल्वेखात्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा बदल केलाय.

रेल्वेचा विकास होत राहिला

मुंबईत इलेक्ट्रिक गाड्यांना १९२५ पासून सुरवात झाली. सर्वात आधी इलेक्ट्रिकीकरण मुंबई लोकलमधे झालं. आज साधारण ५ हजार किमीपेक्षा जास्त ठिकाणी इलेक्ट्रिकीकरण झालंय. १९८०नंतर भारतातल्या दुर्गम भागांमधे रेल्वेच्या कामाला सुरवात झाली. १९९०नंतर एक्सप्रेस ट्रेन सुरू झाली. रेल्वेचा वेग वाढला. 

आज सर्व सुविधा असलेल्या लक्झुरीयस ट्रेनपासून ते परवडणाऱ्या लोकलपर्यंत सर्वच ट्रेन भारतीय रेल्वेत समाविष्ट आहेत. सरकारी आणि खाजगी अॅप, वेबसाईटमुळे ट्रेनचा प्रवास, माहिती, तिकिट बुकिंग करणं अगदी सोप्पं झालंय. मात्र ट्रेन आजही सोयीची आणि परवडणारी असल्यामुळे तिच्या प्रवाशांमधे वर्ष दरवर्षी वाढ होत आहे. म्हणून आज तिच्या वाढदिवसाला हॅपी बर्थडे म्हणायलाच हवं.

हेही वाचाः 

पश्चिम बंगालमधे थेट मोदी विरूद्ध ममता लढत

प्रभू रामचंद्रः महान सांस्कृतिक संघर्षाचा यशस्वी नायक