१५ नोव्हेंबर : आजचा इतिहास

१५ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ५ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १५ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

संगीतकार दत्ता डावजेकर (जन्म १९१७)

तमाशा आणि उर्दू नाटकांमधे तबला वाजवणाऱ्या वडिलांना साथसंगत देत संगीतकार म्हणून नाव कमावणाऱ्या दत्ता डावजेकर यांचा आज जन्मदिवस. सी. रामचंद्र आणि चित्रगुप्त यांचे सहाय्यक म्हणून कामाला सुरवात केली. दत्ता डावजेकरांच्या संगीत दिग्दर्शनाखालीच लता मंगेशकर यांनी मराठी आणि हिंदी सिनेमात गायक म्हणून एंट्री केली. तो सिनेमा होता माझं बाळ (१९४३). डावजेकरांनी त्यानंतर आशा भोसले, उषा मंगेशकर आणि सुधा मल्होत्रा ह्यांनाही पार्श्वगायिका म्हणून संधी दिली.

डावजेकरांनी ६० हून अधिक सिनेमांचे संगीत दिग्दर्शन केले. राजा परांजपे, गजानन जागीरदार, मास्टर विनायक, दिनकर पाटील, दत्ता धर्माधिकारी, राजदत्त, राजा ठाकूर आदी निर्माते-दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलं. रंगल्या रात्री अशा, पाठलाग, पाहू रे किती वाट, थोरातांची कमळा, पडछाया, चिमणराव-गुंड्याभाऊ, पेडगावचे शहाणे, जुनं ते सोनं, संथ वाहते कृष्णामाई आदी चित्रपटातील त्यांचे संगीत विलक्षण गाजलं. १०-१२ नाटकांचेही संगीत दिग्दर्शन केलं. भारतात तयार झालेल्या पहिल्या सिंथेसायझरचे ते जनक म्हणून ओळखले जातात. दत्ता डावजेकर यांचं १९ सप्टेंबर २००७ ला निधन झालं.

बालमित्र गिजुभाई बधेका (जन्म १८८५)

भारतात बालशिक्षणाची पायाभरणी करणारे गिजुभाई बधेका यांचा आज जन्मदिवस. गुजरातमधे जन्मलेल्या बधेका यांनी वकिली करताना एका मुलाला हातपाय बांधून शाळेला नेताना बघितलं. त्यामुळं त्यांनी मारिया माँटेसरी पद्धतीचं बालशिक्षण द्यायला सुरवात केली. १९२० मध्ये गिजुभाईंनी दक्षिणमूर्ती संस्थेचे बालमंदिर तर १९२५ मध्ये भारतातील पहिले पूर्वप्राथमिक प्रशिक्षण कॉलेज सुरू केले. ताराबाई मोडक यांच्या मदतीने गिजुभाईंनी ‘शिक्षणपत्रिका’ हे गुजराती मासिक चालवलं. केवळ बालकांसाठी असणारी ‘वाचनमाला’ सुरू केली. त्यांना ‘बालमित्र’ या पदवीने सन्मानित करण्यात आलं होते. गिजुभाई बधेका यांचं २३ जून १९३९ रोजी निधन झालं. 

‘हायकू’कार शिरीष पै (जन्म १९२९)

‘हायकू’ काव्यप्रकार मराठीत आणणाऱ्या कवयित्री, संपादक शिरीष पै यांचा जन्मदिवस. विशेष म्हणजे, मुलीच्या जन्मदिवसादिवशीच १९५६ मधे आचार्य अत्र्यांनी ‘मराठा’ दैनिक सुरू केलं. पुढं शिरीष पै दैनिक ‘मराठा’च्या संपादक झाल्या. ‘प्रेम कहाणी’, ‘ऊन-सावली’, ‘ओशो’, ‘प्रियजन’,‘पप्पा’ अशा अनेक पुस्तकांचं लेखन त्यांनी केलं. एक तारी, एका पावसाळ्यात, गायवाट, कस्तुरी, ऋतुचक्र आदी कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. मराठीत जपानी हायकू हा काव्यप्रकार त्यांनी रुजवला. लालन बैरागीण,  हे ही दिवस जातील या कादंबऱ्या त्यांनी लिहल्या. बाल साहित्य, ललित साहित्य, नाटकं, कथा असे वेगवेगळे साहित्य प्रकार त्यांनी हाताळले.

रहस्यकथा लेखक सुहास शिरवळकर (जन्म १९४८)

मराठीत सर्वदूर चाहते असणारे रहस्यकथा लेखक सुहास शिरवळकर यांचा आज जन्मदिवस. वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी लिहिलेल्या 'दुनियादारी' या पहिल्याच कादंबरीला मराठी वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. काही वर्षांपूर्वीच या कादंबरीवर आधारीत दुनियादारी सिनेमानंही भरपूर कमाई केली. आपल्या प्रसन्न, खेळकर लेखन शैलीसाठी ते ओळखले जातात. छोटी छोटी वाक्य, बोली भाषेचा वापर आणि संवादात्मक शैलीमुळं त्यांचं लिखाण वाचकांमधे लोकप्रिय झालं.

जवळपास १५० रहस्यमय कादंबऱ्या त्यांनी लिहल्या. कोवळिक, वास्तविक, वेशीपलीकडे, यासारख्या ७१ लोकप्रिय कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. ११ कथासंग्रह, पाच नभोनाट्यं आणि विविध वृत्तपत्रांत त्यांनी विपुल लेखनही केलं. मराठी वाचकांचं अफाट प्रेम मिळालेल्या या रहस्यकथाकाराचं ११ जुलै २००३ ला निधन झालं.

टेनिसपटू सानिया मिर्झा (जन्म १९८६)

भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाचा आज आपला ३२ बड्डे साजरा करतेय. २००३ ते २०१३ पर्यंत सानियानं महिला टेनिस टीममधे टॉपची भारतीय टेनिसपटू राहिली. २००६ मधे तिला ‘पद्मश्री’नं सन्मानित करण्यात आलं. ‘पद्मश्री’ मिळणारी ती सगळ्यात कमी वयाची खेळाडू ठरली. याआधी २००५ मधे तिला अर्जून पुरस्कार मिळाला होता.

मुंबईत जन्मलेल्या सानियाचं शिक्षण हैद्राबादला झालं. डिसेंबर २००८ मधे चेन्नईच्या एका युनिवर्सिटीतून तिनं डॉक्टरेट पदवी मिळवली. टेनिसपटू म्हणून १९९९ मधे सुरवात करणाऱ्या सानियानं २००३ मधे विम्बलडन जिंकलं. २००५ मधे जगातील सर्वोत्तम टेनिसपटूला हरवून यूएस ओपनचा किताब जिंकला. २००९ मधे सानिया मिर्झा ग्रँड स्लॅम जिंकणारी पहिली महिला टेनिसपटू बनली. पुढं पाकिस्तानचा बॅट्समन शोएब मलिकशी लग्न करणाऱ्या सानियानं भारताकडून खेळणं मात्र सोडलं नाही. आपण पाकिस्तानी क्रिकेटपटूशी लग्न केलो म्हणजे मी काय लगेच पाकिस्तानची सून झाले नाही, असं तिनं स्पष्ट केलं होतं. ऑक्टोबरमधेच मुलगा झाल्यामुळं शोएब मलिकनंही यंदा टी१० लीगमधे भाग घेणार नसल्याचं कालचं ट्विट करून बायकोला बर्थडे गिफ्ट दिलंय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.