प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १५ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.
भारताचे दहावे मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचा आज जन्मदिवस आहे. आज आपल्याकडे प्रत्येकाकडे जे वोटर आयडी कार्ड आहे, ती कल्पनाच शेषन यांनी मांडली. निवडणुकीमधे कोणताही पक्षपातीपणा होऊ नये म्हणून त्यांनी जोरकस प्रयत्न केले. डिसेंबर १९९० ते १९९६ या काळात ते मुख्य निवडणूक आयुक्त राहिले.
१९३२ मधे तत्कालीन मद्रास प्रांताचा भाग असलेल्या केरळात त्यांचा जन्म झाला. १९९६ मधे शेषन यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. निवडणूक आयोगाचा कार्यकाळ संपल्यावर शेषन यांनी १९९७ मधे स्वतः राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवली. मात्र, यात त्यांचा के. आर. नारायणन यांच्याकडून पराभव झाला. वोटर आयडीच्या माध्यमातून प्रत्येकाला ओळख देणारे शेषन म्हातारपणाचं जगण वृद्धाश्रमात घालवत आहेत.
जगप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ, ललित निबंध लेखिका इरावती कर्वे यांचा आज जन्मदिवस. तत्त्वज्ञानात बी. ए. केलेल्या इरावतीबाईंनी ‘चित्पावन ब्राम्हिन्स : अ सोशियोएथनिक स्टडी’ या विषयावर प्रबंध लिहून एमएची पदवी मिळवली. त्यानंतर मानववंशशास्त्रात जर्मनीच्या बर्लिन विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली. कुटुंब संस्थेवरचा ‘किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया’ या त्यांच्या पुस्तकाला जगभरात प्रसिद्धी मिळाली.
संशोधनपर लिखाणासोबतच इरावतीबाईंनी जगभराच्या प्रवासात आलेले अनुभव शब्दबद्ध केले. ‘मराठी लोकांची संस्कृती’, ‘आमची संस्कृती’, ‘युगांत’, ‘धर्म’ आणि ‘संस्कृती’ या संशोधनपर ग्रंथांसोबतच ‘परिपूर्ती’, ‘भोवरा’, ‘गंगाजळ’ हे त्यांचे ललित संग्रह गाजले. मराठी लघुनिबंधाच्या विकासाचा एक टप्पा म्हणून इरावतीबाईंच्या लेखनाकडे बघितलं जातं. ११ ऑगस्ट १९७० ला म्यानमारमधे त्यांचं निधन झालं.
मंगेशकर घराण्यातला आणखी एक गाणारा गळा म्हणजे उषा मंगेशकर. ‘छबीदार छबी मी तोऱ्यात उभी’, ‘एक लाजरा न् साजरा’, ‘काय बाई सांगू’, ‘खेळ कुणाला दैवाचा कळला’, ‘मुंगळा’ यासारखी असंख्य गीतं आपल्या गोड आवाजाने उषाताईंनी अजरामर केली. मराठी, हिंदी, गुजराती आणि नेपाळी भाषेतही त्यांनी गायन केलं. पण त्यांना नाव मिळालं ते ‘जय संतोषी माँ’ सिनेमातल्या गाण्यांनी. मैं तो आरती उतारु रे या गाण्यासाठी तर त्यांना वूमन सिंगरसाठीच्या फिल्मफेअर अवॉर्डसाठी नामांकन झालं.
भक्तीगीत, भावगीतासोबतच लोकसंगीत ते चित्रपट संगीत अशा सगळ्या प्रकारात त्यांनी आपली मोहोर उमटवली. आपल्या मोठ्या बहिणी लता मंगेशकर आणि आशा भोसले यांची गाणी आजही लोकांच्या ओठांवर आहेत. तसं उषाताईंच नाही. पण त्यांचं काही गाणी आजही सुपरडूपर हिट आहेत. मुंगळा गाण्यासोबतच पिंजरा सिनेमातली त्यांची गाणी गाजली.
फुटबॉलचं मैदान गाजवणारा बायचूंग भुतिया आता राजकारणाच्या रिंगणात उतरलाय. तृणमूल काँग्रेससोबत असलेल्या भुतियाने स्वतंत्र गोरखालँडच्या मागणीला पाठिंबा दिला. त्यावरून पश्चिम बंगालमधे सत्ताधारी असलेल्या तृणमूल काँग्रेस आणि त्याच्यामधे मतभेद झाले. तृणमूलला रामराम करत ‘हमारो सिक्कीम पार्टी’ची घोषणा केली. आज ४२ वर्षाचा झालेल्या भुतियाने भारतीय फुटबॉल टीममधे एक स्ट्राइकर म्हणून भूमिका पार पाडली.
सिक्कीममधे जन्मलेल्या भुतियाने १९९३ मधे आपलं फुटबॉलचं करिअर सुरू केलं. आय लीग फूटबॉल टीम इस्ट बंगाल क्लबकडून तो खेळायचा. त्यानंतर १९९५ ते २०११ पर्यंत तो भारतीय टीमसाठी खेळायचा. बायचुंग भुतिया म्हणजे भारतीय फूटबॉल टीमला मिळालेलं गॉड्स गिफ्ट आहे, असा उल्लेख जाणकारांनी केलाय. पद्मश्री, अर्जून अवॉर्ड, नेहरू कप, एलजी कप यासारख्या अनेक पुरस्कारांनी त्याला सन्मानित करण्यात आलंय.
हिंदी सिनेमामधे हिरोएवढीच प्रसिद्धी विलनलाही मिळते. आपल्या खलनायकी अॅक्टिंगने बॉलीवूड गाजवणारे गोगा कपूरही खूप फेमस झाले. आताच्या पाकिस्तानात जन्मलेले गोगा कपूर सिनेमात येण्याआधी थिएटर आर्टिस्ट होते. १९७१ मधे आलेल्या 'ज्वाला' सिनेमाने त्यांची बॉलीवूडमधे एंट्री झाली.
'कयामत से कयामत तक', 'अग्निपथ', 'शहनशाह', 'जिगर', 'मैं खिलाड़ी तू अनाड़ी', 'राजा को रानी से प्यार हो गया', 'तूफान' आणि 'पत्थर के फूल' यासारख्या सिनेमे त्यांनी आपल्या अॅक्टिंगच्या जोरावर गाजवले. टीवी सीरियल 'महाभारत'मधे त्यांनी केलं. ३ मार्च २०११ ला दीर्घ आजाराने वयाच्या सत्तरीत गोगा कपूर यांचं निधन झालं.