१४ नोव्हेंबरः इतिहासात आज

१४ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ५ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १४ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

देवांना चेहरा देणारे रघुवीर मुळगावकर (जन्म १९१८)

महाराष्ट्राच्या देव्हाऱ्यातली देवदेवतांची चित्रं साकारणारे महान चित्रकार रघुवीर शंकर मुळगावकर यांची आज जन्मशताब्दी. गोव्यात जन्मलेल्या मुळगावकर चित्रकलेच्या शिक्षणासाठी मुंबईत आले. त्याकाळी सिनेमाचे पोस्टर, कॅलेंडर, मॅगझिन यांच्याकडे चित्रकारांना मोठी डिमांड असायची. मराठीतल्या सर्व आघाडीच्या प्रकाशनांनी त्यांच्याकडून पुस्तकांची कवर केली. शिवाय देवांची चित्र काढण्याचा राजा रवीवर्मा यांचा वारसा त्यांनी पुढं चालवला म्हटलं तर वावगं ठरू नये.  देवीदेवतांबरोबर मराठी साहित्यात गाजलेल्या अनेक व्यक्तिरेखाही त्यांनी जिवंत केली. त्यात बाबूराव अर्नाळकरांचे धनंजय, छोटू, झुंझार विजया, काळा पहाड, धर्मसिंग, चारुहास प्रमुख होते. त्यांनी जवळपास पाच हजारांहून अधिक चित्रं त्यांनी काढली. त्यांचं निधन ३० मार्च १९७६ ला निधन झालं.

क्रांतिपिता लहूजी वस्ताद (जन्म १७९४)

आपल्या तालमीत देशभक्त आणि क्रांतीवीर घडवणारे वस्ताद लहूजी साळवे यांचा आज जन्मदिवस. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी पेठ गावातल्या एका मातंग कुटुंबात लहुजी राघोजी साळवे यांचा जन्म झाला. लहुजींच्या पूर्वजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात पराक्रम गाजवला. साळवे कुटुंबाच्या शौर्यासाठी, निष्ठेसाठी शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना ‘राऊत’ या पदवीने गौरव केला. आजपासून शंभर वर्षांपूर्वी १८१७ मधे खडकी इथं पेशवे-इंग्रज युद्ध सुरू झालं. या युद्धात २३ वर्षांच्या लहुजींनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन इंग्रजांविरुद्ध निकराचा लढा दिला. वडील राघोजींचा या युद्धातच मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी तरुणांना युद्धकलेचं प्रशिक्षण देण्यासाठी १८२२ मधे पुण्याच्या रास्ता पेठेत तालीम सुरू केली. युद्धकलेचं प्रशिक्षण देणारी ही देशातली पहिली शाळा होती. महात्मा जोतीराव फुले यांच्यासह अनेक मान्यवरांनी लहुजी साळवे यांच्या आखाड्यात शारीरिक शिक्षणाचे धडे गिरवले. १३ महिन्यांनीच १७ फेब्रुवारी १८८१ ला त्यांची प्राणज्योत मालावली. क्रांतिपिता लहुजी साळवे यांची पुण्याच्या संगमवाडीत समाधी आहे.

कादंबरीकार नारायण हरी आपटे ( निधन १९७१)

कादंबरीकार, संपादक नारायण हरी आपटे यांचा आज स्मृतीदिवस. आपटेंनी कादंबऱ्यांसोबतच लघुकथासंग्रह आणि वैचारिक लेखनही केलं. जवळपास ३५ कादंबऱ्या लिहिल्या. ‘किर्लोस्कर खबर’ या नियतकालिकाचे ते सहसंपादक होते. सुखाचा मूलमंत्र, पहाटेपूर्वींचा काळोख, उमज पडेल तर, एकटी या त्यांच्या काही प्रसिद्ध सामाजिक कादंबऱ्या आहेत. अजिंक्यतारा, संधिकाल, लांच्छित चंद्रमा आणि रजपूतांचा भीष्म या ऐतिहासिक कादंबऱ्याही गाजल्या. त्यांच्या भाग्यश्री कादंबरीवर अमृतमंथन आणि रजपूत रमणीवर भाग्यरेखा हा सिनेमा गाजला. न पटणारी गोष्ट या कादंबरीवर कुंकू या सिनेमाने इतिहास घडवला. 

कथ्थक नृत्यांगना रोहिणी भाटे (जन्म १९२४)

मराठी घरांमधे स्टेज डान्सची परंपरा रुजवणाऱ्या कथ्थक नर्तकी रोहिणी भाटे यांचा आज जन्मदिवस. मध्यमवर्गीय, पांढरपेशा घरातल्या मुलींनी स्टेजवर जाऊन नाचणं हे समाजमान्य नव्हतं अशा काळात रोहिणी भाटेंनी कथ्थक डान्सर होण्याचा निर्णय घेतला. नृत्यासोबत त्यांना कविता आणि गायनातही रस होता. या सगळ्याचा त्यांनी नृत्यासाठी उपयोग करून घेतला.  १९४७ मधे त्यांनी नृत्यभारती कथक नृत्य अकादमी स्थापन केली. संगीत नाटक अकादमीसह अनेक पुरस्कार त्यांना लाभले. लहेजा नावानं त्यांनी आत्मचरित्र लिहिलंय. रोहिणी भाटे यांचे १० ऑक्टोबर २००८ ला निधन झालं. आज रोहिणी भाटेंचा शिष्यपरिवार जगभर पसरलाय.

मराठी रंगभूमीचा शो मॅन सुधीर भट (निधन २०१३)

मराठी एकाहून एक सरस नाटकं रंगभूमीवर आणून सुपरहिट करणारे नाट्यनिर्माते सुधीर भट यांचा आज स्मृतीदिवस. सुधीर भट यांनी गोपाळ अलगेरी यांच्यासोबत मिळून १ जानेवारी १९८५ ला सुयोग नाटसंस्था सुरू केली. आचार्य अत्रेलिखित ‘मोरूची मावशी’ नाटकाचे हजाराहून अधिक विक्रमी प्रयोग केली. सुयोगकडे ८० हून जास्त नाटकं, १६ हजाराहून अधिक प्रयोग आणि हजार प्रयोगांचा टप्पा ओलांडणाऱ्या ८ नाटकांची निर्मिती केली.  सुयोगच्या माध्यमातून त्यांनी एका लग्नाची गोष्ट, कबड्डी कबड्डी, चार दिवस प्रेमाचे, मोरुची मावशी, ती फुलराणी, तरुण तुर्क म्हातारे अर्क, एका अशी नवीजुनी नाटकं गाजवली. मराठी नाटकांचा त्यांनी सातासमुद्रापार झेंडा रोवला. अशा या मराठी रंगभूमीच्या शो मॅनचं १४ नोव्हेंबर २०१३ ला निधन झालं.