१४ डिसेंबरः आजचा इतिहास

१४ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १४ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

मराठमोळा वारसा ग. दि. माडगूळकर (निधन १९७७)

गदिमा म्हणजे मराठी मनाचा मानबिंदू. त्यांची जन्मशताब्दी यावर्षी उत्साहाने साजरी होतेय, यातच त्यांच्या शब्दांची ताकद दिसून येते. अत्यंत गरिबीत छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. तिथून ते सिनेमाच्या जगात पोचले. सुरवातीला छोट्या भूमिका, सहदिग्दर्शन करता करता ते कथा पटकथा आणि गाणी लिहू लागले. दीडशेहून अधिक मराठी सिनेमे आणि पंधरा हिंदी सिनेमे यांच्यात त्यांच्या लेखणीचं योगदान आहे.

अस्सल मराठमोळेपणा ही त्यांच्या लिखाणाची खासियत होती. कवी, कादंबरीकार, ललितलेखक म्हणूनही ते लोकप्रिय होते. त्यांची भाषा आजही ताजी वाटते. गुरुदत्तचा प्यासा, राजेश खन्नाचा अवतार आणि अमिताभ-राणी मुखर्जीचा ब्लॅक या सिनेमांचं मूळ कथासूत्र गदिमांचंच होतं. ते स्वातंत्र्यसैनिकही होते. प्रतिसरकारमधे ते क्रांतिसिंह नाना पाटलांच्या खांद्याला खांदा लावून लढले. काँग्रेसचे आमदार म्हणूनही ते विधानपरिषदेवर दीर्घकाळ होते. ते यवतमाळच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. तिथेच गदिमांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी पुन्हा साहित्य संमेलन होतंय.

योगगुरू बीकेएस अय्यंगार (जन्म १९१८)

९४व्या वर्षी निधन झालेले बीकेएस अय्यंगार आज असते तर शंभरावा वाढदिवस साजरा करत असते. अनेकांना तसं वाटतही होतं. त्यांचे गुरू तिरुमलाई कृष्णमचार्य यांच्या बरोबरीने देशभर आणि जगातही योग लोकप्रिय करण्याचं श्रेय योगगुरू बीकेएस अय्यंगार यांना जातं.

लहानपणी सततच्या आजारांना कंटाळून त्यांनी योगाचा सहारा घेतला. १९३७ला वयाच्या अठराव्या वर्षी ते पुण्यात आले आणि योगाच्या प्रशिक्षणाला सुरवात केली. जे. कृष्णमूर्ती, जयप्रकाश नारायण यांच्यापासून सचिन तेंडुलकर, करिना कपूरपर्यंत अनेकांना त्यांनी योग शिकवला. बेल्जियमच्या राणीला वयाच्या ८०व्या वर्षी शीर्षासन शिकवून त्यांनी जगाचं लक्ष वेधून घेतलं. जगभरातलेही अनेक सेलिब्रेटी त्यांचे शिष्य बनले. पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित अय्यंगार यांना २००४ला टाइम मॅगझिनने जगातल्या सर्वात प्रभावी १०० व्यक्तींच्या यादीत स्थान दिलं होतं, यावरून त्यांचा प्रभाव लक्षात येतो.

स्वप्नाळू शोमन राज कपूर (जन्म १९२४)

राज कपूर हे नाव घेतल्याशिवाय भारतीय सिनेमांचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही, इतका प्रभाव त्यांचा आजच्या बॉलीवूडवरही आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा भारताने राज कपूरच्या निळ्या डोळ्यांनीच नव्या भारताची स्वप्नं पाहिली. गरिबांच्या व्यथा हसत खेळत मांडतानाच राज कपूरनेच भारतीय सिनेमाला मोठी स्वप्नं पाहायची सवय लावली.

वडील प्रसिद्ध अभिनेते असूनही त्यांनी स्पॉटबॉय म्हणून कामाला सुरवात केली. तेव्हापासून प्रसिद्ध आर. के. स्टुडियोचा मालक होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास चढउतारांची अनोखी कहाणी आहे. त्यांनी त्यांच्या सिनेमांत एकाच वेळेस भाबडा आदर्शवाद, सामाजिक समस्या, स्त्रीदेहाचं कलात्मक दर्शन, अप्रतिम संगीत, भव्यदिव्य सेट्स असा मालमसाला गच्च भरलेला असायचा. निर्माते दिग्दर्शक याच बरोबर अभिनेते म्हणूनही त्यांचं योगदान महत्त्वाचंच आहे. श्री ४२०, आवारा, अंदाज, संगम, बूट पॉलिश, मेरा नाम जोकर, प्रेम रोग, जिस देश में गंगा बहती हैं, तिसरी कसम या त्यांच्या अजरामर कलाकृती आहेत. त्यांची मुलं आणि नातवंडं आजही त्यांचा सिनेमाचा वारसा पुढे नेत आहेत.

आणीबाणीचे विलन संजय गांधी (जन्म १९४६)

आज नरेंद्र मोदी आणि भाजपवर हुकूमशाहीचे आरोप होतात, तेव्हा भाजपच्या हातात काँग्रेसवर टीका करण्यासाठी हुकूमाचा पत्ता असतो, तो म्हणजे आणीबाणी. त्या बहुचर्चित आणीबाणीचे मेन विलन होते, संजय गांधी.

इंदिरा गांधी यांचे ते छोटे आणि लाडके चिरंजीव होते. मोठ्या राजीवना राजकारणात रस नव्हता. त्यामुळे संजयच इंदिरा गांधी यांचे वारसदार मानले जात होते. आणीबाणीच्या काळात मात्र त्यांच्या अतिरेकी सुधारणांनी देश हैराण झाला होता. त्यांच्यावर आणीबाणीचा गैरवापर केल्याचे आरोप झाले. त्यामुळे बदनाम होऊन काँग्रेस पराभूत झाली आणि संजय गांधी यांचा काळ संपला. वयाच्या ३३ व्या वर्षी एका हेलिकॉप्टर अपघातात त्यांचं निधन झालं.

सिनेमातला भाष्यकार श्याम बेनेगल (जन्म १९३४)

सिनेमा हा फक्त बाजार किंवा दाखवेगिरी नाही. ती एक कला आहे. वास्तवाचं दर्शन घडवून विचार करायला लावण्याची प्रचंड ताकद सिनेमात आहे. हे भारतीयांना ज्या सिनेकर्मींनी समजावून सांगितलं, त्यात श्याम बेनेगल यांचं नाव आघाडीवर असेल.

गुरुदत्तचे लांबचे नातेवाईक होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना सिनेमा बनवायचा होता. त्यासाठी ते एफटीआयआयमधे शिकले. मुंबईत जाहिराती बनवल्या. पहिला सिनेमा बनवला अंकुर. तोही तेलंगणातल्या शेतकऱ्यांच्या शोषणावर. तो भारतातल्या समांतर सिनेमांची चवळळ सुरवात करणाऱ्या सिनेमांपैकी एक होता. त्यानंतर त्यांच्या निशांतचा कान्स फेस्टिवलमधे सन्मान झाला. भूमिका, मंथन, चरणदास चोर, जुनून, मंडी, सरदारी बेगम, मम्मो, झुबेदा, मेकिंग ऑफ महात्मा, नेताजी सुभाषचंद्र बोस, वेलडन अब्बा असे त्यांचे अनेक सिनेमा माईलस्टोन बनले. भारत एक खोज, यात्रा, संविधान अशा टीवी मालिकाही क्लासिक म्हणून गणल्या गेल्या. ८ नॅशनल अवॉर्ड, पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार अशा पुरस्कारांनी त्यांच्या कर्तृत्वावर शिक्कामोर्तब केलंय.