१३ नोव्हेंबरः आजचा इतिहास

१३ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ५ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १३ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

स्वातंत्र्यसैनिक मुख्यमंत्री वसंतदादा पाटील (जन्म १९१७)

सहकारातून ग्रामीण विकासाचं मॉडेल उभारणारे स्वातंत्र्यसैनिक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा आज जन्मदिवस. वसंतदादांचं हे मॉडेल पुढं जगभर प्रसिद्ध झालं. स्वातंत्र्य चळवळीतही त्यांचा मोठा सहभाग होता. स्वतंत्र भारतातल्या पहिल्या निवडणुकीतच ते सांगलीतून आमदार म्हणून निवडून आले होते. १९७७ ते १९८५ या काळात ते चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. काही काळ राजस्थानचे राज्यपालही होते.

स्वतः सातवीपर्यंत शिकलेल्या वसंतदादांनी १९८३ मधे मुख्यमंत्री असताना विनाअनुदानित तत्त्वावर इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजला मान्यता देण्याचं धोरण राबवलं. महाराष्ट्रातील पोरांना उच्च शिक्षणासाठी दुसऱ्यांच्या दारात जायची वेळ येऊ नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला होता. आज शिक्षणासाठी देशभरातून महाराष्ट्रात विद्यार्थी येतात. मोठंमोठी राजकीय पद भूषविण्याअगोदरच वसंतदादांना त्यांच्या कारकीर्दीसाठी पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. वसंतदादांनी सांगलीत देशातला सगळ्यात मोठा सहकारी साखर कारखाना उभारला. कारखान्यासोबतच सहकारी बँका, पतसंस्था, छोटे-मोठे दूधसंघ यांची उभारणी करण्यावर त्यांचा भर होता. त्यांनी केलेल्या कामामुळंच आताआतापर्यंत सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. वसंतदादांचं १ मार्च १९८९ ला निधन झालं.

पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅरिस्टर जयकर (जन्म १८७३)

स्वातंत्र्यपूर्व काळात ऐतिहासिक करारांवर सह्या करणारा माणूस म्हणजे बॅरिस्टर मुकुंद जयकर. आज त्यांचा जन्मदिवस. मुंबईतल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या जयकर यांनी लंडनला जाऊन बॅरिस्टरकीचं शिक्षण घेतलं. मुंबई हायकोर्टात त्यांनी वकीली सुरू केली. त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेतला नसला तरी राजकीय वाटाघाटीत यशस्वीरित्या मध्यस्थी केली. ’गांधी–आयर्विन करार (१९३१) आणि ’पुणे करार’ (१९३२) या करारांवर सह्या करणाऱ्या नेत्यांमधे त्यांचा समावेश होता. आपल्या वकिलीतून मिळणारा पैसा ते वेगवेगळ्या संस्था, संघटनांना द्यायचे. संविधान समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलं. पुणे विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरू होते. त्यांच्या नावानं विद्यापीठात बॅरिस्टर जयकर लायब्ररी उभारण्यात आलीय.

'स्टडीज इन वेदान्त' या इंग्रजी पुस्तकाचं जयकरांनी संपादन केलं. 'मराठी मंदिर' या नियतकालिकात त्यांनी वेगवेगळ्या लेखांद्वारे आपले हिंदू धर्मविषयक विचार मांडले. पुण्यात शंभर वर्षांपूर्वी १९१८ मधे भरलेल्या १४ व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद बॅ. जयकरांनी भूषविलं होतं. जयकर यांचं १० मार्च १९५९ ला निधन झालं.

शारदाकार गोविंद बल्लाळ देवल (जन्म १८५५)

सांगलीजवळच्या हरिपूर इथं जन्मलेल्या गोविंद बल्लाळ देवल यांना लहानपणापासून नाटक, कवितांचा नाद होता. बेळगावला असतानाच त्यांनी अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या किर्लोस्कर नाटक मंडळीत जायला सुरवात केली. तिथं ते सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत. पुण्यात आर्योद्धारक नाटक मंडळी नावाची संस्था सुरू केली. १९१३ साली ते बालगंधर्वांच्या गंधर्व नाटक मंडळीत गेले. तिथंच त्यांचा उत्तम नट म्हणून नावलौकिक झाला. त्यांच्या जीवावर अनेक नाटक कंपन्या मोठ्या झाल्या. दुर्गा, मृच्छकटिक, विक्रमोर्वशीय, झुंजारराव, शापसंभ्रम, संगीत शारदा, आणि संशयकल्लोळ अशी सात नाटकं लिहली. यापैकी ‘शारदा’ वगळता उरलेली सगळी नाटकं त्यांनी संस्कृत आणि इंग्रजीतून रूपांतरीत केली होती. गोविंद बल्लाळ देवल यांचे १४ जून १९१६ ला निधन झालं.

स्ट्रॉंगमन प्रियरंजन दासमुन्शी (जन्म १९४५)

राजकीय आणि प्रशासकीय अनुभव गाठीशी असलेल्या प्रियरंजन दासमुन्शी यांचा आज जन्मदिवस. पश्चिम बंगालवर डाव्या पक्षांचा पगडा असताना दासमुन्शी एकट्याच्या बळावर काँग्रेसचा किल्ला लढवायचे. अनेक वर्ष ते पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. जवळपास दोन दशकं ते ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष राहिले. पश्चिम बंगालचे स्ट्राँगमॅन म्हणूनही त्यांची ख्याती होती. १९९९ पासून पश्चिम बंगालच्या रायगंज मतदारसंघाचं त्यांनी नेतृत्व केलं. युपीएच्या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा कारभार पाहिला. त्यांच्या काळातच फॅशन टीवीवर आक्षेपार्ह मजकूर दाखवल्यावरुन बंदी घालण्यात आली होती. २० नोव्हेंबर २०१७ ला त्यांचं दीर्घ आजारानं निधन झालं.

एवरग्रीन जूही चावला (जन्म १९६७)

बॉलीवूड हिरोईन, फिल्म प्रोड्यूसर जुही चावला आज आपला ५१ वाढदिवस साजरा करतेय. पंजाबच्या लुधियानात जन्मलेल्या जुहीनं १९८४ मधे मिस इंडियाचा किताब जिंकला. ८० च्या दशकातच तिने सिनेमात एंट्री केली. जुहीनं हिंदीसोबतच पंजाबी, मल्याळम, तामिळ, तेलगू, बंगाली सिनेमांत काम केलंय. जवळपास ३ दशकं ती बॉलीवूडमधली टॉपची हिरोईन होती. बॉलीवूडमधे जुही-शाहरूख खान ही जोडी आजही नावाजली जाते.

१९८६ मधे 'सल्तनत' सिनेमातून बॉलीवूडमधे एंट्री घेतलेल्या जुहीला खरी ओळख मिळाली ती १९८८ मधे आलेल्या ‘कयामत से कयामत तक’मधून. त्यानंतर स्वर्ग (1990), कर्ज चुकाना है (1991), हम हैं राही प्यार के (1993), आतंक ही आतंक (1995), मिस्टर एंड मिसेज खिलाड़ी (1997), ‘यस बॉस’ यासारख्या सिनेमात तिनं काम केलं. 'हम हैं राही प्यार के'साठी जुही चावलाला 1994 मधे फिल्मफेयर बेस्ट एक्ट्रेस अवॉर्ड मिळाला. अक्टींगसोबतच तिनं काही सिनेमांची निर्मितीही केली. ‘आयपीएल‘मधल्या कोलकता नाईट रायडर्स टीमची सहमालकी तिच्याकडे आहे.